शोध स्वतःचा... भाग १ या भागाचा पुढील भाग -
एवढा वेळ मी ज्या उत्तराच्या प्रतीक्षेत होते ती उत्तर आता समोरून चालून येत होती. मला निमित्तमात्र करून स्वामी आणि शंकर महाराज कार्य घडवून घेत होते. त्यासाठी योग्य लोकांची निवड आणि सगळी जुळवाजुळव त्यांनी अगोदरच करून ठेवली होती. आमची ओळख होणं, एकत्र येणं हा निव्वळ योगायोग मुळीच नव्हता.
ज्या दिवशी मी दीक्षा घेतली त्याच दिवशी योगायोगाने मला माझ्या या प्रवासात ज्यांनी बहुमोलाच मार्गदर्शन केलं अशा कविताजींचा मेसेज आला. त्यांनी त्याच शब्दांत मला एक महत्त्वाचा संदेश दिला, जो मला स्वामी आणि शंकर महाराजांकडून मिळाला होता - "तयार हो! आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे!". मी पूर्वी ज्या ठिकाणी माझे स्पीच थेरपीचे कन्सल्टेशन घेत असे तेथील एका सहकाऱ्यामुळे माझा आणि कविताजींचा संपर्क आला आणि आमच्या तारा तेंव्हाच जुळल्या होत्या. त्यांना त्यांच्या गुरूंकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे "डिस्कव्हर युअरसेल्फ"चा प्रवास आधीच सुरु झाला होता. पण त्यांना या कार्यात सहकार्याची आवश्यकता भासणार आहे हे त्यांचे गुरु जाणून होते आणि त्या कार्यास हातभार लावण्यासाठी माझी सुद्धा तयारी करून घेतली जात होती. आमच्या गुरूंनी योग्य घटिका पाहून आम्हाला तसे संकेत दिले होते.
"डिस्कव्हर युअरसेल्फ" हे स्वामी आणि शंकर महाराजांनी सोपवलेल खूप मोठं कार्य आहे ज्यात मी ओढली गेली आहे. शंकर महाराज स्वतः म्हणतात- “मुझे वो ही जानता है, जो खुद को समझता है।”
खरं तर कविताजींची सुद्धा हे स्वप्न साकार करण्याची आंतरिक ओढ खूप आधीपासून होती आणि तसं अध्यात्मिक मार्गदर्शनही त्यांना त्यांच्या गुरूंकडून करण्यात येत होतं. कविताजी एक संमोहन चिकित्सक आणि रेकी सारख्या विविध अध्यात्मिक ऊर्जा तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या आणि अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणाऱ्या एक अतिशय प्रेमळ मार्गदर्शक आहेत.
नावात काय आहे?
नावात सगळं काही आहे ! "डिस्कव्हर युअरसेल्फ" हा स्वतःचा शोध स्वतःच घ्यायचा एक प्रवास आहे ज्याचे प्रवासी आहात तुम्ही आणि खरे मार्गदर्शक असणार आहेत तुमचे अध्यात्मिक गुरु अर्थात स्वामी, शंकर महाराज किंवा अस म्हणा की तुम्ही त्यांचं जे साकार रूप तुमच्या मनाला भावतं किंवा तुमच्या श्रद्धास्थानी आहे, त्या साकार रूपात ते तुमच्या पाठीशी उभे राहतात. आम्ही या मार्गातले फक्त एक सहप्रवासी असू ज्यांनी या मार्गाने यापूर्वी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आम्ही आमचे अनुभव तुमच्या सोबत वाटू शकू आणि काही नवीन अनुभव आम्हीपण घेऊ शकू. प्रत्येकाचा प्रवास हा तसं म्हणायला एकमेव रहाणार आहे, ज्याची दुसऱ्याच्या प्रवासाशी तुलना करता येईलच अस सांगता येत नाही. किंबहुना न केलेलीच बरी!
कविताजींसोबत या प्रवासात त्यांच्या दुसऱ्या बॅच मध्ये मी सहाय्यक म्हणून सामील झाले. माझ्या बाबतीत सांगावं तर या ३ महिन्यांच्या प्रवासात मला माझ्या कित्येक प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि कित्येक कोडी उलगडली! या दरम्यान मी इतरही आध्यत्मिक गुरूंशी परिचित तर झालेच पण त्याचबरोबर त्यांचा अनुग्रह प्राप्त होण्याचे भाग्य सुद्धा लाभले. मला मनापासून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते ती गुरुदेव परम पूज्य श्रीराम शर्मा आचार्य यांची, ज्यांनी गायत्री परिवार - शांतीकुंज, हरिद्वार याची स्थापना केली. त्यांचे मला फक्त मार्गदर्शनच नाही लाभले तर त्यांच्यामुळे मी अशा सर्व सुंदर व्यक्तींशी जुळले.( इथे अंतर्मनाने सुंदर अभिप्रेत आहे. )
आजच्या घडीला या प्रवासात भेटलेल्या या काही व्यक्तींसोबत मोठ्या कार्याची धुरा सांभाळत आम्ही अधिकाधिक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू पाहत आहोत. "डिस्कव्हर युअरसेल्फ" हा फक्त अध्यात्मिक मार्गात पुढे जाऊ इच्छिणाऱ्यांसाठीच मर्यादित नसून तो अशा सर्वांसाठी आहे ज्यांना वाटत आयुष्यात कुठेतरी हरवलो आहोत. मग त्याला कारण तुमचे पारिवारिक संबंध, कामाचा त्राण, इत्यादी काही असू शकत. "डिस्कव्हर युअरसेल्फ" द्वारे प्रत्येकाचे वैयक्तिक पातळीवरील मार्ग मोकळे होऊ लागतात आणि ज्याला त्याला आपल्या शंकांचे समाधान आपोआपच निरसन सापडू लागते. उदाहरण सांगायचं झालं तर कोणी त्यांच्या घरच्या कर्त्या व्यक्तीला कोरोना मध्ये गमावलं होतं, तर कोणी स्वतःचं स्वतःची नोकरी - धंदा गमावून बसलेलं, कोणी अशा गृहिणी होत्या ज्या सगळ्यांसाठी सगळं काही करूनही स्वतःच अस्तित्व गमावून बसल्या होत्या, तर कोणी एका मागोमाग एक येणाऱ्या अपयशामुळे खचून गेलेलं होतं, तर कोणी असे होते ज्यांना त्यांच्या अध्यात्मिक मार्गात आपण योग्य दिशेने वाटचाल करतो आहोत की नाही याबद्दल साशंक होते. मी हे माझे भाग्य समजते की, माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात मी जे काही ज्ञान आत्मसात केलं, ते तसं म्हणायला जरी खूपच क्षुल्लक असलं, तरी ते ज्याची त्यांना खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे, त्यांच्यासोबत वाटावं अशी स्वामींची ईच्छा असावी. कारण ज्ञान हे वाटल्याने त्याचा इतरांनाही लाभ होतोच आणि वाटणाऱ्यासाठी ते अजून वृद्धिंगत होतं. मी ते स्वतःपुरते ठेवणे म्हणजे एका अर्थाने तो स्वार्थीपणाचं होईल.
अलीकडेच मला माझ्या कुटुंबासोबत डेहराडून येथील माझ्या माहेरी भेट देण्याचा योग आला. आमच्या या वास्तव्याच्या दरम्यान आम्ही ऋषीकेश आणि हरिद्वार येथे भेट देऊ शकलो. एका अर्थाने हा दौरा "डिस्कव्हर युअरसेल्फ" सोबतच्या माझ्या प्रवासात माझे गुरु विविध रूपात माझ्या सोबत असल्याची जणू साक्ष देत होते. मग वसिष्ठ गुहेच्या द्वाराशी भेटलेले रामकृष्ण परमहंस, शारदा देवी, स्वामी विवेकानंद होते तर कधी ऋषीकेशला भल्या पहाटे साधनेत अनुभूती देऊन जाणारे माझे शंकर बाबा होते. हरिद्वारला आलेच आहे म्हंटल्यावर शांतिकुंजला जाऊन गुरुदेव परम पूज्य श्रीराम शर्मा आचार्य यांच्या समाधीशी नतमस्तक होण्याची पण संधी मिळाली. या सर्वांचं बाह्य स्वरूप वेगवेगळं असलं तरी मूळ गुरुतत्त्व हे एकच असल्याचं कायम लक्षात आहे त्यामुळे मनावर आणि हृदयावर अधिराज्य स्वामी आणि शंकर महाराजांचं असलं तरी त्यांची हि सगळीच रूप मला तेवढीच पूजनीय आहेत.
प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी "डिस्कव्हर युअरसेल्फ" बद्दल मनात विचार मनात घोळतचं होते आणि असे असताना जागोजागी माझ्या गुरुचं कोणत्या न कोणत्या मार्गाने समोर येणं हे मी आणि "डिस्कव्हर युअरसेल्फ" योग्य मार्गाने वाटचाल करत आहोत याची खात्री पटवून देत होते. मी सद्गुरुंच्या प्रती जितकी शरणागत आहे तेवढीच त्यांची मला या मार्गात आणून सोडल्याबद्दल अत्यंत ऋणी आहे.
Shodh swatahacha both bhag....khupach sundar aahet....tumha sarvana pudhil pravasasathi shubhechcha