top of page
Writer's pictureNayanesh Gupte

कर्मदरिद्री


 

मुंबई ते हॅम्बर्ग via अक्कलकोट या लेखात मी आमच्या गाणगापूर येथील नृसिंह सरस्वती यांच्या तीर्थक्षेत्रास भेट दिल्याचा उल्लेख होता. या लेखात त्यातील काही घडामोडी थोड्या अजून उलगडून मांडाव्याश्या वाटतात. त्याला कारण पण तशीच आहेत.


कोरोनामुळे लागू करण्यात आलेली संचारबंदी शिथिल झाली असली तरी अजून कोणी तीर्थक्षेत्रांना भेट द्यायचे फारसे धाडस करत नसावे कारण आम्ही जेंव्हा गाणगापूर सारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री मंदिरात पाऊल ठेऊनपण इतर दत्त भक्तांची रीघ लागलेली दिसत नव्हती. असा अनुभव यापूर्वी मला कधी आल्याचे स्मरणात नाही. तेथील गुरुजींच्या आग्रहामुळे आम्ही पूजा आणि दानधर्म आटोपला आणि मग मंदिरास प्रदक्षिणा घालण्यास सुरूवात केली. गुरुजींनी आम्हाला ३ प्रदक्षिणा घालण्यास सांगितले होते. मंदिराच्या अवतीभवती काही सन्यासी पुरुष बसले होते, काही विश्रांती घेत पहुडले होते, त्यात काही भिकारी पण होते. कोण सन्यासी, कोण भिकारी आणि कोण सन्यास वेश धारण केलेले भिकारी हे सांगणं खरंच अवघड असतं!


धडधाकट भिकाऱ्यांना भिक घालणे मला फारसे कधी पटले नाही. धडपड करूनही नशिबी दारिद्र्य आलेले दैनीय स्थितितील कमनशिबी आणि आळशीपणा अंगिकारल्यामुळे काम न करता फुकट खायची सवय लागलेले संधीसाधू भिकारी यांत फरक लक्षात येतो. त्यामुळे अशा तीर्थक्षेत्री जेंव्हा हे भिकारी तुटून पडतात तेंव्हा त्यांच्याकडे मी शक्यतो दुर्लक्ष करून आणि माझे खिसे सांभाळून पुढे पाऊल टाकत रहातो.


असाच एक सन्यासी नृसिंह सरस्वतींच्या मंदिराच्या आडोश्याला बसला होता. आमची पहिली प्रदक्षिणा सुरू झाली तेंव्हाच त्याने मला हात दाखवून खुणेने जवळ बोलावले. पण मला फारसं लक्ष न देणं योग्य वाटलं आणि मी प्रदक्षिणा चालू ठेवली. आकांक्षाच्या ही गोष्ट अजून लक्षात आलीच नव्हती. पुढची प्रदक्षिणा घालताना पण तेच! त्यांनी परत एकदा खुणेने बोलवलं. मी परत दुर्लक्ष केलं. शेवटाची म्हणजे तिसरी प्रदक्षिणा घालताना या वेळी त्यांनी त्यांच्या हातात काहीतरी दाखवलं आणि मला परत खुणेने बोलावलं. या वेळी मात्र मी आकांक्षाला थांबवलं आणि तिला म्हणालो "ते बोलवत आहेत." त्या सन्यासांनी त्यांच्या जीर्ण झालेल्या बॅगेतून दोन रूद्राक्ष काढून माझ्या हातात दिले आणि दोन आकांक्षाच्या हातात. आम्ही त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी त्यांची बॅग फाटली असल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिले आणि कपडे पण खूप जुने झाल्याचे दाखवले. हा सगळा संवाद इशाऱ्यांनीच चालू होता. आम्ही कोणीही तोंडातून एक चकार सुध्दा काढला नव्हता. मी माझं पाकीट काढून त्यातून ५०० रुपयांची एक नोट काढून त्यांच्या हातात दिली. त्यांनी परत एकदा हात वर करून आशिर्वाद दिले. मी मला देण्यात आलेले ते दोन्ही रुद्राक्ष माझ्या खिशात ठेवले आणि आकांक्षाने तिला देण्यात आलेले तिच्याजवळ ठेवले.


त्या क्षणा पासून मला एक गोष्ट खात राहिली की पहिल्या दोन प्रदक्षिणा घालताना मला त्यांनी बोलावलं असताना जायची इच्छा का नाही झाली? त्यांनी हातात काहीतरी दाखवलं तेंव्हाच का आपण गेलो? ते काहीतरी देत आहेत असा काही मोह होऊन मी त्या मोहात वाहून गेलो का? पण ते काय देत होते ते सुद्धा माहित नव्हतं तरी आपल्याला का बरं झाला असा मोह?


नंतर आम्ही तिथून अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला स्वामींचे दर्शन आटोपून आणि मुंबईला काही काळ घालवून आठवड्यानंतर घरी आलो. तेंव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या कडचे रुद्राक्ष मी हरवले आहेत. माझ्याकडून सहसा अशा गोष्टी कधी हरवत नाहीत पण तरी यावेळी मी ते रुद्राक्ष हरवले होते. कुठे ? आणि कसे? याचं उत्तर मलाही माहित नाही. मला ही गोष्ट आता अजूनच खटकायला लागली होती. मी शुध्द मनाने त्या सन्यासी पुरुषाकडे गेलो नाही. मी एकतर पहिलेच जायला हवं होतं किंवा जर मला शंका होती तर जायलाच नको होतं. पण का कोण जाणे कोणत्या मोहपाशाने मी ओढला जाऊन तिथे गेलो आणि त्या मोहाच्या बदल्यात मिळालेले रुद्राक्ष मी गमावले होते. मी त्यांना पैसे दिले ते रुद्राक्षाबद्दल नाही दिले पण ते जे काही झालं ते काही क्षणांत झालं.


पंचमुखी रुद्राक्ष

पाचमुखी रुद्राक्ष ही सर्व रुद्राक्षांमध्ये सर्वात सामान्य आणि सर्वात लोकप्रिय आहे. त्या तुलनेत, रुद्राक्ष वृक्ष सर्वात जास्त संख्येने पंचमुखी रुद्राक्ष तयार करतो. पाचमुखी रुद्राक्ष हा पाच घटक आणि पाच इंद्रियांशी संबंधित आहे. पाच इंद्रियांवर त्याचा जबरदस्त सकारात्मक प्रभाव पडतो. दीर्घ मुदतीसाठी पाच मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मनाची शांती व स्थिरता मिळते. हे कान, नाक किंवा घश्या संबंधित कोणत्याही समस्यांना बरे करण्यास मदत करते. पाच मुखी रुद्राक्ष रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. जर एखादा पाखी मुखी रुद्राक्ष काही विशिष्ट विधी आणि विशिष्ट मंत्रांनी उत्साही असेल आणि विशिष्ट भागात ‘वास्तु’ मध्ये ठेवला असेल तर तो त्या विशिष्ट ‘वास्तु’ मध्ये उपस्थित कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम / स्पंदने / शक्ती नष्ट करण्यास मदत करतो. सर्वसाधारणपणे असे आढळून आले आहे की वाहन, वास्तूमध्ये किंवा गळ्यास घातलेल्या पाच मुखी रुद्राक्ष ठेवल्यास कोणत्याही नकारात्मक स्पंदनाचा नाश होण्यास मदत होते आणि रुद्राक्ष सकारात्मक शक्तींचा संरक्षणात्मक कवच देते.


काही दिवसांपूर्वी आकांक्षाने तिच्याकडचे पंचमुखी रुद्राक्ष स्वच्छ करून घरातील देव्हाऱ्यात शिवलिंगासमोर ठेवले. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी कोरोनामुळे बंद असलेले तिचे वैद्यकीय केंद्र तिने परत एकदा सुरू केले. तिथे सुद्धा स्वामी समर्थांची मूर्ती आणि देव्हारा स्थापन करण्याची तिने आधीच सोय करून ठेवली होती आणि अचानक एक दिवस तिला स्वामींचा संदेश मिळाला की त्या दोन रुद्राक्षांपैकी एक रुद्राक्ष तिच्या वैद्यकीय केंद्रात ठेवावा. या वेळी मला परत एकदा जाणीव झाली की घडलेला प्रसंग हा योगायोग नव्हता. ते रुद्राक्ष काही कारणास्तव मिळणं अपेक्षित होतं. पण माझ्या नशिबात नव्हतं. कदाचित ते फक्त आकांक्षाला मिळणे अपेक्षित होते. किंवा माझ्यासाठी तो कर्माचा सिद्धांत होता की मोहाला बळी पडून कोणतीही गोष्ट करू नकोस.


भगवद्गीता वाचताना काम, क्रोध, लोभ आणि मोक्ष ही चार पुरुषार्थाची लक्षणे असल्याचं श्रीकृष्ण सांगतात आणि या चार लक्षणांवर प्रभुत्त्व न मिळवल्यास होणाऱ्या अध्यात्मिक हानिकडे ते विशेष लक्ष देण्यास सांगतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू असे म्हणतात. खरं सांगायचं तर हे सोडून बाकी कोणीही आपले शत्रू नसतात.

या गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला काही कळण्याच्या आत प्रकाशाहून वेगवान अस आपलं मन कामाने उत्तेजीत होत किंवा क्रोधाने संतप्त होतं तर कधी लोभापायी मोहात पडत, स्तुतीने मन हुरळून जाऊन अहंकार निर्माण करतं, दुसऱ्याच्या प्रगतीकडे (भौतिक असो अथवा अध्यात्मिक) बघून मत्सर निर्माण करतं आणि मोक्ष रहातो मैल दूर अंतरावर.


या सगळ्यात एक गोष्ट लक्षात आली. दिल्ली अभी दूर हैं! षड्रिपूंवर विजय मिळवून जितेंद्रिंय होण्याचा अखंड प्रयत्न चालूच आहे!



297 views0 comments

Comments


bottom of page