मागे "झुंज कोरोनाशी" लेखात आमच्या १७ दिवसांच्या विलक्षण अनुभवाबद्दल आणि तारक मंत्र आम्ही कसा पदोपदी अनुभवला याबद्दल लिहिले होते. या लेखात आणि याच्या पुढील भांगात आकांक्षाच्या या दिवसांतील अध्यात्मिक प्रवासाबद्दल आणि स्वतःचा शोध घेता घेता सुरु झालेल्या "डिस्कव्हर युअरसेल्फ" च्या प्रवासाबद्दल विस्तारित लिखाण करण्याचा छोटासा प्रयत्न.
मूळ इंग्रजी शब्दांकन - आकांक्षा चिटणीस - गुप्ते. (जर्नी टू डिस्कव्हर युअरसेल्फ)
मराठी अनुवाद - नयनेश गुप्ते.
"आकांक्षा तुझा कोविड टेस्ट रिझल्ट पॉझिटिव आला आहे! अयांश आणि मी निगेटिव्ह आहोत.", अंघोळीहून बाहेर आले आणि नयनेशचे हे शब्द कानावर पडले. एका क्षणाकरता मी सुन्न झाले, पण माझा विचार करून नाही तर अयांश आणि नयनेशचा विचार करून. त्यानां काही होता काम नये असं सारखं डोक्यात होतं. ही गोष्ट आहे स्वामींच्या प्रकट दिनाहून परतल्यावरची म्हणजे एप्रिल २०२१ मधली.
त्या रात्री झोपताना मला धाप लागत होती, श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता आणि त्यामुळे गुदमरल्यासारखी अवस्था होऊन मनाची चलबिचल चालू होती. मनातून “अयांश आणि नयनेशला काही होऊ नका देऊ. बाकी मला ज्या त्रासातून जायचं आहे त्यातून जाऊ द्या” म्हणून स्वामींना साकडं घातलं आणि तशातच कधी झोप लागली कळलं नाही. पहाटे ३ च्या प्रहरी अचानक एका ओळखीच्या आवाजाने जागी झाले. त्या आवाजाचा रोख माझ्या दिशेने होता, आवाजात एक जरब होती. शब्द कानी पडले - "लोळत काय पडली आहेस ! उठ ! तूला काहीही झालेलं नाहीये. तूच म्हणाली होतीस की तूला वेळ मिळत नाही. बघ! आता तूला १५ दिवस दिले आहेत. उठ ! तुला मोठं काम करायचं आहे". आणि तिथूनच खरा प्रवास सुरु झाला.
स्वामींच्या कृपेचा अलभ्य लाभ मला कायम मिळाला आहे कारण माझ्यासाठी ते माझे आई, वडील, गुरु, सखा आणि रक्षक असे सगळंच काही आहेत. त्यांनी वेळोवेळी संकटातून सोडवले आहे. त्यांची ती बोलण्याची अद्वितीय पद्धत मनावर ठसा उमटवून जाते. त्या दिवसानंतर प्रत्येक पहाटे २:४५-३ च्या सुमारास मला माझ्या खिडकीच्या बाहेर एका पक्षाचा मधुर आवाज ऐकू येई आणि त्याच्या किलबिलाटानेच माझी झोप उघडत असे. मी साधनेला बसले की पक्षी शांत होऊन जाई. स्वामींनीच त्याला ही जबाबदारी दिली असावी!
मला माझ्या साधनेतील फरक जाणवत होता. माझी साधना आता प्रदीर्घ काळ आणि अत्यंत एकाग्रतेने होऊ लागली. अर्थात त्या ब्रम्हमुहूर्तावरची शांतता पण त्याला तेवढीच उत्तेजक म्हणून कार्य करत होती. अशाच एका दिवशी मी नेहमीप्रमाणे साधनेला बसले होते. फरक एवढाच की यापुढे काय होणार आहे याचा मी यापूर्वी कधी विचारच केला नव्हता. साधनेच्या तंद्रीत मी न जाणे कोणत्या गुहेत पोहचले होते. हाताची ध्यानमुद्रा करून मी स्वामींच्या चरणी ध्यानस्थ बसले होते. स्वामींच्या प्रचंड अजानुबाहू मूर्तिमंत देहासमोर मी खूपच ठेंगणी दिसत होते. मला स्पर्शही न करता त्यांनी त्यांचा हात फक्त माझ्या डोक्यावर धरला होता. त्या प्रेमळ हातातून पांढऱ्या शुभ्र दिव्य प्रकाशाचे लोळच्या लोळ माझ्यावर कोसळत होते. जवळपास तासभर मी त्या साधनेच्या दिव्य आनंदात न्हाहून निघाले होते. मस्तकावर कोसळणाऱ्या त्या ऊर्जेच्या प्रभावाने मला माझ्या आज्ञा चक्राच्या ठिकाणी जडपणा जाणवत होता. हा सगळा साधनेचा सोहळा मी शक्य तितकी स्तब्ध राहून अनुभवतच होते इतक्यात आपल्या दोन्ही अजानुबाहू हातांनी आपल्या पायांना छातीशी कवटाळून, उजव्या हाताच्या तर्जनीने वामपादाच्या (डाव्या पायाच्या) करंगळीकडे निर्देश करणाऱ्या अनोख्या योगमुद्रेत बसलेले शंकर महाराज समोर दिसू लागले. मी गहिवरून गेले. स्वामींनी त्यांच्या अत्यंत प्रिय शिष्य शंकर महाराजांकडे मला सुपूर्त केले होते. त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा स्वामींच्या कार्याची आठवण करून देत मला उद्देशून उद्गार काढले - "तयार हो! तुला मोठं काम करायचं आहे!". पण काय आहे ते मोठं काम? हे मला अजूनही अज्ञातच होते.
दिवसांमागून दिवस चालले होते. कुंडलिनी शक्ती आणि शक्तिपात दीक्षा याबद्दल नवनवीन माहिती वाचनात येत होती. त्यातल्या कित्येक गोष्टी माझ्यासाठी नवख्या होत्या. अशाच एके दिवशी पुण्याच्या वासुदेव निवासचा उल्लेख वाचण्यात आला. त्यांची वेबसाईट पाहिली. त्यात कुंडलिनी शक्तीपाताच्या दीक्षेचे हे संपूर्ण भारतातले एक अतिशय महत्त्वाचे शक्ती स्थान असल्याचे कळले. त्यांच्या वेबसाईटद्वारे शक्तिपात दीक्षा घेण्यासाठी अर्ज करण्याबाबतची माहिती पुरविण्यात आलेली होती. मी मागचा पुढचा काही विचार न करता आणि कसलीही अपेक्षा न ठेवता तो अर्ज भरून पाठवून दिला.
तो शंकर बाबांच्या समाधीचा दिवस उजाडला. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट जी माझ्या निदर्शनास आली ती म्हणजे "कुंडलिनी महायोग दीक्षा १३ जून, २०२१ या दिवशी देण्यात येईल याबाबत." मला पुन्हा एकदा आनंदाचे भरते आले. ठरल्याप्रमाणे पुढचे काही दिवस संपूर्ण सात्विक आहार, साधना, प्रवचने ऐकणे असा माझा नित्यक्रम चालू राहिला.
१२ जून, २०२१.
दीक्षेचा दिवस जवळ येऊन ठेपला. शंकर महाराजांच्या समाधी मठात जाता यावं अशी तळमळ प्रकर्षाने जाणवू लागली. पण एकंदर परिस्थिती बघता लॉकडाऊन मुळे इतक्यात तरी ही पर्वणी मिळणं कठीणच होतं त्यात आम्ही बँगलोरला! काही तरी करा महाराज! म्हणून महाराजांना आर्त स्वरात हाक मारली आणि त्यांनी पण ओ दिली! -"मी तुझ्याच जवळ आहे! बघ!" आधी काहीच उलगडा झाला नाही. पण शंकर महाराजांच्या समाधी मठातील मूर्तीच चित्र काढण्याची ओढ लागली आणि ती महाराजांनी पूर्ण करून घेतली. त्यांच्याच इच्छेने मी त्यांच्या समाधी मठातील मूर्तीच चित्र साकरल होतं!
दीक्षेचा दिवस उजाडला. प्रातः समयी दीक्षेचा आनंदमयी सोहळा पार पडला. शक्ती आणि शिवाचे मिलन झाले. मी पुन्हा एकदा त्या साधनेच्या आनंदात न्हाऊन निघाले.
या सगळ्या एका मागून एक होणाऱ्या घटनांचा मागोवा घेत मी कित्येक वेळा विचारात गर्क होऊन जाई की या सगळ्या अचानक घडणाऱ्या घटना मला नक्की कुठे घेऊन चालल्या आहेत. आयुष्य एक वेगळचं वळण घेत होतं. पण कोण्याही सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे मला एकच गोष्ट समोर दिसत होती ती म्हणजे या अध्यात्मिक आणि सांसारिक जीवनाची सांगड घालून त्याच्यात समन्वय साधणे. सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात सर्वांना खऱ्या अर्थाने ज्या मानसिक समाधानाची आवश्यकता आहे, ते मानसिक समाधान मिळवण्याचा मार्ग अध्यात्मिक वाटचालीत दडला आहे. पण दुर्दैवाने तो बहुतांश लोकांना कळलेला नाही. मला या अध्यात्मिक प्रवासात घेऊन आल्याबद्दल मी माझ्या गुरूंच्या प्रती कृतकृत्य आहे आणि त्याच बरोबर या गोष्टीची जाणीव पण अंतर्मनात आहे की माझे गुरू माझ्याकडून काहीतरी मोठे कार्य घडवून घेऊ इच्छित आहेत; ज्याची या घडीला सर्वांना अत्याधिक आवश्यकता आहे. जेणेकरून लोकांच्या डोळ्यावर बांधलेली अज्ञानाची पट्टी मी दूर करण्यास हातभार लावू शकेन.
खरा शाश्वत आनंद नक्की कशात आहे?
उत्तम पती/पत्नी आणि आज्ञाधारक मुलं ? शानदार घर, गाडी ? चांगल्या पगाराची नोकरी की चांगला जम बसलेला धंदा?
आणि हे सगळं नक्की कोणी ठरवलं किंवा कसं ठरलं? हे सगळं मिळून सुद्धा - जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तूची शोधूनी पाहे। असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात ती परिस्थिती आहेच.
बाहेर समाजाकडे पाहून आपण या सगळ्या गोष्टी असणं म्हणजे सुखी असणं अस उगाचच आपण आपल्याला समजावतो. पण हे आपण आपल्याशी खरं बोलतो का? हे सगळं असूनही मनाला शांती समाधान मिळतच अस आपण खात्रीने सांगू शकत नाही आणि मिळालं तरी दीर्घ काळ टिकेल अथवा नाही याची शाश्वती देणं शक्य नाही. थोडक्यात चिरकाळ टिकणारा शाश्वत आनंद या वाढत जाणाऱ्या अपेक्षांमुळे क्षणभंगुर ठरतो. पण कितीही झालं तरी आपण प्रापंचिक आयुष्य पत्करले असल्यामुळे, प्रपंचापासून माघार घेऊन पळणे शक्य नाही. किंबहुना मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की, असं काय आहे ज्यामुळे तुम्हाला नक्की मानसिक समाधान मिळेल ? माझ्या मते तुमच्यापैकी कित्येक जण म्हणाल की या धक्काधक्कीच्या जीवनात यावर विचार करण्याइतका पण पुरेसा वेळ आमच्याकडे नाही तर अशी स्वप्न साकार करण्याचं काय घेऊन बसलात ? स्वतःच्या आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यात आपण स्वतःला एवढं गुंतवून घेतलेलं असतं की सगळं करूनही शेवटचा श्वास घेताना काहीतरी इच्छा आकांक्षा अपूर्णच राहून गेल्या याची कित्येकदा रुखरुख लागून राहते. आणि त्या न संपणाऱ्या इच्छा अपेक्षांचा गाडा मनुष्य पुढील जन्मात ओढतच राहतो.
मी या सगळ्यांपासून काही वेगळी आहे असं म्हणत नाही. मी सुद्धा एक स्वतःचा कामधंदा, संसार, मुलबाळ सांभाळून यातून वेळ नाही अशी सबब देऊन पळवाट काढणाऱ्यांपैकीच एक होते. पण आपण जेंव्हा एखाद्या गोष्टीसाठी वेळ नाही म्हणून ती टाळतो तेंव्हा खचितच आपण त्याला तितकसं महत्त्व देत नाही. पण या संदर्भात आपण स्वतःबद्दल बोलत आहोत. आपण स्वतःसाठी महत्त्वाचे नाही का? हरवलेल्या स्वतःला धुंडाळून काढणं महत्त्वाचं नाही का ? शंकर महाराज पण म्हणातात की ८४ लक्ष योनींमधून प्रवास केल्यावर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्यात काही पुण्य कर्माची भर पडते तेंव्हा पुढील जन्म पण मनुष्य जन्म प्राप्त होतो. पण तो या हाल अपेक्षा सहन करण्यासाठी म्हणून का? मग आपल्या आयुष्याच साध्य नक्की काय आहे हे शोधून नको का काढायला?
क्रमशः
अप्रतीम लेख... खरचं विचार करायला लावणारा...