top of page
Writer's pictureNayanesh Gupte

गुरुचरित्र पारायण

Updated: Dec 6, 2021

प्रस्तावना

श्रीकृष्णांना जाणून घ्यायच्या ओढीने एका मागोमाग एक ग्रंथ, पुस्तक वाचन चालूच आहेत. भगवद्गीता वाचून झाली नंतर भागवत पुराण चालूच आहे. १२ पैकी ९ खंड संपूर्ण वाचून झाले. याआधी “कृष्ण” या ग्रंथामुळे दहावा खंड आधी एकदा वाचून झाला आहे पण पुन्हा १०वा खंड एकदा वाचायला घेतला आहे. एकीकडे ISKCON चे संस्थपाक प्रभुपादांची काही विश्लेषण न पटल्यामुळे मनामध्ये द्वंद्व चालू झाले. उत्तरं शोधात होतो आणि माझ्या जिज्ञासू वृत्तीला श्रीकृष्णांनी कधी नाही म्हंटलं नाही. वेळ आली तशी ते उत्तरं देत गेले. कधी पुस्तकातून तर कधी कोणाच्या मुखातून, कधी स्वप्नात. नवीन माणसं जोडली. सत्संग वाढला. नवनवीन माहितीचा झरा वाचतोच आहे.


श्री गुरुदेव दत्तात्रेय म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे एकत्रित रूप असे लहानपणापासून माहित होत पण यापलीकडे फारच कमी माहिती होती. भागवत पुराण वाचताना दत्त अवताराचा उल्लेख आला पण तेवढीच माहिती ऐकून मन भरलं नाही. एकीकडे आकांक्षा मुळे श्रीकृष्णांची स्वामी समर्थांच्या रूपात उपासना सुरु झाली. स्वामी स्वतः दत्तावतारी. त्यामुळे त्यांनी दत्त अनुभूती, गुरुलीलामृत, कर्दळीवन, हिरण्यगर्भ वाचून घेतल आणि स्वामी म्हणजे “कोण” याची प्रचिती आली. यात भर म्हणजे आमचे स्वतःचे आणि नव्याने ओळख झालेल्या इतर स्वामीभक्तांचे अनुभव होतेच. गेल्या ६ महिन्यात दोन वेळा अक्कलकोट आणि दोन वेळा स्वयंभू पादुका, दाभोळे इथे अगदी यथेच्छ दर्शन आणि सेवा करण्याची संधी त्यांनी दिली होती. त्यानांतर ज्ञानाचं भांडार उघडल ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताने आणि त्यापाठोपाठ दासबोध (अजून पूर्ण वाचून झालेला नाही).


अवतार क्रम

श्रीपाद प्रभू म्हणजे दत्त गुरूंचा कलियुगातील पहिला अवतार. त्यानंतर श्रीनृसिंहसरस्वती आणि त्यानांतर श्री स्वामी समर्थ, श्री माणिक प्रभू हे समकालीन अवतार. तसेच श्री नृसिंहसरस्वतींनंतर एक परंपरा श्री टेम्ब्ये स्वामींपासून पण पुढे सुरु राहिली. आता या गुरु शिष्यांच्या परंपरेतील या कलियुगात लिहिल्या गेलेल्या प्रमुख ग्रंथांपैकी एक ग्रंथ वाचायचा राहिला होता तो म्हणजे गुरुचरित्र. श्री नृसिंहसरस्वतींच्या अवतार कार्याचा आढावा घेणारा हा ग्रंथ. पण या ग्रंथाच्या वाचनाचे नियम कडक आहेत असे कायम ऐकण्यात आले. त्यामुळे एकदा या नियमांचं पालन करून त्यांचे चरित्र आणि अवतारकार्य जाणून घ्यायची ओढ लागली.


वेध पारायणाचे

या दरम्यान माझे आणि माझा मित्र रोहितचे या विषयावर थोडे बोलणे झाले आणि साधारण काय काय तयारी करावी लागते हे मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यावेळी माझे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचन चालू होते. येत्या महिन्यात पौर्णिमेला पारायण पूर्ण होईल अशा रीतीने नियोजन केले. त्यानुसार १८ जून दुर्गाष्टमी रोजी पारायण आरंभ करण्याचा आणि २४ जून वटपौर्णिमेच्या दिवशी त्यांची सांगता व्हावी असा संकल्प सोडला.


गुरुचरित्र ग्रंथ विकत घेण्यापासून तयारी होती. मी ऍमेझॉनवर ग्रंथ शोधण्यास सुरुवात केली. आधी गीता प्रेस गोरखपूरद्वारा प्रकाशीत ग्रंथाची किंडल प्रत हाती आली. ती विकत घेऊन त्यातील नियम आणि तयारी याची माहितीची नोंद करून घेतली. पण पारायण करायचे म्हणजे डिजिटल आवृत्तीमधून करणे फारसे काही पटत नव्हते. पुन्हा एकदा ऍमेझॉन वर गुरुचरित्र धुंडाळण्यास सुरुवात केली आणि कथासारासहित असलेल्या आवृत्तीची एकच शेवटची आवृत्ती राहिल्याचं निदर्शनास आलं. पुढे वेळ न दवडता ताबडतोब ती आवृत्ती मागवली. पण याआधी शोधलं नव्हतं ही आवृत्ती निदर्शनास आली नव्हती.


गुरुचरित्र पारायण नियम

हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे कारण बऱ्याच जणांकडून स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करू नये असे ऐकण्यात येते. माझ्याही ऐकण्यात आले होते. पण गुरुचरित्राविषयी सर्व माहिती आणि महती गुरुचरित्र स्वतःच विशद करून सांगते. त्यामुळे अन्य कोणत्याही स्रोतांवर अवलंबून न राहता श्रीगुरुंनी जो उपदेश केला आहे तोच शिरसावंध मानावा आणि खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात -

परमहंस परिव्राकाजाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंम्ब्ये स्वामी हे दत्त संप्रदायात दत्तगुरूंचे अवतार मानले जातात. परमहंस परिव्राकाजाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी गुरुचरित्र वाचू नये असे स्पष्ट सांगितले आहे. त्या सर्व कारणांची कारणीमीमांसा करणे इथे तूर्तास शक्य नाही. पण आपली अध्यात्मिक पातळी तिथपर्यंत पोहोचली की या गोष्टी समजू लागतात. समोरून स्वामींनी स्वतः स्पष्ट "हो" सांगितले तर करण्यास हरकत नाही. पण उत्तर आलेच नाही तर ते उत्तर मिळवण्याची सुद्धा आपली पातळी अजून आलेली नाही असं समजून उत्तराची वाट पहावी.


...पण स्वामी स्वतः काय म्हणतात ?

राधा कसबेकर या एक स्वामींच्या भक्त त्यांना गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची प्रबळ इच्छा होत होती. मनात विचार आलेल्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासूनच हि पूजा सुरु करावी असे त्यांच्या मनात आले, परंतु दोन अडचणी समोर असल्याने त्या निर्णय घेऊ शकत नव्हत्या. त्यापैकी एक म्हणजे दुसऱ्याच दिवशी अमावास्या होती आणि त्यांची मासिक पाळी त्याच आठवड्यात येणार होती. त्यांना काय करावे काही सुचत नव्हते म्हणून राधा कसबेकर यांनी यावर स्वामींनाच विचारून निर्णय घेण्याचे ठरवले.


तातडीने राधा स्वामींकडे गेली आणि तिने काही विचारायच्या आधीच स्वामी रागाने गरजले, “राधे, ही अडचण आणि अमावस्या हे सगळे तुम्हा लोकांसाठी आम्हाला यांचे काही नाही. आमच्याकडे बघ! सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत! जा! गुरुचरित्र वाच! वाचण्या आधी माझ्यासाठी पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं कि ते दूध पिऊन टाक. अडचण बीडचन कुछ नहीं... जाओ!”


स्वामींनी सांगितल्याप्रमाणे राधाने रोज गुरुचरित्र वाचले आणि रोज दूध प्यायली. तिचा गुरुचरित्राचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि आश्चर्य हे की उद्यापनाच्या दोन दिवसानंतर राधाची मासिक पाळी सुरु झाली.


इथे स्वामींनी स्वतः तशी अनुमती दिली असल्यामुळे हे सर्वांनाच लागू होईल असं म्हणता येत नाही.


गुरुचरित्रात ५३व्या अध्यायाअंती नियमावली कथन करताना खालील नियम आढळतात -

  • पारायणाचा सप्ताह करावा.

  • शुचिर्भूत होऊन पारायण करण्यास बसावे.

  • शौच, मुखमार्जन, स्नानसंध्या इत्यादी आटोपून मग ग्रंथ वाचन करण्यास बसावे.

  • वाचण्याचे स्थान एकच असावे आणि छान सुशोभित करावे.

  • काही अवास्तव मागण्या न मागता योग्य असा संकल्प सोडून आणि ग्रंथाचे गुरुसमान पूजन करून.

  • पारायण करताना इतर विषयावर उगाच चर्चा करू नये आणि एरवी शक्य तितके मौन पाळावे.

  • ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे.

  • सुंदर दीप प्रज्वलीत करावे.

  • गुरु, देव, ब्राम्हण आणि आई वडिलांना वंदन करून पूर्वेकडे मुख करून वाचनास आरंभ करावा. देवांच्या आधी आपल्या गुरूंना वंदन करावे. कारण फक्त आपल्या गुरूंची उपासना करूनही ब्रम्हा, विष्णू, महेश्वर प्रसन्न होतात.

  • रोजचे ठराविक वाचन पूर्ण झाले की ग्रंथाचे उत्तरांगपूजन करावे.

  • पारायण पूर्ण झाल्यावर ब्राम्हण सुवासिनींना भोजन द्यावे.


तेल उजवीकडेच का ? आणि तूप डावीकडेच का ?

पारायण करायला बसताना तेलाची समई उजव्या बाजूला तर तुपाच्या दिव्याची निरांजन डाव्या बाजूला लावतात. याच्या मागे शिवस्वरोदय शास्त्र आहे.


आपल्या डाव्या नाकपुडीतून येणारा श्वास हा किंचित शीतल असतो. ती इडा नाडी किंवा चन्द्र नाडी होय. उजव्या नाकपुडीतून येणारा किंचित उष्ण असतो ती पिंगला नाडी किंवा सूर्य नाडी. आणि जेव्हा दोन्ही नाकपुड्या चालू होतात तेव्हा सुषुम्ना नाडी सक्रिय होते. तेल आयुर्वेदानुसार उष्ण आहे, तेव्हा सुर्यनाडीच्या ठिकाणी तेलाची ज्योत आणि तूप शीतगुणी असल्याने डाव्या ठिकाणी तुपाची ज्योत. जी त्या त्या नाड्यांना सक्रिय करायला मदत करते.


बेंबी हे शरीरातील सर्व नाड्यांचे मूळ . इथून दहा नाड्या वर, दहा खाली पायाकडे, दोन उजव्या बाजूला आणि दोन डाव्या बाजूला पसरतात. अशा एकूण मुख्य चोवीस नाड्या. या सगळ्या नाड्या गायत्रीच्या एकेका मंत्राक्षराने सक्रिय होतात. (२४ अक्षरी गायत्री मंत्राचे सुंदर विवेचन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात सापडते ) या नाड्या जिथे मेरुस्तंभाजवळ मिळतात तिथे चक्र तयार होते. अशी सात चक्रे आहेत. चन्द्र नाडी चित्त म्हणजे मन संतुलित करते तर सूर्य नाडी प्राण. एकूण चोवीस नाड्यांतील मुख्य दहा त्यातल्या तीन मुख्य इडा, पिंगला आणि सुषुम्ना. इडा डाव्या बाजूला, पिंगला उजव्या तर सुषुम्ना मध्यभागातून प्रवाहित होते. बाकीच्या मुख्य सात नाड्या गांधारी, हस्तजिव्हा, पुषा, यशस्विनी, शंखिनी, कुहू, अलंबूषा. या शरीरातल्या अन्य इंद्रीयांमध्ये मध्ये स्थित आहेत. जसे दोन कान, डोळे, तोंड, जननेंद्रिये आणि गुदमार्ग. हे सगळं सक्रिय झालं की कुंडलिनी जागृत व्हायला लागते. कारण याच दहा नाड्या दहा प्रकारचे वायू नियंत्रित करतात शरीरातले


पारायण करताना काही वेळा माझे आज्ञा चक्राचे स्थान ठणकत असे आणि थोड्या वेळात ते माझ्या नकळतच बंद होत असे.


पारायण करताना अध्यायांची दिवसाप्रमाणे विभागणी

पहिल्या दिवशी ९ अध्याय

दुसऱ्या दिवशी २१व्या अध्यायापर्यंत

तिसऱ्या दिवशी २९व्या अध्यायापर्यंत

चवथ्या दिवशी ३५व्या अध्यायापर्यंत

पाचव्या दिवशी ३८व्या अध्यायापर्यंत

सहाव्या दिवशी ४३व्या अध्यायापर्यंत

सातव्या दिवशी ५२व्या अध्यायापर्यंत

आणि मग अवतरिणीका वाचावी.


पारायण

धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथ ठराविक मुदतीत, विशिष्ट पद्धतीने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने वाचणे़ कोणत्याही ऐहिक गोष्टींच्या प्राप्तीची कामना न ठेवता केवळ निष्काम भावनेने केलेले पारायण साधकाच्या आत्मोन्नतीस पूरक ठरते़ म्हणून निष्काम पारायण हे श्रेष्ठ व श्रेयस्कर ठरते़.

त्यामुळे खर्‍या साधकांनी निष्काम पारायण करून कृपा संपादन करावी काही सांसारिक कामनापूर्तीची अभिलाषा ठेवून जे पारायण केले जाते ते सकाम पारायण जाणावे देवाच्या प्रतिमेसमोर विशिष्ट हेतु ठेवून तसा संकल्प उच्चारणे; कार्य तडीस जाण्यास मी अमुक एवढी पारायणे करेन असे देवाला सांगणे हे सकाम पारायण अशा पारायणानेसुद्धा भाविकांची कार्ये सिद्धीस जातात़ देवाच्या/सद्गुरुंच्या दैवी, अगाध शक्तीचे पाठबळ लाभते़.


श्रीगुरुंकडे काही याचना करता येईल आणि ती मनोकामना पूर्ण होईल या उद्देशाने बऱ्याचदा पारायण केले जाते. त्यासाठी पारायण सुरु करताना हातावरून उदक सोडून संकल्प करावा असे सुचवले जाते. अर्थातच माझ्या मनात सुद्धा काय मागावे असा प्रश्न पडला पण शेवटपर्यंत त्यांना जाणून घ्यावे याव्यतिरिक्त काही विशेष सुचलेच नाही. पहिल्या दिवशी पहाटे ४ वाजता मी आणि आकांक्षा दोघेही शुचिर्भूत होऊन पारायणासाठी पूजेची मांडणी केली. यात दत्तगुरूंची प्रतिमा, कलश, त्यात पाणि, सुपारी, नाणे, अक्षता, गंध घालून आणि वर आंब्याची पाने त्याचा देठ पाण्यात बुडतील अशी ठेऊन त्यावर श्रीफळ ठेवला. यास गणेश कलश असे म्हणतात. पाण्याला गंध लावून केलेली पूजा ही वरुणाची पूजा असते. हा कलश प्रतिमेसमोर प्रतिमा संपूर्ण झाकली जाणार नाही अशा पद्धतीने ठेवला. चौरंगाच्या उजव्या बाजूला सुपारी रुपी गणपतीची अक्षतांवर ठेऊन गंध इत्यादी लावून पूजा केली. त्यानंतर समोर पाटावर वस्त्र घालून, त्यावर ग्रंथ ठेऊन, त्याचवरील दत्तगुरूंच्या प्रतिमेची त्याच पद्धतीने गंध लावून पूजा केली. गणपती, कलश आणि दत्तगुरुंना फुले वाहून मग पारायणास सुरुवात केली. किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज नव्हता. मी शक्य तितका कमी दम घेत वाचत राहिलो. पहिल्या दिवशी साधारण ४ तासांत ९ अध्याय कथासारासहित आटोपले. दुसऱ्या दिवशी अजून अर्धा तास कमी लागला. बाकी दिवस अडीच ते तीन तासांत पारायण संपूर्ण होत असे.

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

पारायण करताना मला माझ्या मनाच्या ३ स्थिती लक्षात आल्या. एक स्थिती जी माझ्या मुखातून पारायण करून घेत होती. दुसरी स्थिती ज्यात मनाने डोळ्यांच्या माध्यमातून पुढचे २-३ शब्द मुखातून वदवून घ्यायच्या आधीच वाचलेले असायचे आणि तिसऱ्या स्थितीत मन बाकी भौतिक जगातील विचारांत कायम भरकटण्याच्या प्रयत्नात असायचे. त्याला वारंवार "अरे बाबा बस इथेच!" करून मला शांत करावे लागे. पण गमंत म्हणजे या तिसऱ्या स्थितीचा पहिल्या दोन स्थितींना काही फरक पडत नसे. यावर अधिक माहिती लेखाच्या शेवटी विशेष टिप्पणी अंतर्गत दिली आहे

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶


पारायणाचे महत्त्व

पारायण करताना केलेले वाचन हे मनातल्या मनात न करता स्पष्ट शुद्ध उच्चार करून मोठ्याने केले जाते. याचे साहजिक कारण मला जे कळले ते म्हणजे असे शुद्ध उच्चार करून केलेले वाचन हे सगळ्यांनाच जमणे शक्य नाही पण त्याचा लाभ सगळयांना व्हावा यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे. "सगळयांना" या शब्दात अगदी शब्दशः सगळे समाविष्ट आहेत. तुमच्या आसपास असणारे किडे मुंगी सुद्धा त्यात आले. कारण भगवंत खूप दयाळू आहेत. अनवधानाने घडलेल्या भक्ती मार्गाची ते आपल्याला चांगली फळे देतात. याविषयीचे विविध संदर्भ गुरुचरित्रातच वाचण्यास मिळतात.


शिकवण

नित्य पारायण आटोपले की भगवद्गीतेचे ४ श्लोक वाचून ते पोस्ट करणे हा नित्यक्रम चालूच ठेवला होता. याच दरम्यान माझा चवथा अध्याय ज्ञानकर्मसंन्यासयोग वाचन सुरु झाले. या अध्यायात भगवंत कर्म, अकर्म इत्यादी विषयी गुह्य ज्ञान प्रदान करतात. १९ जून रोजी असेच दुपारच्या प्रहरी मी शंकर गीता वाचण्यास घेतली. एकीकडे मनात विचार चालू होते की पारायण सुरु करताना काहीच संकल्प सोडला नाही. कमीत कमी षड्रिपूंपासून मुक्ती तरी मागायला हवी होती. तेवढीच साधनेत पुढे जायला मदत होईल. त्या दरम्यान अचानक सोसायटी मध्ये अचानक एक सांडपाण्याची पाईपलाईन तुटल्यामुळे आणि मी सोसायटीच्या समितीमध्ये असल्यामुळे मला इतर लोकांकडून ती दुरुस्त करून घेण्याबाबत फोना फोनी सुरु झाली. "काय कटकट आहे!" म्हणून मी वैतागलो. इतर कोणी प्लंबरशी संपर्क करून पुढील बोलणी करू शकेल का याचा अंदाज घेतला पण ते सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. “शंकर गीता आज वाचून पूर्ण करायची” हा माझा मानस आज पूर्ण होणे दिसत नाही याची कल्पना आल्याने मी अजूनच हिरमुसलो पण महाराजांचीच ईच्छा नसावी बहुतेक हा पण अंदाज होता. त्यात लॉकडाउनमुळे दुकान बंद त्यामुळे आता ही दुरुस्ती कशी पार पडणार ही पण शंका होतीच. पण म्हणता म्हणता सगळ्या गोष्टी सुरळीत होता गेल्या. दुकानदाराचा खाजगी मोबाईल नंबर मिळाल्यामुळे त्याच्याशी संपर्क करून, दुकान उघडून सर्व सर्व सामान जमवाजमव करून रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीची कामे पूर्ण झाली. सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुप मधून कामाची त्वरित दाखल घेतल्यामुळे शुभेच्छांचे संदेश येऊ लागले. त्या संदेशांपेक्षा मला माझा वेळ या सगळ्यात गेल्याच दुःख आणि चिडचीड जास्त होत होती.


दुसऱ्या दिवशी २० जून रोजी, परत एकदा मी शंकर गीता वाचायला घेतली पण प्रचंड झोपने माझे डोळे बंद होऊ लागले. शेवटी तासभर झोप काढायचे ठरवले. अचानक झोपेत शंकर महाराजांची तस्वीर डोळ्यासमोर दिसू लागली आणि काही शब्द स्फुरले आणि मी खडबडून उठलो. ते शब्द असे -


‘‘ जर करशील अतृप्तास तृप्त

तर नांदशील परमार्थात ।

पण तू आहेस प्रपंचात

भलते हट्ट करू नकोस ॥ ’’


त्याच बरोबर मला स्वामीभक्त परिवारातून जोडली गेलेली वैशाली ताईशी बोलण्याची ईच्छा झाली. तिला ताबडतोब संपर्क करून मी झालेला प्रकार कानावर घातला. ती स्वतः शंकर महाराज, स्वामी, श्रीकृष्ण, श्रीपाद प्रभूंची भक्त आणि तिचे वडील हे शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले असले तरी त्यांची अध्यात्मातील प्रगती अतिशय उत्तम. त्यांना संपूर्ण भगवद्गीता अगदी तोंडपाठ असल्याचे वैशाली ताईने मला सांगितले होते.


बोलता बोलता बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. षड्रिपूंवर विजय मिळवू पाहणारा मी आदल्या दिवशी मी माझ्या सोसाटीतल्या माझ्या पदाच्या कर्माला पाठ दाखवून चिडचीड करत होतो. भगवद्गीतेमधील कर्माचा सिद्धांत आणि माझ्या प्रपंचातील कर्माची जाणीव सगळ्या जुळून आणलेल्या गोष्टी होत्या. षड्रिपूंवर विजय मिळवून आत्म्याला तृप्त करून मी अध्यात्मात पुढे तर जाईन पण त्यात प्रपंचातील कर्म बाजूला राहून कसे चालेल ? घराची पोराबाळांची जबाबदारी डोक्यावर असताना त्यांना बाजूला ठेऊन परमार्थ करण्याची शिकवण श्रीकृष्णांनी कधीच दिली नाही. प्रपंचात राहून कर्म करून पण परमार्थ साधता येतो म्हणून कर्मयोग आणि ज्ञानकर्मसंन्यासयोग याच अगदी "प्रॅक्टिकल एक्साम्पल" मला दाखवून दिल होतं. षड्रिपूंवर विजय मिळवून माझं प्रपंचाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून हि ईच्छा या जन्मी किंवा तूर्तास पूर्ण होणे अशक्य आहे हे मी जाणले होते.


सांगता

म्हणता म्हणता पारायणाचा सप्ताह संपला. यादरम्यान वाचताना स्पंदनांद्वारे मनातील शंकांचे निरसन झाल्याची पोचपावती वारंवार मिळत होती. पारायण संपले तरी कधी संपूच नये असे वाटत होते. ग्रंथ वाचनाचा गोडवा काय असतो याचे गुरुचरित्र हे खूप सुमधुर उदाहरण आहे. संचारबंदीमुळे प्रत्यक्षात ब्राम्हण आणि सुवासिनींना भोजन देणे शक्य न झाल्याने आम्ही पिठापूर, गाणगापूर आणि समाधी मठ-अक्कलकोट या तीनही ठिकाणी अन्नदान करून परायणाची सांगता केली.


विशेष टिप्पणी

✽ गुरुचरित्र पारायण करताना काही भाग वाचताना कर्मठपणाचा कळस वाटतो पण काही गोष्टी त्या कालानुरूप सांगण्यात आल्या आहेत. जसे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण हे एका मागोमाग एक घेतलेले आणि काही बाबतीत विरोधाभास निर्माण करणारे अवतार आहेत तसेच नृसिंहसरस्वती आणि स्वामी समर्थ हे कधी कधी विरोधाभास भासवणारे अवतार आहेत. नृसिंहसरस्वती अवतारात एका संन्यासी रूपात राहून त्यांनी विविध कर्मकांडांचा पुरस्कार केला तर स्वामींनी सोवळे ओवळे कधीच मानले नाही. त्यामुळे देशकालस्थलपरत्वे घटनांचा आणि शिकवणुकीचा अर्थ लावणे आपल्याकडून अभिप्रेत आहे. आपला धर्म आणि भगवंत कर्मठ कधीच नव्हते आणि नाहीत. कर्मठ होते ते फक्त आणि फक्त संकुचित मनोवृत्तीची लोकं.


✽ हरि च्या हृदयात हर आणि हर च्या हृदयात हरि वास करतो किंवा थोडक्यात सांगायचे झाले तर हरि आणि हर यात भेद करू नये. असा भेद करणारा कलियुगाच्या मायाजालात गुरफटून जाईल. विष्णूनाम घेतल्यास भगवान शिव धावून येतात तर शिव शंभोच्या नावास श्रीहरी धावून येतात हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील सत्य गुरूचरित्र पुन्हा एकदा कथन करते.


✽ श्रीपाद प्रभूंनी एका रजकास (धोब्यास) पुढील जन्मी यवन राजा होण्याचा आशीर्वाद दिला पण नृसिंहसरस्वती अवतारात त्यांनी ज्या नगरात गोहत्या आणि पशूंची हत्या होते तेथे जाण्यास नकार दर्शविला. आजच्या काळात घरात मांसाहारी पदार्थ शिजवणाऱ्या आणि भगवंतांची आराधना करणाऱ्यांची हीच परिस्थिती आहे. आपल्या घरात दत्तप्रभूंचा वास असावा अशी ईच्छा असणाऱ्यांनी या मुद्याचा वारंवार विचार करावा.


✽ भगवान शंकरांनी पार्वती मातेस सांगितलेली गुरुगीतेचा उल्लेख गुरुचरित्रा मध्ये आहे. पारायण पूर्ण झाल्यावर ही गुरुगीता अवश्य वाचावी. भगवद्गीतेप्रमाणेच हा संदेश अमूल्य आहे आणि गुरु शिष्य परंपरेचे गूढ उकलून सांगणारा आहे.


✽ शंकर गीता आणि गुरुगीता वाचायची असल्यास Google Play वर "श्री" हे अत्यंत उपयुक्त असे ॲप असून ते श्री या शब्दावरील लिंकद्वारा Google Play वरून डाउनलोड करता येईल. याव्यतिरिक्त गुरुचरित्र , श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, श्री दत्तमाहात्म्य इत्यादी संपूर्ण ग्रंथ सुद्धा विनामूल्य वाचण्यास उपलब्ध आहेत.


चार वाणी संदर्भ : श्री दत्तावधुत वाङग्मय

हिंदू पुराण ग्रंथात मानवी आत्म्याला चार वाणी असल्याचे म्हटले गेले आहे.आपण तोंडाने जे बोलतो तीच वाणी आहे, असे समजतो पण तसे नाही. या व्यतिरिक्त इतर प्रकारेही बोलता येतं. बाकी कशात नाही पण नामस्मरणात या वाणींना खूप महत्त्व आहे. नामस्मरण कोणत्या वाणीतून होत आहे, हे लक्षात घेत राहावे लागते. त्यानुसार साधकाची प्रगती कळते.

‘‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।

तेणें मज लावियला वेधु ।

खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।

आळविल्या नेदी सादू ॥२॥

शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।

हें तंव कैसेंनि गमे ।

परेहि परतें बोलणें खुंटलें ।

वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥’’

वैखरी

आपण तोंडाने जे काही बोलतो त्याला वैखरी वाणी असे म्हणतात. सर्वांना हीच वाणी माहीत आहे. आपण दुसर्‍यांशी बोलतो, भाषा शिकतो, हे सर्व वैखरी वाणीने होते. नामस्मरणाचा पहिला टप्पा सुरू होतो तेव्हा वैखरी वाणीद्वारे नाम घेतले जाते. तोंडातल्या तोंडात नाम घेणे म्हणजे वैखरी होय. नामजप हा वैखरीनेच घ्यावा लागतो.

मध्यमा

या वाणीचे स्थान कंठाजवळ असून, ही सदैव जागृत असते. थोडासा अभ्यास केला की, या वाणीचा अनुभव कुणालाही येऊ शकेल. मानसिक जप किंवा स्तोत्रपठन या वाणीद्वारे होत असते. या वाणीने जप केला असता म्हणजे ओठ व जीभ न हलवता जप केला असता किंवा स्तोत्रपठन केले असता जर थोडे लक्षपूर्वक पाहिले, तर कंठाजवळ स्पंदने जाणवतात व कालांतराने मध्यमा वाणीचा स्पष्ट अनुभव येतो.

पश्यंती

या वाणीचे स्थान अनाहत चक्रामध्ये असून, जेव्हा अनाहत चक्र जागृत होते, तेव्हा ही वाणीही जागृत होते. ही वाणी जागृत झाल्यावर साधकाला विविध प्रकारचे ध्वनी ऐकू येऊ लागतात.

परा

परा ही सखोल वाणी आहे. या अवस्थेत वाचासिद्धी येते. आपण जे बोलू ते खरे होते. या वाणीला परा असे म्हणतात. परावाणीचे स्थान नाभीकमलामध्ये असून, हे कमल जागृत झाल्यानंतर या वाणीचा अनुभव येऊ लागतो. अर्थात, फक्त योग्यांनाच किंवा महान ईश्वरभक्तांना, संतांना या परावाणीचा अनुभव येतो. ही वाणी जागृत झाली की, अखंड ॐ ध्वनी साधकांना ऐकू येऊ लागतो. साधनेचा महत्वाचा प्रांत येथे संपतो.


चार वाणी संदर्भ : मनाचे श्लोक

मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात


‘‘ सदा सर्वदा नाम वाचें वसों दे।

अहंता मनीं पापिणी ते नसों दे॥’’


यातील अहंतेला पापिणी का म्हटलंय, याचा थोडा उलगडा आपण गेल्या वेळी केला. आता या दोन चरणांतून आणखी एक विशेष अर्थ झळकतो आणि तो साधन स्थिर झालेल्या साधकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काय आहे हा अर्थ? तर समर्थ सांगतात की, ‘‘सदा सर्वदा नाम वाचे वसो दे’’ ही स्थिती जर साध्य झाली, म्हणजेच सदोदित नामाचंच वळण वाचेला लागलं तर एक मोठा धोकाही असतोच! काय आहे हा धोका? तर, साधनेचा म्हणून एक सात्त्विक अहंकार निर्माण होऊ शकतो! सदोदित नाम होऊ लागलं, म्हणजेच मन सदोदित साधनारत झालं तर ते अधिक सूक्ष्म बनतं. मनाच्या अनेक सूक्ष्म शक्ती जाग्या होऊ लागतात. त्या शक्तींच्या ओझरत्या अनुभवानंदेखील ‘आपण कुणीतरी झालो’, हा भ्रम उत्पन्न होऊ लागतो. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, हा भ्रम जडू लागतो. त्यातून सूक्ष्म असा अहंकार निर्माण होतो. म्हणूनच समर्थ बजावतात की हे साधका, वाचेनं सदोदित नाम घे, पण पापिणी अहंतेला मनात थारा देऊ नकोस! कारण आपण गेल्या भागात पाहिलंच की एकदा का मनात अहंकार निर्माण झाला तर तो मला शाश्वतापासून दूर केल्याशिवाय राहात नाही.


आता ‘‘सदा सर्वदा नाम वाचे वसो दे’’ या चरणाचा थोडा विचार करू. ही जी वाचा किंवा वाणी आहे ती चार प्रकारची आहे. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी म्हणजे उघड बोलणं. मध्यमा म्हणजे मनात सुरू असलेलं बोलणं. पश्यंती म्हणजे निव्वळ स्फुरण आणि परा ही वाक् शक्तीचं स्फुरण जिथून होतं त्यापलीकडे आहे. तर वाणीचे हे चारही स्तर नामानं भरून जावेत, अशी नामसाधना समर्थाना अपेक्षित आहे. म्हणजेच जगात आपण वावरतो तेव्हा वैखरीचा उपयोग वारंवार होतो. लोकांशी आपल्याला बोलावंच लागतं. पण ते बोलतानाही मनात नामाचं स्मरण असलं पाहिजे. शाश्वताचं स्मरण असलं पाहिजे. आता अनेकदा आपण उघडपणे बोलत नाही, पण मनात अनंत तऱ्हेचे विचार वा प्रतिक्रिया उमटत असतात. हे विचार वा प्रतिक्रिया शब्दरूपच असतात. हे मनातल्या मनातलं ‘बोलणं’च असतं. हे ‘बोलणं’ सुरू असतानाच नामाचं स्मरण जसजसं वाढत जाईल तसतसं हे ‘बोलणं’ ओसरू लागेल. थोडक्यात मध्यमेचा स्तरही नामानं भरून जाईल. मग येते पश्यंती अर्थात निव्वळ स्फुरण. पश्यंती ते वैखरीचा अनुभव आपल्याला येत असतो. समजा आपल्या डोळ्यासमोर आपल्याला न आवडणारी घटना घडली, आपला अपमान झाला किंवा आपल्याला कुणी विरोध केला, तर प्रथम काय होतं? तर मनात क्रोध उसळतो. अर्थात क्रोधाचं हे स्फुरण असतं आणि ते शब्दरूप नसतं. मात्र त्यातून दुसऱ्याला जे बोलायचं आहे ते मनात प्रथम उमटतं. ही मध्यमेची स्थिती. त्यानंतर आपण मनातलं बरचंसं बोलून टाकतो. ही वैखरीची स्थिती. क्रोधाप्रमाणेच प्रेमाच्या प्रसंगातही स्फुरण, आंतरिक शब्दयोजना आणि प्रकट बोलणं हेच टप्पे असतात. हे सर्व इतक्या वेगानं होतं की असे तीन वेगवेगळे टप्पे आपल्या प्रतिक्रियेमागे वा अभिव्यक्त होण्यामागे असतात, हेच आपल्याला जाणवत नाही. तर अंत:करणात जिथं स्फुरण होतं तिथंही नाम पोहोचलं तर मग सभोवतालच्या घटनांमागे वाहावत जाणं आपोआप कमी होतं. ‘मी’पणा क्षीण होऊ लागल्यानं एखाद्या घटनेनं मनाला ‘मी’पणामुळे धक्का बसण्याचं प्रमाण कमी होतं. अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंगांमध्ये मनाचं समत्व बऱ्याच प्रमाणात टिकून राहातं. अशी आंतरिक स्थिती ही नामसाधनेतला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.


🌺॥ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ॥ 🌺

2 Comments


Shrikant Chitnis
Shrikant Chitnis
Jun 27, 2021

अतिशय सुंदर लेखन केले आहे. बऱ्याच गूढ गोष्टींचा उलगडा, किंवा त्याबद्दल आपला अभिप्राय, सुंदर रीत्या मांडला आहे.

Like
Nayanesh Gupte
Nayanesh Gupte
Jun 27, 2021
Replying to

Thank you Pappa 🙏🏼

Like
bottom of page