top of page
Writer's pictureNayanesh Gupte

जीवो जीवस्य जीवनम्

आकांक्षा आणि मी संपूर्ण शाकाहारी झालो आहे हे ऐकून आमच्या मित्र मंडळींना, ओळखीच्या लोकांनाच नव्हे तर आमच्या घरात आई वडिलांना देखील मोठा धक्का बसला. आम्ही मांसाहार आणि मद्य प्राशन पूर्णपणे वर्ज्य करून आज जवळपास पाच महिने झाले असतील. आठवड्यातून एखाद दिवस कोंबडी, एखाद दिवस मच्छी आणि कधी कधी वरण भातासोबत तोंडी लावायला सुकी मच्छी तर कधी संध्याकाळी सिनेमा लाऊन बसलो, की घरी तळलेले कबाब आणि रेड वाइन किंवा बिअर ( पण ते क्वचितच ) असा सगळा कार्यक्रम चालायचा.

पण ज्या दिवशी आम्ही हे सगळं वर्ज्य करण्याचा निर्णय घेतला, अगदी त्या दिवशी घरातले उरलेले सुरलेले बिअर चे कॅन आणि अर्धी संपलेली रेड वाइन ची बाटली असे सगळेच अक्षरशः कचऱ्यात स्वाहा केले.


आता हे सगळं ऐकून सगळ्यांचा पहिला साहजिक प्रश्न हाच की असं अचानक काय झाले?

कारण आम्ही अस्सल मांसाहारी प्राणी आहोत आणि चुकून मनुष्य जन्मात आलो आहोत, अशीच काहीशी समजूत आमच्या जवळच्यांची आहे, याची प्रचिती आम्हाला बऱ्याचदा आली आहे. पाच महिन्यांपूर्वी आमचे फेसबूक, इंस्टाग्राम, इत्यादी सोशल मीडिया वरचे रकाने सुंदर रित्या सादर केलेल्या मांसाहारी खाद्यपदार्थांची भरून जातं. विशेषकरून आम्ही एखाद्या झकपक रेस्टॉरंट किंवा कॅफे मध्ये गेलो असू तर नक्कीच. थोडक्यात सांगायच तर "खा प्या आणि मजा करा" या विचारसरणीचे उत्कृष्ठ (की नित्कृष्ठ ?) प्रदर्शन त्या सोशल मीडियाच्या रकान्यांमधून झळकत असे.


गेल्या नोव्हेंबर मध्ये भगवद्गीता वाचायला घेतली, आणि ती वाचून पूर्ण व्हायच्या आतच आमचे आयुष्य बदलून गेले. सुरुवात झाली भगवद् गीतेमध्ये वाचलेल्या श्रीकृष्णांच्या "हृषिकेश" या नावावरून...


हृषिकेश या संस्कृत शब्दाची फोड हृषिक् + ईश अशी आहे. हृषिक् म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे परमेश्वर किंवा स्वामी. श्रीकृष्ण हे इंद्रियांचे स्वामी आहेत. ते आपल्या मुकुटात मोरपीस धारण केलेले मायापती आहेत. त्यांचा मायेचा पसारा एवढा अफाट आणि पार करण्यास एवढा कठीण आहे, की या मायाजालातून सुटणे मोठ्या मोठ्या देवांनाही अशक्य आहे. या मायाजालामुळेच सर्व ब्रम्हांड सत्व, रज आणि तम या गुणांच्या अधिपत्याखाली कठपुतळ्यांच्या बाहुल्या जशा कठपुतळीकाराच्या तालावर नाचतात, तसे नाचते. पण हेच श्रीकृष्ण या तीन गुणांच्या पलीकडे असे त्रिगुणातित आहेत. श्रीकृष्णांचा निस्सीम भक्त होण्याची इच्छा बाळगणाऱ्याने सर्वप्रथम आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवणे आवश्यक आहे.

 

भगवद्गीतेमधील २ऱ्या अध्यायातील ४४ व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात


भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।

व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४ ॥


भाषांतर :

"जे लोकं इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्र्वेर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढनिश्चय होऊ शकत नाही"

 

गांधीजींची तीन माकडे फार प्रसिद्ध आहेत. वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. असे नाक, कान, तोंडावर हात ठेऊन वाईट प्रवृत्तींना दूर ठेवणे तात्पुरते का होईना पण शक्य आहे. पण जीभेवर ताबा मिळवणे हे अत्यंत कठीण!


ज्याने आपल्या आयुष्यात जीभेवर ताबा मिळवला, त्याने अर्धे आयुष्याचे सार समजले. कारण त्याला बाकी इंद्रियांवर पण ताबा मिळवणे फार कठीण नाही. सध्या आपल्या आजूबाजूला असे अनेक जण पहावयास मिळतात जे काही न काही आजारामुळे त्रस्त आहेत आणि त्या आजरांचे मूळ हे त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये दडलेले आहे. उदाहणादाखल सांगायचे झाले तर मधुमेह, अती वजन वाढणे आणि त्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढून हृदयाचे विकार होणे, इत्यादी.


एके काळी चमचमीत खाद्य पदार्थांच्या ओढीने वाहून गेलेला मी स्वतः ही या सवयीस अपवाद नव्हतो. भारतातल्या धर्म आणि जातिव्यवस्थेेप्रमाणे मी सी.के.पी. म्हणजे चांद्रसेनिय कायस्थ प्रभु. मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो की ज्यांना कोणाला ही जात माहिती आहे, त्यांच्यासमोर जर तुम्ही सी.के.पी. आहात असे सांगितले की ते सी.के.पी. खासियत असलेल्या काही पदार्थांची नावे घेतल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर, सी.के.पी. लोकांमध्ये बाकी बरीच कौशल्ये असली, तरी बऱ्याचदा कोणत्याही चर्चासत्राचि सुरुवात ही एक दोन खाद्यपदार्थांच्या चर्चेनेच होते. इंग्रजी CKP प्रमाणे काही जणांचं मत तर CKP म्हणजे चांगले खाणारे पिणारे असाच आहे! अशाच या खादाड सी.के.पी. लोकांचा सी.के.पी. खवय्ये नामक फेसबूक ग्रुप मी १० वर्ष अगोदर चालवायला घेतला होता. १० वर्षांत त्या ग्रुपच्या सभासदांची संख्या २५,००० पलीकडे गेली आणि म्हणता म्हणता सी.के.पी. खवय्ये हा सगळ्यात मोठा आणि सी.के.पी. लोकांचा सगळ्यात आवडीचा ग्रुप झाला. ग्रुप मधल्या बऱ्याचशा लोकांकडून खूप आपुलकी आणि प्रेम मिळालं. समीर गुप्तेंद्वारा चालवल्या जाणाऱ्या सी.के.पी. फुडफेस्ट साठी माझी हजेरी लागलीच तर कित्येक स्टॉल वर लोक आग्रहाने बोलवत आणि मी आग्रह करूनही पैसे घेत नसतं. काही काही जण तर "घरी घेऊन जा!" म्हणून डबे सुद्धा बांधून देत.


सांगायचा मुद्दा असा की, असे सगळं असूनही फेसबूकला राम राम ठोकताना सी.के.पी. खवय्येला पण राम राम ठोकणे अनिवार्यच होत. भगवद्गीता वाचून आणि श्रीकृष्णांपासून प्रेरित होऊन, मी साक्षात श्रीकृष्णांनाच माझे अध्यात्मिक गुरू मानलं होतं आणि माझ्या मते त्यांनीही त्यांचा शिष्य म्हणून माझा स्वीकार करून घेतला होता. एक आज्ञाधारक शिष्य या नात्याने माझे हे कर्तव्य आहे की मी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी केलेल्या उपदेशाचा मान राखणे. या कलियुगामध्ये त्यातल्या सगळ्याच उपदेशांच पालन करणे कठीण असले, तरी अशक्य नक्कीच नाही. कुठून न कुठून सुरुवात करणे तर आवश्यक होते.


मी अशी प्रतिज्ञाच केली की, अशा सर्व वासना आणि इच्छा ज्या माझ्यावर अधिकार गाजवतात, त्या सगळ्यांना मी श्रीकृष्णांच्या भक्तिद्वारे माझ्या अधिकाराखाली आणीन. सुरुवात झाली ती मांसाहारी पदार्थांचा त्याग करण्यापासून. मांसाहार करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे "जीभेचे चोचले पुरवणे आहे!" या पलीकडे मी दुसरे तिसरे कोणतेही कारण मी विचार करू शकत नाही. मला स्वतःला व्यायामाची अत्यंत आवड आहे. व्यायाम करणारे बरेच जण प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी मांसाहार करणे आवश्यक असल्याचे मानतात, पण ही गोष्ट मला मान्य नाही. शरीराला लागणारी प्रथिनांची गरज ही शुध्द शाकाहारी आहरामार्गे पूर्ण करणे सहज शक्य आहे. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली सारख्या यशस्वी खेळाडूने पण हे स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलेले आहे.


पण याच जीभेचे चोचले पुरविण्यासाठी मी एका निष्पाप प्राण्याचा जीव घेण्यासाठी तयार होणं हे माझ्यासाठी दांभिकपणाचे लक्षण झाले. माझा प्राण्यांवर खूप जीव आहे असे मला मनापासून नेहमीच वाटत आले आहे. लहानपणी जत्रेतून आणलेल्या कोंबडीच्या पिल्लांचा जेंव्हा शोकांतिक मृत्यू झाला तेंव्हा मुसमुसुन रडल्याचे मला आठवते, गल्लीतले कत्र्याचे पिल्लू जेंव्हा अपघाताने जखमी झाले, तेंव्हा माझ्या स्कूटरवर बसवून त्याला प्राण्यांच्या दवाखान्यात नेऊन त्यावर उपचार करवले होते आणि नंतर परत ते धावू लागेपर्यंत त्याची काळजी घेतल्याचेही माझ्या स्मरणात आहे. असे सगळे असतानाही मांसाहार करणे मनातून कुठेतरी पटत नसले तरी ते कळत असूनही वळत नव्हते. कारण मी माझ्याच इच्छांना/वासनेला बळी पडलो होतो. ही वासना मला आतून पोखरते आहे, हे आता मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत होतो.


भगवद्गीता वाचून या वासानेवर प्रभुत्व मिळवण्याची धडपड सुरू झाली होती. मी स्वतःलाच दिलेले हे एक आव्हान होते. कारण मला माझ्या अध्यात्मिक गुरूंना - श्रीकृष्णांना, हे सिद्ध करून एकप्रकारे गुरुदक्षिणा द्यायची होती की, यापुढे मी काही झाले तरी परत मांसाहार करणार नाही. त्यांना अध्यात्मिक गुरू मानलं तेंव्हाच मी सर्वांगाने त्यांच्यासमोर शरणागती पत्करली होती.


भगवंतांना मांसाहार अर्पण करू नये हे विधीलिखीत सत्य सगळेच जाणून आहेत.

 

भगवद्गीतेमधील ९ व्या अध्यायातील २६ व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात


पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्य‍ा प्रयच्छति ।

तदहं भक्त्य‍ुपहृतमश्न‍ामि प्रयतात्मन: ॥ २६ ॥


भाषांतर :

"जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो."

 

पण मनुष्यच असा प्राणी आहे की तो इथेही चमचमीत पदार्थाचं अमीष दाखवून भगवंतांनाही लाच देण्याचा प्रयत्न करत असतो.


लिहिता लिहिता अचानक हरिद्वारच्या महादेवांच्या मंदिरात बसलेल्या साधूंचे वाक्य आठवले, जेंव्हा त्यांनी मला पाकिटातून दानपेटीत टाकण्यासाठी सुट्टे पैसे शोधताना पाहिले. ते म्हणाले -

"आपण कोण आहोत त्यांना काही अर्पण करणारे, हे सगळंच तर त्यांचं आहे !".


भगवद गीता आणि श्रीमद् भागवत पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे, मनुष्याला मुळातच सदसद्ववेकबुद्धी प्रदान करण्यात आली आहे आणि या बुद्धीच्या बळावर तो निसर्गाकडून मिळालेल्या देणगीचा पूर्णतः सदुपयोग करून या पोटाची खळगी भरून स्वतःला सहज संतृप्त करू शकतो. त्याकरिता त्याला कोणत्याही निष्पाप प्राण्याचा जीव घेण्याची मुळीच आवश्यकता नाही.


बळी तो कान पिळी ही या जगाची रीतच आहे. मनुष्याने अन्नसाखळीमध्ये सर्व हिंस्र प्राण्यांनाही मागे टाकून सर्वोच्च स्थान पटकावले आहे ते शारीरिक बळावर नव्हे तर बुद्धीच्या बळावर. पण हीच बुद्धी गहाण न टाकता आपल्याच वेदांमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या शिकवणुकीचा थोडा शास्त्रोक्त पद्धतीने गहन विचार करणे आवश्यक आहे.

 

श्रीमद् भागवत पुराण स्कंध १, अध्याय १३वा, श्लोक ४७ वा

अहस्तानि सहस्तानामपदानि चतुष्पदाम् ।

फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम् ॥४७॥

भाषांतर :

"हात नसलेले हात असणाऱ्यांचे भक्ष्य आहेत. पादहीन हे चार पाय असणाऱ्यांचे भक्ष्य आहेत. दुर्बल सबलांचे जगण्याचे साधन आहेत. एकूण सामान्य नियम असा की, 'एक जीव दुसऱ्या जीवाचे अन्न आहे'"

 

प्राचीन काळी वेदांमध्ये नमूद केलेल्या काही यज्ञांमध्ये पशुबळी देण्याची पद्धत होती. उदाहरणार्थ आपल्यापैकी बरेच जण अश्वमेध यज्ञ ऐकून असतील. अश्वमेध म्हणजे ज्या यज्ञात अश्र्वाचा (घोड्याचा) बळी दिला जातो असा यज्ञ होय. प्रभु श्रीरामांनी सुद्धा हा यज्ञ केला होता. अशा यज्ञांचा मूळ उद्देश हा स्वतःच्या भौतिक प्रगतीसाठी नसून अध्यात्मिक प्रगतीसाठी आणि समाजकल्याणासाठी करणे अपेक्षित असे. यज्ञात बळी दिलेल्या पशुसाठी सुद्धा पुन्हा मनुष्य जन्म घेऊन श्रीकृष्णांच्या चरणी सेवा करण्याची संधी लाभत असे. यज्ञ हे श्रीविष्णूंचेच एक नाव आहे. श्रीविष्णू हे कोणत्याही यज्ञाचे परम भोक्ते आहेत मग तो यज्ञ कशासाठीही किंवा कोणासाठीही असो! श्रीमद् भागवत पुराणाच्या दुसऱ्या स्कंधात श्रीकृष्णांच्या विराट स्वरूपाचे वर्णन करताना त्यांची जिव्हा म्हणजे अग्नीदेव असल्याचे म्हंटले गेले आहे.

 
यज्ञ
 

कलियुगाच्या सुरुवातीला जेंव्हा कलीच्या प्रभावाने मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होण्यास सुरुवात झाली तेंव्हा मनुष्याने स्वतःच्या भौतिक सुखासाठी निष्पाप पशुंचा यज्ञात बळी द्यायला सुरुवात केली. मनुष्य असो अथवा पशू, हे त्या भगवंतांचीच निर्मिती. त्यांचीच बाळं! शेवटी आपल्याच मुखातून निघालेल्या स्वयंभू वेदांचा विरोध करून त्या निष्पाप निरागस प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी श्रीहरी विष्णुंनी बुध्द अवतारात प्रकट होण्याची लीला रचली.


आपल्याला भूक लागली की "पोटात आग पडली आहे" हा वाक्प्रचार फार सहजतेने आपण वापरत असतो. ही पोटातली आग किंवा जठराग्नी दुसरं तिसरं काही नसून एक यज्ञ आहे. पंचमहाभूतांनी बनलेले हे आपले शरीर जेंव्हा भूक लागल्याचे संकेत देते तेंव्हा पोटात अन्न ढकलून त्या जठराग्नीला आपण आहुती अर्पण करून त्या अग्निला शमावतो. जर श्रीहरी विष्णूंन्ना मांसाहार अर्पण करणे वर्ज्य आहे तर माझ्या मुखाद्वारे तोच मांसाहार गिळंकृत करून मी यज्ञाला मांसाहार अर्पण करण्याचे पाप कसे करू शकतो?


भोजन ग्रहण करण्यापूर्वी त्या अन्नाची आणि अन्नपूर्णेची हात जोडून प्रार्थना करणे ही आपल्या धर्माची शिकवण आहे. समर्थ रामदास स्वामींचे हे खालील श्लोक आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोतच पण मला त्याचा खरा अर्थ भगवद गीता वाचल्यावर उमगला!


वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥


जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।

अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।

हरीचिंतने अन्न सेवित जावे ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥


 

|| जय जय रघुवीर समर्थ ||




टिप्पणी :

याच ब्लॉगची इंग्रजी आवृत्ती - Jīvo Jīvasya Jīvanam मी काही महिन्यांपर्वीच लिहिली होती. पण ही मराठी आवृत्ती म्हणजे त्या ब्लॉगचे तंतोतंत भाषांतर नाही. साधारण मुद्दे तेच!


2,996 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page