top of page
Writer's pictureNayanesh Gupte

Anniversary - 'तिची' आणि आमची

आज तिची आणि आमची पहिली Anniversary. हो ! आजच्याच दिवशी एक वर्षापूर्वी ती आमच्या वाहन तळात दिमाखात उभी होती. या एका वर्षात जवळपास १९,००० कि.मी.चा प्रवास आम्ही एकत्र केला आहे. तिच्याशिवाय हा सर्व प्रवास अशक्यच होता.


सकाळी आकांक्षा ने आठवण करून दिली आणि एक वर्ष मागे गेलो. तिच्या स्वागताची तयारी आठवली. घर, गाडी आणि साडी यापैकी कोणत्याही खरेदीस मी कधी फार किस काढला नाही. माझा गाडी घेण्याकडे कधी फारसा कल नव्हताच. त्याला एक कारण की घरी कधी पूर्वी गाडी नव्हती आणि बँगलोरच ट्रॅफिक बघता Uber, Ola असताना गाडी कशाला घ्या! लांब पल्ल्याचा प्रवास असल्यास भाड्याने हवी त्या गाडीची सोय सहज होऊन जाई. म्हणून मी एकंदर गाडी घेण्याच्या संकल्पनेबाबत उदासीन होतो.


मग सुरू झालं ते संचारबंदीच सत्र आणि एकंदर कोणत्याही अशा सर्व सामान्य लोकांना उपलब्ध संचार आणि दळणवळणाच्या साधनांचा उपयोग करणे धोक्याचे होऊन बसले. अयांशच अवघं एक वर्षाचं वय बघता त्याला दुचाकीवरून घेऊन जायचे धाडस आम्हा दोघांतही नव्हते. तसच आई बाबांचा विचार करून आपल्याकडे आता थोडी ऐसपैस गाडी असणं गरजेचं आहे जाणवू लागलं होतं. मग काय ! घ्यायची तर टाटाची गाडीच घ्यायची असं आधीच ठरवलं. कारण काय? तर साधं सोपं आहे. टाटांनी सर्व सामान्य लोकांसाठी खूप काही केलं आहे. बाकी कोणत्या गाड्या मी पाहिल्या पण नाही. आधी बँकेतल्या ठेवीकडे बघून साधारण छोटी शहरात चालवण्याजोगी गाडी बघण्यास सुरुवात केली. पण गाडी आली की पायाला पण चाक लागणार आणि भटकंती करायची हौस शिगेला पोहचल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे व्यावहारिक पातळीवर विचार करता गाडी लहान घेण्यात काहीच तथ्य नव्हतं. शेवटी तिच्यावर नजर खिळली आणि लव्ह एट फर्स्ट साईट वगैरे झालं. तिचा तो निळा रंग मनाला खूपच भावला. आतून ऐसपैस, आरामदायी बसण्याची सोय वगैरे वगैरे सगळं मनासारखं होतं. आकांक्षाला पण ती आवडली होती! मग काय अजून विचार करण्यात वेळ दवडवण्यात काही अर्थ नव्हता! TATA NEXON XZA+ निळा रंग ! ठरलं !


३१ मे २०२० रोजी घराजवळच्या टाटा मोटर्सच्या शोरूमला भेट दिली आणि त्यांना एकदा टेस्ट ड्राइव्ह साठी बोलावून घेतलं. आकांक्षाने एकदा चालवून बघावी म्हणून त्यांना घरी गाडी घेऊन यायची वेळ ठरवून दिली. माझ्यापेक्षा जास्त तिचं चालवणार आहे याची चांगलीच पूर्वकल्पना होती त्यामुळे तिने चालवून बघणं मला आवश्यक वाटलं.

छे ! छे ! हे वरचं वाक्य म्हणजे निव्वळ थापा. खर सांगायचं तर २०११ मध्ये टाटा इंडिका शिकलो त्यानंतर परत गेल्या ९ वर्षात परत कधी स्टिअरिंग हातात घेतलं नव्हतं. त्यामुळे मी काय खाक टेस्ट ड्राइव्ह घेणार होतो!


या दरम्यान मी आणि माझा एक जवळचा मित्र अक्षय साठ्ये आम्ही भेटून गप्पा मारत होतो. त्याला गाडी घ्यायला जाताना "तू बरोबर ये" म्हणून मी विनवणी केली होती. कारण पहिली गोष्ट म्हणजे, गाडी घेताना काय विचारायचं आणि काय बघायचं याच मला अगदी शून्य ज्ञान होतं. दुसरी गोष्ट म्हणजे, माझ्या तुलनेत आकांक्षाला गाडीबद्दल आणि गाडी चालवण्याचा जास्त अनुभव असला तरी तिचा पण काही अगदी रोजचा सराव नव्हता. त्यामुळे गाडी घरी आणायची कोणी हा खूपच क्षुद्र प्रश्न माझ्या मनाला भेडसावत होता. अक्षय मात्र माझ्या केविलवाण्या परिस्थीतीवर फारसा न हसता आमच्या सोबत यायला लगेच तयार झाला. "पहिली गाडी महागडी घेतो आहेस!" "ते पण स्वतःला चालवता येत नसताना आणि एकदम बायकोच्या हातात देतो आहेस, जिला फारशी चालवायचा सराव नाही", हे सगळं बघून एकंदर तो पण मला मिश्किल नजरेनेच बघत होता म्हणा, पण का कोण जाणे मला आपण ऑटोमॅटिक गाडी घेणार म्हणून भलताच आत्मविश्वास होता.


शेवटी ३१ मे रोजी मी ताबडतोब गाडी ठरवून आलो. ७ जून ला गाडी मिळणं अपेक्षित होते पण दुसऱ्या दिवशी गाडी ४ जूनलाच हातात येईल कळलं. आता उत्सुकता अजून शिगेला पोहोचली. शेवटी एकदाचा ४ जून आला. ऑफिसच्या कामातून अक्षयने पण आमच्यासाठी वेळ काढला आणि गाडी सोबत आमचा छानसा फोटो पण त्यानेच काढला. तोपर्यंत आकांक्षाने थोडे दिवस तिची मैत्रीण साक्षीच्या गाडीवर हात साफ करून घेतल्याने आता घरी नेईपर्यंत तरी ती व्यवस्थित चालवू शकेल याची खात्री होती.

 
 

आणल्याचा काही दिवसातच ती खरचटून झाली होती. तिच्या तोंडावरच डाग लागल्याने, आता अजून नजर लागायची नाही म्हणून आम्ही फार मनाला लावून घेतलं नाही. पण दाभोळे येथील स्वामींच्या मठात जाताना रत्नागिरीच्या घाटातले दगड धोंड्यातले रस्ते ज्या सहजतेने तिने पार केले ते बघून स्वामींनी आम्हाला ही गाडी का घ्यायला लावली याचा अंदाज आला होता. त्याच क्षणी मनातून पुढचे प्रवास म्हणजे आमचे कर्म म्हणून तुम्हाला अर्पण करतो म्हणून आम्ही श्रीकृष्णार्पणमस्तु असे मनातल्या मनात म्हणून बोलून मोकळे झालो होतो.


गाडी आल्यापासून रोज थोडा थोडा सराव सुरू झाला. म्हणता म्हणता शे दोनशे किलोमीटर अंतर कापण्यास सुरुवात झाली. बँगलोर एअरपोर्ट जवळील दृगगती मार्ग आमच्या आवडीचा. किंबहुना, तो रस्ता वगळता बाकी कोणता रस्ता फारसा मोकळा मिळत नसे. तरी कधी चेन्नई बाजू कधी मुंबई बाजू असे सगळ्या दिशांना फुटणारे फाटे आम्ही पिंजून काढले. आता वरदळीत किंवा महामार्गावर कुठेही चालवण्याचा आत्मविश्वास आला होता. मग पुढे कूर्ग, रत्नागिरी, गणपतीपुळे, तिरुपती, मुंबई, पुणे, अक्कलकोट, पंढरपूर, लेपाक्षि अशी भटकंती करत करत कधी १९००० किलोमीटर पार पडले कळलेच नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रवासात अयांशने खूप धमाल केली. सुरुवातीला लांबचा पल्ला गाठायच म्हणजे आम्हाला चिंता होती की अयांश कितपत सहकार्य करेल. पण पठ्याने चांगलीच साथ दिली.


सध्या पुन्हा एकदा ही संचारबंदी शिथिल व्हायची वाट बघतो आहे. किमान परत एकदा एअरपोर्टचा रस्ता धरायचा आहे. बाकी भटकंतीची यादी तयार आहेच!

201 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page