top of page
Writer's pictureNayanesh Gupte

मधुराष्टकम् - एक अनुभव

॥ श्री ॥


भगवदगीता वाचन आणि मधुराष्टकम् यांचा संगम मी ज्या क्षणाला अनुभवला तेंव्हा हा लेख लिहायला घेतला. अर्धवट लिहून झाला पण मनासारखा नव्हता झाला, त्याला साद घातली, "कृष्णा ! मधुराष्टकम् अनुभवायचंय !" त्याने "तथास्तू" म्हंटलं असावं. कारण माझा या अनुभवाला शब्दात उतरवण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी या मनाच्या चक्षूंनी जे अनुभवलंय त्याला कशाचीही उपमा देणं अशक्य आहे. मी धन्य झालो कृष्णा आज मी धन्य झालो!


या मधुराष्टकम् पर्यन्तच्या प्रवासाची थोडीशी प्रस्तावना.


भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता नक्की कोणासाठी सांगितली ?

हा प्रश्न मी आधी पण माझ्या या लेखात मी याबद्दल थोडक्यात लिहिलं होतं. अर्जुन हा सगळ्याच दृष्टीने निमित्तमात्र योद्धा होता. कारण त्या योगेश्वर श्रीकृष्णाला ज्यांच्यात संपुर्ण ब्रम्हांड निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे, जे प्रत्येकाच्या हृदयात निवास करतात त्यांना त्यांच्या अचाट योगसिध्दीच्या बळावर अर्जुनाला फक्त दृष्टिक्षेपाने हे ज्ञान प्रदान करणं सहज शक्य होतं. मग अस असताना ज्यांनी रणछोड नाव धारण केले आहे अशा श्रीकृष्णांना भर रणांगणात अर्जुनाला भगवद्गीता सांगण्याची आवश्यकता ती काय ?


गुरू शिष्यांच्या परंपरेचं महत्त्व प्रस्थापित करणं आणि त्यातून ती शिकवण पुढे आपल्यापर्यंत पोहचवण हे त्यातलं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट होत. "आपल्यासाठी??!!" हे वाचून जर तुम्ही चपापला असला तरी मी खात्रीपूर्वक सांगतो की- "हो ! भगवद्गीता श्रीकृष्णांनी आपल्यासाठी सांगितली". कारण भगवद्गीता सुरु होते तेंव्हा पहिल्या अध्यायातच श्रीकृष्ण सांगतात की भगवद्गीता सर्वप्रथम विवस्वान सूर्याला सांगण्यात आली होती पण काळाच्या ओघात ती गुरु कडून शिष्याकडे संक्रमित करण्याची परंपरा लोप पावली म्हणून ती लोप पावलेली परंपरा "धर्मसंस्थानार्थाय सम्भवामि युगे युगे!" म्हणून पुन्हा एकदा या युगात सर्वांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने ते अर्जुनाला सांगतात. आता एवढं सांगूनही अर्जुन हा निमित्तमात्र होता हे पचवणं थोडं जड जात असलं तरी त्याची थोडी करणीमीमांसा या लेखात केली आहे.


थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की अध्यात्मिक प्रवासात साधना करणं, ध्यान लावणं, मानस पूजा करणं आणि नामस्मरण करणं हे सगळं आलंच. अध्यात्माच कुतूहुल असलेल्या नवसाधकला जेंव्हा साधनेला बसायची वेळ येते तेंव्हा असंख्य विचार मनात धावत असतात आणि बुद्धीला पटत असो वा नसो मन लगाम सुटलेल्या घोड्या सारखे उधळत त्या विचारांच्या मागे धावत असते. जेंव्हा बुद्धी ताळ्यावर येते तेंव्हा लक्षात येत "अरेरे! आपण त्या परेमश्वराचं चिंतन करायचं सोडून बाकी नको त्या गोष्टींमागे भरकटलो होतो". परत एकदा मन एकाग्र करण्याचा प्रयत्न सुरु होतो. मन परत भरकटत. कधी कधी साधक कंटाळून साधना करणं सोडून देतो. म्हणून या भरकटलेल्या नवसाधकाच्या वतीने अर्जुन म्हणतो -


➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

अर्जुन उवाच

योऽयं योगस्त्वया प्रोक्त: साम्येन मधुसूदन ।

एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥३३॥


चञ्चलं हि मन: कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् ।

तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥३४॥


भाषांतर :

हे मधुसूदन तुम्ही सांगितलेली योगपद्धती मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे

हे कृष्ण! मन हे चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते.

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶


वास्तविक पाहता अर्जुन हा कोणी सामान्य पुरुष नव्हता. पण तरीही श्रीकृष्णांचा सखा, नातलग आणि शिष्यत्व पत्करलेल्या अर्जुनाने ही व्यथा मांडावी तर आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसांची दशा किती निराळी असावी ? तरी शांतपणे अर्जुनाच्या कोणत्याही प्रश्नाला सामान्य किंवा बाळबोध प्रश्न न म्हणता श्रीकृष्ण त्याच्या प्रत्येक शंकेचे निरसन करतात.


मन हे प्रकाशाहून वेगवान आहे. ते क्षणाचाही विलंब न करता कुठून कुठे पोहचेल सांगता येत नाही. वैयक्तीक स्तरावर विचार केला की या मनाला लगाम कसा घालायचा प्रश्न नेहमीच पडतो. प्रश्नात थोडं खोलवर शिरल की लक्षात येत की कुठेतरी मनाने इतर गोष्टींना जास्त प्राधान्य दिल आहे त्यामुळे त्या गोष्टींचं प्रलोभन किंवा चिंता मनाला त्याच्या मागे घेऊन जाते.


मग पुन्हा एकदा मी अर्जुनाकडे पाहतो. द्रौपदीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडलेला आणि तिला स्वयंवरात जिंकू पाहणारा अर्जुन श्रीकृष्णाला शरण जातो. कर्णासारखे इतर धनुर्धारी अर्जुनास प्रतिस्पर्धी असतात. जेंव्हा त्याला खाली पाण्यात पाहून वर फिरणाऱ्या मास्याच्या डोळ्याचा अचूक वेध घ्यायचा असतो तेंव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतात. त्यावर अधीर झालेला अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की "हे सगळं मलाच करायचं आहे तर हे वासुदेवा आपण काय करणार ?" त्यावर श्रीकृष्ण त्याला स्मितहास्य करून म्हणतात "हे अर्जुना ! जेंव्हा ज्या अस्थिर पाण्यात पाहून तुला त्या फिरणाऱ्या मास्याच्या डोळ्याचा वेध घ्यायचा आहे त्या पाण्यास स्थिर ठेवण्याचं काम मी करणार."

महाभारताच्या प्रसंगी कौरवांची अफाट सेना, त्यांचे नातलग, मित्र परिवार, गुरुवर्य सगळेच त्याच्या विरोधात असतात. जेंव्हा श्रीकृष्ण मी किंवा माझी सेना असा प्रस्ताव समोर ठेवतात तेंव्हा श्रीकृष्णांची सेना निवडता, श्रीकृष्ण शस्त्र उचलणार नाही माहित असूनही अर्जुन फक्त श्रीकृष्णाला निवडतो !

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶


अर्जुनाचं उदाहरण द्यायचा मुद्दा असा की त्याने सर्व काही चिंता श्रीकृष्णांवर सोपवून दिल्या. त्याने पहिलं प्राधान्य श्रीकृष्णांना दिल, श्रीकृष्णांना निवडलं, कारण श्रीकृष्ण म्हणतात -


➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥२२॥


भाषांतर :

परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो.

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶


स्वामी समर्थांनी समाधिस्त होण्याआधी सांगितलेला हाच तो श्लोक !


असं असताना आपण कसलाही मोह, चिंता का करावी ? त्याहून गंमत म्हणजे जिच्या सौंदर्याची त्रिभुवनात चर्चा आहे आहे अशी लक्ष्मी देवी सुद्धा ज्या मदन मोहनाचं मुखावलोकन करण्यास कायम उत्सुक असते अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या मनमोहक रूपाचं ध्यान का करू नये ? त्यावरून अलीकडे त्या सुमधुर कृष्णाचं मधुराष्टक मनाला मोहात पाडून गेलं. डोळ्यासमोर उभा राहतो तो "कृष्ण" हा भागवत पुराणाचा ग्रंथ. त्यांच्या पाळण्यात असल्यापासून सुरु झालेल्या लीलांपासून त्यांचा युगंधर श्रीकृष्ण प्रवास सगळाच अद्भुत आणि मधुर प्रवास. यातील प्रत्येक शब्द आणि अक्षर श्रीकृष्णांच्या सुंदर रूप आणि लीलांच प्रतिबिंब आहे.


➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶


अधरं मधुरं वदनं मधुरं

नयनं मधुरं हसितं मधुरम् ।

हृदयं मधुरं गमनं मधुरं

मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ १ ॥


तुमचे ओठ मधुर आहेत,

तुमचं मुख मधुर आहे,

तुमचे डोळे मधुर आहेत,

तुमचं हास्य मधुर आहे ,

तुमचं हृदय मधुर आहे,

तुमची चालण्याची ढब मधुर आहे,

हे माधुर्य रसाच्या अधिपती श्रीकृष्णा

तुम्ही पूर्णतः मधुर आहात ॥ १ ॥


वचनं मधुरं चरितं मधुरं

वसनं मधुरं वलितं मधुरम् ।

चलितं मधुरं भ्रमितं मधुरं

मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ २ ॥


तुमचं बोलणं मधुर आहे,

तुमचं चरित्र मधुर आहे,

तुमची वस्त्र मधुर आहेत,

तुमचं ऐटीत उभं राहणं मधुर आहे,

तुमचं चालणं मधुर आहे,

तुमचं फिरणं मधुर आहे,

हे माधुर्य रसाच्या अधिपती श्रीकृष्णा

तुम्ही पूर्णतः मधुर आहात ॥ २ ॥


वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः

पाणिर्मधुरः पादौ मधुरौ ।

नृत्यं मधुरं सख्यं मधुरं

मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ३ ॥


तुमची बासरी मधुर आहे,

तुम्ही माळलेली फुले मधुर आहेत,

तुमचे हात मधुर आहेत,

तुमचे चरण मधुर आहेत,

तुमचे नृत्य मधुर आहे,

तुमची मित्रता मधुर आहे,

हे माधुर्य रसाच्या अधिपती श्रीकृष्णा

तुम्ही पूर्णतः मधुर आहात ॥ ३ ॥


गीतं मधुरं पीतं मधुरं

भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् ।

रूपं मधुरं तिलकं मधुरं

मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ४ ॥


तुमचे गीत मधुर आहेत,

तुमचं पिणं मधुर आहे,

तुमचं खाण मधुर आहे,

तुमचं निद्रा घेणं मधुर आहे,

तुमचं रूप मधुर आहे,

तुमचा टिळा मधुर आहे,

हे माधुर्य रसाच्या अधिपती श्रीकृष्णा तुम्ही पूर्णतः मधुर आहात ॥ ४ ॥


करणं मधुरं तरणं मधुरं

हरणं मधुरं रमणं मधुरम् ।

वमितं मधुरं शमितं मधुरं

मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ५ ॥


तुमचे कार्य मधुर आहे,

तुमचं पोहणं मधुर आहे,

तुमचं चोरी करणं मधुर आहे,

तुमचं प्रेम मधुर आहे,

तुमचे शब्द मधुर आहेत,

तुमचं शांत राहणं मधुर आहे,

हे माधुर्य रसाच्या अधिपती श्रीकृष्णा

तुम्ही पूर्णतः मधुर आहात ॥ ५ ॥


गुञ्जा मधुरा माला मधुरा

यमुना मधुरा वीची मधुरा ।

सलिलं मधुरं कमलं मधुरं

मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ६ ॥


तुमचं गुणगुणणे मधुर आहे,

तुमच्या माळा मधुर आहेत,

तुमची यमुना मधुर आहे,

तिच्या लाटा मधुर आहेत,

तिचं पाणी मधुर आहे,

त्यातील कमळ मधुर आहेत,

हे माधुर्य रसाच्या अधिपती श्रीकृष्णा

तुम्ही पूर्णतः मधुर आहात ॥ ६ ॥


गोपी मधुरा लीला मधुरा

युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।

दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं

मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ७ ॥


तुमच्या गोपी मधुर आहेत,

तुमच्या लीला मधुर आहेत,

तुम्ही त्यांच्या सोबत मधुर आहात,

तुम्ही मुक्त पण मधुर आहेत,

तुमचं बघणं किती मधुर आहे,

तुमचा शिष्टाचार मधुर आहे,

हे माधुर्य रसाच्या अधिपती श्रीकृष्णा

तुम्ही पूर्णतः मधुर आहात ॥ ७ ॥


गोपा मधुरा गावो मधुरा

यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।

दलितं मधुरं फलितं मधुरं

मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ८ ॥


तुमचे गोप मधुर आहेत,

तुमच्या गायी मधुर आहेत,

तुमची छडी मधुर आहे,

तुमची सृष्टी मधुर आहे,

तुमचं विनाश करणं मधुर आहे,

तुमचं वर देणं मधुर आहे,

हे माधुर्य रसाच्या अधिपती श्रीकृष्णा

तुम्ही पूर्णतः मधुर आहात ॥ ८ ॥

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶


अष्टक म्हणजे तसं तर आठच श्लोक पण त्या आठ श्लोकांत त्यांच माधुर्य वेड लावते. कसं वेड लावते ? ते मांडण्याचा केलेला छोटासा प्रयत्न.


नंद महाराज यशोदा मातेच्या गोकुळातील घरात बसलेला छोटासा गोंडस गुटगुटीत बाळकृष्ण, रत्न मोत्यांनी जडवलेली आभूषणे परिधान केलेला , डोक्यावर छोटस मोरपीस धारण केलेला छोट्याश्या मडक्यात हात घालून दही काढून खातानाचा नटखट गोंडस कान्हा, ज्याचं तोंड त्या दह्याने माखलं आहे, तोंडातले इवलेसे थोडेसे दात दिसत आहेत, दही खाता खाता कधी त्याच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांड आणि विश्वरूपाचं दर्शन देईल सांगता येत नाही. पण नको तो स्वतःभोवती तेजोवलय निर्माण करून बसलेला गोंडस कान्हाचं बरा. नको ते विश्वरूप दर्शन, नको ते ब्रह्मांड दर्शन त्यापेक्षा त्याचे ते टपोरे पाणीदार काजळ भरलेले डोळे आपण डोलूंत अंजन घालून पाहत राहावे, त्याच्या कुरळ्या केसांत रोवलेली त्याच्या मोरपिसाचा मायेत बुद्दीन जावं, त्याच्या लाल चुटुक ओठातून कधी काही मधुर बोबडे बोल बाहेर पडतील का या प्रतीक्षेत एकटक बघत राहावं पण तो लबाड मनकवडा आपले भाव जाणून खट्याळ हसतो आणि त्याच्या दोन्ही पायांच्या मध्ये ते मडकं घेऊन त्या लोण्यावर ताव मारत राहतो.

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

लोक सुखाची तुलना नेहमी स्वर्ग सुखाशी करतात. मला हसू येत. अरे वेड्यांनो माझ्या कृष्णाचं वृंदावन पाहिलं आहे तुम्ही? त्या वृन्दावनातल्या गर्द झाडीत, यमुनेच्या शांत प्रवाहाच्या सोबतीत, पक्षांच्या मंदावणाऱ्या मधुर किलबिलाटात, रात्रीच्या चंद्र प्रकाशात तो त्याच्या बासरीच्या सप्त सुरांनी साद घालतो, शरीरातील सातही चक्रे त्या बासरीच्या स्वरांवर एकवटतात, दूर घराघरात कृष्णच्या विचारात मग्न झालेल्या गोपी त्या सुरांनी अजूनच वेड्या होतात, देह भान हरपून त्या बासरीच्या सुरांवर अलगद उडून यावं तशा सर्वांना आकर्षित करणाऱ्या त्या मदन मोहनाकडे धावत सुटतात. सामान्य लोकांसाठी ती रासलीला असते पण आनंदचिन्मय रसाच्या माधुर्यात बुडून जाण काय हे फक्त फक्त त्या गोपींनाच कळत असतं, किंबहुना आपल्याला नक्की काय होतंय हे त्यांनाही कळलेल नसतं. त्यांना दिसत असतो तो फक्त डोळे बंद करून आपली दाही बोट वेणुनादात गुतंलेला किशोरवयीन श्रीकृष्ण. अहाहा ! किती ते मनमोहक दृश्य. आता त्याची रासलीला सुरु होणार. संपूर्ण अरण्य भान हरपून त्या एका पायावर उभ्या असलेल्या, डोळे बंद करून संपूर्ण ब्रह्मांडाला साद घालणाऱ्या कृष्णाकडे डोळे लावून बसलं आहे. त्याला एका पायावर उभं राहायला कष्ट होऊ नये म्हणून त्याची प्रिय सुरभी गाय त्याला आधार मिळावा अशी त्याला टेकून उभी आहे. आईच ती पण! आपल्या बाळाला एका पायाला त्रास होईल म्हणून जिभेने त्याचे चरण चाटते आहे. पक्षी आता घरटयातून डोकी बाहेर काढून आपल्याहून किलबिलाटाहून मधुर बासरी वाजवणाऱ्या त्या बासरीच्या स्वरात आपल्याला एखादा तरी सूर गवसतो का म्हणून तल्लीन होऊन शांत झाले आहेत, शांत वाहणारी यमुना पण त्या कृष्णाचा पदस्पर्श कधी होईल या विचारात वाऱ्यासोबत खळखळत त्याला साद घालते, "ये रे कृष्णा! मला पण तुझ्या पावन स्पर्शाने शांत कर." आज यमुनेवर सहस्त्र कमळ फुलले आहेत. आपल्या अवताराचा विचार न करता देह भान हरपून धावत जाणाऱ्या राधिकाची वेणी विखुरलेली आहे, तिच्यात माळलेली वृंदावनातील सुंदर फुले वाटेत तिच्याच पावलांवर विखुरली आहेत. दोन्ही हातांची तिचा परकर हातात धरून, त्या पैंजणाच्या मधुर आवाजांनी ती वृंदावनाला जाग राहण्याची सूचनाच देते. धावून तिचा श्वासोच्छवास जोरात होतो आहे, पण त्या श्वासात पण कृष्ण आहे, तिच्या केसातून गालावर ओघळणाऱ्या त्या स्वेदबिंदूत कृष्ण आहे, तिच्या धडधडणाऱ्या छातीत कृष्ण आहे, आज त्यांच्या मिलनाची मधुरता बघायला जो तो आसुसलेला आहे. प्रेमाचं दुसरं नाव राधा कृष्ण बाकी सब झूट है ! तिच्या नजरेस तो बासरी वाजवणारा कृष्ण दिसतो. डोळे बंद करूनच बासरी वाजवता वाजवता तो मंद हास्य करतो. शक्ती शिवापर्यंत पोहचणं आणि कुंडलिनी जागृत होणं आणि राधा कृष्णाचं मिलन होणं या दोन्ही क्षणांत भरलेला परमोच्च आनंदाचा हा क्षण रंगात रंगुनी तुझ्या अवघी रंगला श्रीरंग या अनुभूतीच्या पलीकडे आहे. त्याला बघून ती शांत होते, डोळ्यातील आसव तिच्या छातीवर ओघळून एक वेगळा कुंकुमार्चन सोहळा रंगतो. ती तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवून त्यावर आपलं डोकं ठेऊन त्या बासरीत गढून जाते. खरं तर राधा पोहचली म्हंटल्यावर जे सूर शांत व्हायला पाहिजेत ते आता अजूनच उंच उंच भरारी घेत आहेत कारण ते सुद्धा राधा कृष्ण मिलनाचा सर्वोच्च आनंद लुटत आहेत. त्यांना पण काहीतरी सांगायचं आहे. "अरे काम भावनेच्या आहारी जाणाऱ्या वेड्यांनो तुम्हाला वाटत काम भावनेत मिळणारा आनंद हा सर्वोच्च आहे? जरा ऐका आम्हाला!" त्या कृष्णाच्या बासरीतून निघणारे राधा कृष्णाच्या मिलनातले स्वर हेच ते खरे आनंदचिन्मयरस देणारे आणि सर्व सुखांना मागे टाकणारे स्वर आहेत. ते ऐकून सर्व वासना शांत होतात. तंद्री लागते ती फक्त त्या अर्धोन्मीलित नेत्रांनी बासरी वाजवणाऱ्या राधा कृष्णाच्या रुपाकडे. आज चंद्र पण सरकण्याचं नाव घेत नाही. त्याच शितल चांदणं आज यमुनेच्या प्रतिबिंबातून द्विगुणित होऊन त्यातील जलचांरांना पण त्या लीलेचा आस्वाद घेण्यास आवाहन करत आहे. मंद वाऱ्याची झुळूक पण त्या स्वरांना आपल्यावर वाहून न्यायचा प्रयन्त करते आहे. आज खरा उत्सव आहे. मग ते वृंदावनातील मोर कसे मागे राहतील ? हा सर्व देखावा सुशोभित करण्यासाठी त्यांनी पिसारा फुलवून अवतीभोवती गर्दी गेली आहे. त्यांचा पण त्या बासरीच्या तालावर नाचण्याचा प्रयत्न चालू आहे. आज तो पिसारा फुलवून त्यांना कोण्या मादीला आकर्षित नाही करायचं तर एवढा सुंदर पिसारा ज्या कृष्णाने दिला, ज्यातलं एक पीस तो त्याच्या मुकुटात बसवतो तो पिसारा आवाज नजराणा म्हणून त्या कृष्णाला मोहात पाडेल का ? असा विचार करून त्यालाच अर्पण करत आहेत. पण तो मोहन कसा कोणाच्या मोहात पडेल. तो बासरी वाजवतच राहतो आणि संपूर्ण निसर्ग त्यात गुंग होऊन जातो.

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶


यातला प्रत्येक क्षण मी मनाच्या चक्षूंनी आणि उघड्या डोळ्यांनी अनुभवला आहे. ध्यान लावायला डोळे बंद करावेच लागतात असं नाही आणि ध्यान लावायला वेळ काढायला लागतो असही नाही, कायम त्याच्या नामात रहावं, कायम त्याच्या ध्यानात रहावं. त्याने काही माग म्हंटलं तरी त्याच्याकडे मागू नये, त्याला त्या प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवावं, त्याला मागितलेली गोष्ट त्याने दिली आणि “तथास्तू” म्हणून तो निघून गेला तर ? नको ! काही माग असा तुझा पण हट्ट असेल तर मला तूच हवा आहेस. बोल कबूल आहे ?


वेड लावतोस रे तू कृष्णा ! वेड लावतोस ! हे वेड असच राहू दे! मी एवढंच म्हणतो की जेंव्हा जेंव्हा डोळे बंद करून किंवा उघड्या डोळ्यांनी ध्यान लावण्याचा प्रयत्न करीन तेंव्हा तेंव्हा या मनाला लगाम घालून सगळ्या विचारांच्या पलीकडे जाऊन फक्त हे मन फक्त आणि फक्त तुझ्यावरच आसक्त होऊ दे!


गंमत म्हणजे उर्वरित अर्धा लेख लिहिताना त्यांनी वेगळ्याच मधुर स्वरांनी साद घातली ते असे -

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶


॥ हरे कृष्ण ॥




Recent Posts

See All

2 Comments


Sandali Cg
Jul 23, 2021

Extremely extremely beautiful . I have no words to say how much I felt better solace ..i meditate. I am learning to live spiritual life ..

Sonali gupte

Like
Nayanesh Gupte
Nayanesh Gupte
Jul 24, 2021
Replying to

हरे कृष्ण 🙏

Like
bottom of page