होळी म्हटलं की समोर उभा राहतो तो धगधगता अग्नी. मनात विचार सुरू झाले कसलं प्रतीक आहे हा अग्नी? एकाहून अधिक पौराणिक कथा या सणाशी जोडलेल्या आहेत. या कथा पूर्वीही वाचल्या होत्या पण मनात चालणारे विचार काही वेगळं सांगत होते. त्या कथांचं तात्पर्य शोधत होते. जणू काही स्वामी काही सांगत होते. विचारांना शब्दांत पकडण्याचा प्रयत्न चालू होता.
समोर आली ती भक्त प्रल्हादाची कथा. त्याच्या भक्तीची उत्कट परीक्षा होती ती. किंबहुना हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद यांचा जन्मच भगवंताच्या योजेने प्रमाणे झाला होता. भगवंताचे नामस्मरण करतो म्हणून प्रल्हादाचा जन्मदाताच त्याच्या जीवावर उठला होता. पण भक्ती आणि भगवंता वरच प्रेम हे अगदी जन्म देणाऱ्या माता पित्याशी असणाऱ्या नात्याच्याही पलीकडे असते हे भगवंताला दाखवून द्यायचे होते. त्याची श्रद्धा आणि भक्ती अढळ होती. हिरण्यकश्यपूने त्याची बहीण होलिका हिला प्राप्त झालेल्या वराचा दुरुपयोग करून घेण्याचे ठरवले. तो वर असा होता की ती अग्नीच्या सानिध्यात बसूनही ती अग्नीने भस्म होणार नव्हती. प्रल्हादाला मांडीवर बसवून होलिका अग्नीच्या स्वाधीन झाली. पण तिला माहीत नव्हते ते प्रल्हादाच्या भक्तीचे आणि नामस्मरणाचे सामर्थ्य! तिच्यासाठी सगळंच विपरीत घडतं गेलं. देव तारी त्याला कोण मारी! प्रल्हाद नामस्मरणात दंग राहिला आणि झालं ते होलिका दहन!
हे सगळं मनात घोळत होतं तोच संत जनाबाईंचा हा अभंग वाचण्यात आला.
।। मानसहोळी ।। संत जनाबाई यांची!
कराया साजरा । होलिकेचा सण । मनाचे स्थान । निवडीले ।।
ऐसे ते स्थान । साधने सरावले । भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।
त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला। त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।
रचलीया तेथे। लाकडे वासनांची । इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।
गुरुकृपा तैल । रामनाम घृत । अर्पिले तयात । ऐसे केले ।।
रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी । भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।
वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले । यज्ञरूप आले । झाली कृपा ।।
दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती । आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।
झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत । जाणावया तेथ । नूरले काही ।।
वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी ।। जेणे मुक्तीची दिवाळी। अखंडित ।।
आता विचारांना अजून मोकळी वाट मिळत चालली होती. घरातील स्वामींच्या मूर्तीकडे पाहत विचार आला, प्रल्हादाला विष्णू स्वरूप स्वामी तेंव्हाही म्हणाले असतील, "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"! प्रल्हादाने नामस्मरण करून ही मानस होळी कधीच केली असावी.
अशाच विचारांत ऑफिसला गेलो. दुपारच्या प्रहरी एका मीटिंगमध्ये कामाच्या सर्व गोष्टी चर्चा करून झाल्यावर माझ्या एका टीम मेंबरने मला अचानक प्रश्न विचारला - "नयनेश तुमच्याकडे होळी मागची कोणती कथा जास्त प्रचलित आहे?" त्याच्या अचानक आलेल्या प्रश्नांमुळे मी पुन्हा एकदा सकाळच्या विचारांत जाऊन पोहचलो. ती कथा पुन्हा पुन्हा मनात घोळत राहिली.
तेंव्हा एकच वाटलं की आपली श्रद्धा, भक्ती आणि आचरण कसं असावं? स्वामींनी स्वतः "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असं स्वतः म्हणावं असं असावं. आपले आचार विचार बदलल्या शिवाय ते व्हायचं नाही. प्रत्येक वाईट कर्म हे कृतीत येण्यापूर्वी ते विचारांत, मनात आधी घडतं. त्या प्रत्येक वाईट विचारांची होळी करता आली पाहिजे. ते जेंव्हा जमेल तेंव्हा ते प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना चीरकाळ टिकणाऱ्या आनंदाकडे जायचे आहे पण चिदानंद हा स्वतःच एक मार्ग आहे ज्यावर तेंव्हाच चालणं शक्य आहे जेंव्हा मनातील कल्मषांची होळी करता येईल. तेंव्हा होईल - चिदानंद रुपम शिवोऽहम् शिवोऽहम् !
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
"प्रत्येक वाईट कर्म हे कृतीत येण्यापूर्वी ते विचारांत, मनात आधी घडतं. त्या प्रत्येक वाईट विचारांची होळी करता आली पाहिजे. ते जेंव्हा जमेल तेंव्हा ते प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही."...
You nailed it by this point of view. 🙏👍👌