माझा अध्यात्माचा प्रवास हा भगवद्गीतेच्या वाचनाने सुरू झाला. गेल्या कित्येक वर्षांत हातात पुस्तकं घेऊन त्यातल्या शब्दाचं माधुर्य चाखण्याच्या अनुभवला मी माझ्याच बुद्धीवर धूळ साचल्यामुळे मुकलो होतो. भगवद्गीता वाचली आणि मनावर जमलेली भ्रमाची कोळीष्टक स्वच्छ झाली. त्यानंतर नियमित वाचनाचा अखंड प्रवास सुरू झाला. रोज पहाटेचे २ तास हे वाचनासाठी मी राखून ठेवले आहेत. साहित्याच्या स्वरूपानुसार माझी ४० ते १२० पाने या २ तासांत वाचून होतात.
हा लेख लिहिण्या मागचा मूळ मुद्दा हा वाचन प्रक्रिया त्याच मला उमगलेले महत्त्व आणि त्याचा अध्यात्माशी असलेला संबंध आणि त्यावरील माझे Scribbled Thoughts अर्थात मनात आल ते शब्दात उतरवले!
वाचाल तर वाचाल
सद्य परिस्थितीत गुरूचा शोध घेणे, योग्य गुरू सापडणे आणि त्यांचं मार्गदर्शन मिळणे या गोष्टी खूपच दुस्तर झाल्या आहेत. अशा परिस्थितीत पुस्तकं, ग्रंथ हेच आपले शिष्या गुरू आहेत. माझ्या आधीच्या काही लेखांमध्ये मी कर्म आणि भक्ती यांबद्दल माझे विचार मांडले होते आणि भक्तीचा मार्ग हाच सर्वोत्तम मार्ग असल्याच्या विधानाला पुष्टी दिली होती.
भक्ती म्हंटल की ध्यान लावणं आल, नामस्मरण आल आणि त्यातून जागृत होणारे अष्टसात्विक भाव आले.
अष्टसात्विक भाव म्हणजे काय ?
भक्त किती वर्षे भक्तीमार्गामध्ये आहे, त्याच्या जेष्ठतेवरून त्याचा भक्ती मार्गातील - प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत यावरून त्याच्यी अध्यात्मिक प्रगती ओळखली जाते. ज्या ईष्टदेवतेची तो आराधना करतो किंवा ज्या देवतेवरती त्याची श्रध्दा आहे अशा देवतेच्या उपासनेच्या वेळी त्याच्या अनुभवात आलेल्या क्रिया म्हणजे अष्टभाव ते कोणते तर -
१. प्रथमभाव-स्वेद :
मंत्र, स्तोत्र, जप करताना ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याच्यी सेवा पूर्व जन्मातील प्रारब्द शुद्ध करण्यात खर्च होते.
२. दुसरा भाव-कंप :
या भावात पोहचवलावर भक्ताला शरीराला कंप सुटतो.शरीरात कंप जाणवते.
३. तिसरा भाव- रोमांच :
स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना पोथी वाचताना अनुभव सांगताना शहारे आले तर सेवेत तिसरा भावात समजवा.
४. चतुर्थ भाव- अश्रू :
महाराजांचे आठवणीने हृदय भरून आले तर आनंदाश्रू येतात. हा भाव सेवेकऱ्याची हृदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकऱ्याकडून स्वामी काव्य ही निर्माण होते. खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवा काल वाढवायला हवा. निदान एकाच आसनवर बसून एका तासावर जप करायला हवा. अशी दीड वर्ष साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो.
५. पंचम भाव -सत्वापत्ती :
याभावात प्रवेश केल्यावर अनुसंधान जास्त वेळ टिकते. अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात. स्वामी मय होऊन जातो. पण सर्व सामान्य माणसे चवथा भावापर्यंत या जन्मात पोहचतात व पुढच्या जन्मात पुढचा अध्यात्मिक प्रवास सुरू होतो.
६. षष्ट भाव-समाप्ती :
या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख दु:ख मान अपमान निंदा स्तुती सर्व समान वाटु लागतात. अभिमान अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते. सतगुण वाढू लागतात.
७. सप्तम भाव- असंसक्ती :
सातव्या भावात प्रवेश केल्यास देवतांची दर्शन-साक्षात्कार-संभाषण होतात. षटचकरे जागरूक होतात-इतरांच्या भूत भविष्य समजत, बोललेले शब्द सत्य होतात. या भावात गुरु दुर्लक्ष करतात साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते व जन कल्याणाचे कार्य करावे.
८. अष्टमभाव-प्रलय :
या भावात साधक ईश्वराशी एकरुप होतो. सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात.
आता प्रश्न असा पडतो की हे अष्टसात्विक भाव एकाएकी जागृत करायचे कसे ?
नामस्मरण करावे हे म्हणणे हे म्हणणं सहज सोप आहे तेवढं ते लगेच अंगवळणी पडणं तेवढं सहज सोप नाही. म्हणूनच भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण क्रमाक्रमाने होणाऱ्या अध्यात्मिक प्रगतीचे खूप सुंदर वर्णन करतात.
आपण कितीही प्रयत्न करून एकाएकी ध्यान लाऊन बसू शकत नाही जर आपण नवसाधक असू. अशा वेळी आपल्याला बाकीच्यांसारखे नामस्मरण किंवा ध्यान लावणे जमतं नाही म्हणून खजिल होऊन जाऊ नये. कारण स्वतः श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की त्यांनी अंतःकरणातून केलेल्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नाही. म्हणून कर्मयोगात ते आपण केलेले प्रत्येक कर्म ते त्यांना अर्पण करण्यास सांगतात. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची सेंवा कशी करता येईल जेंव्हा शोधू लागतो तेंव्हा ते सुद्धा आपली परीक्षा बघतात आणि योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन करतात जेणेकरून आपण अध्यात्माच्या पुढच्या स्तरावर पोहचू शकू. या स्तरात साधारण कर्मी म्हणून आपण मनापासून जेंव्हा पूजा अर्चा करतो, भक्तिभावाने प्रसाद करून त्यांना अर्पण करतो तेंव्हा ती भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते.
अथातो ब्रम्हजिज्ञासा
या मार्गातून भगवंतांना जाणून घ्यायची गोडी लागते आणि ही गोडी म्हणजेच अथातो ब्रम्हजिज्ञासा - परब्रह्माला जाणून घेण्याबद्दलची जिज्ञासा, इच्छा, उत्सुकता. ही जिज्ञासा पूर्ण करण्याचे २ मार्ग आहेत. एक म्हणजे भगवंतांनी दिलेले ज्ञान भगवद्गीता आदि ग्रंथांतून आत्मसात करणे आणि दुसरे म्हणजे त्यांच्या लीलांचे वर्णन करणारी पुराणे आणि त्यातल्या कथा वाचणे.
महाभारत
घरात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे महाभारतातील चित्र लावावे की लावू नये कायम संभ्रमात टाकणारी बाब राहिली आहे त्यावरील माझे विचार मी यापूर्वी "सारथी श्रीकृष्ण" या लेखात मांडले होते. बऱ्याच लोकांनी हा लेख वाचला तेंव्हा अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे लोकांना घालून दिलेली भिती ही फक्त या चित्रापूर्ती मर्यादित नसून हे ग्रंथ सुद्धा वाचू नये अशा धक्कादायक अर्थहीन विधानांशी पण जोडलेली आहे. आज भारत संपूर्ण स्वावलंबी नसला तरी अध्यात्म ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे.
थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया
इ.स. १८७५ मध्ये त्यावेळच्या जगविख्यात तत्ववेत्यांनी म्हणजेच टॉलस्टॉय, इमल्सन, मिटन, बेकन, जॉन्सन, मेकॉले, जॉर्ज बनार्ड, ऑस्कर वाइल्ज़, हामर, रस्कीन, शेले, वर्डस्वर्थ, लॉगफेलो, मॅक्समूलर या मंडळींनी भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून न्यूयॉक येथे एक सोसायटी स्थापन केली. त्या सोसायटीचा मुख्य उद्देश असा होता की, 'परमेश्वर व त्यांचे अवतार कार्य फक्त भारतातच आहे. आपण प्रत्यक्ष भारतात जाऊन, फिरुन सर्व प्रमुख पवित्र स्थळांना भेटी देऊन ती माहिती घेऊन सर्व जगाला पुरवू.' असे त्यांचे ध्येय होते.
शास्त्र
पण तरीही आपली अध्यात्माच्या क्षेत्रात ही दयनीय अवस्था झाली कारण प्रत्येक परकीय आक्रमणांनी भारताच्या धर्मव्यवस्थेवर धाड टाकली. लोकांना प्रलोभन दाखवून जे ज्ञान सर्वांनी आत्मगत करणं अपेक्षित आहे तेच वाचू नये म्हणून बळेच अंधश्रद्धा पसरवली. आज अनेक शतकांनंतरही तिचं भिती पुढच्या पिढीकडे वारस्याप्रमाणे देण्यात आली. एखादी गोष्ट शास्त्र म्हणून करा किंवा करू नये याची उत्तर मिळत नाहीत आणि मिळवण्याची ते शास्त्र वाचण्याची धडपड सुद्धा कोणी करत नाही.
श्रद्धा
देवासमोर उभे राहून हात जोडले म्हणजे श्रद्धा होत नाही. श्रद्धा आणि अंधभक्ती यात अंतर आहे. या अंधभक्तीचा कळस म्हणजे फक्त धर्मा-धर्मात नाही तर २ भिन्न संप्रदायाची लोक 'आमचा देवच श्रेष्ठ' या विषयावर युक्तीवाद करून बाकीच्या लोकांनापण संभ्रमात टाकतात. त्यातून भरकटलेली नवी पिढी नास्तिकवादाच्या मार्गास लागते. "तू पण सकाळी उठून जपाला बस आणि बघ देव प्रसन्न होतो की नाही!" असं जर तुम्ही कोणाला सांगाल तर झटपट अनुभूती घेण्याचा मार्ग न कोणाच्या पचनी पडेल आणि न आचरणात येईल.
पुराणे पुराणांबद्दल काय सांगतात ?
महर्षी व्यासांनी ४ वेदांव्यातिरिक्त १८ पुराणे लिहिली या श्रुती-स्मृति मध्ये वेद म्हणजे श्रुति तर स्मृति म्हणजे १८ पुराणे. या पुराणांतील कथा वाचून लोकांना आनंद मिळावा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यातून बोध घेता यावा हा मुख्य उद्देश. त्याव्यतिरिक्त उपपुराणे, उपनिषदे वगैरे अशी ज्ञांसंपदा आहे ती वेगळीच. ही १८ पुराणे ५ मुख्य देवतांभोवती फिरतात. श्रीकृष्ण, भगवान शंकर, गणपती, शक्ती आणि सूर्य. कलियुगात ४ वेद आणि १८ पुराणांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे आणि घेणे, त्याचा तर्कशुद्ध अभ्यास कोणालाही शक्य नाही. मुळात इष्ट देवतांनी धारण केलेली ही भौतिक रूपे ही मनुष्याला आकलन होण्यासाठी आवश्यक असतात. श्रीकृष्ण किंवा प्रभु श्रीराम त्यांच्या दोन बाहूंनी पण सर्व लीला करण्यास समर्थ होते. पण भगवंत आपल्याहून श्रेष्ठ म्हणून त्यांना चार किंवा आठ भुजा किंवा दिव्यदृष्टीशिवाय पहाता न येणारे विराट रूपाचे प्रदर्शन त्यांना मनुष्य बुद्धीच्या आकलनासाठी प्रकट करावे लागते.
वैचारिक मंथन
या सर्व कथा आपण कथा म्हणून वाचून सोडून देऊ शकतो किंवा त्यातून बोध घेऊ शकतो. उदाहरणादाखल सर्वश्रुत असलेल्या समुद्र मंथन कथेबद्दल सांगायचे झाले तर समुद्र मंथन करताना त्यातून लक्ष्मी देवी प्रकट झाली. तिचे अतिशय सुंदर मनमोहक रूप पाहून तिने वरमाळा आपल्याच गळ्यात घालावी अशी सर्वांची इच्छा होती. पण तिने मात्र श्रीहरी विष्णुंच्या गळ्यात वरमाळा घातली. पुराणातल्या समुद्र मंथनाचे शब्दशः भाषांतर पाहायला जावं तर याहून जास्त बोध होत नाही पण त्यावर वैचारिक मंथन करताना बऱ्याच गोष्टी निदर्शनास येतात. जसे की लक्ष्मी देवी म्हणजे संपत्ती प्रदान करणारी देवी. तिने वरमाळा घालावी म्हणजे ती आपली गृहलक्ष्मी व्हावी आणि एकनिष्ठ राहून आपल्या गृही सदैव नांदावी ही प्रत्येकाची इच्छा. संपत्ती असली आपण आयुष्य ऐश आरामात बसून घालवू शकतो अशी इच्छा साधरण प्रत्येकालाच असते. पण जो या भौतिक आसक्तीच्या पलीकडे गेलेला आहे आणि सत्व गुणाचा अधिपती आहे, जो ज्ञानाने समृद्ध आहे अशा वराची अपेक्षा करणारी. म्हणजेच संपत्तीचा हव्यास न ठेवता आपण ज्ञानाच्या बळावर सत्व गुणात किंवा तिनही गुणांच्या पलीकडे जाऊन त्रिगुणातीत व्हायचा प्रयत्न करावा. हे त्या भगवान नारायणांच्या उपासनेनेच शक्य आहे आणि जिथे नारायणांची उपासना होते तिथे लक्ष्मी देवी कायम निवास करते.
विभूतीयोग - भगवद्गीता
आपल्याला सर्वांना पडलेला प्रश्न अर्जुनालाही पडला होता आणि म्हणून भगवद्गीतेच्या १०व्या अध्यायातील (विभूतीयोग) १७ व्या श्लोकात जेंव्हा अर्जुन श्रीकृष्णांना त्यांची उपासना कशी करावी याबद्दल विचारतो तेंव्हा श्रीकृष्ण मार्गदर्शन करताना या विश्वातील प्रत्येक गोष्टीत त्यांचा अंश असल्याचं सांगतात. जसे की वेदांमध्ये सामवेद, सर्व रुद्रांमध्ये (११ रुद्र) शंकर तर पांडवांमध्ये अर्जुन आपणच आहोत हे सांगतात. पण 'देखल्या देवा दंडवत' म्हणून कोणासमोरही लोटांगण घाला असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही वेदांचा अभ्यास करा किंवा भगवान शंकराची आराधना करा किंवा आणि काही करा, तुमचा मूळ उद्देश हा त्या परब्रम्हाला जाणून घेणे हा असला पाहिजे. म्हणून १० व्या अध्यायाची सांगता करताना ते म्हणतात हे सर्व जाणून काय करणार? त्यापेक्षा माझ्या भक्तीत रममाण हो, सर्व गुह्य ज्ञान मी स्वतः तुला प्रदान करीन. म्हणजे शेवटी गाडी इकडून तिकडून फिरून येते ती परत भक्ती कडेच!
...तुझ्या नामात रे गोडवा !
पण सांगायचा मुद्दा असा की आपण भक्तीमध्ये रममाण व्हायचे असेल तर मनातून परमात्म्याला आवाज देता आला पाहिजे. तो आवाज कर्म करून, ज्ञान ग्रहण करून, ध्यान लाऊन असा क्रमाक्रमाने सहज शक्य आहे. कोरड्या मनाने कर्मकांड करून किंवा श्लोक, मंत्रांचे पठण करून भक्तीचे अष्टसात्विक भाव एकाएकी जागृत होत नाहीत. गमतीने उदाहरण द्यायचे झाले तर बायकोला कितीही मौल्यवान हार भेट दिला तरी तुम्ही स्वतःच्या हाताने सरप्राइज म्हणून तिच्या गळ्यात तो घालत नाहीत तोपर्यंत त्या मागचे प्रेम व्यक्त होत नाही. सगळ्यांसमोर मिरवायला ती तो हार गळ्यात घालेलही पण प्रेमाने तो हार तेंव्हाच वर्षे नु वर्षे जपला जाईल जेंव्हा त्यामागच्या प्रेमाला किंमत असेल न की त्यातल्या सोन्या-चांदी माणिकांना.
कृष्ण
हे एवढं लिहून हा लेख कसा समाप्त करू? या प्रश्नात मी गढून गेलो आणि मग माझी स्मृति त्यांनी पुन्हा एकदा जागृत केली ती माझ्या "कृष्ण" जाणून घ्यायच्या जिज्ञासेने.
भगवद्गीता वाचून झालेला प्रवास मला त्या प्रश्नार्थक स्तरावर घेऊन गेला जिथे मी या विचारात पडलो की भगवद्गीतेमध्ये भगवंत ज्या भक्तीचा स्तराबद्दल कथन करतात तो भगवद प्रेमाचा स्तर कसा जागृत करू ? आणि त्यांनी "कृष्ण" ग्रंथ हातात घ्यायचा संकेत दिला. माझ्या "कृष्ण - The Book" या इंग्रजी लेखात विस्तृतपणे मांडले आहेत.
हा लेख मी एक आठवड्यापूर्वी लिहिण्यास घेतला आणि प्रत्येक परिच्छेद लिहिताना त्यांनी मला वेगवेगळ्या वाचनातून भटकवले. काय कुठे कधी कसे वाचावे याचे संदर्भ वेगवेगळ्या मार्गाने समोर आले. भगवद्गीता आणि कृष्ण दोन्ही ग्रंथांचा संगम असलेला हा खालील संदेश पाठवून लेख संपवायची आज्ञा दिली -
"कृष्ण - नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव! प्रत्येक शब्द हा जोडाक्षर. जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण. पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा. जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा.
दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण. सातवा अवतार प्रभू राम. राम ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ,मर्यादेत. म्हणून "मर्यादा पुरुषोत्तम" ! रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही.
तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले,त्याच्यावर टीका केली. मग पुढच्या अवतारात प्रभू ने सर्व मर्यादा ओलांडल्या! करा काय करायचं ते ! जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा. कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये.
कृष्ण म्हणजे श्रीमदभगवद्गीता - जीवनाचं सार!
प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला. जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं. गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला. म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती, कृष्ण ८ वर्षाचा होई पर्यंत.जे राधा आणि कृष्णविषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा ८ वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी ? ईतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचं नांव कृष्णाशी कायमचं जोडलं गेलं! किंबहुना तीचं प्रेम इतकं नितळ, निस्सीम, निर्मळ होतं की तिचं नांव कायमचं कृष्णाच्या आधी लागलं.
कृष्ण-राधे कोई ना कहता,
कहते है राधे-शाम ।
जनम जनम के फेर मिटाता,
एक राधा का नाम ॥
असं हे राधा आणि कृष्णाचं प्रेम! किंबहुना प्रेमाचं दुसरं नांव म्हणजेच राधा व कृष्ण!
कृष्णाला १६,१०८ बायका! त्याचा ही इतिहास-
ज्यांना त्याने मुक्त केलं त्या म्हणू लागल्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्यांचा स्वीकार केला. अन नुसता स्वीकारच नाही केला त्या प्रत्येकी सोबत त्यांच्या सुख दुःखात सहभागी होता. आज काही महाभाग म्हणतात "कृष्णाने इतक्या बायका केल्या. तर आम्हाला काय हरकत आहे?" "अरे त्याने आग लागलेली ५० गावे गिळून टाकली होती. तू जळता एखादा कोळसा गिळून दाखव की ! मग कृष्णाची बरोबरी कर!"
मी आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही समजण्यात खरी मजा!
त्यासाठी गीता समजून घेणं महत्वाचं. गीते मध्ये काय नाही? तर गीतेत सर्वकाही आहे! जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जीवन शास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं! यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजतं. अर्जुन या भूतलावर असा एकमेव मानव झाला जो या नाशवंत देहासह स्वर्गात ५ वर्षे राहिला व शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं. या देहासह स्वर्गात जाता येत नाही पण अर्जुन हा एकमेव मानव जो ५ वर्षे तिथे राहिला. म्हणजे अर्जुनाची योग्यता काय आहे ते समजतं. त्या अर्जुनाच्या डोळ्यांवर आलेलं मोह, माया याचं पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली. गीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे हे प्रथम कृष्णाने आधीचे ९ अध्याय कथन करून पाहिलं. त्याची तयारी करून घेतली. मग पुढे खरा गूढार्थ सांगितला. विश्वरूप दाखवतांना सुद्धा त्याला आधी दिव्य दृष्टी दिली. त्याची तयारी करून घेतली. मग त्याला दाखवलं की - "सर्व काही करणारा मीच आहे, तू फक्त निमित्तमात्र आहेस!"
असा हा कृष्ण! त्याच्या विषयी किती सांगावं अन किती नको! तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो, जास्त आवडतो. त्याला जितकं समजून घेऊ तितकं कमीच. त्याच तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार. ते समजून घेतलं की जीवन समजलं. जीवन सफल झालं. मनुष्य जीवनमुक्त झाला. अशा या कृष्णाला साष्टांग वंदन!"
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ।
हे नाथ नारायण वासुदेव ॥
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ ।
मुकुंद विष्णू भगवन नमस्ते ॥
श्री कृष्णाला समजून घेण्यासाठी आपणाला श्री कृष्ण परमात्मा वाचन, चिंतन, मनन, नामस्मरण करण्याची बुद्धी प्रदान करो हीच प्रार्थना!
"सद्य परिस्थितीत गुरूचा शोध घेणे, योग्य गुरू सापडणे आणि त्यांचं मार्गदर्शन मिळणे या गोष्टी खूपच दुस्तर झाल्या आहेत." हे खूप खरं आहे .मी ह्याचा अनुभव घेतला आहे . पण निस्सीम भक्ती असेल तर तो आपल्याला मार्गर्शन करतो आणि तिथून बाहेर काढतो .
दुःख ह्यांचं वाटत कि आपण केलेल्या परिक्रमांच्या दैवी अनुभवावर पुस्तक छापून लोकांची दिशाभूल हि करत आहेत . जर आपण दासबोध वाचला नसेल तर तो वाचा , त्यात रामदास स्वामींनी गुरु कसा असावा व शिष्य कसा असावा ह्याची माहिती दिली आहे .