top of page
Writer's pictureNayanesh Gupte

अनुभूती

आपण जन्म घेतो तेंव्हा सोबत काही घेऊन येत नाही आणि हा नश्वर देह सोडून जाताना पण सोबत काहीच घेऊन जात नाही असं म्हणतात. पण हे अंशतः बरोबर आहे. कारण आपल्याला मिळालेला हा देह आणि त्याचसोबत आपल्या सोबत असते ती एक पूर्व कर्मांची पोटली. पेराल तसे उगवते म्हणजे भाग्य, भक्ती, कर्म, आपल्या सोबत होणारी चांगली वाईट गोष्टी आणि आपल्याला आयुष्याच्या वळणावर भेटणारी प्रत्येक व्यक्ती हा काही योगायोग नसून आपण एकमेकांच्या कर्माची परतफेड करत असतो आणि या कारकीर्दीत पुन्हा कर्माच्या बंधनात अडकत जातो. त्यामुळे प्रत्येक जन्मात त्याच व्यक्ती वेगवेगळ्या नात्याने आपल्या संपर्कात येत राहतात. त्याचप्रमाणे सद्गुरूंबद्दल भक्ती, श्रद्धा आणि प्रेम हे मागच्या जन्मात जिथे सुटतं तिथूनच परत सुरू होत. एकदा आपण त्यांना प्रेमाने साद घालून आत्मसमर्पण केलं की आपल्या आयुष्याचा कर्ता आणि करविता तोच असतो. आपली इच्छा असो वी नसो आपण त्यांच्या इच्छेप्रमाणे कार्य करत राहतो. वर वर पाहता वाटतं "हे कसं शक्य आहे?" कारण आपल्या सगळ्या कृतीचा कर्ता आपण स्वतःलाच समजत असतो. एक प्रकारे तो पण अहांकारच असतो. पण ज्या क्षणी मी म्हणजे कोणी नाही. कर्ता करविता तोच आणि मी निमित्तमात्र ही भावना जागृत होते तेंव्हा आपल्याला "अनुभूती" मिळण्यास सुरुवात होते.


श्री राजीव दत्तात्रेय मनोहर लिखित "अनुभूती" हे असेच एक अद्भुत सुंदर अनुभूतीने भरलेलं आणि त्यांच्याच कृपेने लेखनात उतरलेलं अध्यात्मिक साहित्य आहे. मुळात लेखक नसलेले राजीव मनोहर काका अत्यंत सोप्या भाषेत त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात मांडलेले आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीस आपण मुळात या वैज्ञानिक आधार नसलेल्या किंवा तर्कांनी सिद्ध न करता येणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवणारे असूनही त्यांना आलेल्या सुंदर अनुभूती म्हणणे "अशक्य ही शक्य करतील स्वामी" ची प्रचिती देऊन जातात.

 
 

मी ऍमेझॉन किंडल ची मेम्बरशिप घेतली त्याच दिवशी कधी तरी ऍमेझॉनने हे पुस्तक मला घेण्यास सुचवले होते. पण आजपर्यँत ते किंडलच्या बुकशेल्फ मध्येच बसून होते. सकाळपासून माझ्या डोळ्यांसमोर त्याचे मुखपृष्ठ घिरट्या घालू लागले. योगायोगाने दुपारी ऑफिस ची काम लवकर आटोपली आणि मी लवकर मोकळा झालो. पुस्तक वाचायला घेतलं आणि पुढील दीड तासांत वाचून काढलं.


भोग हे भोगुनच संपवावे लागतात पण आपल्याला अत्यंत कठीण परिस्थतीतही त्यांची साथ असते याची दत्तगुरू वेळोवेळी जाणीव करून देतात. कारण मुळात त्यांना गुरू मानलं की परीक्षा घेणं आणि दिशा दाखवणं या दोन्ही गोष्टी आपोआपच त्यात आल्या. आपली कर्म त्यांना समर्पित केली की त्या कर्मास पूर्णत्वास न्यायची जबाबदारी ते स्वतः घेतात तेंव्हा त्यांच्यासाठी प्रत्येक भक्त हा अर्जुन असतो आणि त्याच्या रथाचे सारथ्य करणारे ते श्रीकृष्ण असतात.


लहानपणी केळीच्या झाडाच्या बुंध्याशी मिळालेल्या चतुर्भुज विष्णूच्या मुर्तीपासून सुरू झालेला प्रवास त्यांना आयुष्यात प्रथमच दत्तयाग करताना दौपदीच्या थाळीचा अनुभव कसा देऊन गेला याचे अद्भुत वर्णन वाचताना शब्दोशब्दी "श्री गुरुदेव दत्त" किंवा "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" आपल्याही मुखातून बाहेर पडत रहात. कित्येक वेळा आपण यंत्रवत कसे चालत हिंडत राहिलो आणि ज्या क्षणाला आशा सोडली त्याच क्षणाला खजील होऊन ग्रीष्मात होरपळून निघालेल्या मनस्वरुपी वृक्षाला भर अनपेक्षित पालवी फुटावी तसे परत नव्या जोमाने उठून उभे राहण्यास दत्तगुरु प्रवृत्त करतात.


मार्ग दाखवण्याची आणि सोबत संरक्षणासाठी श्वान पाठवण्याची त्यांची किमया त्यांच्या वेगवेगळ्या अवतारकार्यात नेहमीच पाहायला मिळाली आहे आणि त्याचा अनुभव आम्ही पण प्रत्यक्ष घेतला आहे. परत एकदा त्या घटनांची उजळणी होताना पाहून मन भरून येते.


गिरनारच कुतुहुल आणि आधीच निर्माण झालेली ओढ या अनुभूतीने अजून द्विगुणित केली आहे. १०,००० पायऱ्या हा आकडा आता अंगावर काटा उभा करत नाही. गिरनारसोबत इतरही दत्त महाराजांची क्षेत्रे पालथी घालण्याची विलक्षण ओढ लावून जातो. कारण कोणत्या ठिकाणी कोणत्या रुपात ते स्वतः सदेह दर्शनाची अनुभूती देऊन जातील हे आपल्या तर्क वितर्क करणाऱ्या बुद्धीसाठी अनाकलनीय अतर्क्य आहे.


"नवनाथांचा" वारंवार येणारा फोन पण त्यांना कायम न लागणारा फोन मनात विचारांची अजून दाटीवाटी करून गेला. "देव भावाचा भुकेला" याची अनुभूती पदोपदी मिळत होती. खरतर आपल्याला त्यांची ओढ असते त्याहून त्यांना आपली त्याहून अधिक ओढ असते. पण त्यांच प्रेम बापासारखं असतं. कायम खंबीर राहणार, जाणवू देणार नाही पण आपलं बाळ काय करत आहे कशी प्रगती करत आहे याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं आणि वेळ आली की तोच बाप धावून येतो. आपण निद्रिस्त असताना डोक्यावर प्रेमाची फुंकर मारून जातो.


"अनुभूती" वाचून झाल्यावर २ मिनिटं शांत बसलो. पुन्हा एकदा पान चाळायला सुरुवात केली. श्री राजीव दत्तात्रेय मनोहर आणि त्यांची पत्नी सौ. ऋतुजा राजीव मनोहर या दोघांनी त्यांचा नंबर आणि पत्ता पुस्तकाच्या सुरुवातीस दिला होता. त्यामुळे त्या नंबरवर संपर्क करून त्यांना अभिप्राय कळवावा अशी इच्छा झाली आणि ताबडतोब तसे कळवलेही. व्हॉट्सॲप वर थोडी ओळख पाळख झाली आणि मग राजीव काकांनीच स्वतः फोनवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली. बोलण्या बोलण्यात त्यांची मुलं बँगलोरलाच सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे कळले. त्यामुळे आता संचारबंदी संपूर्ण बंद झाली की बँगलोरला प्रत्यक्ष भेटीची संधी कधी मिळते याची वाट पाहतो आहे. निर्मळ मन असणाऱ्या अशा दत्त गुरूंच्या भक्तांशी अगदी थोडक्यात साधलेला संवाद पण त्यांच्या गुरुभक्तीच्या स्पंदनाद्वारे आपल्या मनात तरंग निर्माण करून जातो.


🌺॥ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ॥ 🌺


291 views0 comments

Comments


bottom of page