top of page
Writer's pictureNayanesh Gupte

भगवद्गीता कशी वाचावी

Updated: May 7, 2021

सहा महिन्यांचा सोशल मीडिया वरून घेतलेला सन्यास संपवून मी सोशल मीडियावर परत आलो. पण यावेळी माझं ध्येय निश्चित आहे आणि ते म्हणजे अधिकाधिक लोकांना सकारात्मतेने बघण्यास प्रवृत्त करणे, भगवद्गीता वाचण्यास प्रेरित करणे, अध्यात्म आणि धार्मिकता यातला फरक जाणून घेऊन लोकांना अध्यात्माच्या वाटचालीबद्दल जागरूक करणे.


माझ्या Scribbled Thoughts वर प्रकाशित केलेलं लेख सोशल मीडिया वर वाचून खूप जणांनी त्यांना भगवद्गीता वाचण्याची इच्छा व्यक्त केली तर काही जणांनी वाचायला घेतल्यावर ती अर्धवट वाचून काही न काही कारणास्तव न जमल्याचे सांगितले. या लेखात भगवद्गीता का वाचावी पेक्षा कशी वाचावी किंवा कशी वाचता येऊ शकते यावरचे माझे विचार मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी त्यामागची काही प्रस्तावना मी प्रस्तुत करू इच्छितो.


प्रस्तावना

 

ही भगवद्गीतेची प्रत ISKCON चे संस्थापक श्रील प्रभूपाद यांनी संकलित केली आहे. पण याचा अर्थ मी ISKCON मध्ये सहभागी झालो आहे असा नाही आणि तशी माझी अजूनतरी इच्छा नाही. त्याची कारणीमीमांसा मी या लेखात करू इच्छित नाही. पण एक गोष्ट नक्की की लेखकाने प्रचंड अभ्यास करून त्यांचे संपूर्ण पांडित्य या लेखनात उतरवले आहे. त्यामुळे जसं मी श्रीकृष्णांना माझे अध्यात्मिक गुरू मानतो तसं श्रील प्रभूपाद यांना शिष्यागुरू मानतो अध्यात्मिक गुरू हा एकच असतो पण शिष्या गुरू अनेक असू शकतात. श्रील प्रभूपाद आता हयात नसले तरी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे भगवद्गीता आणि श्रीमद् भागवत पुराणा सारखे अमूल्य साहित्य माझ्या हाती लागलं. हेच साहित्य बाकी प्रकाशनांद्वारे सुद्धा उपलब्ध असले तरी श्रील प्रभूपादांनी निर्माण केलेल्या साहित्यात त्यांनी अन्य पुराणे, उपनिषदे, वेद इत्यादी विविध अध्यात्मिक साहित्याचे जागोजागी दाखले देऊन या साहित्य वाचनाचा आणि आकलनाचा प्रवास अत्यंत सुकर केला आहे.


भगवद्गीता वाचून माझ्या आयुष्यात आणि जीवनपद्धतीत झालेले बदल बघता साहजिकच काही लोकांनी उपहासाने "मग, आता पुढे हिमालयात कूच करणार वाटतं?" अशी प्रतिक्रिया नोंदवली तर पुष्कळ लोकांनी कुतूहलाने त्या बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण स्वतः या भूतलावर वावरत असतानाही त्यांच्या मायेने आच्छादित लोक त्यांची अवहेलना करत तर ते अंतर्धान पावल्यानंतर आज ५००० वर्षांनी त्यांची उपासना करणाऱ्यांबद्दल काय सांगावे! पण खरे पहाता त्यांनी ५००० वर्षांपूर्वी दिलेला अमुलाग्र गीतोपदेश आजही या सृष्टीस जसाच्या तसा लागू पडतो आणि म्हणूनच हे भगवंतांच्या मुखातून बाहेर पडलेले ज्ञान आयुष्यात एकदा तरी वाचनास मिळणे म्हणजे हे सद्य मानवी आयुष्य कृतकृत्य झाल्याची पोचपावती आहे.


भगवद्गीता वाचून माझ्या आयुष्यात झालेले काही बदल मी इथे मांडू इच्छितो जेणेकरून पुढील लेख आणि नंतर भगवद्गीता वाचण्यास स्फूर्ती मिळावी.


मांसाहार, मद्यप्राशन करणे वर्ज्य केल्याबद्दल चे विचार मी जीवो जीवस्य जीवनम् या लेखात मांडलेच आहेत. त्याव्यतिरिक्त पहाटे लवकर उठणे, सकाळच्या त्या शांत प्रहरी नियमित वाचन करणे, थोडा वेळ घरीच व्यायाम करणे, व्यायामाचे उद्दिष्ट पिळदार शरीरयष्टी कमवणे हे न ठेवता चपळता आणि सहनशक्ती वाढवणे या उद्देशाने करणे, व्यायाम करताना आजकालची धांगडधिंगा करणारी तामसिक गाणी न वाजवता हनुमान चालीसा ऐकत करणे, टीव्ही वरील निरर्थक कार्यक्रम न बघता तो वेळ वाचनात / लिखाणात घालवणे, वेळ मिळेल तेंव्हा नामस्मरण करून मनाला भरकटण्यापासून दूर ठेवणे इत्यादी गोष्टी घर आणि नोकरी सांभाळून सहज शक्य आहेत.


भगवद्गीता आणि मराठी

"माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके" अस संत ज्ञानेश्वर सांगून गेले. अर्थ असा की "माझ्या मराठीच कौतुक करावं तितकं कमी आहे कारण गोडव्यामध्ये पैज लावली तर अमृतालाही मागे टाकेल". अर्थातच मराठी मातृभाषा असल्याने भगवद्गीता मराठीत वाचणे मला जास्त सोपे होते. पण याव्यतिरिक्त आपले विशेष भाग्य आहे आणि त्याचे सविस्तर कारण मी इथे मांडू इच्छितो.


विष्णूने सूर्याला सांगितलेल्या मूळ ७ श्लोकांचे कृष्ण-अर्जुन संवाद माध्यमातून महर्षी व्यासांनी (श्रीकृष्णाचे वाङमयीन अवतार) महाभारतात ७०० श्लोक केले. या सातशे श्लोकांच्या ज्ञानेश्वरांनी अजून विस्तृत समजावून सांगण्यासाठी १०००० ओव्या केल्या ज्ञानेश्वरीत.

या सगळ्या १०००० ओव्यांचे सार काढून चांगदेव पासष्टीच्या ६५ ओव्या रचल्या. नंतर याला सुद्धा अजून संक्षिप्त करुन ३० कडव्यांचा हरिपाठ केला. म्हणून हरिपाठाच्या शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी । शहाणा तो धनी घेतो येथे।।


तुकाराम महाराजांना भागवत पंथाची दीक्षा चैतन्य महाप्रभूंनी (श्रीकृष्णाचे अवतार) दिली तर ISKCON प्रचार करत असलेला "हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।" हा महामंत्र चैतन्य महाप्रभूंच्या प्रेरणेने पुढे आला.


स्वतः द्वारकाधीश कृष्ण उद्धवला सांगतात की या गीतेचे ज्ञान सामान्यांपर्यंत पोचवायला मीच ज्ञानेश्वर म्हणून अवतार घेईन, तेव्हा आदिनाथ महादेव निवृत्ती म्हणून येतील ते माझे गुरु असतील.


गुरूचरित्र, गुरुलीलामृत वाचतानाही तोच गीतोपदेश निरनिराळ्या कथांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना जास्त चांगल्या पद्धतीने समजेल अशा भाषेत मांडण्यात आला आहे.


थोडक्यात सांगायचं तर भगवद्गीतेचा संदेश आपल्यापर्यंत पोहचावा यासाठी श्रीकृष्ण स्वतः वारंवार अवतरीत झाले आहेत आणि मराठीमध्ये हाच उपदेश जाणून घेण्याचे विपुल साहित्य उपलब्ध आहे.


उद्देश

मी लहानपणापासून हे बऱ्याचदा ऐकत आलो आहे की भगवद्गीतेमध्ये आयुष्याचं सार आहे आणि आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतात. ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच भ्रामक आहे. भ्रामक एवढ्यासाठी की जर तुम्ही भगवद्गीता हातात घेताना मनात शंका-कुशंका, अहंकार असेल तर श्रीकृष्णाची माया तुम्हाला तुमच्या उत्तरापर्यंत कधीच पोहोचू देणार नाही.

मनातल्या सगळ्या शंका कुशंका बाजूला ठेऊन आपण श्रीकृष्णांना सर्वांगाने शरण जाणे आणि मग त्यांना हात जोडून त्यांनी आपल्याला हे अमुलाग्र ज्ञान प्रदान करावं अशी याचना करणे हे अत्यंत आवश्यक आहे.

भगवद्गीता वाचताना प्रत्येकाला आणि प्रत्येकाला दरवेळी वाचताना नवीन अनुभव येतो. कारण श्रीकृष्ण प्रत्येकाला त्याच्या शंकाचे निरसन करून अंतःकरणातून स्वतः मार्गदर्शन करतात. आपण तसे शरण न जाता वाचण्याचा प्रयत्न केल्यास एकवेळ शब्द डोक्यात शिरतील पण ज्ञान मिळेलच याची शाश्वती नाही.

आपण म्हणतो माझी देवावर श्रद्धा आहे आणि तरीही आपण हाक दिली की तो त्या हाकेला प्रतिसाद देणार नाही अशी शंका घेतो. त्याने प्रतिसाद द्यायची वाट न बघताच आपण आपली अध्यात्माची पकड शिथिल करून देतो. पण तीच परीक्षा असते. तुम्ही त्याचा हात घट्ट पकडून ठेवा कारण तो तुमचं बोट कधीच सोडत नाही. आणि कधी असं वाटलच की त्याने आपलं बोट सोडलं आहे तर ते आपलाच आत्मविश्वास वाढावा यासाठी असतं. आपण नाही का लहान बाळाला त्याने आपल्या आधाराशिवाय चालता, धावता, पोहता यावं म्हणून त्याचा हात सोडतो ? तो पडला तरी त्यातून शिकावं आणि उठून परत पुढे जावं ही आपली प्रामाणिक इच्छा असते. तसच त्या भगवंताचे आहे. या नश्वर जगात त्याच्याहून आपली जास्त काळजी त्याला सोडून कोणालाच नसते!


वाचनाची वेळ आणि पद्धत

"वाचनासाठी योग्य वेळ कोणती ?" हा प्रश्न मला खूप जण विचारतात किंवा वेळ न मिळणं, वाचताना सातत्य न राहणं या बद्दल खूप जणांची तक्रार असते.


वेळेचं म्हणाल तर भगवंतांचा संदेश ऐकायला आणि वाचायला वेळ, काळ आणि ठिकाणचं बंधन नसाव. कारण या तिनही गोष्टी भौतिक असून आपला आणि त्यांचा संबंध हा अध्यात्मिक आहे. आपण भगवंतांच्या तटस्था शक्तीचे प्रदर्शन आहोत. म्हणजे भौतिक आणि अध्यात्मिक शक्तीच्या तीरावरचे. त्यामुळे खर बघता आपण त्यांच्या अध्यात्मिक शक्तिकडे आकर्षित होणे आवश्यक असते पण त्यांच्याच मायेच्या प्रभावाखाली आपण भौतिक गोष्टींच्या आहारी जातो.

थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला जी वेळ वाचनास सगळ्यात योग्य वाटते आणि आपले मन जेंव्हा जास्तीत जास्त एकाग्र होऊ शकत, ती वेळ सगळ्यात योग्य.


त्यासाठी पहाटे उठून शुचिर्भूत होऊनच वाचायला बसावे अस काही नाही. श्रीकृष्ण भगवद्गीतेत स्वतः या विधानास पुष्टी देतात की या गीतोपदेशाचे अध्ययन करून होणारे पापांचे क्षालन हे गंगेमध्ये स्नान करण्याहून जास्त मोठे आहे. आपण मुळातच शुध्द आणि पवित्र असतो, तर न आपण हा जन्म घेऊन इथे कर्मबंधात अडकलेलो असतो, न आपल्याला गंगेत स्नान करण्याची वेळ आली असती. त्यामुळे मुळातच अशुद्ध असलेलो आपण स्नान करून अशी कोणती निर्मळता साध्य करणार ?आपल्याला लागलेली माती, धूळ आणि त्या मातीपासून जन्मलेलो आपण सगळं एकच आहोत. भगवद्गीता वाचनाने आपलं मलीन मन निर्मळ होतं आणि मनाची कवाडं उघडतात. त्यामुळे सकाळच्या प्रहरी दैनंदिन दिनचर्येत फारसा वेळ न दवडता मी पाहिले वाचन करण्यावर भर देण्यास प्राधान्य देतो. कारण एकदा का सूर्योदय झाला आणि प्रपंच्याच्या रहाटगाडग्याला जुंपलो की मग परत ती एकाग्रता मिळणे कठीण आहे. काही जणांना हाच वेळ रात्री झोपण्यापर्वी मिळतो, अशा लोकांनी झोपण्यापूर्वी वाचन करून झोपण्यास काहीच हरकत नाही.


सातत्य

भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक हा ४ भागांत विभागला जातो.

१. संस्कृत श्लोक

२. संस्कृत श्लोकाची संधी आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ

३. संपूर्ण श्लोकाचा अर्थ

४. तात्पर्य


आता माझा पहिला प्रश्न. तुम्हाला संस्कृत येत का ? याव अशी अपेक्षा पण नाही. येत असेल तर उत्तमच पण जर नसेल येत तर मग संस्कृत श्र्लोक, त्यातल्या शब्दांची फोड वाचून तुम्ही नक्की काय साध्य करणार ? हा द्राविडी प्राणायाम कशाला करायचा ? तुमचा वाचनामागचा उद्देश काय ? संस्कृतच आपलं ज्ञान तपासून पाहणे की त्या ग्रंथातल मूळ ज्ञान प्राप्त करणे?

जर तुमचं उत्तर हे भगवद्गीता समजून घेणे आणि त्यातलं ज्ञान आणि मतितार्थ समजावून घेणे हा असेल तर श्लोकावर वरवर नजर फिरवून सरळ अर्थ आणि तात्पर्याकडे वळावे. उगाच श्लोकांच्या पाठांतराकडे वळू नये.


पण श्लोक वाचूच नये आणि पाठ करू नये असे नक्कीच माझे म्हणणे नाही. या द्राविडी प्राणायाम करण्यात जर तुमचं वाचनातल सातत्य राखणं कठीण होणार असेल तर प्रथम वाचन हे अर्थ आणि तात्पर्य यावर भर देणारे असावे जेणेकरुन वाचनात कमीत कमी खंड पडेल आणि कमीत कमी वेळेत संपूर्ण भगवद्गीता वाचन शक्य होईल.

पुन्हा एकदा वाचण्याची इच्छा झाल्यास (आणि ती होतेच), या वेळी श्लोक आणि त्यातील संधी समास खोलात जाऊन अभ्यास करावेत. तस म्हणायला हाच मंत्र साधारण कोणत्याही अभ्यासाच्या बाबतीत लागू पडतो.


कालावधी

८ खंड आणि प्रत्येक खंडात १० भाग असलेली मालिका बघायला आम्हाला जेवढा कंटाळा येत नाही तेवढा कंटाळा एक ४००-५०० पानांचे पुस्तक बघून येतो! "एवढं कधी वाचणार?!" या विचारानेच आम्ही ते पुस्तक परत जिथून काढलं तिथे परत ठेऊन देतो. मग सातत्याच काय घेऊन बसलात!


भगवद्गीतेमध्ये ७०० श्लोक आहेत. आपण फक्त रोज एकाच श्लोकाच अध्ययन करायचे म्हंटले तर संपूर्ण भगवद्गीतेचे अध्ययन करण्यास साधारण २ वर्ष लागतील. पण आपला संकल्प याहून नक्कीच मोठा ठेऊ शकतो. मग एका ऐवजी दोन श्लोकांचे अध्ययन केले तर १ वर्ष आणि थोडा अजून प्रयत्न करून किमान ४ श्लोकांचे अध्ययन केले तर साधारण सहा महिन्यांच्या कालावधीत अध्ययन पूर्ण करण्याचा संकल्प सोडणे सहज शक्य आहे.


मी याच पद्धतीचा अवलंब करून परत एकदा भगवद्गीता वाचण्यास घेणार आहे. तुम्ही वाचणार का माझ्यासोबत ?

तुमचे उत्तर हो असल्यास मला me@nayaneshgupte.com वर कळवा.


4,264 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page