मी नेहमी म्हणतो की अध्यात्माच्या मार्गात योग्य पुस्तक आणि ग्रंथ हेच खरे शिष्या गुरू आहेत. वाचनाची चटक लागल्यापासून माझे अध्यात्मिक गुरू जे काही 'सुचवतात' ते मी वाचत जातो. गेल्या महिन्यात 'हिरण्यगर्भ वरील लेखात' मी सचिन मधुकर परांजपे यांच्या एका फेसबूक पोस्टचा उल्लेख केला होता. तेंव्हा पहिल्यांदाच या ज्योतिष भाग्यरत्न मार्गदर्शक आणि लेखकाच्या नावाचा परिचय झाला. नंतर मी सोशल मीडियावर परत आलो तेंव्हा त्यांच्या फेसबुक वरील पोस्ट वाचण्यात आल्या आणि त्यांच्या लिखाणाचं आणि ज्ञानाच कौतुक वाटलं. त्यांनी 'माझी फेसबुकगिरी' नावाचं पुस्तक लिहिलं आहे ऐकून अजूनच गंमत वाटली.
नंतर हिरण्यगर्भ वाचून झालं तेंव्हा माझ्या Scribbled Thoughtsच्या एका वाचकाने 'हिरण्यगर्भ' आणि 'चैतन्यस्पर्श' अशी २ पुस्तकं मागवल्याचा फोटो पाठवला. तेंव्हा पहिल्यांदा 'चैतन्यस्पर्श' पुस्तकं निदर्शनास आलं आणि लेखकांचं नाव पाहून नाव ओळखीचं असल्याची नोंद मेंदूने करून घेतली होती.
नंतर 'अध्यात्म - वाचन आणि नामस्मरण' वर लेख लिहिताना अचानक आनंद गोवंडे शिक्षकांचा फोन आला. तसं ते मला कधी शाळेत शिक्षक म्हणून नव्हते. ते एका IT कंपनी मध्ये काम करतात. पण मी लहान असताना जेंव्हा शाखेत जायचो तेंव्हा ते शाखा घेत असत. अजूनही त्यांना आनंद शिक्षकच म्हणतो. माझ्या लिखाणाबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांनी विशेषकरून फोन केला होता. तासभर गप्पा रंगल्या. त्यात त्यांनी संदर्भ म्हणून डॉ. रा. चि. ढेरे यांची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. ती पुस्तके शोधण्यास bookganga.com उघडले आणि समोर परत 'चैतन्यस्पर्श' समोर आले. परत एकदा मी नोंद घ्यायला विसरलो नव्हतो.
काही दिवसांनी 'हिरण्यगर्भ'चे लेखक सखाराम आठवले काकांनी व्हॉट्सॲप वर 'चैतन्यस्पर्श' मधला एक लेख पाठवला ज्यात 'हिरण्यगर्भ' (त्यांची कादंबरी नव्हे तर खरे खुरे हिरण्यगर्भ) चा उल्लेख होता. ते आणि आम्ही 'स्वामी परिवाराचे' भाग झालो आहोत. त्यांच्याकडून नवीन अनुभव आणि शिकायला बरेच काही मिळतं.
आता १०-१५ दिवसांत तिसऱ्यांदा चैतन्यस्पर्श समोर आलं होतं. नेहमीप्रमाणे आता पुढील पुस्तक कोणतं वाचायचं आहे याचे संकेत मिळाले होते. ताबडतोब पुस्तकाची ई-बुक प्रत घेतली आणि पुढील काही दिवसांत वाचून काढलं.
वाचायला सुरुवात केली तस महाकालेश्वराच्या उल्लेखाने सुरुवात झाली. गेले काही महिन्यांपासून महाकालेश्वरचा उल्लेख वारंवार आला होता. त्यामुळे पुस्तक वाचून होईपर्यंत ओढ लावणारं आहे हे लक्षात आलं होत. पुस्तकाची सुरुवात झाली एक दोन पानं संपवत होतो तोपर्यंत 'अवलिया' आणि 'सिद्धचेता' दोघांचीही ओळख झाली.
पुस्तकं वाचायला आवडणाऱ्या सगळ्यांच्याच बाबतीत हे होतं की नाही माहित नाही, पण एखादा 3D चित्रपट पहावा तसं तिथे लिहिलेल्या त्या प्रत्येक क्षणात मी तिथे उपस्थित असल्याचा भास मला नेहमीच होतो. त्यामुळे घनदाट अरण्यात मध्येच बांधलेलं झोपडीवजा घर, त्या अरण्यातील भयाण शांतता, कधी झाडांचे, पक्षांचे, काळोख होताच ओरडणाऱ्या रातकिड्यांचे आवाज, तर कधी ऊब देणारा धूनी, अन्नपूर्णेने स्वतः केलेलं सागरसंगित भोजन, कधी त्रेता युगापासून भटकणारे सत्पुरुष तर कधी मुक्ती न मिळालेले पिशाच्च मनाच्या आंतरिक दृष्टीने पहात होतो. कधी हिमालयातील गुहा तर कधी हॉटेलच्या खोलीत ध्यानाला बसलेले सचिन परांजपे आणि सिध्दचेता मी त्यांच्या समक्ष उभे राहून अदृश्यपणे अनुभवले.
देव, ध्यान, नामस्मरण इत्यादी शब्द मुळातच अध्यामिक विश्वाशी जोडलेले असल्यामुळे या शब्दांची खोली सहज मोजता मापता येईल अशी नसतेच. पण तुमच्या आयुष्यात गुरू किंवा अवलिया मार्ग दाखवण्यासाठी असेल तर त्यांचा चैतन्यस्पर्श जन्मो जन्मीची कोडी सोडवून तुम्हाला तुमचा खरा अपेक्षित मार्ग दाखवतो.
शिवतत्त्व, विष्णूतत्त्व, साधना का करावी, ओंकार कसा म्हणावा, गायत्री मंत्र आणि त्याची शक्ती, विष्णू सहस्त्रनाम आणि ध्यान धारणा म्हणजे नक्की काय आणि ध्यानात तंद्री लागल्यावर खऱ्या अर्थाने येणारे अद्भुत अनुभव, प्रेम, मैत्री, वास्तल्य, कधीही तृप्त न होणारी वासना अशा बऱ्याच विषयांना सचिन मधुकर परांजपे उर्फ बाबा त्यांच्या 'चैतन्यस्पर्श' मधून स्पर्श करून जातात.
डोक्यावर अन्नपूर्णेचा वरदहस्त असणारा आणि अष्टसिद्धी प्राप्त झालेला जिवलग 'अवलिया' आणि महाअवतार बाबाजींचा पदस्पर्श लाभलेली सिद्धचेता हे दोघं सचिन परांजपे यांना त्यांच्या अध्यात्मिक प्रवासात त्यांना लाभलेले खरतर गुरूच म्हंटले पाहिजे पण गुरू शिष्याच नात न ठेवता मैत्रीच्या नात्याने ते लेखकाच्या आयुष्याचं सोनं करून जातात.
….आणि मनातल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं देताना हे 'चैतन्यस्पर्श' त्यातल्या लेखनाद्वारे लेखकाच्या अनुभवाच्या चैतन्याचे कण माझ्या मनात रुजवून गेलं!
Comments