हा लेख, चिंतन मी नक्की कोणत्या महिन्यात लिहायला घेतलं ते पण आठवत नाही पण ते सहज सहजी पूर्ण होतं नव्हतं. याची सुरुवात झाली जेंव्हा स्वामींसाठी मोठा देव्हारा घ्यायचा म्हणून संकेत मिळाले आणि देव्हारा घरी आला. तेंव्हा "देव देव्हाऱ्यात नाही" हा लेख लिहिला आणि त्याच सोबत अलीकडेच ज्या गायिकेने गायलं होतं त्याची YouTube लिंक मी त्या लेखात दिली होती. पण त्या गाण्यापासून संगीताची एक नवीन मालिका सापडली - "शतजन्म शोधताना". याच सुमारास माझं युगंधर वाचन सुरू झालं. तिथून सुरू झालं विचारांचं मंथन, चिंतन एका क्लिष्ट विषयाबद्दल - राधा कृष्णाच्या नात्याबद्दल!
"निखळ प्रेमाचं" असं या जगातील पहिलं वाहिलं नातं कोणतं? जे सकल जनांनी, समाजाने मान्य केलं? ८ मुख्य राण्या आणि नंतर नरकासुराच्या तावडीतून सोडवलेल्या १६,००० राजकुमाऱ्यांशी कोणी लग्न करणार नाही म्हणून त्यांना पत्नी म्हणून स्वीकारून आपल्या मुख्य ८ राण्यांचा दर्जा देणाऱ्या श्रीकृष्णाच नाव जोडलं गेलं ते त्याच्या बालपणीच्या "सखीशी" - राधाशी!
राधा आणि द्रौपदी या दोघींनाच कृष्णाने सखी म्हणून संबोधल्याचे माझ्या तरी वाचनात आले आहे. पण द्रौपदी अर्जुनाची पत्नी असल्यामुळे द्रौपदी आणि कृष्णाचं मैत्रीचं नातं फारसं चर्चेत कधी राहील नाही. पण राधा कृष्णाच्या नात्याभोवती गूढ वलय कायम राहिलं.
राधा आणि कृष्णाचा विवाह झाला का? श्रीकृष्णाच्या प्रत्येक विवाहामागे काही रोमांचक घटना आहेत. श्रीकृष्ण म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा आठवा अवतार. त्यामुळे अर्थातच त्याच्याशी विवाह करण्याचं भाग्य म्हणा किंवा सामर्थ्य म्हणा हे सहज कोणाला झेपेल असं कधी नव्हतच. पण ज्याने ८ विवाह केले तो पुन्हा गोकुळात येऊन राधेला विवाह करून घेऊन येऊ शकतं नव्हता का?
याच विश्लेषण कधी शोधायला गेलो नाही पण हा लेख मनात घोळतच होता म्हंटल्यावर कृष्णाने समोर आणलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे - "श्रीकृष्णाच्या या ८ पत्नी होत्या अष्टलक्ष्मी!" हे वाचून अंगावर एक वेगळंच रोमांच उभ राहिलं. त्याच्याशी जोडलेल्या अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टींत खोल अर्थ दडलेला आहे हेच खरं. पण हे अर्थ कृष्णाला जाणून घ्यायचं आहे, त्याला काय शिकवण द्यायची आहे या एकाच ध्यासाने जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यास समोर येतात. तेही त्याच्याच इच्छेने. कारण जास्त चिकित्सा करूनही काही अर्थ नाही. भगवदगीतेत विभूतियोग सांगून झाल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोच की - "हे सगळं ज्ञान जाणून तू काय करणार?". त्याबद्दल सखोल विचार मांडताना आदि शंकराचार्य यांनी "भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढ़मते।" असं म्हणून "हे मूर्ख मनुष्या तू कितीही ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न केलास तरी तू मूर्खच राहणार. त्यापेक्षा हरी नाम घे आणि त्या श्रीकृष्ण गोविंदाला शरण जा!" म्हणून काव्य रचना केली. त्यातला अर्थ न कळता ते ऐकताना सुद्धा त्यातला गोडवा खूप छान वाटतो.
याच संदर्भात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचताना जे सत्य स्वतः श्रीपाद प्रभू समोर मांडतात ते असं - "श्रीपाद श्रीवल्लभ, ''मी स्वत: श्रीकृष्ण आहे'' असे म्हणत त्यावेळी सामान्य लोकांना ते हास्यास्पद वाटे. त्या अज्ञानातूनच मी प्रश्न केला ''श्रीपादा ! तू स्वत:ला श्रीकृष्ण म्हणवतोस तर अष्टभार्या सोळा सहस्त्र गोपिका सुध्दा या अवतारात आहेत काय ?'' यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले ''माझ्या अष्टविधा प्रकृतीच अष्टभार्या आहेत. या माझ्या शरीरातून दशादिशांमध्ये शक्तीस्वरूप असणारी स्पंदने क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर, मन आणि आत्मतत्वामधून (१०x१०x१० = १०००) एक हजार स्पंदने प्रवर्तित होतात. या प्रकारे सोळा कलांमधून एकूण सोळा हजार स्पंदने प्रवर्तित होतात. याच माझ्या सोळा हजार गोपिका आहेत".
गंमत म्हणजे श्रीकृष्णाच्या जशा ८ पत्नी होत्या तशाच राधेच्या अगदी जवळच्या अशा ८ सख्या होत्या. गर्गसंहिता, स्कंदपुराण, ब्रम्हवैवर्त पुराण आणि इतर काही पुराणांत आणि ग्रंथात राधा कृष्ण हे नात खूप वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं आहे तर श्रीमद् भागवत पुराण राधा कृष्णाच्या नात्याबद्दल मौनच पाळत.
आताच्या काळात अनेक कवींनी आणि चित्रकारांनी राधा कृष्णाच्या प्रेमाला त्यांच्या शब्दांत किंवा चित्रांत रेखाटून ते प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामुळे राधा कृष्णाचं प्रेम हे प्रथम दर्शनी आपल्या सारख्या सर्व सामान्य सारखं असावं असा आभास होतं. पण जसा कृष्ण उलगडत जातो तसं त्याची रासलीला ही प्रेमाचं अभूतपूर्व प्रतीक असली तरी तिचा वासनेशी किंवा प्रणयाशी किंचितही संबंध नव्हता ही गोष्ट अधिकाधिक स्पष्ट होत जाते.
राधा! जे नाव घेऊन / ऐकून श्रीकृष्ण स्वतः हरवून जात असे. वेगवेगळ्या पुराणांमधून, काव्यांमधून ती वेगवेगळ्या पद्धतीने मांडली गेली पण कृष्णाचा श्रीकृष्ण होण्याआधी होती ती राधा! म्हणून आजही राधाकृष्ण हा फक्त एक शब्द नाही तर जणू दोन शरीर धारण केलेलं एकच तत्त्व होतं. पुरूषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची अंतरंगा अध्यात्मिक शक्ती - राधा!
कुंतीमातेनं श्रीकृष्णाच्या श्री या अंगाकडे लक्ष वेधताना अर्जुनाला सांगितलं होतं, ‘अर्जुना, माझा कृष्ण भेटणाऱ्या प्रत्येक स्त्रीशी कसा वागतो, ते बारकाव्यानं बघत जा. संस्कृती-संस्कृती म्हणतात, ती म्हणजे हे वागणंच होय. दुसरं काहीही नाही! तूही ते कधीच विसरू नकोस.’
श्रीकृष्णाचे जीवन खूप आगळं वेगळं राहिलं आहे. अजन्मा अशा त्याने त्याच्या लीला ज्या कारागृहात जन्म घेतला तिथपासूनच सुरू केल्या होत्या. किंबहुना त्या आधीपासूनच. सगळंच त्याने रचवून आणलेलं. स्वर्गाधिपती इंद्राची पूजा नाकारून, प्रलयकारी परिस्थितीतून गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलताना तो अवघ्या ७ वर्षांचा होता. वृंदावनातून सर्व गोप गोपींचा आणि त्याच्या राधाचा पण निरोप घेऊन त्या स्थूल देहाने कायमच प्रस्थान करताना तो अजून किशोर वयात सुद्धा आला नव्हता. मग राधाकृष्णाच्या या प्रेमाच्या नात्याकडे पहावं तर नक्की कसं पहावं?
कृष्ण! त्याच्या नावाच्या अर्थातच आकर्षण आहे. सर्वांना आकर्षून घेणार आयुष्यातील संगीत आहे तो कृष्ण. उगाच नाही म्हणाला तो भगवद्गीता सांगताना वेदांमध्ये "सामवेद" मी आहे. संगीत हे शास्त्र नाही कला आहे आणि वेदांचा ज्ञाता, संकलक श्रीकृष्ण त्या संगीतातले साम म्हणून जेंव्हा एखाद संगीत आपल्या हृदयाची तार छेडून आरपार जातं ते त्या ह्रुदयात वास करणाऱ्या कृष्णामुळे!
अशाच एका सांजसमयी "शतजन्म शोधताना" या गायन मालिकेतले शब्द कानावर पडू लागले आणि डोळ्यासमोर जे काही तरळल ती पण त्या कृष्णाचीच लीला -
कृष्णाने आपले ओठ अलगद त्याच्या प्रिय बासरीवर ठेवले आणि जो काही राग छेडला! अहाहा! त्या मधुर स्वरांसोबत वाऱ्याची मंद झुळूक त्या स्वरांना अलगद उचलून वृंदावनात घेऊन गेली. ती झुळूक राधेच्या गालाला स्पर्शून गेली आणि सुर थेट राधेच्या हृदयाला भिडला. कृष्णाचा तो स्पर्श तिने जाणवला होता. तिच्या मन मंदिरात ती बासरी मुकुंद वाजवत उभा होता. शब्द फुटत नव्हते. हृदय पिळवटून निघाले होते. मीरेच्या हातात वीणा होती तेंव्हा तिने हीच अंतरीची राधा अनुभवली होती! त्या नीलवर्णी कृष्णाच्या बहुरंगी रंगछटा आठवत राधा मनातच पुटपुटली...
आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे !
भाव अंतरी उमलत होते परि मनोगत मुकेच होते शब्दांतुन साकार जाहले, तुझ्यामुळे !
परोपरीचे रंग जमविले स्तब्धच होते करी कुंचले रंगांतुन त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे !
करात माझ्या होती वीणा आली नव्हती जाग सुरांना तारांतुन झंकार उमटले, तुझ्यामुळे !
हृदयमंदिरी होती मूर्ती तिमिर परंतु होता भवती आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे !
कृष्ण जेंव्हा सवंगड्यांसोबत परतीच्या वाटेला निघाला तेंव्हा राधेने त्याला वाटेतच गाठले. त्याच्या त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या बासरीची स्तुती कशी करू तिला स्वतःलाही कळतं नव्हते. पण त्यातून मिळणाऱ्या आनंदाची कृतज्ञता म्हणून राधेने कृष्णाच्या गळ्यात घातलेली वैजयंती माला कृष्णाने आजन्म परिधान केली.
राधेचा कृष्ण जेंव्हा तिच्या समक्ष उभा नसे तेंव्हा तिच्या प्रिय ८ सख्यांना कृष्णावर जडलेली प्रित व्यक्त करताना राधा म्हणते -
राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयि प्रीत जागते जाणता, अजाणता
पाहिले तुला न मी, तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी, उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता
दिवस रात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी, मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी नादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी वेड वाढवून तो उडून जाय मागुता
हे दिवस असेच सरत होते. अभिरभानूचे वंशज असलेल्या नंदबाबा आणि इतर वृंदावन वासी यांच्यासाठी शरद पौर्णिमेचा उत्सव म्हणजे एक विशेष महत्त्व होतं. रासलीलेचा तो दिवस! वृंदावनातल्या गोप आणि गोपिकांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा, आनंदाचा एक सण! शरदाचं चांदणं जसं वर चढत होतं तसं या रास नृत्याला एक वेगळीच शोभा जडत होती. प्रत्येकीच्या मनी कृष्ण आपलाच पती व्हावा अशी त्यांची वेडी ईच्छा होती आणि कृष्ण हे जाणून होता. जणू प्रत्येकीच्या सोबत तो रासलीला रचत होता. हे प्रेम साधं सुध नव्हतच. अत्युच्च मधुरभक्तीचा कळस होतं ते गोपिकांच प्रेम. म्हणून म्हणतात की एक कृष्ण गोकुळातून मथुरेस प्रस्थान करण्यास बाहेर पडला जो कधी परतलाच नाही आणि एक कृष्ण जो कायम गोकुळातच राहिला, गोपिकांच्या हृदयी, मन मंदिरी आणि कधी बाहेर पडलाच नाही. रासलीला रचताना आपला कृष्ण फक्त आपल्याच सोबत आहे म्हणून वेड्या आशेने स्वप्न बघणाऱ्या राधेला कृष्ण जेंव्हा झुलवतो तेंव्हा कृष्ण राधेला म्हणतो -
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !
नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ? ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी
हे सगळं नाट्य मनाच्या रंगमंचावर खुलले असताना त्या यमुनेच्या तीरावर शेकडो कमळ पाण्यावर खुलली होती. त्यांचा दरवळणारा गंध त्या मधुरा भक्तीला अजूनच खुलवत होता. ती रात्र इतर रात्रीं सारखी साधारण रात्र नव्हती. आजतागायतची ती सगळ्यात दीर्घकाळ चाललेली अशी ती रात्र होती. जणू काही युग या एका रात्रीत पालटली. सुख म्हणजे काय असतं? हे या रात्रीत गोपिकांना उमगल होतं. त्या मधुरा भक्तीत लीन झालेल्या त्यांच्या जन्माच सार्थकच आज झालं होतं. त्यांच्या त्या मिलनाची कथा आज चिरंजीवी झाली होती. राधा पुटपुटली...
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना
तुझ्या जीवनी नीतीची जाग आली माळरानी या प्रीतीची बाग आली सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा
तुझा शब्द की थेंब हा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा उगा लाजण्याचा किती हा बहाणा
चिरंजीव होई कथा मिलनाची तृषा वाढते तृप्त या लोचनांची युगांचे मिळावे रूप या क्षणांना
पण हे सुख दीर्घकाळ टिकणार नव्हतं. मुळात एकच जागी थांबाव म्हणून कृष्णाचा जन्मच नव्हता. त्याच्या पदचिन्हांना अनुसरूनच त्याचं अवतार कार्य होतं. त्यातलं एक चिन्ह म्हणजे चक्र. चक्रधारी तो गोकुळातून पायांना चक्र लागल्यागत जो निघाला तो परतला नाहीच. तो गोकुळ सोडून निघणार या कल्पनेने गोपिकांची अवस्था संत तुकारामांच्या या अभंगवाणी सारखी झाली.
सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ॥ धरी धरी आठवण । मानी संताचे वचन ॥ नेले रात्रीने ते अर्धे । बाळपण जराव्याधे ॥ तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥
"एवढे दिवस आपण कृष्णाच्या खोड्या काढण्याच्या उगाच कागाळ्या केल्या! त्याच्या खोड्या हे त्याचं प्रेम होतं. आपण त्याच्या प्रेमात अजून पुरेसे न्हाहून निघालेलो नाही. आपलं अर्ध आयुष्य आपण नको त्या गोष्टींत व्यतीत केलं आणि आता तो आपल्याला कंटाळून तर नाही ना चालला?" या विचारांनी राधा आणि सर्वच गोपिका व्यथित झाल्या. पण कृष्णाला त्याच जीवनकार्य करण्यासाठी गोकुळास मागे ठेउन पुढे जाणं भाग होत.
त्याच्या प्रत्येक प्रिय व्यक्तीस आणि भौतिक गोष्टीस मागे ठेउन जाताना तो एक सुंदर शिकवण समोर मांडून जातो.त्यावर वाचण्यात आलेलं चिंतन - "कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्याचं नाहीत. त्याची आई, त्याचे वडील जन्मानंतर लगेच वेगळे झाले, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून तेही गेले. मित्र-सखे गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. आयुष्यात काहीना काही निसटतंच गेलं त्याचं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण आनंदाने. ज्याला कृष्ण समजला, त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं राहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे. आयुष्यात कृष्ण समजून घेता आला पाहिजे!"
तरी कृष्ण सुद्धा त्या मधुरा भक्तीच्या आठवणीने व्याकुळ होतोच. गोकुळातील क्षेम कुशल जाणून घ्यावं म्हणून त्याने त्याचा प्रिय बंधू आणि सखा उद्धवला गोकुळात धाडतो. पण मधल्या काळात कितीतरी ऋतू सरतात, कितीतरी शरद पौर्णिमा येऊन जातात आणि रासलीलेची आठवण ताजी करून जातात. पुन्हा आभाळ दाटून येत. घननीळ आभाळ त्या नीलवर्णी श्यामसुंदरराची आठण करून देतं. राधा आपल्या जीवलगाची आठवण काढत रहाते. पुटपुटते...
दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू जिवलगा, कधि रे येशील तू ?
धरेस भिजवुन गेल्या धारा फुलून जाइचा सुके फुलवरा नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू !
शारदशोभा आली, गेली रजनीगंधा फुलली, सुकली चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू !
हेमंती तर नुरली हिरवळ शिशीर करी या शरिरा दुर्बळ पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !
पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली मेघावली नभि पुनरपि आली पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !
पण गंमत हीच आहे की राधा आणि कृष्ण कधी वेगळे झालेच नाहीत. कारण ते वेगळे कधी नव्हतेच. कृष्णरुपी परमात्म्याची आत्मा आहे ती राधा राणी. सखी आणि सखा कसे असावेत याचं उदाहरण कृष्णाने दाखवून दिलं होत मग ती राधा असो वा द्रौपदी. आजच्या वासनेने भरलेल्या काळात जेंव्हा प्रत्येक जण बीभत्स वासनेला प्रेमाचं नाव देऊन खर तर प्रेमाला विवस्त्र करू पाहत आहे तिथे कृष्ण सखा म्हणून नात्याची आठवण ठेऊन त्याच्या "कृष्णेला" वस्त्रहरण होत असताना कसा धावून आला होता हे दाखवून देतो आहे. हो द्रौपदीला तो लाडाने कृष्णे म्हणत असे कारण ती यज्ञासेना सुद्धा कृष्णासारखी सावळीच!
मुद्दा असा की, ज्याला कळली राधा त्याचा झाला कृष्ण! या जगात वासना रहित प्रेम जिथे जिथे आहे तिथे तिथे आहे राधा कृष्ण!
वरील गाण्यांची आणि उल्लेख केलेली "शतजन्म शोधताना" गायन मालिका खालील लिंक वर ऐकता येईल -
(टिपण्णी : माझ्या मनात हा लेख स्फुरत होता तेंव्हा हे खालील चित्र कृष्णाने आकांक्षा कडून काढून घेतलं)
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Comments