हा लेख सुरू करण्यापूर्वी, माझा त्या स्त्रीशक्तीला दंडवत 🙏🏼 जी घरोघरी माता, पत्नी रुपात घर संसाराची धुरा सांभाळत आहे. लेखाची अशी सुरुवात करण्याचे कारण थोड्याच वेळात स्पष्ट होईल, तूर्तास मी लेखाच्या मुख्य विषयाकडे वळतो.
प्रस्तावना
तसं म्हणायला गेल्या वर्षभरापासूनच आपण सर्व या दुर्धर महामारीशी झुंजत आहोत. प्रत्येकाची झुंज ही एका वेगळ्या पातळीवर चालू आहे. कोणी आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत आहे तर कोणी शारीरिक दुर्बलतेवर मात करून पुन्हा नव्याने उभ राहायचा प्रयत्न करतो आहे. या सगळ्यातून तारेवरची कसरत करत असताना जेवढी कुटुंबाची साथ मिळते आहे तेवढाच संघर्ष बरेच ठिकाणी कौटुंबिक कलहातून सावरण्यापासून पण केला जात आहे.
गेले वर्षभर आकांक्षा आणि मी दोघेच मिळून आमचं छोटंसं कुटुंब सांभाळतो आहोत. त्यात अयांशच वाढत वय आणि त्याची नवनवीन गोष्टी जाणून घ्यायची जिज्ञासा बघता आमची अर्ध्याधिक शारीरिक ऊर्जा त्याच्या मागे पळण्यात खर्च होते आणि उर्वरित ऊर्जा स्वयंपाकघर आणि त्यातील भांडी धुण्यात. विनोदाचा मुद्दा वगळला, तर वरील परिच्छेदात म्हंटल्याप्रमाणे दैनंदिन संघर्षातून आम्हीपण भरडून निघतच होतो आणि त्यातून होणारा शारीरिक त्रास मानसिक त्रासात परिवर्तित होत होता. या त्रासाला कंटाळून गेलेलो आम्ही एका क्षणी अध्यात्माकडे वळलो आणि त्यानंतर जे काही वैचारिक परिवर्तन घडून आले आणि कारोनाशी झुंज देताना आम्ही कसे सावरलो याचे संक्षिप्त वर्णन मी या लेखाच्या पुढील भागात करू इच्छितो.
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय
आमचा अध्यात्मिक प्रवास साधारण ऑक्टोबर २०२० पासून वेगाने सुरू झाला. भगवद्गीता आणि त्या मागोमाग श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या रथावर आरूढ प्रतिमेच्या रुपात त्यांचे जणू पदस्पर्श आमच्या घरास लागले होते.
पुढे जवळपास सर्वच काही सुरळीत चालू होत. फेब्रुवारी २०२१ मध्ये दाभोळे येथील स्वामींच्या मठात जाऊन आलो आणि तिथे परत परत जाण्याची वेगळीच ओढ निर्माण झाली. १४ एप्रिल, २०२१ रोजी स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दाभोळेला जायची संधी मिळाली आणि तेथील घटना, नवीन अनुभव आणि जोडली गेलेली माणसे आणि ओढवलेले नवीन संकट यामुळे आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली. दाभोळे येथील स्वामींच्या मठात आलेला अनुभव मी स्वामी समर्थ प्रकट दिन - १४ एप्रिल, २०२१ या लेखात लिहिला आहे. या लेखाचा पुढील भाग हा आमच्या परतीच्या प्रवासापासून पुढच्या १५ दिवसांत आलेल्या विलक्षण अनुभवावर आधारीत आहे.
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय !
प्रारब्ध हे कधी कुणाला चुकले नाही. आपल्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात हे जेवढं खर आहे तेवढच आलेली प्रत्येक परिस्थिती ही पूर्व कर्माचे भोग नसून आपण भविष्यात समोर येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी करून घेत असते. आपण शांतचित्ताने या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर चिंतन, मनन करून आपल्यासमोर नक्की काय वाढून ठेवले आहे याचा सारासार विचार करणे आवश्यक असते. या परिस्थितीतून जाताना होणारा त्रास हा शरीराला होणारा त्रास आहे आणि मी म्हणजे हे शरीर नाही (अहम् ब्रम्हास्मी) हे जाणून घेणे आवश्यक आहे. तेंव्हा त्याचा मानसिक त्रास होऊ न देता आलिया भोगासी असावे सादर म्हणून आपली विहित कर्मे या शरीराद्वारे करीत रहावी पण मन मात्र त्यात गुंतवू नये. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर जनाबाई, गोरा कुंभार यांसारख्या संतांसोबत परमेश्वराने दळण दळले तर कधी माती तुडवत भांडी बनवली. शरीर जात्यावर दळण दळण्यात व्यस्त असले तरी मुखी नामस्मरण होते आणि तो परमेश्वर त्या नामात दंग झाला!
नि:शंक हो निर्भय हो मना रे!
परत एकदा प्रारब्धाचे उसने वळते करण्याची वेळ आली होती. दाभोळेहून निघालो आणि परतीच्या रस्त्यात आकांक्षा अस्वस्थ झाली. सकाळपासून प्रकट दिनाच्या तयारीत झालेली धावाधाव, पाऊस पडून गेल्यावर वाढलेला उकाडा आणि नुकतेच जेऊन झाल्यावर धरलेला आंबा घाटाचा रस्ता, यामुळे ती अस्वस्थ झाली असावी असा माझा अंदाज होता. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने अचानक संचारबंदी घोषित केली होती. त्यामुळे त्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी आम्हाला महाराष्ट्र हद्द गाठणे भाग होते. बँगलोरला पोहचायला कमीत कमी १२ तास लागणार माहित असूनही आम्ही भर दुपारीच आम्ही परतीचा प्रवास सुरू केला होता. साधारण बेळगाव किंवा हुबळी धारवाडपर्यंत पोहचून रात्री तिथेच मुक्काम करायचा आणि सकाळी उठून दुपारपर्यंत बँगलोर गाठायचे असे आम्ही ठरवले होते. साधारण दुपारी ०५:०० च्या सुमारास आम्ही महाराष्ट्र हद्द गाठली. सोबत कोव्हिडच्या चाचणीचे प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे आता आपल्याला परत पाठवतात की काय अशी शंका मनात होती. मनामध्ये स्वामींना साकडं घातलं होतं, आम्हाला सुखरूप घरी पोहचवा. स्वामींच्या कृपेने आम्हाला कर्नाटक हद्दीत प्रवेश करण्यास कोणी अडवले नव्हते.
संध्याकाळी ०७:०० च्या सुमारास आम्ही हुबळी गाठले आणि तेथील प्रेसिडेंट हॉटेल मध्ये रहायची व्यवस्था झाली. तोपर्यंत आकांक्षाची तब्येत अजूनच खालावली. अंगात ताप चढू लागलेला. पोटाची स्थिती पण फार काही चांगली नव्हती. मी आणि अयांश ठणठणित होतो त्यामुळे हा त्रास तिला श्रमपरिहार करूनच झाला होता असा माझा विश्वास होता. सोबत औषध बाळगली होती त्यामुळे आवश्यक ती औषध घेऊन आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी आकांक्षा बऱ्यापैकी सुस्थितीत होती आणि पुढील हुबळी ते बँगलोर रस्ता तिनेच ड्राईव्ह करून जायचे ठरवले. गाडी चालवत असली की तिचे या सगळ्या कुरबुरींकडे लक्ष जात नाही. दुपारी १२:०० च्या सुमारास आम्ही चित्रदुर्ग गाठले आणि एका खानावळीत जेवायला थांबलो. अजूनही तब्येत म्हणावी तितकी सुधारली नसल्याने आकांक्षाने फक्त ताक पिऊन समाधान मानले. मी आणि अयांशने खिचडी खाल्ली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
घरी पोहचल्यावर बाकीचा दिवस प्रवासाचा शीण घालवण्यात गेला. दुसरा दिवस उजाडला. पण अजूनही थकवा गेला नव्हता. आकांक्षा अजून अस्वस्थ झाली. आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे या विचाराने तिला तिचं मन आतून खात होती. दम लागत होता. ताप उतरला असला तरी सर्दी खोकला हळू हळू वाढू लागला. मी आणि अयांश अजूनही सुस्थितीत होतो त्यामुळे फक्त आकांक्षाला कारोना झाला असण्याची शक्यता माझ्या मनाला पटत नव्हती. पण तरी सुद्धा एकदा कोरोनाची चाचणी करून घ्यायची म्हणून ठरवलं. तोपर्यंत आकांक्षाने घरातही मास्क लावून स्वतःला आमच्यापासून शक्य तितके दूर ठेवण्यास सुरुवात केली. १६ एप्रिल, संध्याकाळपर्यंत माझ्याही घशात कफ जाणवायला सुरुवात झाली. थोड्या हालचालींनी पण दम लागायला लागलेला. आता मात्र मलाही कोरोना बद्दलचा संशय बळावू लागला. आम्ही अयांशकडे विशेष लक्ष ठेऊन होतो.
विद्या विनयेन शोभते!
दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजताच आम्ही नजिकचे साकरा हॉस्पिटल गाठले. जपानी विद्यापीठाद्वारे चालवण्यात येणारे तथाकथित सर्व सोयी सुविधा असणारे असे भव्य दिव्य इमारत बांधलेले हे रुग्णालय. पण दुर्दैवाने त्यांच्याकडे २ वर्षाच्या मुलाची RT-PCR चाचणी करू शकतील असे कर्मचारी नाहीत आणि डॉक्टर अतिशय उन्मत्त! "हे आमचे काम नाही" असे उडवाउडविचे उत्तर देऊन ते डॉक्टर चाचणी करण्यास नकार देऊन निघून गेले. त्यामुळे माझाही पारा चढला. तेंव्हा प्रौढांची चाचणी करणाऱ्या कर्मचारी वर्गाने आमची परवानगी घेऊन रडून रडून थैमान घातलेल्या अयांशची कशीबशी चाचणी आटोपली आणि आम्ही घरी आलो. नंतर ट्विटर च्या माध्यमातून केलेल्या तक्रारीमुळे रुग्णालयाने आम्हाला संपर्क करून आमची माफी मागितली आणि संबंधित कर्मचारी वर्गावर कारवाही करण्याची शाश्वती दिली.
चाचणीचा निकाल यायला २४ ते ४८ तास लागणार होते. आता संशय बळावला असल्यामुळे मी घरात क्वारनटाईन व्हायची तयारी सुरू केली. आम्हाला कोव्हिडशी झुंज देऊन २ हात करणे आवश्यक होते. सगळ्यात जास्त काळजी होती ती अयांशची. मी दोघांसाठी दोन स्वतंत्र एक-एक लिटरचे थर्मास, पाणी पटकन गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक किटली, N95 मास्क, वाफ घेण्यासाठी दोघांना दोन स्वतंत्र इलेक्ट्रिक वाफारे, डेटॉल, कचऱ्याचे डबे, कचऱ्याच्या पिशव्या अशी सगळी जमवा जमव केली. या दरम्यान मी मास्क लाऊन आणि हात वारंवार सॅनिटाइझ करत होतो. जेणेकरून कोणाला माझ्यामुळे लागण होऊ नये. पुढे जास्त वेळ न दवडता आम्ही ताबडतोब गरम पाणी पिणे, वाफ घेणे, गुळण्या करणे हे सगळे उपाय सुरू केले. एकीकडे ऑक्सीमिटर (SpO2) वर आम्ही आमच्या ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेऊन होतो. कधी ही पातळी कमी जास्त येते म्हणून तीन वेळा तपासून मगच त्यावर विश्वास ठेवत होतो.
उगाची भितोसी भय हे पळू दे !
१७ एप्रिलला सकाळीच आमच्या चाचणीचा निकाल मला ई-मेल द्वारे कळवण्यात आला. चाचणीत आकांक्षाचा निकाल 'पॉझिटिव्ह' तर आम्ही दोघं 'निगेटिव्ह' आल्याचे कळले. तरी माझा निकाल चुकून निगेटिव्ह (false negative) तर नाही ना आला म्हणून पण मनात शंकेची पाल चुकचुकत होती. पण आता मला कोरोनाची लागण झाल्याची कोणतीही लक्षण दिसत नव्हती. घशातील कफ अजूनही जाणवत होता पण त्या व्यतिरिक्त अजून काही लक्षण नसल्यामुळे मी अयांश, आकांक्षा, घर, आमच्या तिघांचे पथ्य पाणी, ऑफिस असं सगळं सांभाळून घ्यायची जबाबदारी माझ्या एकट्याच्या खांद्यावर घ्यायचे ठरवले. आमच्या दोघांच्याही आई वडिलांनी मदतीला येण्याची तयारी दाखवली पण आम्ही सांभाळून घेऊ म्हणून त्यांना न येण्यास सूचित केले.
या दरम्यान आम्ही चाचणीसाठी रुग्णालय गाठले तेंव्हाच ऑफिसच्या 'हेल्थ पोर्टल' वर आम्हाला होणारा त्रास आणि लक्षणं कळवली होती. त्यामुळे ऑफिसने आम्हाला संपर्क करून आमचा आणि डॉक्टरांचा संपर्क करून दिला होता. मी त्यांच्याशी व्हॉट्सॲप द्वारे संपर्कात होतो. चाचणीचा निकाल त्यांना पाठवताच त्यांनी औषध लिहून पाठवली. जवळच्या मेडिकल स्टोअर्सने ती त्वरित उपलब्ध करून दिली. एकीकडे काही मित्रांशी संपर्कात होतो. माझ्या पूर्वीच्या कार्यालयातील सहकर्मचारी असलेल्या मणिदीपने आम्ही चालू केलेले उपाय आणि भरपूर पाणी पिण्यास सांगितले. तो नुकताच या सगळ्या परिस्थीतीतून बाहेर पडला होता. शाळेतला मित्र रोहितने तुळशी, गुळवेल यांच्या गोळ्या किंवा रस घेण्यास सुचवले जेणेकरून आयुर्वेदिक पद्धतीने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होईल आणि त्याच बरोबर एक गुह्य मार्ग सांगितला, स्वामींचा 'तारक मंत्र' !
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे !
या सगळ्या धावपळीत आम्ही स्वामींना विसरलो नव्हतो. माझी पूर्ण खात्री होती की ते काहीतरी परीक्षा घेत आहेत. कारण आकांक्षा, मी आणि अयांश एकमेकांच्या संपर्कात असूनही फक्त आकांक्षाला कोरोनाची लागण होणे हे काही झेपत नव्हते. श्रीकृष्णाचा कर्माचा सिद्धांत पण डोक्यात घोळत होता. प्रारब्ध कोणाला चुकत नाही पण जेंव्हा आपण आपल्या गुरूचा हात घट्ट पकडला असतो तेंव्हा अंगावर कितीही संकट आली तरी तो आपली साथ सोडत नाही. आमची सगळ्यांचीच परीक्षा होती. "सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात उजव्या हाताची अनामिका बुडवून तारक मंत्र म्हणायचा आणि ते पाणी प्यायचे." असा सल्ला रोहितने दिला. त्यानेही तो अक्कलकोट मठातून ऐकला होता. त्याप्रमाणे तो सल्ला तंतोतत आचरणात आणला.
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे!
दुसऱ्या दिवशीपासून तारेवरची कसरत सुरू झाली. आमच्यासमोर सगळ्यात मोठ आव्हान होतं ते म्हणजे पुढील १५ दिवस अयांशला आकांक्षाजवळ जाऊ न देणं. एकाच घरात राहून हे कितपत शक्य होईल, ही शंकाच होती. मी सकाळी ०४:००-०५:०० च्या दरम्यान उठून शुचिर्भूत होऊन देवाची पूजा, तारका मंत्र म्हणणे आटोपून घेत असे. मग आकांक्षा आणि माझ्यासाठी गरम पाणी तयार करून ठेवणे, सकाळी उपाशी पोटी तुळशी पुदिन्याचा रस सेवन करणे, आमच्या न्याहारीची तयारी करून ठेवणे इत्यादी काम आटोपून घेत. आकांक्षा घराच्या एका खोलीत क्वारनटाईन असल्यामुळे तिला आवश्यक वस्तू नेऊन देणे, तिच्या जेवणाची आणि औषध पाण्याची वेळेवर सोय करणे आणि या सगळ्या प्रक्रियेत हात, दाराच्या कड्या न चुकता वारंवार सॅनिटाइझ करणे चालूच होते. घरामध्येही आम्ही दोघं कायम मास्क लाऊनच बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. या दरम्यान अयांश उठला की त्यालाही न्हाऊ, खाऊ-पिऊ घालून मी माझ्या रोजच्या ऑफिसचे काम करण्यास सज्ज होत असे. मधल्या वेळेत पाण्याच्या बाटल्या परत भरून ठेवणे, अयांशला खाऊ, पिऊ घालणे, त्याचे डायपर बदलणे, काढा करणे, वेळ मिळेल तेंव्हा वारंवार वाफ घेत रहाणे, रात्री झोपण्याआधी अयांशने केलेला पसारा, घर आवरून, केर भांडी करून आटोपून घेणे यात माझी प्रचंड दमछाक होणे अपेक्षित होते. पण 'प्रचंड स्वामी बळ पाठीशी' असताना असा कोणताही त्रास मला आजिबात झाला नाही. लहानपणापासून आई आणि लग्न झाल्यावर आकांक्षाला ही जबाबदारी पार पाडताना खुपदा पाहिलं आहे. फक्त १५ दिवस मला हे सगळं एकट्याने करायची वेळ आली तेंव्हा आपण बऱ्याचदा घरातल्या स्त्रियांना कसे 'ग्रांटेड' घेतो याची जाणीव होत होती.
अशक्यही शक्य करतील स्वामी
अयांशचा दिनक्रम म्हणजे खेळणे, बागडणे, आरडा ओरड, गोंधळ मध्ये एखाद दोन तास झोप. आकांक्षा क्लिनिकला जाताना किंवा ती आल्यावर दरवाजाचा होणाऱ्या आवाजाकडे 'मम्मा कधी येईल?' म्हणून आस लावून बसणारा तो, आकांक्षा क्वारनटाईन झाल्यापासून त्या खोलीकडे ढुंकूनही पाहत नव्हता. कधी खोलीचे दार उघडे असेल तरी तो बाहेरूनच आत मम्मा दिसते आहे ना, बघणार पण त्या खोलीची लक्ष्मण रेषा त्याने ओलांडली नाही. जणू काही मध्ये एक अदृश्य भिंत उभी होती. आकांक्षापण लांबूनच त्याला बघून मनोमन समाधान व्यक्त करत होती. एक एक क्षण एक एक दिवसासारखा भासत होता. एकाच घरात राहूनही खोलीच्या बाहेर पाऊल टाकता येत नव्हते. अयांशला उराशी कवटाळून घेता येत नव्हते. या सगळ्यात माझी होणारी ओढाताण तिला दिसत होती पण हतबल होऊन बसण्यापलीकडे काही मार्ग दिसत नव्हता. पण एकाच घरात राहूनही अयांशपासून ती दूरी सातत्याने राखण्याचं 'अशक्यही शक्य' स्वामींनी करून दाखवलं होतं.
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरु 'तू असे बाळ त्यांचा'
एकंदर हे जे काही होतं आहे त्यातून आपलं चांगलंच होणार आहे आणि आमचे गुरू आमच्या पाठीशी उभे आहेत यावर आमचा दृढ विश्वास होता. औषध सुरू केल्यापासून २ दिवसातच आकांक्षाला ठणठणीत बरे वाटत होते. थोडं सर्दी पडसे आणि वासाचे ज्ञान पूर्ण गेले होते पण मनातील जिद्द, विश्वासाला थोडाही तडा गेला नव्हता. तिच्या हातात मी परत एकदा भगवद्गीता टेकवली आणि म्हंटले "घे. वाच. आता तुझ्या आणि त्यांच्या मध्ये अजून कोणी नाही. पुढचे १५ दिवस सत्कारणी लाव". एकीकडे तिची उपासना, ध्यानधारणा चालूच होती. प्राणिक हिलींगच्या ग्रुप सोबत ती ध्यानधारणा करू लागली. एका दिवशी परत एकदा स्वामींनी तिला दृष्टांत दिला आणि "तुला काही झाले नाही आहे!" असे स्पष्ट सांगितले. तिच्यावर अजून मोठी जबाबदारी टाकून तिला त्यांच्या समक्ष ध्यानस्थ बसवले. कोणत्यातरी गुहेमध्ये त्या योगीराजांच्या समक्ष ध्यानस्थ बसून ध्यान करताना तिला उच्च स्पंदन जाणवत होती. असाच दिव्य अनुभव अजून काही दिवसांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ध्यान लाऊन बसली असताना तिने घेतला.
खरा होई जागा श्रद्धेसहित
कसा होशी त्याविण तू 'स्वामीभक्त'
याच दरम्यान आमचा दाभोळे येथे आलेला अनुभव मी लिहून माझ्या Scribbled Thoughts वर प्रकाशित केला. तो लिहिण्यास कुठून कसा वेळ मिळाला हे स्वामींनाच माहित. या सगळ्या धावपळीत माझा जन्मदिवस कधी आला आणि कधी गेला याचा पत्तापण लागला नाही. त्यावेळी मी सोशल मीडियावर सुद्धा परत आलो नव्हतो त्यामुळे फार कोणी शुभेच्छा देण्याचापण प्रश्न नव्हता. खर सांगायचं तर पूर्वी सोशल मीडिया नसताना लोक जसं एकमेकांचे वाढदिवस लक्षात ठेऊन शुभेच्छा देत त्या काळाचे आणि लोकांमधल्या खऱ्या ऋणानुबंधाचे मला जास्त कौतुक वाटले. दाभोळेला जाण्यापूर्वी मी आनंद कामत लिखित 'दत्त अनुभूती' नुकतेच वाचले होते.
त्यामुळे त्यांना आणि त्या पुस्तकात उल्लेख केलेल्या ११ गिरनार वाऱ्या करणाऱ्या स्वामीभक्त साधक रितेश वेदपाठक यांना संपर्क करण्याची उत्कट इच्छा झाली. त्यांना संपर्क करून त्यांना त्यांच्या पुस्तका बद्दलचा अभिप्राय संक्षिप्त रित्या कळवला आणि शुभेच्छा दिल्या. त्या मागोमाग आकांक्षा कडून त्यांच्याद्वारे संचलित 'स्वामीभक्त' या व्हॉट्सॲप ग्रूप बद्दल कळलं आणि थोड्याच दिवसात रितेश दादांनी मलापण या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं. काही दिवसांतच त्यातील इतर स्वामीभक्त गुरुबंधू आणि भगिनींशी ऋणानुबंध जुळून आले. 'दत्त अनुभूती' मधून आलेल्या अनुभूती बद्दल अजून लिहायचे आहे पण ते ज्या कारणासाठी माझ्या गुरूंनी माझ्याकडून ते वाचून घेतले ती अनुभूती अजून पूर्ण झालेली नाही. त्या पुस्तकाद्वारे एक शृंखला सुरू झाली असून ती अजून वाढतच आहे!
विभूती 'नमन नाम' ध्यानादी तीर्थ
स्वामीच या पंच प्राणामृतात
माझा एकंदर सोशल मीडियाशी संपर्क वाढू लागला. माझे Scribbled Thoughts वरील लेख अजून लोकांपर्यंत पोहचू लागले. मुळात ते फार लोकप्रिय वगैरे व्हावे अशा काही अपेक्षेने कधी लिहिलेच नव्हते पण ज्यांना मी ओळखत नव्हतो किंवा शुल्लक ओळख असणारे लोकही स्वतःहून येऊन अभिप्राय नोंदवू लागले. मनातून संदेश मिळू लागला होता की "तुझी सोशल मीडियावर परत यायची वेळ झाली आहे". एवढे वर्ष हजारो लोकांशी माझा या माध्यमातून संपर्क आला. मुळात तो संपर्क वेळ फुकट घालवण्यासाठी नसून त्यामागे काही कारण दडले होते याची जाणीव होत होती. अध्यात्म हा विषय सगळ्यांच्याच पचनी पडणारा नसला तरी ज्यांच्या पचनी पडतो त्यांना तो खूप सुखद अनुभव देऊन जातो. आमचे असे अनुभव, विचार आणि आमच्यातला बदल लोकांपर्यंत पोहचून त्यातून जर कोणाला अध्यात्माची आणि नामस्मरणाची गोडी निर्माण होणार असेल किंवा असलेली गोडी वृद्धिंगत होणार असेल तर ते कार्य म्हणजे आमच्या प्रसिद्धीचे कार्य नसून आमच्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने आम्हाला लाभलेले अहोभाग्य म्हणावे लागेल. कारण सध्याचा काळ हा स्वतःला घरात कोंडून तो वेळ फुकट घालवण्यासाठी नसून तो वेळ चिंतन, मनन आणि नामस्मरण करून आत्मपरीक्षण करण्यात आणि त्याद्वारे आपला आणि भगवंतांचा नक्की काय संबंध आहे ? हा आत्मसाक्षात्कार करून घेण्यात व्यतीत करणे अत्यंत आवश्यक आहे. यातून मिळणाऱ्या मनःशांतीला दुसरे काही तोड नाही!
हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती
न सोडी तया स्वामी ज्या घेई हाती
म्हणता म्हणता आकांक्षाचे १७ दिवसांचे क्वारनटाईन संपुष्टात आले. अयांश आणि मी १७ दिवस कोरोनाची लागण न होता सुखरूप काढले होते. कितीही मोठे संकट आली तरी आपण त्यांच्यावरचा विश्वास, नामस्मरणाची साथ सोडू नये. त्यांनी आमचा हात घट्ट पकडून ठेवला असल्याची खात्री पटवून अद्भुत प्रचिती दिली होती!
॥ ॐ श्री स्वामी समर्थ ॥
コメント