➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶
➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶
ती जन्मतःच एक योगिनी होती. प्रारब्धाचे भोग हे भोग भोगूनच संपवावे लागतात आणि पूर्व जन्मीचे सर्व भोग या जन्मात भोगून संपवावे या तत्वांवर खंबीरपणे आयुष्य काढणारी मुलगी, पत्नी, सून, आई, सासू, बहिण, आजी, गुरूनानी अशा कित्येक भूमिका या योगिनीने पार पाडल्या.
माझा स्वतःचा अलीकडचा अनुभव आणि निरीक्षण बघता. शास्त्रानुसार संस्कार पद्धतीस मुकलेली स्त्री ही बहुतांश पुरुषांना मागे सोडून अध्यात्मिक क्षेत्रात खूप पुढे निघून गेली आहे. कथानकातील कालिंदी वर म्हटल्याप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तिची साधना अखंड चालूच ठेवते.
आपण कोणत्याही माता पित्यांच्या पोटी जन्माला आलो जेंव्हा आपलं प्रारब्ध हे सद्गुरूंनी निश्चित केलेल असतं आणि आपण फक्त परीक्षा देत असतो. कधी उत्तीर्ण नाहीच झालो तर सद्गुरू पुन्हा नव्याने संधी देत राहतात. प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण केल्यावर एक नवीन परीक्षा समोर उभी राहते. त्या परिस्थितीत जास्त न गुंतता त्यावर मात करून खंबीरपणे कालिंदी पुढे जात राहते. श्रीकृष्णाचा आणि कालिंदीच्या खोल डोहाचा परस्परसंबंध सांगताना आणि कथानकातील कालिंदी आणि तिला दिलेली यमुनेची उपमा अगदी समर्पक असल्याचे जाणवते. जसा यमुनेचा खोल शांत डोह तशीच धीर गंभीर कालिंदी. पण तेवढीच आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या चोख पार पाडणारी लढवय्यी. स्वामीचा वैरागी स्वभाव माहित असतानाही स्वामीच्या प्रेमात पडणारी कालिंदी आणि कालिंदीच्या रूपावर आणि अबोल स्वभावाच्या प्रेमात न्हाहून निघालेला स्वामी हे एक वेगळंच समीकरण होतं. स्वामी शंकर महाराजांच्या आदेशानुसार हिमालयात साधनामग्न होतो तर कालिंदी स्वामीला वाऱ्यावर सोडूनही साधनेत प्रगती करत राहते. मुलांवर काही निर्बंध न लावता त्यांना त्यांचे मार्ग शोधून देणाऱ्या आणि त्यांच्या प्रगतीपथावर कायम सोबत असणारी आदर्श आईची मूर्तिमंत प्रतिकृती म्हणजे कालिंदी. गर्भात असताना बाळाला पुरेसं अन्न न मिळाल्याने बाळ जन्मताच वैकुंठास निघून गेल्याचे ऐकून आपण आवंढा गिळतो पण त्याचे त्या धीर गंभीर कालिंदीला काहीच नसते. विणलेली टोपडी परत ठेऊन ती प्रपंचात गुंतून जाते. सर्पदंशाने विष पचवून आयुष्याशी झगडत रहाते. तिचा तो आवेश पाहून नियती सुद्धा तोंडात बोट घालत असावी.
कालिंदीला निमित्तमात्र बनवून जगन्नाथ कुंटे ॐकार कसा म्हणावा शिकवून जातात. कालिंदी मधला हा खालील परिचछेद मनात बसला -
“कालिंदीनं हळूहळू सर्वांना जमवायला सुरुवात केली. पाच-सहा लोकांना एकत्र जमवायचं. त्यांना पद्मासनाची बैठक समजावून द्यायची, ज्ञानमुद्रा दाखवायची, ताठ बसवायचं आणि ॐकार कसा चालू करायचा ते दाखवायचं, म्हणजे ॐ म्हणायचा. अ,ऊ, म ही तीन अक्षरं. साधा श्वास घ्यायचा आणि खर्जात म्हणजे फक्त आपल्याला ऐकू येऊ शकेल अशा आवाजात अऽऽ म्हणायला लागायचं. अंदाजे पाच-दहा सेकंदानंतर ओठांचा थोडासा ‘ओं' सारखा आकार करून ऊऽऽ असा उच्चार 'अ'च्या पेक्षा जास्त वेळ करायचा म्हणजे अंदाजे पंधरा-वीस सेकंद आणि त्या त्याला जोडूनच 'म'चा उच्चार दीर्घ वेळ करत बसायचा. 'म'च्या उच्चाराला मर्यादा नाही. स्वामी गंमतीत म्हणायचा, 'किती वेळ? जगाच्या अंतापर्यंत चालेल.' 'म' आकाराचा उच्चार मात्र ओठ बंद करून करायचा आहे. छाती पोटातली सगळी श्वासाची हवा बाहेर जात राहते. पोट हळूहळू आत जायला लागतं. फुगा रिकामा व्हावा तशी अवस्था होते. पोटात पूर्ण खड्डा होतो. क्षणभर तसंच थांबावं. पुन्हा नॉर्मल श्वास घ्यावा. अऽऽऊऽऽऽऽऽ असा ओमचा उच्चार तीन वेळा करावा; मग शांत बसावं, डोळे मिटलेले आहेत. 'महाराज, शरण आलोय. सांभाळा.' डोळ्यांपुढे दिसत असलेले विचार फक्त पाहत बसावं. हेच ध्यान. ध्यानात काहीच करायचं नाहीये. फक्त विचार बघत बसायचं. हळूहळू विचार संपून जातील. निर्विचार न मन अशी अवस्था होईल. केवळ चैतन्याचा अनुभव येईल.”
त्यादिवसानंतर पहाटे साधना करताना ॐकार खऱ्या अर्थाने अंगात स्पंदन निर्माण करू लागला. त्याची कंपन दुसऱ्या खोलीत आकांक्षालासुद्धा जाणवू लागली. काही दिवसांपूर्वी अपर्णा ताईने विचारलेल्या "ॐकार कसा म्हणावा" प्रश्नाचं उत्तर पण मिळालं होतं, त्यामुळे तिला ताबडतोब तेवढ्या परिच्छेदाचा स्क्रीनशॉट काढून पाठवलं.
अवधुतानंद जगन्नाथ कुंटे कालिंदीला रंगवताना नर्मदा परिक्रमा, साधनेत आलेले त्यांचे वैयक्तिक अनुभव आणि कालिंदीच व्यक्तिमत्त्व याची छान सांगड घालतात. तिची शंकर महाराजांवरील श्रद्धा आणि महाराजांनी तिची केलेली जडण घडण कथानकाच्या उत्तरार्धात खुलून दिसते. कालिंदी आणि शंकर महाराजांची मूर्ती दोन्ही घडताना टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवाला देवपण येत नाही हे प्रकर्षाने जाणवते. कधी घरातून वडिलांनी अहंकारापोटी ज्या कालिंदीला घरातून बाहेर काढले असते त्या कालिंदीची कीर्ती साता समुद्रापार पोहोचते. तिच्या नावाचे कालिंदीनगर उभे राहते. पण यातही यत्किश्र्चीत अहंकार निर्माण होऊ न देता सगळी शंकर महाराजांची कृपा म्हणून कालिंदी प्रकाशझोतापासून दूर शिव शंकराच्या मंदिरात कालिंदी साधनेत गढून रहाते. तिने घडवलेल खेड्याच नगर आणि आधुनिकतेला लांब ठेवूनही घडवलेले स्वावलंबी गाव, गावखेड्याची ओढ लावून जात.
सगळ्या गावाला आणि जुन्या नव्या पिढीला अध्यात्म आणि साधनेची ओढ लावून साधनामस्त झालेली कालिंदी साधनेत समाधिस्त होऊन शंकर महाराजांत विलीन होऊन जाते. मागे सोडून जाते तो कलिंदीच्या विचारांचा खोल डोह.
Comments