दत्तात्रेया तव शरणम् ।
दत्तनाथा तव शरणम् ॥
त्रिगुणात्मका त्रिगुणातीता
त्रिभुवनपालक तव शरणम्॥१॥
आज सकाळच्या प्रहरी सखाराम आठवले यांनी लिहिलेली "हिरण्यगर्भ - कथा ब्रम्हांडनायकाची श्री स्वामी समर्थांची" ही कादंबरी वाचून पूर्ण झाली आणि श्री दत्तात्रेय शरणाष्टक जीभेची, मनाची साथ सोडायला तयारच होत नाहीये. ही कादंबरी वाचताना अखंड स्पंदनांनी माझे शरीर शहारून जात होते. वाचून होताच यावर लेख लिही असा तगादा मनाने लावला होता. मी इथूनच भरकटण्यापूर्वी काही प्रस्तावना व्यक्त करू इच्छितो.
प्रस्तावना
माझा वाचनाचा व्यासंग आणि अनुभव अगदी दांडगा नाही. एका प्रदीर्घ कालावधीनंतर मी परत एकदा वाचनास सुरुवात केली आणि भगवद्गीता, कृष्ण, श्रीमद् भागवत पुराण, सुदरकांड, गुरुलीलामृत, दत्त अनुभूती इत्यादी मराठी साहित्यात उपलब्ध अशा काही अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करता करता वर उललेखिलेल्या दत्त अनुभूती या आनंद कामत लिखित पुस्तकाच्या वाचनानंतर लेखकास आणि ज्या खुळ्या भक्तासोबत त्यांनी ११ गिरनार वाऱ्या केल्या, त्या रितेश वेदपाठक यांना संपर्क करण्याची खूप इच्छा झाली. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांचा दूरध्वनी क्रमांक शोधण्यास फारसा वेळ लागला नाही. दोघांनाही त्यांच्या व्हॉट्सॲप वर त्यांच्या पुस्तकाबद्दलचा माझा अभिप्राय कळवून माझ्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
काही दिवसांत त्यांनी मला त्यांच्या "स्वामीभक्त" या व्हॉट्सॲप ग्रूप मध्ये सामील करून घेतले. रितेश आणि आनंद दादांनी ग्रुपचे नियम माहिती करून दिले. या ग्रुपमधील सभासद रोज नित्य नियमाने त्यांना अथवा इतरांना आलेले अनुभव, स्वामींवर केलेली काव्ये, लेख, प्रवचने, विविध मठांमधील दर्शनाची छायाचित्रे इत्यादी पाठवत असतात. मी सुद्धा माझ्या Scribbled Thoughts वर प्रकाशित केलेले लेख अधून मधून पाठवत असतो आणि वाचक प्रतिक्रिया, अभिप्राय नोंदवतात. अशाच एक स्वामीभक्त गौरी गोखले ताईने मला माझे लेख वाचून माझे व्हॉट्सॲप वर संभाषणात कौतुक केले आणि बोलता बोलता मला "हिरण्यगर्भ" या कादंबरी बद्दल सांगितले.
अखंड स्पंदनक्रियेस सुरुवात
८ मे, २०२१, सकाळचा प्रहर. प्रातःकालची कामे आटोपून मी मोबाईल हातात घेतला. अचानक आदल्या दिवशी गौरी ताईने सुचवलेल्या पुस्तकाची आठवण झाली. मी इंटरनेट वर शोधण्यास सुरुवात केली. Amazon वर कादंबरी तर सापडली, पण त्याची Kindle आवृत्ती. तंत्रज्ञान विषयक पुस्तक नसल्यास कथा, कादंबऱ्या मी शक्यतो हातात पुस्तक घेऊन त्याच्या करकरीत पानांना चाळून वाचण्याचा आनंद घेतो. पण या वेळी कोण जाणे Kindle तर Kindle म्हणून विकत घ्यायची इच्छा झाली. ताबडतोब पुस्तक विकत घेऊन, Kindle ॲप डाउनलोड करून वाचायला सुरुवात केली.
प्रस्तावना वाचताना त्यातल्या काही गोष्टी "काल्पनिक" आहेत हे वाचून आधी मी थोडा हिरमुसलो होतो. पण एक एक ओळ पुढे पुढे वाचण्यास सुरुवात केली तशी खात्री पटली की जे साहित्य स्वामींनी लिहून घेतले आहे ते खचितच काल्पनिक असणे शक्य नाही पण मग त्यांनी काल्पनिक का म्हंटले असावे याचा प्रत्यय पुढे पुढे आला.
स्वामींच्या ७३० वर्षांच्या कालखंडाचे उलगडून दाखवलेले रोमांचकारी रहस्य वाचून त्यावर विश्वास ठेवण्यासाठी अध्यात्मिक आकलनाची आवश्यकता होती कोणत्याही भौतिक पुराव्यानिशी या घटना पडताळण अशक्य आहे. प्रत्येक शब्दागणिक स्वामी त्यातला शब्द नी शब्द मनाच्या पटलावर चित्रित करून दाखवत होते.
महाभारतानंतर श्रीकृष्ण अंतर्धान पावण्यापूर्वी उद्धवाला हिमालयात बद्रिकाश्रमात जाण्यास सांगतात हा भाग मी श्रीमद् भागवत पुराणात वाचला होता. त्यानंतर हिमालयाच्या गुहेत ६००० वर्षांपासून तप करत बसलेला उद्धव जेंव्हा या कलियुगात तपास बसलेला दिसतो किंवा रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समक्ष "योगिराज" त्यांना दर्शन देणाऱ्या प्रसंगाचे वर्णन वाचताना आपण तिथे त्या क्षणाचे साक्षी असल्याचा अनुभव मी ही कादंबरी वाचताना घेतला आहे. त्याक्षणी अंगावर उभे राहिलेल्या रोमांचाचे आणि सर्वांगातून कडाडणाऱ्या स्पंदनांचे वर्णन मी शब्दात करूच शकत नाही. श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती, संत ज्ञानेश्वर, शंकर महाराज, गजानन महाराज, साई बाबा, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य अनेक सिद्ध पुरुष कधी, का आणि कसे अवतरले याचे नियोजन कसे झाले ही उत्तर तो परमात्मा सोडून अजून कोण बरे देऊ शकेल ?
गुंतागुंत
मी लहान असल्यापासून गणपती बाप्पाची खूप आराधना केली. रोज सकाळी अंघोळ आटोपल्यानंतर त्याच्याकडे नतमस्तक होताना एक गोष्ट आवर्जून मगायचो ती म्हणजे "सदसद्विवेकबुद्धी". कारण एकदा का बुद्धी ताळ्यावर आणि तल्लख असली आयुष्यात भरकटण्याचे प्रसंग कमीच येत असावेत असा माझा दृढ विश्वास होता. पुढे माझा अध्यात्मिक प्रवास सुरू झाला तेंव्हा पहाटे ध्यान लावायचा प्रयत्न करत असे तेंव्हा भगवान शंकर डोळ्यासमोर दिसत. नंतर भगवद्गीता वाचून श्रीकृष्णाने गोडी लावली न लावली तोच स्वामी पण प्रकट झाले. तसं म्हणायला कोणाला समोर ठेऊन पुढे जावं हा प्रश्नच होता. त्याची उत्तरं पण मिळत होती.
हा गुंतागुंतीचा उलगडा करणारे असे ३ प्रसंग माझ्या वाट्यास आले.
प्रसंग पहिला
"गणपती आणि श्रीकृष्णाचे काय नात आहे?" मी त्यांना वारंवार विचारत होतो. हिरण्यगर्भ वाचताना गणेशाच्या मूर्तीसमोर गोट्या खेळताना "आता तुझा डाव तूच खेळ!" म्हणून अडून बसलेल्या चिमुरड्या पोरास बटू गणेशाच्या रुपात दर्शन देऊन स्वामी त्यांच्या हातात कायम असणारी गोटी घेऊन कशी शिकवण देतात ते मी पण तिथेच उभा राहून पाहिलं आहे. तत्पूर्वी पण श्रीपाद वल्लभांच्या माता पित्यास महागणपतीने दिलेल्या वचनाबद्दल मला "त्यांनी" निदर्शनास आणून दिले होते.
प्रसंग दुसरा
माझ्या तोंडात ॐ नमः शिवाय पण डोळ्यासमोर श्रीकृष्ण उभे राहत आणि मला प्रश्नात गुंतवून टाकत की "मी नक्की कोणाची आराधना करतो आहे?" दुसऱ्या दिवशी मला व्हॉट्सॲप वर खालील मेसेज माझ्या पर्यंत पोहचला जो मी तसाच्या तसा देत आहे.
"प्रश्न - विशिष्ट दैवत एकच असतं आणि त्याचे भक्त किंवा त्या दैवताचे उपासक मात्र असंख्य असतात. लौकिक देहावस्थेत असणारे उपासक, देहातीत अवस्थेतील हिमालयस्थित महायोगी, दिव्यदेही आत्मे तर काही प्रेतात्मेही उपासक असतात. मग प्रत्येक ठिकाणी ते दैवत कसं जातं?
उत्तर - दैवत हे मूळ निर्गुण निराकार परमईश्वरी शक्तीचे गुणात्मक प्रकट रुप आहे. विशिष्ट गुणांचे प्रतिनिधित्व ते दैवत करत असते. तो गुणसमुच्चय असतो. त्याला रुप (form) हे आपण दिलेले आहे. रुप हे बध्द आहे, ते मर्यादित आहे. पण गुण हा प्रकार सर्वव्यापी आहे. देहरुप वरवर तेच असलं तरी फॉर्म बदलता असतो म्हणूनच तुमच्या डोळ्यासमोर साकार होणारा शंकर हा तुमच्या बायकोच्या, मुलांच्या आणि शेजारच्या गृहस्थांच्या मनःचक्षुंसमोर असेलच असं नाही. प्रत्येकाचा शंकर निरनिराळा आणि विष्णूही, गणपतीही. पण गुण हे सर्वव्यापी आणि सर्वव्याप्त असल्याने तुम्ही विशिष्ट शब्दरचना, मंत्र, ध्यानाच्या सहाय्याने ते तुमच्यासमोर निर्माण करु शकता. गुण प्रकट झाले की देह (फॉर्म) आपसूकच निर्माण होतो.
गंमत म्हणजे एखाद्या अनभिज्ञ किंवा अजिबात माहिती नसलेल्या माणसाला तुम्ही ॐ नमः शिवाय हा गणपतीचा मंत्र आहे असं सांगून गणपतीची प्रतिमा दाखवली तर त्याला तो मंत्र गणपती आवाहनाचा वाटेल व गणपतीच त्याची मनोकामना पूर्ण करेल. शब्द हा माध्यम किंवा object असला तरी खरी शक्ती ही तुमच्या आंतर्मनाचीच आहे. आवाहन, मंत्र-स्तोत्र पठण करतानाची कळकळ आणि तीव्रता (फ्रिक्वेन्सी) अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे देवपूजाअर्चा एकदाची उरकू नका. जे काही करायचे ते मनापासून आणि १००% मनःपूर्वक करा.
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)"
मी अचंबित होऊन माझा मित्र रोहित यास ताबडतोब प्रश्न विचारला. "काय रे, हा असा मेसेज तू मला का अचानक पाठवलास ?" . "सोशल मिडिया वर कुठेतरी वाचनात आला आणि का कोण जाणे तुला पाठवावं असं वाटलं." असं त्याने उत्तर देताच मला मनातून हसू आल. कारण माझा अध्यात्मिक प्रवास सुरू झाल्यापासून अशा अनेक प्रश्नांची उत्तर आतापर्यंत त्यांनी अशीच दिली आहेत.
प्रसंग तिसरा
आज पहाटेची वेळ. सकाळी ४ वाजता उठून मी शुचिर्भूत होऊन कानाला हेडफोन्स लावले आणि महामृत्युंजय मंत्राचा जप लाऊन ध्यानाला बसलो. महामृत्युंजय मंत्राचा जप लाऊन ध्यान लावायची माझी पहिलीच वेळ होती. पण का कोण जाणे मनातून तेच संकेत येत होते.
हिमालयात पौर्णिमेच्या रात्री गंगोत्री जवळ शिळेवर ध्यान लावून बसलेले नीलवर्णी भगवान शंकर डोळ्यासमोर होते. म्हणता म्हणता त्यांच्यात नीलवर्णी स्वामी दिसू लागले. डोक्यावर मोरपीस तर गळ्यात, हातात रुद्राक्षाच्या माळा, म्हणता म्हणता स्वामींनी गणपतीचे रूप धारण केले. स्वामींचे पुढे आलेले उदर त्या लंबोदराच्या उदरात परिवर्तित झाले तर स्वामींचे मोठे कर्ण गणपतीचे कर्ण भासू लागले. कोणी म्हणेल की मनाचा खेळ पण अंगात जाणवणारी स्पंदन काही वेगळंच सांगत होती. त्याच उत्तर पण तेच देत होते.
सबका मालिक "एक"
बुद्धीची आणि कलेची देवता म्हणून गणपती बाप्पा लहानपणापासून जवळ राहिले, भरकटलेल्या अस्वस्थ तरुणाला त्यांनी श्रीकृष्णाच्या रुपात गीतोपदेश दिला होता आणि पुढचा अध्यात्मिक प्रवास सुकर करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ योगी म्हणून भगवान शंकराच्या रुपात मार्गदर्शन करत होते. हा सर्व खेळ सुरू झाला अयांशच्या जन्मानंतर म्हणून त्या विश्वनिर्माता आणि प्रजोत्पादनासाठी उद्युक्त करणाऱ्या ब्रम्हदेवाची आठवण स्वामींच्या रुपात देत ते जवळ होतेच.
हिरण्यगर्भ वाचताना ख्रिस्ती, इस्लाम आणि सुफी संप्रदायाचे एकमेव परमात्मा "तेच" असल्याची जाणीव ते करून देत होते. भागवत पुराणात वाचल्याप्रमाणे बौद्ध आणि जैन धर्माची मुहूर्तमेढ पण त्यांनीच रोवलेली लक्षात होतंच. स्थळ, काळ, देश, परिस्थिती बघून ते स्वतः किंवा त्यांच्या पार्षदांना पाठवून त्यांच्या अखंड लीला चालूच असतात.
धर्म म्हणजे बाकी दुसरं तिसरं काही नसून मीच आहे हे ते वारंवार सांगत होते. माझा कावरा बावरा झालेला चेहरा पाहून त्या गंगोत्रीच्या जवळील प्रचंड शिळेवर उभे राहून कंबरेवर हात ठेऊन जोरजोरात हसत होते.
भगवद्गीते मध्ये १८ व्या अध्यायातील ६६ व्या श्लोकात ते म्हणतात -
सर्व धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये! मी तुला सर्व पापांमधून मुक्त करेन.
मानवाने निर्मिलेल्या सर्व धर्मांचा त्याग करून तो परमात्मा एकच आहे हे जाणून घेणे आणि त्यालाच शरण जाणे सोडून अजून कोणता धर्म नाही हे ते स्वतः वारंवार प्रतिज्ञा घेऊन सांगतात. तुम्ही ज्या वेळी ज्या रुपात त्यांचं चिंतन करता त्या रुपात ते तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणून धीर देतात.
आज स्वामींची पुण्यतिथी. ७३० वर्षांनी देह सोडून जाता जाता ते भगवद्गीतेमधला ९ व्या अध्यायातिल २२वा श्लोक सांगून गेले आणि पुनः एकदा तेच श्रीकृष्ण असल्याची जाणीव करून गेले.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२ ॥
भाषांतर :
परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो.
१४ एप्रिल रोजी स्वामींच्या प्रकट दिनी त्यांनी मला गुरुलीलामृत वाचायला लावले आणि आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी "हम गया नही जिंदा है!" सांगत ४०० पानांचं हिरण्यगर्भ एका दिवसात माझ्याकडून वाचून घेतल. वाचून होताच मी गौरी ताईला वाचून झाल्याचे कळवले आणि मला या पुस्तकाबद्दल माहिती करून दिल्याबद्दल तिचे शतशः आभार मानले. मी एका दिवसात वाचून पूर्ण केलं म्हणून ती पण अचंबित होती पण स्वामींची कृपाच ती! कोणासमोर कधी काय वाढून ठेवतील हे त्या हिरण्यगर्भाच्या गर्भात दडलेले रहस्य कधी कोणी कसं काय जाणून घेऊ शकेल ?
शिव हर शंकर, नमामि शंकर शिवशंकर शंभो ! हे गिरीजापती, भवानी शंकर शिव शंकर शंभो !!
श्री स्वामी समर्थ 🙏