top of page
Writer's pictureNayanesh Gupte

दृष्टांत

भटकंती

भौतिक जगाची भटकंती आकांक्षा आणि मी लग्न व्हायच्या आधीपासूनच करत आलो आहोत. आधी आमचे आई वडील सोबत असतं, लग्न झाल्यावर दोघांनी मिळून खूप भटकंती केली आणि अयांशच्या जन्मानंतरही ती चालूच आहे पण अध्यात्माच्या प्रवासातले आम्ही तसे नवीनच प्रवासी. पण ह्या प्रवासात अनेक रोमांचकारी घटनांची अनुभूती घेत एका सुंदर नागमोडी वळणाच्या रस्त्यास लागलो आहोत.


कुतूहल

गेल्या काही महिन्यांपासून "तुमचा अध्यात्मिक प्रवास कसा सरू झाला?" , "तुमच्या घरी स्वामींची उपासना आधीपासून केली जात होती का?" असे निरनिराळे प्रश्न खूप जणांनी विचारले. माझ्या भगवद्गीता वाचून झालेल्या विलक्षण प्रवासाबद्दल मी बऱ्याचदा माझ्या लेखांत लिहिले आहे. पण, हा लेख विशेष आहे! कारण हा लेख आकांक्षाच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल आहे. तिचा प्रवास माझ्या आधी सुरू झाला आणि तिचा प्रवास सुरू नसता झाला तर माझाही कदाचित झालाच नसता. पती-पत्नीपैकी एकाचा प्रवास सुरू झाला तर दुसऱ्याचा पण होतोच आणि तसे नाही झाले तर मात्र दोघांचाही मार्ग खडतर आहे !


रहस्य

अयांश गर्भात असल्यापासूनच आकांक्षा तिला अचानक वेगवेगळे आकडे आणि त्यांची पुनरावृत्ती होणारी शृंखला सगळीकडे दिसू लागली. जसे की घड्याळात पाहिलं की नेहमी १:११, ११:११,३:३३,४:४४,५:५५ असे काही आकडे दिसत रहाणं. एकदा - दोनदा दिसणं हा योगायोग असू शकतो पण पण दिवसातून किमान ४ वेळा आणि तेही अगदी रोज म्हणजे आश्चर्याची बाब होती. अयांशच्या जन्मानंतरही हे चालूच राहिले. हे असे आकडे Angel Numbers म्हणून ओळखले जातात. पण या कोण Angel आहेत ? आणि आपल्याला काय सांगू इच्छित आहेत ? हे आकड्यांचे कोडे उलगडायला वेळ लागला.


निराशा

अयांशच्या जन्मानंतर वर्षभराने कोरोनाने थैमान घातला आणि सगळी परिस्थितीच कठीण होऊन बसली. आकांक्षाचे लहान मुलांशी संबंधित खाजगी वैद्यकीय केंद्र असल्याने तिला हे केंद्र कोरोनाचे संकट आटोक्यात येईपर्यंत बंद ठेवणे आवश्यक होते. माझेही घरूनच काम चालू होते. आपल्या वैद्यकीय केंद्राची काळजी आणि उत्पन्नाचे साधन खंडित झाल्यामुळे आकांक्षा चिंतेने ग्रस्त होऊन गेली. केंद्राच्या जागेचे भाडे, तिथे काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचा आणि तज्ञांचा ठरलेला मोबदला देणं अशक्य झालं होतं. ती अक्षरशः रडकुंडीला आली होती. मी मदतीला असलो तरी माझ्यावर पूर्ण अवलंबून राहणे तिला पटत नव्हते. पण हतबल होऊन बसण्यापलिकडे काही पर्याय पण दिसत नव्हता.


तंत्र-मंत्र

अशातच या सर्वत्र दिसणाऱ्या आकड्यांचे रहस्य काय आहे हे शोधण्यास तिने सुरुवात केली. त्यातून मिळणाऱ्या माहितीद्वारे आकांक्षाने या तंत्र मंत्र विद्येशी निगडित वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवली. त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारचे Tarot Card, Angel Cards, Access Bars, Reiki, Crystal Healing इत्यादी विविध विषयांमध्ये नैपुण्य मिळवले. या सगळ्या गोष्टी शिकण्यामागचा उद्देश एकच होता की याद्वारे मनाची शांती मिळवणं आणि इतरांनाही तशीच शांती मिळवून देण्यास मदत करणं.


जेंव्हा तुम्ही मनाची शांती मिळवण्याची धडपड सुरू करता तुमचा अध्यात्मिक प्रवास सुरू झालेला असतो. तंत्र मंत्र म्हणजे एक प्रकारची मायाच आणि सर्व मायेचे एकमेव अधिपती म्हणजे श्रीकृष्ण आणि अध्यात्मिक जीवनाचे परम गुरू पण श्रीकृष्णचं !


दिवाळी २०२०

दिवाळी जवळ येऊन ठेपली होती. माझ्या सख्या काकांचे आजारपणाने नुकतंच निधन झाल्याने आमच्या घरात दिवाळी साजरी होणार नसल्याचं निश्चित होते. संचारबंदी शिथिल होण्यास सुरू झाली असून प्रवास करण्यास आता शासनाकडून आता मुभा देण्यात आली होती. आम्ही पण त्या संधीचा लाभ घेऊन काही दिवस माझ्या सासू सासऱ्यांच्या देहरादून येथील निवासस्थानी जाण्याचे ठरवले आणि त्या अनुषंगाने आमचे हरिद्वार, हृषिकेश दर्शनही होईल असे ठरवून आम्ही देहरादूनला कूच केले. मी सोबत भगवद्गीता घेतली होती. वेळ मिळेल तसा वाचत होतो.


अथातो ब्रम्हजिज्ञासा !

आपल्याला दिसणारे Angel Numbers आणि ज्या पद्धतीने या अध्यात्मिक प्रवासातील गोष्टी उलगडत चालल्या होत्या त्यावरून आकांक्षाला एका गोष्टीची जाणीव नक्कीच झाली होती की आपल्या डोक्यावर अध्यात्मिक शक्तीचा हात आहे पण त्या शक्तीस नक्की काय नावाने संबोधावे याची प्रचिती अजून आली नव्हती. आम्ही बऱ्याच नवीन गोष्टी वाचून आणि अनुभव घेऊन शिकत होतो.

ध्यान लावणं ही प्रक्रिया मुळातच वाटते तेवढी सोपी नाही. शून्यात किंवा निराकार ब्रम्हात ध्यान लावून बसणं ही अशक्य गोष्ट आहे. ध्यान लावताना अशी शून्यात तंद्री लावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते त्या परब्रम्हावर अथवा त्याच्या कोणत्याही रुपावर लावावे. आकांक्षा पहाटे ब्रह्मवेळी (साधारण पहाटे ०३:००-०५:०० च्या दरम्यान) उठून ध्यान लावून बसत असे.

असेच एके दिवशी, ब्रह्मवेळी, आकांक्षा ध्यान लावून बसली असताना नवीनच लावलेला LED बल्ब मिणमिण्यास सुरुवात झाली. ध्यानात मग्न असलेल्या आकांक्षाला कोणी अध्यात्मिक शक्ती आपल्या आसपास असून आपली प्रचिती देत असल्याची जाणीव झाली. त्या अध्यात्मिक शक्तिसमोर हात जोडून त्यांना परिचय देण्याची विनंती केली आणि तिला एकच आवाज ऐकू आला -


भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!


याहून अजून काय तो परिचय विचारायचा राहिला होता आता? सगळं चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागलं. त्या दिवसापासून आजतागायत आमच्या दोघांचाही अखंड भक्तीचा प्रवास चालूच आहे. त्यांचा आवाज मध्ये मध्ये कानावर पडत राहतो आणि आम्ही त्याला गुर्वाज्ञा म्हणून त्याचे पालन करत राहतो.


कर्मण्येवाधिकारस्ते...

१८ एप्रिल, २०२१ रोजी आकांक्षा कोरोना चाचणीत positive आल्याचे कळूनही आम्हाला एका क्षणासाठीही चिंतेने ग्रासलेले नाही ते फक्त आणि फक्त त्या एका आवाजामुळे. "श्रीकृष्णाय अर्पणमस्तु" आणि "श्री स्वामी समर्थाय अर्पणमस्तु" म्हणून सगळं काही त्यांना अर्पण केले आहे आणि सर्व काही त्यांच्यावर सोडून आम्ही आमच्या भक्ती आणि कर्मात व्यस्त आहोत.


627 views2 comments

2 Comments


Mahesh Naik
Mahesh Naik
Jun 08, 2021

मला हि ११:११ , १०:१० वारंवार दिसत आहेत ,पण अर्थ लागत नाही आहे

Like
Nayanesh Gupte
Nayanesh Gupte
Jun 08, 2021
Replying to

वेळ आला की कळेल. तुम्ही प्राणिक हिलिंग शिकलात म्हणजे तुम्ही energies वर काम करू शकता. आणि या energies guided energies असल्यामुळे एका अर्थाने हे विदेही, सिध्द, गंधर्व इत्यादी ज्यांना angels card किंवा tarot card प्रॅक्टिस करणारे angles म्हणतात ते एका अर्थाने तुमच्यावर प्रभावित आहेत. तुमचं प्राणिक हिलींग शिकणं हे त्याचाच भाग असू शकतं

Like
bottom of page