गुरुपौर्णिमा जवळ येत होती तसे गाणगापूर जाण्याचे वेध लागले होते. गाणगापूर कर्नाटकातच असल्यामुळे बँगलोरहून गाणगापूरला प्रवास करणे तसे सहज शक्य होते. पण.. हा "पण" फार त्रासदायक असतो. कोविडची दुसरी लाट आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गर्दी होऊ नये म्हणून मंदिर बंद ठेवण्यात येण्याची शक्यता असल्याचे मंदिरातील पुजारी वल्लभ भट यांनी सूचित केले होते. या दरम्यान दाभोळे मठात भेटलेले गजानन कुलकर्णी संपर्कात होते. त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दाभोळे मठात जाणार असल्याचे कळवले. दाभोळे मठ तसा लोकांना माहिती नसल्याने प्रवास करून येणाऱ्या लोकांची गर्दी होण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे आम्ही मठाचे सर्वेसर्वा सिनकर काकांना फोन करून आम्ही तिथे २ दिवस मुक्कामाच्या तयारीने येतो आहोत असे कळवले. त्यांनाही आनंद झाला. खूप दिवसांपासून आमची तिथे भेट न झाल्याने आम्ही लौकरात लौकर तिथे यावं अशी त्यांचीपण इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी करायला घेतली. आपल्यासोबत गौरी ताई, वैशाली ताई यांनी सुद्धा तिथे यावं अशी इच्छा होती. या विचारांत होतो इतक्यात गणपतीपुळेच्या अभिषेक हॉटेलचे ईमेल आले. मी गौरी ताईला आणि आकांक्षाने वैशाली ताईला ही कल्पना सुचवली की ते गणपतीपुळे येथील अभिषेक हॉटेलमध्ये राहू शकतात. तिथून दाभोळे मठ तासाभराच्या अंतरावर आहे. वैशाली ताईला काही कारणास्तव जमणे कठीण होते. पण गौरी ताईला ही कल्पना फार आवडली. तिने सुद्धा त्याप्रमाणे पावलं उचलायला सुरुवात केली. जवळपास आमच्या सर्वांचंच सगळं काही नक्की झालं होत. पण परत एकदा "पण" मध्ये आला. स्वामींचे खेळ स्वामींनाच माहित. कोकण विभागास पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे झाडे उन्मळून पडली, दरड कोसळली आणि आणि दाभोळे मठाकडे जाणारा रस्ता बंद आला. आम्हाला घरून चिंतेचा सुर कानी पडू लागला. एरवी बँगलोर ते दाभोळे मठ हे ८२५ किलोमीटर अंतर आम्ही १२ तासांत पार करतो पण पावसाळी हवामान आणि ओले निसरडे रस्ते असताना अयांशला सोबत घेऊन ही जोखीम घेण्याची मानसिक तयारी होत नव्हती. दाभोळे दौरा रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. मन खजील झाले होते. परत एकदा गाणगापूरला जावे का म्हणून विचार सुरू झाले. आता मी स्वतः काही विचार करण्यात तथ्य नव्हते. श्रीकृष्णांना साकडे घातले. ते म्हणाले असावेत, "अरे गुरुपौर्णिमा आहेस म्हणतो. माझ्या कृष्ण स्वरुपास गुरू मानतोस, मग एवढा विचार कसला करतोस?". अचानक उडुपी श्रीकृष्ण मठ डोळ्यासमोर आला. त्याचबरोबर जाणवणारी स्पंदन तीव्र होती. आता अजून किंतू परंतू पण या कोणालाही मध्ये येण्याची काहीच सोय नव्हती. तरी एकदा मठ दर्शनासाठी उघडा असल्याची खात्री करून घ्यावी म्हणून मी माझा मित्र गौतम बल्लाळला फोन केला. तो सध्या त्याच्या उडुपी येथील घरी असल्याने त्याच्याकडून आवश्यक असे सगळे तपशील मिळतील याची खात्री होती. मंदिराविषयी हे तपशील गोळा करताना गौतमने एक गोष्ट कानावर घातली की मंदिर दुपारी २ ते ६ या वेळातच उघडे राहील आणि इतके दिवस बंद ठेवण्यात आलेले मंदिर ३-४ दिवसांपूर्वीच उघडण्यात आले आहे. हे ऐकून खूपच आनंद झाला. आता उडुपीला जाण्याचे वेध लागले.
उडुपी आणि आमचं वेगळंच नात आहे. आकांक्षा आणि तिचा भाऊ अमेय दोघांनी त्यांची पदवी उडुपीला लागून असलेल्या मणिपाल येथील विद्यापीठातून प्राप्त केली असल्याने या जागेशी आकांक्षाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याचबरोबर आकांक्षाला भेटण्यासाठी आणि अमेयच्या अभियांत्रिकीच्या प्रवेशावेळी आणि अशा अजून काही प्रसंगी माझी सुद्धा तिथे काही वेळा भेट झाली होती आणि त्याचबरोबर उडुपी श्रीकृष्ण मठात जाण्याचा योग यापूर्वीही आला होता. पण त्यावेळी श्रीकृष्ण हेच आपले अध्यात्मिक गुरू आहेत याची पुसटशी सुद्धा कल्पना त्यांनी होऊ दिली नव्हती.
प्रवासाचे दिवस जवळ येत चालले होते. आषाढी एकादशीचा दिवस. पहाटे नेहमीप्रमाणे उठलो खरा पण डोक्यात एक वेगळाच संदेश घेऊन - "ही तुझी वारी आहे". तेंव्हा काहीच बोध झाला नाही. गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला. खर म्हणजे दिवस उजाडायच्या आताचं आम्ही पहाटे ५ वाजता घर सोडलं होतं. झुंजू मंजू झालं तोपर्यंत आम्ही उडुपी मंगलोर कडे जाणारा रस्ता धरला होता. पाऊस रिमझिम पडत होता. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ पाहून प्रसन्न वाटत होतं. मी गाडी चालवत होतो आणि आकांक्षाने "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" च्या गजरासोबत त्या प्रसन्न वातावरणात एक वेगळंच पावित्र्य मिसळून टाकलं.
हासन शहर सोडलं आणि रस्ता अरुंद झाला. आता घाट सुरू होणार होता. रस्त्याच्या दुतर्फा असणार हिरवळ आता मोठ्या वृक्षांमध्ये परिवर्तित होत होतं. पावसाची रिमझिम चालूच होती. Youtube ने त्याची नेहमीची suggestions ची वाट सोडून विठ्ठलाच्या भजनांची वाट धरली. महेश काळेंच्या आवाजात "अबीर गुलाल" उधळला आणि अंगात चैतन्य सळसळल. त्यामागोमाग विठ्ठल नामाचा गजर चालूच झाला. "ही तुझी वारी आहे" चा उलगडा आता होतं होता. रस्त्यावर आमची गाडी वगळता फार रहद्दारी दिसत नव्हती. गाई गुर आणि डोक्यावर इरले पांघरून जाणारे गुराखी अधून मधून दिसत होते. त्या गुराख्यांत माझा विठ्ठल कुठे दिसतो का म्हणून डोळे शोधत होते. त्याने परत एकदा संदेश पाठवला. "अरे आजूबाजूला बघ. ही हिरवळ, झाड, रिमझिम पाऊस आणि या निसर्गात दिसणारं हे चैतन्य आहे ना, तो मीचं आहे. त्या गाई गुरांत आणि त्यातल्या प्रत्येक गुराख्यात मीच आहे". तुकाराम महाराज "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" का म्हणाले ते आता उलगडत होतं. गाडी पळवण्याची काही घाई नव्हती. त्या वारीचा आनंद घेत आणि अभंग भजनांत तल्लीन होऊन आम्ही रस्ता कापत चाललो होतो.
बराच वेळ झाला तरी आम्ही तो सुंदर घाटाचा मार्ग धरुनच चालत होतो. आता उडुपी फक्त अडीच तासांवर राहिल्याचे दिसत होते. आम्ही दोघांनी आश्चर्याने परत एकदा आपण नक्की कोणत्या रस्त्यावर आहोत तपासून पाहिले. रस्ता बरोबर होता पण नेहमीचा मंगलोरमार्गे जाणारा रस्ता न पकडता चिकमंगलुरमार्गे जाणारा रस्ता पकडून आम्ही पुढे आलो होतो. जणू काही त्या हिरवळीच्या मार्गातून नाही तर त्या श्रीकृष्णाच्या वृंदावनातून आम्ही प्रवास करत होतो. त्या निसर्गाच्या सानिध्यात त्याच सळसळणार चैतन्य सोबत होत.
अचानक रस्त्यात आदि शंकराचार्यकृत मठाची पाटी दिसली. त्या गर्द झाडांनी व्यापलेला रस्त्यात आम्ही मधूनच त्या मठाच्या दिशेने गाडी वळवली. गूगल मॅप गोंधळला. गर्द झाडांमुळे त्याला नेटवर्क मिळेनासे झाले. आम्ही गाडी पुढे हाकत होतो खरं पण बरोबर चाललो आहोत की नाही याची शाश्वती नव्हती. एकीकडे उडुपीला पोहचायला लागणारा वेळ पण वाढत होता. पोहचल्यावर श्रीकृष्ण मठात जायचं आहे त्यामुळे जास्त वेळ काढून चालणार नाही हे पण डोक्यात होत. शेवटी गाडी मागे वळवली, आकांक्षाने ड्रायव्हर सीटचा ताबा घेतला आणि मी अयांशचा. मजल दरमजल करत आम्ही मणिपालमध्ये शिरलो. आपण चार वर्ष ज्या मणिपालमध्ये राहिलो, शिकलो त्या मणिपालच पालटलेले रूप पाहून आकांक्षा त्या आठवणींमध्ये गुंग होऊन गेली. तिकडच्या माहितीतल्या इमारती, खादाडीच्या जागा, इत्यादी पाहून ती १० वर्ष मागे पोहचली. थोड्याच वेळात आम्ही आमच्या इच्छित स्थळी म्हणजे "व्हाईट लोटस' या होटेलपाशी पोहोचलो. चेक इन वगैरे सोपस्कार पार पाडून आमच्या खोलीचा ताबा घेतला. अयांशला अंघोळ पांघोळ घालून तयार होईपर्यंत ३ वाजले होते.
खर तर पोहचल्या पोहचल्या पाहिले श्रीकृष्ण मठात जायची इच्छा होती पण भल्या पहाटे आम्ही अयांशला झोपेत तसच उचलून निघालो असल्यामुळे त्याला न्हाऊ घालून घेऊन जाणं आवश्यक वाटलं. त्यात आता ३ वाजले आणि जेवण बाकी आहे म्हणून परत द्विधा मनस्थिती निर्माण झाली. आम्ही एकवेळ उपाशी राहू, पण आमच्यामुळे अयांशची फरफट नको म्हणून जेवण आटोपून ४ वाजायच्या सुमारास मठात पोहचलो.
मठाचा संपूर्ण परिसरच चैतन्यमय आहे. त्यात पाऊस रिमझिम पडतच होता. एका हातात छत्री, दुसऱ्या हातात अयांशचा हात पकडून चालताना आकांक्षाची तारांबळ उडत होती. अयांशपण पावसात रस्त्याने चालण्याची मजा पहिल्यांदाच अनुभवत होता. मध्ये मध्ये साचलेल्या पाण्यात उड्या मारून त्याच्या आवडत्या "Peppa Pig" मधले "muddy puddle" अनुभवण्यात त्याला वेगळीच मज्जा आणि समाधान मिळत होते.
श्रीकृष्ण मठासमोरील श्री चंद्रमौळीश्वर देवालयासमोर आम्ही थांबलो. पाहिले त्या शांत स्तब्ध समाधी लावलेल्या आणि चंद्राप्रमाणेच शीतल दिसणाऱ्या शिव शंकराच दर्शन घेतलं. त्या शांत स्वरुपाकडे पाहून रुद्र रूप धारण करणारे आणि कल्पाच्या अंती प्रलय घडवून आणणारे हेच चंद्रमौळीश्वर आहेत हे विश्वास बसणं कठीण जाव इतकं ते शांत मनोहर रूप आहे. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन नामस्मरणात तल्लीन झालेले पुजारी अखंड नामस्मरण करत एकीकडे तीर्थ आणि गंध देत देत होते. त्यांचे हात फक्त यंत्रवत चालत होते. बाकी तंद्री ब्रम्हानंदी लागली होती. त्यांना नमस्कार केला. इतक्यात पावसाचा जोर वाढला असल्यामुळे एका हातात अयांश आणि एका हातात छत्री घेऊन प्रदक्षिणा पूर्ण केली आणि तिथून श्रीकृष्ण मठाकडे निघालो.
कुठेही आजिबात गर्दी नव्हती. काही क्षणांत आम्ही गाभाऱ्यात पोहचलो. आपल्या उपेक्षित भक्ताला दर्शन देण्यासाठी खिडकीच्या दिशेने मुख फिरवून बसलेल्या त्या श्रीकृष्णाच्या अर्चाविग्रहाचे दर्शन आजही त्या खिडकीतूनच घ्यावे लागते. गाभाऱ्यात फारसा उजेड नसल्याने अयांश कावरा बावरा झाला. ९ तासांच्या प्रवासाचा त्यालाही क्षीण आलाच असणार. त्यामुळे त्याला आता आरामाची आवश्यकता होती. त्याची रडारड सुरू झाली. आकांक्षाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. तोपर्यंत मी श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातले आणि आम्ही लगेच बाहेर पडलो.
परतीच्या वाटेवर आम्ही आलो तो रस्ता न पकडता आपण दुसरा रस्ता पकडावा म्हणून आकांक्षाने सूचित केले. पुढून एखादा जवळचा रस्ता असावा असा तिचा अंदाज होता पण खर म्हणता आमच्या गुरूंचा तो एक संकेत होता. कारण मधला अजून कोणता रस्ता तर नाहीच दिसला पण जेंव्हा आम्ही मुख्य रस्त्याला लागलो आम्ही श्री शंकरनारायण दत्तात्रेय मंदिरासमोर उभे होतो. मंदिराचे दार उघडे होते. आत कोणीच नव्हते. मंदिराच्या आवारात त्याच्या ऑफिसजवळ एक मुलगा काळा शर्ट आणि लाल लुंगी घालून उभा होता. "आत जाऊ का?" म्हणून त्याला खुणेनेच विचारले आणि त्यानेपण खुणेनेच होकार दर्शवला. आत मध्यभागी शिवलिंग, डाव्या बाजूस शिवलिंगावर दत्तगुरु आणि उजव्या बाजूला शिवलिंगावर श्रीकृष्ण आणि प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस वाघावर विराजमान आमची कुलदैवत वाघजाई देवी अशी आगळी वेगळी रचना असणारे ते मंदिर होते. दर्शन घेऊन आम्ही थोडावेळ शांत बसलो. पण ती शांतता पण क्षणभराहून जास्त टिकणारी नव्हती. मंदिराच्या आवारात अयांश पावसात भिजत पळापळ करण्याचा आनंद लुटत होता. पण तिथे शेवाळ असल्यामुळे पडण्याची भीती असल्याने अर्ध लक्ष तिथे लागून होत. शेवटी आम्ही जास्त वेळ न बसता, होटेलकडे निघालो. त्या मंदिरातून बाहेर पडलो तोच बाजूला अजून एक शिवमंदिर दिसले. बाहेरूनच नमस्कार केला आणि तडक हॉटेल गाठले.
हॉटेलवर परत येऊन स्वस्थ बसलो तोपर्यंत ६ वाजले होते. अयांश लागलीच झोपी गेला आणि त्यामागोमाग आमचा पण कधी डोळा लागला कळलेच नाही. जाग आली तेंव्हा रात्रीचे एक वाजले होते. पोटात भुक जाणवत होती पण आता एवढ्या मध्यरात्री कुठे जेवा म्हणून परत डोळे बंद केले ते सकाळी ५ वाजता उघडले.
२३ जुलै, शुक्रवार - गुरूपौर्णिमा
उडुपी पर्यंत आलो आहोत तर पुढे मुर्डेश्वर पर्यंत जाऊ, असा आमचा विचार होता. पण या सगळ्यात अयांशची दगदग होता कामा नये हे सुद्धा डोक्यात होतच. आमच्या भटक्या स्वभावामुळे त्या बिचाऱ्याची पण खूप धावपळ होते आणि इतक्या लहान वयात तो एवढ्या प्रवासात त्रास न देता साथ देतो ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्याने साथ दिल्याशिवाय हा प्रवास अशक्य आहे. हो नाही हो नाही करत आम्ही मुर्डेश्र्वरला जाण्याचे रद्द केले आणि सकाळच्या वेळी श्री शंकरनारायण दत्तात्रेय मंदिरात साधना करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही मंदिरास भेट देऊन तिथे थोडा वेळ शांत बसलो. वरांड्यात अयांशची धावाधाव चालूच होती त्यामुळे आम्ही आळीपाळीने साधनेला बसायचे ठरवले. मी सोबत भगवद्गीता आणली होती. माझे नित्याचे ४ श्लोक पठण करून शांत बसायचे ठरवले. इतक्यात मंदिराचे पुजारी आले त्यांनी शंकराच्या पिंडीवर अभिषेक सुरू केला. मी आणि आकांक्षा थोडा वेळ त्या अभिषेकाच्या वेळीच्या दर्शनाचा लाभ घेऊन अयांशच्या हट्टामुळे थोड्या वेळात तिथून निघालो. हॉटेलच्या रूमवर जाऊनच साधना करण्याचे ठरले.
दुपारच्या वेळात अयांश झोपी गेल्याने मी एकटाच श्रीकृष्ण मठात दर्शन घेण्यास निघालो. पावसामुळे जीन्स घालणं जीवावर आल होतं. तसाच अर्ध्या चड्डीत मठाकडे निघालो. आदल्या दिवशी प्रमाणे आधी श्री चंद्रमौळीश्वराचे दर्शन घेतले. आज पावसा ऐवजी रखरखीत उन पडले होते. तिथून बाहेर पडलो आणि श्रीकृष्ण मठाच्या दर्शनाच्या दरवाजात पोहचलो. अर्धी चड्डी पाहून तिथल्या संरक्षण अधिकाऱ्याने प्रवेश देण्यास नकार दिला. मी काहीही न बोलता माघार घेतली. जवळचे "रामराज्य" लुंगीचे दुकान गाठले. दुकानदाराने माझी समस्या जाणली. त्याने एक छानशी लुंगी मला नेसवून दिली आणि एक उपरण सोबत दिलं. त्या अर्ध्या चड्डीच्या खिशात वाजणारा मोबाईल फोन आणि त्यावर नेसलेली लुंगी यामुळे सगळीच पंचाईत झाली होती. पण वेळ न काढता तडक मठात पोहचलो. मनसोक्त दर्शन घेतलं. थोडा वेळ नामस्मरण केलं आणि परत एकदा दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर निघालो. जाता जाता दोन्ही हातात मावणार नाही अशा मोठ्या लाडूचा प्रसाद हाती घेऊन मठाच्या बाहेर पडलो. मनात विचार चालू होते. श्रीकृष्णांना म्हंटल "मला तुमचा माझ्या सोबत असल्याचा अनुभव घ्यायचा आहे. द्याल का?". इतक्यात एक दूधवाला त्याच्या मोपेडला दोन्ही बाजूला पिशव्या टांगून घुर सोडत बाजूने गेला आणि थोडा पुढे जाऊन थांबला. त्या मागोमाग एक गाय त्याच्या मोपेडपाशी येऊन थांबली. काही खायला मिळेल का या अपेक्षेने पिशवीत तोंड घालून अंदाज घेत होती. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि पुढे निघालो. लुंगीमुळे पटापट चालणे जड जात होते. भर रस्त्यात उभा राहून मी एकदा मागे नजर टाकली. ती गाय तडक माझ्या दिशेने येत होती. मी स्तब्ध उभा राहिलो. ती जवळ येऊन थांबली. मी हातातल्या कागदी पिशवीतला लाडू बाहेर काढून तळहातावर ठेवला आणि तिला सहज खाता यावा म्हणून खाली वाकलो. तिने अलगद तो लाडू अख्खा गिळला आणि मी अजून काही देऊ शकेन का या अपेक्षेने ती प्रेमाने मला तिच्या तोंडाने गोंजारू लागली आणि मी तिच्या कपाळावरून हात फिरवून तिला गोंजारु लागलो. काही क्षणांत माझ्याकडे अजून काही नाही पाहून ती पाण्याच्या शोधात पुढे निघाली. मी माझ्या परतीच्या वाटेवर निघालो. घडला प्रकार आकांक्षाला फोन करून सांगितला. अयांश अजूनही झोपून उठला नव्हता. त्यामुळे तेवढ्यात तिची पण साधना उत्तम झाली. उरला सुरला दिवस ठरल्याप्रमाणे आकांक्षाच्या मैत्रिणीच्या घरी चहापान आणि गप्पांत गेला. त्यांच्याकडेच रात्रीचे जेवण आटोपून आम्ही हॉटेलवर परतलो.
तिसरा दिवस उजाडला. परत एकदा मुर्डेश्र्वर जाऊ का नको मध्ये विचार करण्यात गेला. पुन्हा एकदा विचार बदलले कारण जाऊन येऊन ६ तास लागणार होते. दुपारी पुन्हा एकदा मठात जायचे असल्यामुळे आम्ही अर्ध्या रस्त्यात मरवंथे आणि मलपे येथील समुद्र किनाऱ्याची मजा अनुभवून परतलो.
दुपारच्या प्रहरी पुन्हा पाय श्रीकृष्ण मठाकडे वळले. रोज जाताना मठाच्या बाहेरून दिसणाऱ्या तळ्याकडे आणि जाळीच्या मागून दिसणाऱ्या त्या मंदिराकडे बघून विचार येई की "किती सुंदर दृश्य आहे मठाचे!" पण समोर लावलेल्या जाळीमुळे त्याचा फोटो काढण्याची इच्छा इच्छाच राहिली होती. २ मिनिट तिथेच थांबून मी ते भरून आलेलं आकाश, त्यातून डोकावणारी सूर्यकिरण, शेवाळ्यामुळे हिरव झालेलं पाणी, त्यातलं मठाचे प्रतिबिंब जाळीच्या आडून न्याहाळत मी उभा होतो. इतक्यात परत एकदा फोटो काढायची इच्छा झाली. "कसा काढू?" विचार करत इकडे तिकडे नजर भिरभिरली आणि त्या मोठ्या जाळीला फुटभर लांबीची जाळी कुरतडून खिडकी केलेली दिसली. तिथून संपूर्ण मठ, तळ हा सगळा नजरा मला माझ्या मोबाईल मध्ये कैद करता आला. आनंदाने भरून आलं. "किती क्षुल्लक इच्छा पण तुम्ही पूर्ण करता!" हा विचार करून खूप समाधान वाटलं.
पुन्हा एकदा मनसोक्त दर्शन घेतलं. उद्या येता येणार नाही त्यामुळे मठातच रेंगाळलो होतो. तिथल्या भिंतीवरच्या श्रीकृष्णांच्या लीलांची सुंदर चित्र पाहून मन त्या मदन मोहनाला पाहण्यात, त्या चित्रांना डोळ्यांत साठवून ठेवण्यात गर्क झाल होत. बाजूला दोन आजीबाई फुलांच्या माळा गुंफत गुंफत श्रीकृष्णाचे स्तवन करत होत्या. त्या श्रीकृष्णांच्या सेवेत पूर्णपणे मग्न झाल्या होत्या. त्यातल्या दिव्यानंदाची मला कल्पना पण करणं कठीण होतं. "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" या प्रश्नाचं उत्तरच समोर दिसत होतं. हे सगळं अनुभवताना मन भरून यायला हवं होतं का? नाही आलं. तो म्हणाला, "झालं ना तुझ्या मनासारखं दर्शन? आता लौकर घरी ये. मी वाट पाहतोय". तिथून निघालो. झपाझप पावलं हॉटेलकडे निघाली. ज्या दुकानातून आदल्या दिवशी मठात जाताना लुंगी घेतली होती, ते दुकान त्यानंतर जाता येताना कधीच उघड दिसलं नाही. त्या दुकानदाराचा प्रसन्न चेहरा तेवढा लक्षात आहे.
संध्याकाळी ठरल्याप्रमाणे माझा मित्र गौतमच्या घरी पोहचलो. त्याचा वडिलोपार्जित वाडा, शेतजमीन, आवारात देवीच आणि श्रीहरी विष्णुंच मंदिर आहे. देवीच मंदिर ७०० वर्ष जून आहे अशी ख्याती आहे. तिथे श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी काही मूर्ती खास तीरुपतीहून मागवण्यात आल्याचे गौतमने दाखवले.आम्ही पोहचलो तेंव्हा गौतमची आई विष्णूसहस्त्रनामाच्या पारायणासाठी निघत होत्या. अयांशने त्यांच्या वाड्यात कुत्रे मांजरी सोबत खेळण्यात आनंद लुटला.
थोड्याच वेळात देवीच्या मंदिरात आरती सुरू झाली. घंटानादाने परिसर दुमदुमून गेला. आम्हालाही आरतीचा अलभ्य लाभ घेता आला. अयांशने मला ओढत ओढत मंदिराच्या ३ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. आता संध्याकाळचे ७ वाजून गेले होते. अंधार पडायला लागला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे परतीचा प्रवास ५ वाजता सुरू करायचा म्हणून आम्ही गौतम आणि त्याच्या कुटुंबीयांचा निरोप घेऊन लौकर हॉटेलवर आलो आणि सगळी बांधाबांध करून लौकर झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी पहाटे परत एकदा अयांशला गाडीत कोंबून आम्ही पहाटेच्या अंधारात गाडी घाटाच्या रस्त्याने शृंगेरीच्या दिशेने पळवली. येताना रस्ता चुकलो होतो पण जाताना आता तशी पूर्व तयारी करून निघालो होतो. साधारण ७:१५ च्या सुमारास आम्ही शृंगेरी मठास पोहचलो.
अजून आजूबाजूची दुकान उघडली नव्हती. लांबून प्रवास करून आलेली मंडळी जवळच्या तुंगा नदीच्या काठावर स्नान उरकायला चालली होती. फार कमी लोक मंदिरात प्रवेश करताना दिसत होती. आम्ही पण जास्त वेळ न दवडता मंदिराच्या आवारात प्रवेश केला. अयांशला सांभाळता यावे आणि शांतपणे दर्शन घेता यावे म्हणून आम्ही एक एक करून मंदिरात प्रवेश करायचे ठरले. त्या शिव शंभूच्या मंदिरात प्रवेश करताच समोरच ते सुंदर शिवलिंग दिसले. गर्दी नव्हतीच. साष्टांग नमस्कार घालून त्यांना वंदन केल. शिवलिंगाच्या उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला देवी. दोघांनाही वंदन करून बाहेर पडलो.
बाजूला शारदा देवीचे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केला तेव्हा ॐकाराचा ध्वनी मंदिरात घुमत होता आणि त्याच्या स्पंदनातून प्रचंड ऊर्जा निर्माण करत होता. समोर सुंदर लावण्याने झळकणाऱ्या तेजस्वी शारदा देवीच्या शक्तीची उर्जाच जणू काही त्या स्पंदनांतून जाणवत होती. फार कमी वेळा अशी संधी मिळते जेंव्हा अशा लोकप्रिय देवस्थानी क्षणाभराहून जास्त वेळ स्तब्ध राहून कसलीही घाई गडबड न करता मनसोक्त दर्शनाचा आनंद लुटून त्या अध्यात्मिक उर्जेबरोबर एकरूप होण्याची संधी मिळते. आपण ब्रम्ह तर ती समोर उभी ठाकलेली अध्यात्मिक ऊर्जा म्हणजे परब्रम्ह आहे याची अनुभूती घेत काही न बोलता, मागता त्या क्षणाचा फक्त आनंद घेता येतो. या दौऱ्यामध्ये श्रीकृष्ण मठ, श्री चंद्रमौळीश्वर, श्री शंकर नारायण दत्तात्रेय देवस्थान आणि आता शृंगेरी येथील हे साधारण १२ शतकांपूर्वी आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेले हे दक्षिणेकडील अमान्य पीठ, सगळीकडेच या मनसोक्त दर्शनाचा अलभ्य लाभ घेता आला. आम्ही दर्शन आटोपलं तोपर्यंत गर्दी वाढली होती. येताना आपल्याला रस्ता का नाही सापडला याच उत्तर मिळालं होतं. भर दुपारी गर्दीत आणि कोसळणाऱ्या पावसात किंवा ऊनात अस दर्शन होऊ शकलं असतं का? हे त्या परमेश्वरालाच माहित.
आता यापुढे गाडीत बसलो ते लौकरात लौकर घर गाठण्यासाठी. जवळ होती ती गेल्या ३-४ दिवसांच्या आठवणींची, आशीर्वादाची, अनुभूतीची आणि साधनेची शिदोरी.
धन्यवाद 🙏 तुमच्यामुळे आमचे घर बसून निवांत आणि मनसोक्त सर्व देवांचे दर्शन झाल.