top of page
Writer's pictureNayanesh Gupte

चंदनाच्या सुवासाचे रहस्य

प्रस्तावना

अयांशचा जन्म त्याच्या आजोळी म्हणजे नवी मुंबईत झाला आणि त्यांनतर आकांक्षा आणि अयांश काही महिने माझ्या सासुरवाडीत पनवेललाच वास्तव्यास होते. त्याच्या जन्मानंतर एकदा गुप्ते आणि चिटणीस अशा दोन्हीकडच्या कुलदेवीस भेट द्यावी आणि आशीर्वाद घ्यावेत अस नियोजन चालूच होतं. पण अशा भेटी या योग असल्यावरच जुळून येतात हेच खर! आम्ही मुंबई मध्ये असेपर्यंत हा योग काही आला नाही. शेवटी २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी आकांक्षाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही बँगलोरहून पुण्याला येऊन तेथून दगडूशेठ हलवाईचा आमचा लाडका बाप्पा आणि मग लोणावळ्याला सीकेपी समाजाची कुलस्वामिनी एकवीरा आई, तिथून खंडाळ्याला गुप्ते घराण्याची कुलस्वामीनी वाघजाई, मग कुलदैवत सावरसई, पेण येथील बापूजी बुवा आणि शेवटी पनवेलला सासुरवाडी आणि तिथून मुंबईहून विमानमार्गाने परत बँगलोर अशी परिक्रमा पूर्ण केली. पण यावेळी पण चिटणीसांची कुलस्वामीनी असलेल्या नागाव येथील देवस्थानी जाणं काही झालं नाही. अयांशचे आजोबांची पाठ सोडायला त्याचं कार्यालय तयार नव्हते, नंतर कोरोना महामारीची लाट आणि त्यातून सावरून हळू हळू संचारबंदी शिथिल व्हायला लागली त्याच्या आतच अयांशच्या आजोबांची बदली देहरादून, उत्तराखंड येथे झाली. आता कुलस्वामीनीच्या दर्शनाचा इतक्यात काही योग येणं कठीणच दिसत होतं. तरी त्यातल्या त्यात आकांक्षाचा भाऊ अमेय त्याच्या जर्मनीला जायच्या तयारीमुळे पनवेलच्या घरीच थांबला होता. त्यामुळे एक कडी अजूनही मुंबईशी जोडलेली होती.


गंध दरवळला

प्रत्येकाच्या कामाच्या वेळा वेगळ्या असल्या तरीपण या सर्व गोंधळात देशाच्या ४ कोपऱ्यात स्थायिक झालेलो आम्ही वेळ मिळेल तसा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात असतो. अशाच एकेदिवशी गप्पा रंगल्या असताना अयांशच्या आजोबांनी त्यांना येत असलेला एक आगळावेगळा अनुभव आम्हाला कथन केला. आमच्या अध्यात्मिक वाटचालीची त्यांना कल्पना होतीच त्यामुळे हा अनुभव कथन करून काही सुगावा लागतो का ते पडताळून पहावे असा काहीसा उद्देश असावा. तर गंमत अशी की, रात्री अपरात्री त्यांना एका विशिष्ट वासाने त्यांची झोप उघडतं असे. हा सुवास असला तरी जळका वास रात्री अपरात्री का यावा म्हणून ते माझ्या सासूबाईंना पण उठवत आणि कुठे काही दिसते आहे का पडताळून पहात. असा प्रसंग ३-४ वेळा तरी झाला पण या सुवासामागचं कोड काही उलगडले नाही. शेवटी त्यांनी पण त्यावर फार विचार करण सोडून दिलं.

साधारण या दरम्यान अमेय पनवेलला एकटा असल्याने माझ्या सासू सासऱ्यांनी पनवेलच्या घरी एक २-३ दिवसांची धावती भेट द्यायचे ठरवले. पण जेंव्हा जेंव्हा त्यांनी तिकिटांचे आरक्षण करण्याचे ठरवले तेंव्हा तेंव्हा काही ना काही कारणास्तव प्रवासाची तारीख पुढे ढकलणे अनिवार्य होतं होते.


'योगायोग'

एके दिवशी अचानक "आमच्या मुंबईच्या तिकिटांचे आरक्षण झाले आहे." म्हणून आम्हाला माझ्या सासू सासऱ्यांनि कळवले. झाले एकदाचे म्हणून आम्ही सर्वांनीच निःश्वास टाकला. प्रवासाची तारीख जवळ येऊन ठेपली. या दरम्यान आकांक्षा आणि माझ्या सासू सासऱ्यांना त्यांचे पूर्वज आणि कुलस्वामीनीशी निगडित अशा काही 'धक्कादायक गोष्टी' कानावर आल्या,ज्या आकांक्षाला मिळणाऱ्या 'संकेतांशी' तंतोतंत जुळत होत्या आणि त्या निमित्ताने कुलस्वामिनीला भेट देण्याविषयीचा विषय पण पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला. एकंदर आमचा अध्यात्मिक प्रवास बघता 'योगायोग' असं काही नसतं आणि सगळ्या घटना, त्यातली पात्रे, चेतन अचेतन गोष्टी सगळं हे त्या नियतीने बरोब्बर जुळवून आणलेलं असतं याची मला पूर्ण जाणीव होती.


त्या दिवशी पहाटे माझं नेहमीप्रमाणे भागवत पुराण वाचन चालू होते. उघड्या डोळ्यांनी माझ्या समोर चित्र उभी राहिली. जुन मंदिर, श्रीकृष्णाची गोकुळात गायीसोबत बासरी वाजवतानाची मध्यमवयीन छबी एका जुन्या पुराण्या लाकडी चौकटीत बसवलेली पाहिली. एवढंच पाहून ती चित्र डोळ्यासमोरून लुप्त झाली. आकांक्षाला मनोमन मिळणारे संकेत कुलस्वामीनी काही कारणास्तव नाराज असल्याचे संकेत देत होती. पूर्वाजांवषयी काही घटनांची माहिती या नाराजीशी निगडित आहे हे सुद्धा कळतं होतं. असा सगळा विषय तापलेल्या लोखंडासारखा गरम असताना मी त्यावर अजून एक घाव घातला. पहाटेच्या दिवास्वप्नानंतर त्यातली बरीचशी कोडी मला आता उलगडायला लागली होती. मी आकांक्षाला सासूबाईंना फोन लावण्यास सांगितले. त्यांना मी एकच गोष्ट सांगितली. तुमचं येणं पुढे ढकलले जाणं, पूर्वजांचा विषय, आकांक्षाला कुलस्वामिनी नाराज असल्याचे मिळालेले संकेत, तुमच्या हातात असलेले पुढचे २ दिवस, अमेयच जर्मनीला जाणं आणि मला आज सकाळी पडलेलं दिवास्वप्न या सगळ्या कड्या एकाच साखळीच्या आहेत. तुम्ही उद्याच नागावला जायची तयारी करा. सोबत जाताना जमल्यास श्रीकृष्णाची फ्रेम सोबत घेऊन जा !


खरेदी

ठरल्याप्रमाणे माझे सासुसासरे संध्याकाळी खरेदीस बाहेर पडले. सासूबाईंनी देवीसाठी ओटी भरण्याची तयारी केली. नंतर ते एका फ्रेमच्या दुकानात पोहचले. मी वर्णन केलेली श्रीकृष्णाची फ्रेम कुठे दिसते का ते पाहू लागले. त्या दुकानदाराने लहान मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या खूप फ्रेम दाखवल्या पण मी वर्णन केलेली फ्रेम काही सापडेना. शेवटी हताश होऊन त्यांनी मला फोन केला आणि तशी फ्रेम मिळत नाही म्हणून कळवले. मी त्यांना तशी नसेल तर श्रीकृष्णाची किंवा नारायणांची कोणतीही फ्रेम घ्या म्हणून कळवले. माझ्या सांगण्यामागचा उद्देश हा होता की देवीला तिच्या नारायणांपासून दूर ठेवू नये. देवी म्हणजे त्यांच्या भौतिक शक्तीचे प्रतीक आहे. देवी नाराज असेल तर त्या श्रीकृष्णाची मनमोहक बासरी नक्कीच तिचा राग निवळण्यास सहाय्य करेल असा माझा दृढ विश्वास होता. पण तशी फ्रेम न मिळाल्याचे ऐकून मी पण शोधाच म्हणून फार आग्रह केला नाही. फोन ठेवला आणि काही मिनिटांतच अयांशच्या आजोबांनी मी वर्णन केलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राचा हुबेहूब फोटो आम्हाला व्हॉट्सॲप वर पाठवला. आधी माझा तर विश्र्वासच बसेना. नंतर घरी आल्यावर जेंव्हा त्यांनी आम्हाला परत फोन केला, तेंव्हा त्यांनी सांगितलं की हवी तशी फ्रेम मिळाली नाही म्हणून दुकानदाराने त्यांना चित्राचे वर्णन विचारले आणि मग शोधून शोधून आत दडून बसलेली ती फ्रेम बाहेर काढली. जणू काही आम्ही पोहचायच्या आत अजून कोणाच्या हाती लागू नये म्हणून तो नटखट कान्हा लपून बसला होता.


शुभम भवतु !

दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३० च्या सुमारास माझ्या सासऱ्यांनी नागाव येथील मंदिरातून आम्हाला व्हिडिओ कॉल केला. त्यांनी अमेयच्या हातात फोन दिला आणि ते पूजा कार्यात मग्न झाले. अमेय आम्हाला पूजेची तयारी दाखवत होता. माझे लक्ष देवीच्या साड्यांकडे गेले. मला स्वप्नात ज्या गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या साड्या दिसल्या होत्या त्याच रंगाच्या साड्या नेमक्या देवींना नेसावण्यात आल्या होत्या. या रंगाबाबत मी आकांक्षाला बोललो होतो पण ही गोष्ट तिने अजून कोणाच्या कानी घातली नव्हती. ती एवढी महत्त्वाची असावी असं त्यावेळी वाटलं सुद्धा नसेल. त्यामुळे ती सुद्धा आश्चर्याने किंचाळली आणि अमेय मात्र चक्रावून गेला. त्याच्यासाठी यातल्या बऱ्याचशा गोष्टी आमच्याहून अधिक धक्कादायक होत्या. बोलता बोलता दुसरी गोष्ट जी माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे श्रीकृष्णाची नवीन फ्रेम ही तेथील २ देवींच्या सोबत न ठेवता तेथील कलावती देवींच्या फ्रेमसोबत ठेवण्यात आली होती. ते पाहून मला मनोमन हसू फुटले आणि ते यासाठी की कलावती देवी या श्रीकृष्णांच्या भक्त होत्या. नुकतेच काही दिवस झाले असतील जेंव्हा मी त्यांचे चरित्र वाचत होतो आणि एक गोष्ट जी प्रकर्षाने डोक्यात बसली होती ती म्हणजे त्यांच्या गुरूंनी त्यांना श्रीकृष्णाची मूर्ती देऊन तिची उपासना करण्यास सांगितले होते आणि श्रीकृष्णांवर त्यांचे अतोनात प्रेम होते. भागवत पुराणात म्हंटले आहे की लक्ष्मी देवी किंवा इतर देवी देवतांपेक्षा त्यांना भक्ताची भक्ती खूप प्रिय आहे आणि त्यांचा त्या भक्तांविषयी जास्त अनुग्रह असतो. म्हणून खुद्द लक्ष्मी मातेने पण त्यांची आराधना केली होती. सांगायचा मुद्दा असा की आपले स्थान त्यांनी आपल्या भक्ताच्या सोबत आधीच निश्चित केले होते. आम्ही ती फ्रेम घेऊन जाणारे निमित्तमात्र ठरलो. हे सगळं पाहून मन भरून आलं आणि मनात हा एकच श्लोक आला


ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु।

मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥



सर्व सुखी होवोत

सर्व रोगमुक्त होवोत

सर्व मंगलमय क्षणांचे साक्षीदार असोत

कधी कोणी दुःखाचा भागीदार होऊ नये


चंदनाच्या सुवासाचे रहस्य

पूर्वजांशी निगडित गोष्टी, कुलस्वामिनीला भेट अशा सगळ्या गोष्टींचा माझ्या सासऱ्यांचे जेष्ठ चुलत बंधू म्हणजे प्रशांत काका आणि त्यांची पत्नी माधवी काकीशी वार्तालाप करून माझे सासू-सासरे, अमेय, काका-काकी असे सगळे नागाव येथे पोहचले होते. दोन देवी असल्यामुळे काकी आणि सासूबाई, दोघींनी खण नारळाची सर्व पूर्वतयारी केली होती. पूजा पार पडताना काकांनी सोबत आणलेली अगरबत्ती लावली. त्याचबरोबर हा सुगंध कुठुन येत आहे म्हणून माझ्या सासऱ्यांनी आजूबाजूला बघण्यास सुरुवात केली आणि त्याचबरोबर या रहस्यमय शृंखलेमधील शेवटची कडी पण उलगडली! रात्री अपरात्री येणारा सुवास हाच सुवास असल्याची परत परत खात्री पटली आणि ते ऐकून आम्ही सगळेच पुन्हा एकदा थक्क झालो !

 
 

एकंदर जे घडले आणि घडत होते सगळंच अद्भुत होते. मी त्यावर अजून थोडा विचार केला आणि भगवद्गीतेमध्ये वाचलेल्या अजून काही गोष्टी निदर्शनास आल्या.

 

भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायातील १५ व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात


सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो

मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।

वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो

वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५ ॥


भाषांतर :

मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात.

सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदान्ताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.

 

भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मारूपाने स्थित आहेत आणि सर्व क्रियांचे प्रेरक तेच आहेत. जीव आपल्या पूर्वजन्मातील सर्व काही विसरतो; परंतु त्याच्या सर्व कर्मांचे साक्षी असणाऱ्या भगवंतांच्या आदेशानुसारच त्याला कर्म करावे लागते. म्हणून तो पूर्वकर्मानुसार पुन्हा आपल्या कर्माचा प्रारंभ करतो. आवश्यक ते ज्ञान त्याला पुरविले जाते, स्मृती प्रदान केली जाते. आणि तो पूर्वजन्माबद्दल सर्व काही विसरतोही. आमच्या कर्मधर्मसंयोगाने आम्हा सर्वांनाच त्यांनी योग्य वेळी योग्य ते ज्ञान प्रदान करून आमच्याकडून आवश्यक ते कार्य त्यांनी करून घेतले.


कुलस्वामिनीचे दर्शन झाले आणि दुसऱ्या दिवशी अमेयचा जर्मनीचा व्हिसा तयार असल्याचे ई-मेल आले. त्यामागोमाग पुढे अक्कलकोट ची वारी झाली, ज्याबद्दल मी मुंबई ते हॅम्बर्ग via अक्कलकोट या लेखात लिहिले आहे. त्या दिवशी जर कुलस्वामिनीचे दर्शन झाले ते नसते झाले तर नंतर कधी होऊ शकले असते हे सांगणे अवघड आहे.


ही घटना उलटून बरेच दिवस उलटून गेले आणि आता सर्व काही सुरळीत झाल्याची शाश्वती मिळाली. अलीकडेच काही नातेवाईकांकडून त्या मंदिरात पूर्वी श्रीकृष्णाची फ्रेम असल्याचेही कळले आणि परत एकदा अंगावर शहारे आले!

 

त्यावरून श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये १८ व्या अध्यायात सांगितलेला ६६वा श्लोक आठवला


सर्वधर्मान्परित्यज्य

मामेकं शरणं व्रज ।

अहं त्वां सर्वपापेभ्यो

मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ ६६ ॥


भाषांतर :

सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये.

मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस.

 

भगवान श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान, संन्यासाश्रमाचे ज्ञान, निरासक्तीचे, मन आणि इंद्रियसंयमनाचे, ध्यानाचे इत्यादी नाना प्रकारच्या ज्ञानाचे, धर्मपद्धतींचे वर्णन केले आहे. त्यांनी विविध प्रकारच्या धर्माचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. आता भगवद्गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात की, त्यांनी आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतींचा त्याग करावा आणि केवळ मला शरण यावे. अशा शरणागती अर्जुनाचे सर्व पापांपासून रक्षण होईल, कारण भगवंत स्वतः त्याला तसे वचन देत आहेत.


खरोखरच! कोणतेही विशेष असे कर्मकांड न करता फक्त त्यांची मनोभावे पूजा करून त्या योगेश्वर श्रीकृष्णाने सगळे योग जुळवून आणले आणि कधी काळी जे काही 'अघटीत' घडले होते त्या चुका देवी आईच्या मार्गे पदरात सामावून घेतल्या!



 

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।

हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥

434 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


Mahesh Naik
Mahesh Naik
Jun 08, 2021

शब्द नाही आहेत , पण अंगावर शहारे आले. त्यात नागाव चा(alibaug) उल्लेख म्हणजे नागाव पासून काही अंतरावर माझे जन्म स्थान . नागावच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या . पूर्वी माझा पण पूर्वज, कुलदैवत यांच्या दोषावर विश्वास नव्हता . पण मला हि काही गोष्टी आता पटायला लागत आहे . अजूनहि या विषयावर चिंतन करायचा आहे .

Like
bottom of page