top of page
Writer's pictureNayanesh Gupte

दहीहंडी

का रचली त्याने मानवी थराची दहीहंडी ?

दह्याची हंडी ही जर यशाची हंडी आहे असा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की यशाचा मार्ग वर चढून जाताना कित्येक खंबीर जणांची त्यात मदत होत असते. कित्येक जणांचे त्यात हातभार लागत असतात. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे त्याने निर्माण केलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत प्रत्येक जण महत्त्वाचा घटक आहे. त्या थरातील एकाचा जरी पाय डगमगला तर संपूर्ण थर कोलमडतो. वरून खाली पडणाऱ्याला झेलून त्याला परत वर चढण्याची उमेद द्यायला शिकवते दहीहंडी!

कृष्णाने ते लोणी एकट्याने कधीच खाल्ले नाही. त्याने ते मित्रांनाच नाही, तर माकडांना सुद्धा वाटून टाकले. थराच्या सर्वात वरच्या टोकाला पोहचणाऱ्याची ही नैतिक जबाबदारी आहे की त्याने ते लोणी सगळ्यांसोबत वाटून खावे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यात भेदभाव करू नये. सुपात्री दान महत्त्वाचं. ब्राम्हण आहे की माकड हा विचार करू नये.


जिने "माझं माझं" करून लोणी लपवून ठेवले त्यांचे लोणी तर त्याने मडके फोडून अक्षरशः माकडांना वाटले किंवा फुकट सुद्धा गेलं. सगळं त्याचच आहे. मी माझं करत बसणारे सगळं काही गमावून बसतात. संपत्तीचा विनियोग हा जर दान देणे, उपभोग घेणे, योग्य ठिकाणी खर्च करणे असा न करता तिचा फक्त संचय केला असता ती चंचला आपला मार्ग शोधते आणि संचय करणाऱ्यांकडून नाश पावते. या उलट जो सगळ्यांसोबत वाटून खातो त्याला कमी कधीच पडत नाही. तो कृष्ण त्याला अजून भरभरून देतो!


आधी म्हणालो तसं थराच्या खाली उभे असणारे ताकदीने कितीही सामर्थ्यवान असले तरी सगळ्यात उच्च स्तरावर कृष्ण हाच त्यांचा पालनकर्ता आहे. त्याच कोणामुळेही काहीही अडत नाही. त्याला जे हवं तो ते सहज मिळवू शकतो. कारण सर्व काही त्याचच आहे. त्याच्या सेवेत असणारे आपण फक्त निमित्तमात्र असतो. त्याला त्या लोण्याची आवश्यकता नसली तरी आपण शरणागती पत्करून जेंव्हा सर्व काही त्याला अर्पण करतो तेंव्हा आपल्या कर्माच्या फळाप्रमाने आपल्या वाटच लोणी तो परत आपल्यालाच देतो. तो मनकवडा आपला परम् मित्र आहे हे तो वारंवार सांगतो म्हणून त्याला ज्याने सर्वस्व अर्पण केलं त्याला तो रिकाम्या हाती कसा ठेवेल?


यावर लिहीत जाईन तेवढं कमीच आहे. त्याने भगवद्गीता फक्त रणांगणावर नाही सांगितली. त्याच संपूर्ण आयुष्य त्याने ती त्याच्या स्वतःच्या कृतीतून सिद्ध करून दाखवली.


ज्याने कृष्ण जाणला त्याने आयुष्याच सार खऱ्या अर्थाने जाणल!


57 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page