भगवद्गीतेवर आधारित हा एक अत्यंत रोचक विषय आहे. माझ्या ओळखीत अनेक लोक सोशल मीडियावर अगदी नित्य नियमाने अमक्या तमक्याने लिहिलेले किंवा निनावी सुविचार पोस्ट करत असतात. त्यात कर्माबद्दल लिहीलेले सुविचार लोकांच्या फार आवडीचे असतात. बऱ्याचदा लिहिताना ज्याने कोणी त्यांचं वाईट केलं आहे त्यांना कर्माची फळ भोगावी लागावित असाही आशय असतो कधी कधी.
सांगायचा मुद्दा असा की भगवद्गीतेमध्ये कर्मयोग आणि भक्तियोगावर एक संपूर्ण अध्याय आहे. हा अध्याय म्हणजे अर्जुनाला पडलेले प्रश्न आणि श्रीकृष्णाने त्याच केलेलं निरसन आणि या चर्चेहून या विषयावर अधिक प्रकाश पाडू शकेल असे दुसरे कोणते साहित्य अस्तित्वात असेल असे मलातरी वाटत नाही. तेच संदेश प्रत्येक जण त्याला आलेल्या अनुभवाप्रमाणे इकडून तिकडून फिरवून सांगत राहतो. त्यामुळे या लेखात परत तेच अध्याय लिहून काढणं हा माझा उद्देश नाही. मला जो मुद्दा इथे मांडायचा आहे तो म्हणजे पुण्य कर्म आणि भक्ती यांमध्ये घातला जाणारा घोळ. ज्याने ह्यातला भेद जाणला त्याला आत्मसाक्षात्कार झाला असे समजता येईल.
काय असतं हो हे पुण्य कर्म?
आपण मनुष्य म्हणून या पृथ्वीवर जन्म घेतला म्हणजे आपण सगळेच कर्मी आहोत आणि ही वसुधा आपली कर्मभूमी. पण हे कर्म दोन प्रकारचे असतात. सकाम कर्म आणि निष्काम कर्म.
सकाम कर्म
आताच्या युगात बहुतांश लोक ही सकाम कर्मात गुरफटले आहेत. थोड सोप्प करून सांगायचं तर आपल्या सगळ्यांनाच कर्माची फळं अपेक्षित असतात. एखाद्या संस्थेला मदत किंवा दान करण्यात पण त्यातून आपण काहीतरी पुण्य कमवू अशी अपेक्षा असते. घरोघरी सांगितल्या जाणाऱ्या पूजा आणि यज्ञ हे पण बहुतांशी सकाम कर्माचाच भाग आहेत. कारण त्यात सांगितले जाणारे मंत्रोच्चार हे भौतिक प्रगतीच्या महत्त्वाकंक्षेमुळे प्रेरित होऊन केले जातात. मग ते कुटुंबाच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी किंवा आर्थिक भरभराटीसाठी केलेले असो.
आमची अध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी कोणी अशा पूजा किंवा यज्ञ केल्याचे फारसे ऐकण्यात आले नाही. असो !
निष्काम कर्म
याऊलट निष्काम कर्म आहे. कोणासाठी काहीतरी करावं आणि त्यांचं भलं व्हाव ही तळमळ आतून असते. याची नोंद कोणाच्या खात्यात होते आहे किंवा नाही याची अपेक्षा नसते.
सकाम कर्म असो की निष्काम कर्म, कर्म ते कर्म असते. प्रत्येकाच्या घरातील संस्काराप्रमाणे सत्कर्माची व्याख्या ही बदलत असते. एखाद्याच्या लेखी मांसाहार करणं हे पापकर्म असू शकते. पण तोच "पापकर्मी" अगदी नित्य नियमाने भगवंतांचे स्मरण करून त्यांची पूजा अर्चा करून त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहत असण्याची सहज शक्यता आहे.
मांसाहार करणं / न करणं हा एक वेगळाच विषय आहे जो मी माझ्या जीवो जीवस्य जीवनम् या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
भक्ती
भक्ती ही कर्मापासून फार वेगळी आहे. आपण जे काही करतो ते त्या भगवंतांना समर्पित करून त्यांना पूर्णपणे शरण जाणे म्हणजे भक्ती. म्हणून श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की जे काही करशील ते मला समर्पित कर, माझ्यासाठी कर. कारण जे कर्म स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणासाठीही केलेलच नाही त्या कर्माची फळं मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि कर्मांच बंधन मोडून, जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडून शेवटी मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.
भक्ती आणि सत्कर्म
मध्यंतरी आकांक्षा आणि मी गप्पा मारत असताना तिने तिच्या वैद्यकीय केंद्राच्या सुविधा सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उपेक्षित मुलांपर्यंत पोहचवण्याची इच्छा व्यक्त केली. निस्संदेह हे एक पुण्य कर्म आहे. पण "कर्म" आहे. कारण त्यातला भाव हा जर माझ्या मनाला शांतता मिळावी, किंवा समोरच्या व्यक्तीला सुख मिळाव अशी असेल तर ते स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या सुखासाठी झालेले कर्म झाले. पण जेंव्हा त्याच कर्मामागचा भाव हा मी हे जे काही करतो आहे ते भगवंतांना समर्पित करतो ( श्रीकृष्णार्पणमस्तु ) आणि त्यांच्या समाधानासाठी करतो तेंव्हा तेच कर्म फक्त पुण्य कर्म राहत नाही ती भक्ती असते.
भगवद्गीतेची सुरुवातच त्या रणांगणावरील क्षणापासून होते जेंव्हा अर्जुनाचे उद्विग्न झालेले मन त्याला युद्ध करण्यापासून परावृत्त करते. आपल्याच गुरुवर्य आणि आप्तेष्टांना युद्धात पराभूत करून रक्तरंजित झालेले ते सिंहासन आणि राज्य काय कामाचे ? त्या युद्धातला विजयाचा आनंद कोणासोबत उपभोगायचा ? अशा द्विधा मनस्थितीत अर्जुन गुरफटून जातो.
त्याला या उद्विग्न मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी दिलेला अमूल्य असा गीतोपदेश जेंव्हा अर्जुनाचे डोळे उघडतो त्यानंतर त्या रणांगणावर जे महाभारत घडले त्या युद्धाचा अर्जुन हा असामान्य अजरामर योद्धा झाला. कारण श्रीकृष्ण शस्त्र उचलणार नसले तरी हे युद्ध व्हावे आणि दुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीचा सर्वनाश व्हावा ही त्यांची इच्छा अर्जुनाने पूर्ण केली. कर्म तेच पण त्याने सिंहासन आणि राज्याच्या लोभापायी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी केले.
भक्ती, संयम आणि पापकर्म
रावण हा भगवान शंकराचा निस्सीम भक्त होता. अतिशय कठीण तपश्चर्या करून त्याने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. पण शेवटी त्याने हृषीकेश रामाची सर्वोच्च सत्ता अमान्य केली. तो स्वतःच्या वासनेला बळी पडला आणि शेवटी श्रीरामांच्या हाती धारातीर्थी पडला. म्हणून भक्ती महत्त्वाची आणि तितकेच आपल्या इंद्रियांचे आपण अनाभिषक्त सम्राट होणे अत्यावश्यक आहे.
सत्ययुगात हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, त्रेतायुगात रावण आणि कुंभकर्ण आणि द्वापारयुगात शिशुपाळ आणि दंतवक्र हे खरे भगवंतांच्या वैकुंठातले द्वारपाल जय आणि विजय. पण प्रपंचात राहूनही भक्ती करत रहाणं आणि कर्मबंधात न अडकणं असे बरेच उपदेश आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी अनंत नाव धारण केलेले ते अनंत लीला अनंत रुपात अखंड करत असतात.
मंदिर आणि रुग्णालय
हा सध्याचा ज्वलंत विषय आहे. मध्यंतरी एकदा माझे व्हॉट्सॲप वरचे "अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या राम मंदिराचे" स्टेटस अपडेट पाहून माझ्या मित्राने मला प्रश्न विचारला. सध्याची स्थिती बघता मंदिरे बांधण्यापेक्षा रुंग्णालये बांधणे किती अत्यावश्यक आहे वगैरे वगैरे याबद्दलचे त्याचे प्रामाणिक मत त्याने मांडले.
या विचाराचे खंडन करणारे माझे स्पष्ट विचार मी पुढे मांडू इच्छितो.
मी शक्यतो बातम्या वाचत किंवा पहात नाही. पण त्या दिवशी अचानक राम मंदिरास १००० करोड देणगी मिळाल्याबद्दलच्या बातमीचे मला कौतुक वाटले म्हणून मी ते माझ्या स्टेटसमध्ये अपडेट केले होते.
मंदिर असो वा रुग्णालय ते बांधण ही सरकारची जबाबदारी आहे. कर भरणारा प्रत्येक देशवासीयांच्या श्रमातून आलेला हा पैसा सरकारने योग्य वेळी योग्य तिथे सत्कारणी लावणं आवश्यक आहे अशी अपेक्षा असते.
राम मंदिराच्या बाबतीत ही रक्कम त्यांच्या भक्तांनी आपल्या लाडक्या श्री रामांसाठी स्वेच्छेने गोळा करून त्याचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. मी सुद्धा माझा खारीचा वाटा त्यात अर्पण केला होता. त्यामुळे खर म्हणता यात सरकारच योगदान हे फक्त पाठिंबा देऊन ही प्रभु श्रीरामांची ईच्छा पूर्ण करणे एवढेच आहे. बाकी कर गोळा करूनही आवश्यक सोयीसुविधा पूर्ण करण्यास किंवा कडक निर्बंध घालण्यात सरकार कुठे आणि का कमी पडले या राजकारणी विषयात माझा फारसा रस नाही.
मंदिर आणि रुग्णालय या दोन्ही गोष्टी समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक आहेत. मंदिरे ही माणसाच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहेत तर रुग्णालये ही या अध्यात्मिक मार्गातून ढळलेल्या समाजाच्या शारीरिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी आवश्यक आहेत.
मंदिर म्हणजे भगवंतांनी त्यांच्या अर्चविग्रहाच्या स्वरूपात आपल्याला त्यांची सेवा करून देण्याची सुविधा आहे. श्रवण, कीर्तन, पाया पडणे, पूजा-अर्चा करणे, वंदन करणे, दास्यत्व स्वीकारणे, मित्रत्व आणि आत्मनिवेदन करणे या श्रीमद् भागवत पुराणात भक्त प्रल्हाद महाराजांनी कथन केलेल्या ९ पद्धती आहेत. यातील आपल्याला आवडेल अशा कोणत्याही एका पद्धतीने जरी भगवंतांची आराधना केल्यास आपली भक्ती त्यांच्यापर्यंत पोहचते. आणि एकदा का मनुष्य भक्तीच्या मार्गाला लागला की आपोआपच भगवंत त्याची काळजी घेतात. या भक्तीची ताकद एवढी मोठी आहे की संकटात तुम्ही असता आणि काळजी त्याला असते. प्रारब्ध कोणाला चुकत नसते. आपल्याला आपल्या कर्माचे भोग भोगावेच लागतात. फक्त फरक एवढाच असतो की जेंव्हा त्याचा हात पकडलेला असतो तेंव्हा दुःखाचा महासागर पण सहज पार पडतो. भक्तीचा मार्ग ज्याने स्वीकारला आहे त्याला आचार विचार कसे असावे याच ज्ञान मिळवण्यासाठी फार धडपड करावी लागत नाही कारण हे गुह्य ज्ञान भगवंत स्वतः अंतःकरणातून मार्गदर्शन करत असतात.
प्रातःकाळी लवकर उठणे, व्यायाम, साधना, पूजा-अर्चा करणे, योग्य वेळी आणि आवश्यक तेवढाच सात्विक आहार सेवन करणे, नामस्मरण करणे, स्वतःला प्रलोभनांपासून दूर ठेवणे, आवश्यक तेवढीच निद्रा घेणे अशी ज्याची दिनचर्या आहे तो कोणत्याही आजारपणास सहजासहजी बळी पडेल का ?
मग माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे की कल्पना करा १,००,००० लोकसंख्या असलेल्या एखाद्या शहरात जर अशी दिनचर्या असणारी बहुसंख्य लोकसंख्या असल्यास त्या शहरात किती मोठ्या रुग्णालयाची सोय करणं आवश्यक आहे ?
अशी जीवनपद्धती कायम टिकवण्यासाठी लागणार मार्गदर्शन भगवंतांचे प्रतिनिधी आणि स्वतः भगवंत सोडून अजून कुठून लाभणार ?
तीर्थक्षेत्र किंवा मंदिरे विकास करण्याचा मूळ मुद्दा हा फक्त भगवंतांचे दर्शन घेणे नसून तिथे जाऊन अन्य भक्तांकडून आणि विद्वान साधू पुरुषांकडून मार्गदर्शन करून घेणे हा आहे. संत पुरुषांच्या सहवासात काढलेला काही काळ सुद्धा खूप काही ज्ञान देऊन जातो.
भागवत, महाभारतात बलराम, विदुर आदि महापुरुष तीर्थाटनास जाऊन अन्य ऋषींच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करून आल्याच्या कथा आढळतात. प्रत्यक्षात बघता बलराम म्हणजे पण त्या अनंताच रूप आणि विदुर म्हणजे भगवंतांच्या १२ महाजनांपैकी १ अशा यमराजाचे अवतार. पण त्यांनीही सर्व सामान्य लोकांनी त्यांचे उदाहरण समोर ठेऊन योग्य आचार विचार आचरणात आणावेत म्हणून स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलेली शिकवण असते.
पण आपण जन्म-मृत्यू-जरा (वार्धक्य)-व्याधीच्या (रोग) चक्रात गुरफटून जातो. नियंत्रित जीवनपद्धती न अवलंबता आपल्या मनमर्जीने स्वतःला कर्माबंधात अडकवून घेतो आणि जेंव्हा संकट ओढवत तेंव्हा कधी देवाचा धावा करतो तर त्याने आपल्याला का नाही सोडवलं म्हणून त्याला दूषणे देतो. पण तेंव्हा आपण हे विसरून जातो की त्याच्या उपदेशाचा मान न राखता केलेल्या केलेल्या आपल्याच कर्माची ती फळं आहेत. त्यासाठी भगवंतांना दोष देणे हे काही योग्य नाही.
आधुनिक विज्ञान आणि अध्यात्म
या ब्रम्हांडात प्रत्येक गोष्टीला स्वतःची अशी एक वारंवारता (frequency) आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर सध्या थैमान घातलेल्या कोरोनाच्या विषाणूमध्ये बंद “इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्ट्रक्चरसह” कमी कंप आहे, ज्याची प्रतिध्वनी वारंवारता सुमारे ५.५ हर्ट्ज ते १४.५ हर्ट्ज आहे. उच्च वारंवारतेच्या श्रेणीमध्ये ते सक्रिय होऊ शकत नाही किंवा २५.५ हर्ट्जपेक्षा जास्त जगू शकत नाही.
निरोगी व्यक्तीचे शरीर उच्च श्रेणींमध्ये "कंपित" करते. तथापि, निरोगी व्यक्तीने नकारात्मक विचार केल्यास ही कंपनसंख्या कमी होते. ते कायम उच्च श्रेणीमध्ये कंपित व्हावे यासाठी सातत्य राखणे अत्यंत महत्वाचे आहे. आपले शरीर आणि शरीरप्रणाली पृथ्वीच्या वारंवारतेनुसार कंप पावतात. पृथ्वी एक विशाल इलेक्ट्रिक सर्किट प्रमाणे वागते. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स "शुमान रेझोनान्स" नावाच्या नैसर्गिक वारंवारतेसह सर्व सजीव वस्तूंचे संरक्षण आणि संरक्षण करते. (७.८३ हर्ट्ज आणि ते देखील बदलू शकतात)
रुग्णालये, कारागृह यासारख्या ठिकाणी नकारात्मक वातावरणामुळे कमी वारंवारता आढळून येते. त्याचप्रमाणे दुःख, भिती, त्रास, चिंता अशा प्रकारच्या सर्व भावना या नकारात्मक असून कमी वारंवारता दर्शवतात. तर प्रेम, औदार्य, दिलखुलासपणे हास्य, व्यायाम करणे, खेळणे, भरपूर पाणी पिणे अशा गोष्टींची वारंवारता ही ३००-१००० हर्ट्ज पेक्षा जास्त असते. थोडक्यात कोणत्याही महाभयंकर विषाणूचा किंवा रोगाचा प्रतिकार करण्यासाठी नकारात्मकतेवर सकारात्मतेने मात करणे आवश्यक आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर तेच रुग्ण लवकर मात मिळवतात ज्यांचे मनोबळ उत्कृष्ठ आहे. मंदिरात प्रेम, आनंद, शांतता आणि आत्मसाक्षात्कार अशा भावनांचा सर्वोच्च वारंवारता (५००-१००० हर्ट्ज) निर्माण करण्यात सहयोग असतो.
घंटानाद
हिंदू धर्मात मंदिरात शिरल्यावर किंवा पूजा करताना घंटा वाजवण्याची पद्धत आहे. ही घंटा पंचधातूची असावी असा शक्यतो नियम असतो. त्याला कारण असे की त्या धातूंच्या ठराविक मिश्रणावर त्या घंटानादाची वारंवारता अवलंबून असते. तसेच आपल्या शरीरात शरीराच्या विविध अध्यात्मिक क्रिया नियंत्रित करणारी चक्र असतात. विविध कारणास्तव ही चक्रे त्यांच्या मूळ क्रिया करण्यापासून अनियंत्रित होतात. हा घंटानाद या अनियंत्रित चक्रांना तात्पुरता का होईना नियंत्रित करून आपले लक्ष त्या भगवंताकडे केंद्रित करण्यास मदत करतो. तसेच मंदिराच्या रचनेतील इतर अनेक गोष्टी भौतिक दिसत असल्या तरी त्या गोष्टी या भौतिक आणि अध्यात्मिक जगाला जोडणाऱ्या शृंखला असतात.
आपण जेंव्हा एखाद्या इस्पितळास भेट देतो आणि एखाद्या मंदिरास भेट देतो तेंव्हा कुठे जास्त प्रसन्नता जाणवते ? या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी बऱ्याचशा इस्पितळात पण मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
प्रयत्नांती परमेश्वर
प्रयत्न करणे आपल्या हातात असते. "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी!" असे म्हणून हातावर हात ठेऊन बसा अस भगवंत कधीच म्हणत नाही.
द्रौपदी स्वयंवराच्या वेळी जेंव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला पाण्यात पाहून मास्याच्या डोळ्याचा वेध कसा घे यावर सल्ला देत होते, तेंव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं, "हे सगळंच मलाचं करायचं आहे, तर हे वासुदेव, तुम्ही काय करणार?"
तेंव्हा श्रीकृष्णाने त्याला स्मितहास्य करून उत्तर दिलं, "ज्या अस्थिर पाण्यात बघून तुला तुझे लक्ष्य साधायचे आहे, ते पाणी स्थिर ठेवण्याचं काम मी करणार!"
सांगायचा मुद्दा असा की आपल्या प्रयत्नांच यश हे त्याच्या हातात आहे. ती सगळी आपल्या कर्माची फळं आहेत. चांगले कर्म म्हणजे फक्त कृती नव्हे तर आपण मनात काय विचार करतो हे पण तितकेच महत्त्वाचे आहे कारण आपल्या मनातल्या प्रत्येक विचाराचा तो साक्षी आहे आणि त्या पुढचा प्रत्येक क्षण हा त्या विचारावर अवलंबून आहे.
श्रद्धा
आपल्याला भगवंतांची आणि त्यांच्या नामस्मरणाची गोडी लागण हा जन्मोजन्मीचा कर्मधर्मसंयोग असतो. काही लोक म्हणतात की देव आमचं मागणं ऐकत नाही किंवा "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल!" कारण त्या पुरुषोत्तम परमेश्वराचे अस्तित्व त्यांना मान्य नसते. त्यांच्यासाठी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतः म्हणाले आहेत की भक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने मला जाणणे अशक्य आहे. अशा नास्तिकांना भगवद्गीता समजावणे तसे अवघडच. पण हे खालील काव्य सहज सोप्या भाषेत तोच संदेश देऊन जाते
अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं ।
कौन कहता हे भगवान आते नहीं,
तुम मीरा के जैसे बुलाते नहीं।
कौन कहता है भगवान खाते नहीं,
बेर शबरी के जैसे खिलाते नहीं।
कौन कहता है भगवान सोते नहीं,
माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं।
कौन कहता है भगवान नाचते नहीं,
गोपियों की तरह तुम नचाते नहीं।
नाम जपते चलो काम करते चलो,
हर समय कृष्ण का ध्यान करते चलो।
याद आएगी उनको कभी ना कभी,
कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥
Comments