आतापर्यंत मी लिहिलेले लेख ज्या क्षणी विचार गर्दी करू लागतात त्याच क्षणी किंवा त्याच दिवशी मी शक्यतो लेख लिहून काढतो. हा लेख लिहिण्यापूर्वी स्वामींनी चिंतन, मनन करून घेतलं आणि मानसपूजेची सवय लावली.
᪥ ईश्वरः परमः कृष्णः
बुद्धपौर्णिमेचा दिवस. आकांक्षाला तिच्या प्राणिक हिलिंगच्या ग्रुप कडून ग्रुप मेडिटेशनची लिंक देण्यात आली होती. आज त्यांच्यासोबत आपण पण मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करावा म्हणून मी पण बसलो. ते 'गाईडेड मेडिटेशन' असल्यामुळे ते सांगत होते त्याप्रमाणे सूचना पालन करण्याचा प्रयत्न करत होतो थोडा वेळ जमलं पण नंतर मन भरकटायला सुरुवात झाली. पण निराश होऊन सोडून द्यायचं नव्हतं. पण तरीही त्यांची मेडिटेशनची ऑनलाईन मीटिंग बंद केली. डोळे मिटले. पुन्हा एकदा तंद्री लावण्याचा प्रयत्न केला. आता तंद्रीतपण मी आमच्या घरातच होतो. आमच्या दिवाणखान्यात आलो. समोर श्रीकृष्ण अर्जुनाच्या चित्राखाली सोफ्यावर गोकुळातले ८ वर्षाचे श्रीकृष्ण बसले होते. निळी लखलखणारी कांती. पितांबर नेसलेले, गळयात हातात सुंदर गुलाबी फुलांच्या माळा, हातात सुशोभित केलेली रत्नजडित बासरी, कुरळे केस आणि त्या केसांच्या मागून डोकावणार मोरपीस, पाणीदार टपोरे डोळे, लाल चुटुक स्मित हास्य करणारे ओठ.
त्या मोहनाचं मनमोहक कृष्णरुप पाहून डोळे दिपून गेले. "कर्षति आकर्षति इति कृष्णः" म्हणजे खेचून घेतो, आकर्षित करतो तो कृष्ण. म्हणून इंग्रजी मध्ये आपण ज्याला "Black Hole" म्हणतो त्याला आपण मराठीत "कृष्णविवर" म्हणतो. अगदी प्रकाश सुद्धा त्यात गेला कि त्याचा होऊन जातो. बाहेर येत नाही. त्या कृष्णाच्या मनमोहक रूपाने वेड लावणं हि सुद्धा त्या योगीराज मायापतीची एक मायाच आहे पण या मायेला बळी पडणं हे इतर कोणत्याही मायेला बळी पडण्यापेक्षा कधीही उत्तम !
असा तो मदनमोहन समोर बसलेला. त्याचे पादप्रक्षालन करण्यासाठी मी सोन्याची सुंदर परात घेऊन आलो. त्याचे सुंदर कोमल पाय त्या परातीत होते. त्यावर हळू हळू पाणी ओतून त्यांना हाताने धुवून घेतले त्या निळसर पावलांना बाजूने गुलाबी छटा होती. त्यांची नखे मुळातच तांबड्या रंगाची होती. ते मऊ मऊ पाय मी टर्किशच्या टॉवेल ने छान पुसून घेतले. नंतर त्या पावलांना चंदन अत्तर लावले. मुळातच ज्यांच्या दिव्यांगाला भुंग्यालाही भुरळ पाडेल असा सुमधुर सुवास होता अशा त्या मधुर कृष्णाला सुवासिक अत्तर लावण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न म्हणजे मी माझीच हौस बळेच पूर्ण करत होतो.
त्यानंतर एका मातीच्या भांड्यात दुधपोहे घेऊन उभा राहून मी माझ्या हाताने कृष्णाला भरवू लागलो. प्रत्येक घास भरवताना माझी पाचही बोटे त्यांच्या मुखात जात होती. उभे राहून भरवणे मला थोडे कठीण जात होते. त्या मनकवड्या कृष्णाने मला हात धरून बाजूला बसवले आणि माझ्या हातून दूध पोह्याचा नैवैद्य तो ग्रहण करत राहिला. झाल्यावर मी ओल्या टॉवेलने त्याचे तोंड टिपून घेतले. भरवताना दुध मुखाच्या आजूबाजूला लागले होते ते नीट टिपून घेतले. पुन्हा त्याच्या समोर बसलो. तो स्मित हास्य करतच होता. त्याच्या डोक्याच्या मागून आता सुवर्णाचे तेज असलेला अनंत शेष दिसत होता तेच सुवर्ण तेज त्याच्या सर्वांगाच्या बाजूने तळपत होतं. एकदा चतुर्भुज रूपात दर्शन देऊन तो अंतर्धान पावला.
ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्द विग्रहः।
अनादिरादि गोविन्दः सर्वकारण कारणम्॥
(ब्रह्मसंहिता ५.१)
कायम आनंद देणारे श्रीकृष्ण परेमश्वर आहेत,
ज्यांना आदि नाही आणि अंत नाही असे सर्व कारणांचे कारण गोविंद आहेत.
या दरम्यान माझ्या डोळ्यातून कधी घळाघळा अश्रू वाहू लागले होते याची मला काहीच कल्पना नव्हती. डोळे उघडले. माझं मेडिटेशन मानस पूजेच्या रूपात खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं.
᪥ मन उधाण वाऱ्याचे
अध्यात्माच्या प्रवासात बरेच सोबती भेटत आहेत आणि नवनवीन चर्चेतून नवनवीन गोष्टी समोर येत राहतात. बऱ्याचदा या गोष्टी गोंधळून टाकणाऱ्या असतात. जसे कि मी कोणते स्तोत्र पठण करू, मी ओंकार बरोबर म्हणतो आहे की नाही, मेडिटेशन ला बसलो की मन जास्त वेळ मन एकाग्र होतं नाही भरकटत रहात त्यासाठी काय करावं असे प्रश्न भेडसावत राहतात. ज्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे त्यातील प्रत्येक जण वेगळी दिशा दाखवत राहतो आणि मन कायम संभ्रमित अवस्थेत राहत. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून काही जण "गुरु" करा म्हणून सुचवतात किंवा आमच्या गुरूंच्या सत्संगाला या म्हणून मागे पण लागतात. मग एक नवीन प्रश्न निर्माण होतो की हे आजकालचे गुरु म्हणजे बुवाबाजी करणारे गुरु असतात. आपण नक्की कोणत्या गुरूच्या नादी लागायचं ?
दासबोध मध्ये गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा या विषयी समर्थ रामदास खूप सुंदर विवेचन मांडले आहे पण परत एकदा स्थलकाळदेशपरत्वे बघता कलियुगात असे गुरु आणि असे शिष्य दोन्ही सापडणे फार कठीण. म्हणून अलीकडच्या काळात लिहिल्या गेलेल्या शंकर महाराजांच्या शंकर गीतेमध्ये ते म्हणतात सद्गुरुंना शरण जाऊन आपणच आपले गुरु व्हावं. याच कारण खूप सोप्प आहे. शाळेच्या एका वर्गात ५० विध्यार्थी असले तरी सगळ्यांची, गुणवत्ता, आकलनशक्ती सारखीच नसते. कोणाला ऐकून गोष्टी चांगल्या समजतात आणि लक्षात राहतात, कोणाला लिहून तर कोणाला वाचून. कोणत्याही पद्धतीचा अवलंब केला तरी शेवटी सगळ्यातून एकच गोष्ट साध्य करणे अपेक्षित असते ते म्हणजे ज्ञान संपादन करणे.
तर सांगायचा मुद्दा असा की मध्यंतरी एक प्रश्न विचारण्यात आला की "ओंकार म्हणण्याची योग्य पद्धत कोणती?". "स्त्रियांनी ओंकार म्हणू नये, असे काही आहे का ?" खरतर या प्रश्नाचं खरं अचूक उत्तर देण्या इतका योगी आणि विद्वान मी नक्कीच नाही. पण श्रीकृष्णाच्या कृपेने मी स्वतः जे ज्ञान आत्मसात केलं आणि अनुभवलं ते असं आहे.
मुळात या सगळ्यात एक गंमत आहे. साधना करणं म्हणजे एकप्रकारे ध्यानयोग. पण नामस्मरण म्हणजे ध्यानयोग होतोच अस नाही. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर विश्वामित्र हे ध्यान योगाच्या जोरावर क्षत्रिय असूनही ब्राम्हण ऋषी झाले. तर कलियुगातील संत तुकाराम, जनाबाई, गोरा कुंभार, नामदेव, कान्होपात्रा हे ध्यान न लावताहि फक्त नामस्मरण करून ध्यानात मग्न झाले आणि भगवंतात विलीन झाले. सांगण्याचा मुद्दा असा की मी ध्यान मार्गात तसा कमीच रुळतो जेवढा नामस्मरणात रुळतो. शून्यात तंद्री लावण्याचं तत्त्वज्ञान पटत नाही आणि जमतही नाही. एखाद्या प्रसंगी फक्त त्याचच नाव मुखात येणं सुरू करणं हे ध्यान लावण्यापेक्षा सोप्प आहे असं माझं मत आहे. चित्रपटांची गाणी कशी बसतात तोंडात ? तसच आहे. लहानपणी आपल्याला शुद्धलेखन म्हणून अक्षर गिरवायला लावतात जेणेकरून हाताला वळण लागेल. सुरुवातीला ती जबरजस्ती वाटते. मनाचं तसच आहे. धावत असतं ते दहा दिशांना पण त्याला नामस्मरण करायला लावायच. कारण ध्यान लावणं, योग्य पद्धतीने ओंकार उच्चार करणं जेवढं कठीण आहे त्याहून नामस्मरण सोप्प. अद्वैताचा अनुभव दोन्हीकडून येतो.
पण हा मुळात अद्वैत आणि द्वैत या दोन सिद्धांतातील फरक आहे. कारण ध्यान लावून त्यातून बाहेर येणारे आपण एवढ्या वेळ नक्की कोणत्या दिव्यानंदात होतो नक्की सांगू शकतीलच असे नाही पण नामस्मरणात तल्लीन झालेले ते भगवंतांच्या सानिध्यात होते याची साक्ष देऊ शकतात.
विश्वामित्रांचा वरचा एक मुद्दा अपूर्ण राहिला तो म्हणजे त्यांनी ध्यानमार्ग अवलंबून पण जेंव्हा मेनकेने त्यांना भुल घातली तेंव्हा ते त्यांच्या इंद्रिय इच्छा मोडीत घालू शकले नाहीत. मेनकेने जागृत केलेल्या वासनेला ते बळी पडले. कारण त्यांचं ध्यान भंग झालं. नामस्मरणात दंग होऊन गेलेल्यांच अस सहजा सहजी होत नाही. कारण सिद्धींच्या मागे न लागलेले भक्त मुळात भगवंतापासून विभक्त होतच नाहीत त्यामुळे त्यांना भुरळ घालणं एवढं सहज शक्य होतं नाही.
हे सांगण्या मागचा मुद्दा असा की अध्यात्माच्या मार्गात विषयी भावना मायेच्या प्रभावाखाली आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात फक्त ध्यान मार्गाने त्यांना नियंत्रित करणं शक्य नाही. भगवद्गीतेमध्ये म्हणून श्रीकृष्ण ध्यानयोग आधी भक्तीयोग नंतर सांगतात आणि भक्तियोगचं सर्वश्रेष्ठ असल्याच भगवंत वारंवार सांगतात. पण याचा अर्थ बाकी योग क्रियांनी भगवंताला आळवणी घालणं शक्य नाही असं नाही. भक्ती भाव मनात जबरजस्ती करून जागृत करता येत नाही. रोज ब्रह्ममुहूर्तावर पहाटे ०३:०० वाजता स्वतःहून उठा अस म्हणून आपण उठू शकू का ? घड्याळात अलार्म लावलेच लागतो. तो लावूनपण उठायला होतंच का ? नाही होतं. पण थोडा प्रयत्न केला आणि अलार्म लावून का होईना उठायची सवय केली काही काळानंतर अलार्म न लावताही आपोआप जाग यायला सुरुवात होते. इच्छाशक्ति प्रबळ असेल तर ते अजून लवकर साध्य करता येत. बाकी सर्व योगक्रिया या भक्तियोगाची डिग्री मिळवण्यासाठी क्रमाक्रमाने पोहचायच्या इयत्ता आहेत. एखादा साधक सुरुवातीपासूनच जेंव्हा भक्तिमार्गा पर्यँत पोहचलेला दिसतो तेंव्हा त्यामागे त्याची जन्मोजन्मीची साधना असते त्यामुळे आपण आपल्या साधनेची कधीही कोण्या दुसऱ्याच्या साधनेशी तुलना करू नये. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहावे.
᪥ पण तरीही... अखंड नामस्मरण कसं शक्य आहे ?
त्याची अजून एक गंमत सांगतो. भगवदगीता वाचून झाली तेंव्हा एक गोष्ट मनात ठासून भरली गेली ती म्हणजे श्रीकृष्ण हे कायम तुमच्या हृदयात स्थित असलेले परमात्मा आहेत. मग सुरु झाला तो संवाद. म्हणजे आजकाल जसे दोन घनिष्ठ मित्र किंवा सो कॉल्ड सौल मेट्स एकमेकांना आपल्या आयुष्याचे आणि निर्णयाचे वृत्तांत कायम देत असतात तसं त्या हृदयस्थ श्रीकृष्णाला साद घालणे सुरु झाले. म्हणजे काही नवीन निर्णय घायचा झाला की त्यालाच विचारायचे "सांग बाबा ! तुला काय वाटत? काय करू? हे योग्य की ते योग्य ? जास्त कोणतं योग्य ? हे घेऊ की ते घेऊ ? बघ हां ! तुला विचारून करतोय आणि तुलाच समर्पित करतोय. उद्या असं का केलंस म्हणून मला विचारायचं नाही. कर्ता करविता तूच आहेस ! बाकी पूर्वी मला जे तुझ्याविषयी अज्ञान होत आणि माझ्या ज्या चुका झाल्या त्याबद्दल मी एवढंच म्हणेन की - अन्याय माझे कोट्यानु कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!"
अशी माझी त्याच्याशी अखंड बडबड चालूच असते. तो फक्त हसतो. वेळ आली की त्याच्या सांकेतिक भाषेतून उत्तरं देतो. मी या बाबतीत तसा ढ असल्याने कधी कधी समजायला वेळ लागतो. या ढ शिष्याला क्षमा कर म्हणतो. ढ आहे म्हणून लगेच सगळं ब्रम्हज्ञान प्रदान कर म्हणून मागायचं नाही. त्याला वेळ योग्य वाटेल तेंव्हा देईल. त्याची भक्ती करत राहायची. त्यामुळे आपोआपच त्याच रूप चित्ती राहतं आणि नाव मुखी असतं. नामस्मरण म्हणजे मंत्राचा जप नव्हे!
काही अध्यात्मिक संस्थांच्या मार्गदर्शनाखाली जेंव्हा लोकं ठरवून अमुक एक वेळा नामाचा जप करायचं म्हणतात तेंव्हा मनोमन हसू येत. तो तुमच्या जपमाळेचा हिशोब कधीच ठेवत नसतो. तो मनापासून जपल्या जाणाऱ्या नामात दंग होत असतो. बऱ्याच लोकांचं त्या माळा जपण्यात अर्ध लक्ष त्या आकड्याकडे जात. वरून आज 'मी' एवढा जप केला म्हणून अहंकार निमार्ण होतो तो वेगळाच ! असो !
᪥ नवविधा भक्ती
शास्त्राप्रमाणे अशा या भक्तीचे नवविधा मार्ग आहेत. भागवत पुराण आणि दासबोध च्या माध्यमातून पुन्हा पुन्हा प्रल्हाद महाराज आणि समर्थ रामदास स्वामींनी केलेले या पुढील श्लोकाचा विवेचन सारखं समोर येत होतं. यापैकी आपल्याला कोणताही एक मार्ग जमला आणि त्यात रुळलो तरी आपण भक्तिमार्गाला लागलो समजावं.
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
✽ श्रवण भक्ती - (परीक्षित महाराज)
श्रवण ही संपर्क साधण्यासाठी मानवाची मुलभूत गरज आहे. परमात्म्याचे नाम व गुणसंकीर्तन ऐकणे हि भक्तीची सर्वात पहिली पायरी आहे. भगवंताच्या गुणांच्या श्रवणाने सत्त्व गुणांचा संचय होत जातो. मी स्वत : जे नामस्मरण , गुणसंकीर्तन करतो , ते स्वतःच ऐकणे, माझे शब्द मी स्वतः ज्या प्रमाणात ऐकतो, त्या प्रमाणात माझी भक्ती वेगाने फलदायी होते.
✽ कीर्तन भक्ती - (शुकदेव गोस्वामी)
एखाद्या विषयात जर आपल्याला विशेष प्रगती साधायची असेल तर त्यासाठी अभ्यास आवश्यक असतो , हा अभ्यास म्हणजेच ' कीर्तन '. स्वतः परमात्म्याचे गुण संकीर्तन करणे म्हणजेच 'कीर्तन भक्ती'.
✽ स्मरण भक्ती - (प्रह्लाद महाराज)
स्मरण म्हणजे आठवण. परमेश्वर आहे, सदैव आहे व अत्यंत कृपाळू आहे, ह्याचे नित्य स्मरण आवश्यक आहे.
भगवंताचे नाम म्हणजेच भगवंताचे अकारण कारुण्य. भगवंताच्या नामातच भगवंताचे सामर्थ्य आहे .म्हणूनच नामस्मरण हे सर्वात सोपे व अत्यंत सूक्ष्म साधन आहे.
✽ पादसंवाहन भक्ती - (लक्ष्मी माता)
पादसंवाहन भक्ती म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार (सत्य, प्रेम, आनंद) ,स्वतःचे इतरांशी आचरण ठेवणे.
✽ अर्चन भक्ती - (पृथुराजा)
भगवंताच्या साकार रूपाशी स्वतःचे घट्ट नाते स्थापन करण्यासाठी केलेला प्रयास, त्यासाठी केलेली प्रत्येक प्रेममय कृती म्हणजे 'अर्चन'. परापूजा, मानसपूजा, व मूर्तीपूजा हे तीनही अर्चन भक्तीचेच प्रकार आहेत.
✽ वंदन भक्ती - (अक्रूर)
वंदन म्हणजे नमस्कार. मनाचे नम: करणे , म्हणजेच चुकीच्या गोष्टींकडे झेपावणारे मन उचित गोष्टींकडे वळविणे. दिवसाच्या चोवीस तासांपैकी कमीत कमी चोवीस मिनिटे फक्त भगवंतासाठीच ठेवण्याचे बंधन म्हणजेच 'वंदन मर्यादा'.
वंदनाचाच एक अविभाज्य व सुंदर प्रदेश म्हणजे 'धूळभेट ' .परमात्म्याच्या चरणांची धूळ हीच सर्वश्रेष्ट विभूती. म्हणूनच भगवंताच्या सगुण साकार मूर्तीच्या चरणांना लावलेले गंध, परमात्म्याच्या हवनातील उदी, अथवा परमात्म्याच्या तसबिरीसमोर लावलेल्या उदबत्तीची रक्षा कपाळाला व गळ्याला लावावी.
त्यामुळे आपोआपच गळ्याच्या स्थानी असणारे विशुद्ध चक्र अशुद्धीकडून शुद्धीकडे प्रवास करण्यास तयार होऊ लागते.
✽ दास्य भक्ती - (हनुमान)
दास्य भक्ती म्हणजे ' माझा स्वामी जेवढा समर्थ तसाच मीही होणार' ह्या इच्छेने 'त्याच्या' पायाशी राहून विनम्रपणे त्याच्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेणे होय.
दास्य भक्ती म्हणजे संपूर्ण शरणागती. परमात्म्याचे दास्यत्व म्हणजे परमेश्वराचे प्रेम, निर्भयता व पावित्र्य, ह्या त्रिवेणी संगमाचे दास्यत्व स्वीकारणे.
✽ सख्य भक्ती - (अर्जुन)
मानवाच्या जीवनात नित्य सोबत असणारा एकमेव परिपूर्ण मित्र म्हणजे भगवंत. प्रत्येक गोष्टीत आधी 'तो' आणि मग 'मी' हा भाव नित्य जागृत ठेवणे म्हणजे सख्यभक्ती. असा माझा जेव्हा भाव राहील तेव्हा ह्या सख्याचे प्रत्येक जीवावर असणारे निरतिशय प्रेम मला अनुभवता येईल.
✽ आत्मनिवेदन भक्ती - (बळी राजा)
स्वतःच्या समग्र जीवनाचा, प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक भावाचा नैवेद्य 'त्याला' अर्पण करणे म्हणजेच 'आत्मनिवेदन'.
᪥ मानसपूजा सच्चिदानंद विग्रहाची
माझी साधना, मानस पूजा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या वाचनानंतर आणि गुरुचरित्राच्या पारायणानंतर थोडी अजून प्रबळ झाली. पारायण केल्यापासून पहाटे उठून शुचिर्भूत होऊन बसायची सवय मोडायची नाही ठरले. मध्ये कामाच्या ताणामुळे काही दिवस वगळता वेळेवर उठून साधनेला बसणे नियमित सुरु झाले. पूर्वी केलेल्या श्रीकृष्णाच्या मानस पूजेचा अनुभव अजून जीर्ण झाला नव्हता. भंगवंतानी मनाला अचाट शक्ती दिली आहे. त्याच्या वेगाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. त्या शक्तीच्या जोरावर मी कुठेही जाऊ शकतो आणि काय वाटेल ते करू शकतो. असे असताना मानस पूजा म्हणून मी माझी पूजा मुर्तीपुरती मर्यादित का ठेवावी ?
साधनेला बसलो की त्यांना पहिले आळवणी घालू लागलो की तुमच्या सदेह सच्चिदानंद विग्रहाची पूजा करण्याची संधी द्या. कारण मनाची शक्ती कितीही अचाट असली तरी मनात अहंकार असल्यास ते सच्चिदानंद रूप डोळ्यसमोर आणून स्थिर ठेवणं शक्य होतं नाही. कारण मनावर बुद्धीचे नियंत्रण असते आणि सद्सद्विवेकबुद्धी प्रदान करणे हे त्यांच्याशिवाय कोणाला शक्य नाही. मंदिरात प्रवेश करताना हात पाय धुवून प्रवेश करतो तसंच मनातलं मालिन्य नामस्मरणाने धुवून पुढे व्हावं. एकदा का हे सच्चिदानंद रूप समोर आलं की मनातील मालिन्य तात्पुरतं का होईना धुवून टाकलं जात.
सध्याच्या माझ्या मानस पूजेतले काही विधी सांगून मी हा माझा लांबलेला लेख आवरता घेतो. अक्कलकोट निवासी स्वामींना अक्कलकोटातील त्यांच्या प्रिय भक्त चोळप्पा महाराजांच्या घरातच औदुंबर किंवा वडाच्या झाडाखाली एका शिळेवर बसायची प्रार्थना करून त्यांनी सदेह हयात असताना ज्या हंड्यातून त्यांना स्नान घातले जाई त्याच हंड्यात पाणी तापवून त्यांना स्नान घालतो. आपल्यासारखा साबण किंवा बॉडीवॉश वगैरे न वापरता चंदनादी उटी अत्तर लावून त्यांना स्नान घालण्यास प्रारंभ करतो. स्नान घालताना स्वामी दिगंबरावस्थेत आहेत म्हणून मनातून कोणतीही लाज बाळगून चालत नाही. मुळात दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे आकाश असे फक्त ज्यांनी पांघरले आहे त्या दिगंबर परमात्म्याला स्नान घालायला मिळणे हि किती मोठी पर्वणी आहे.
स्नान आटोपले कि त्यांना एका सुक्या रेशमी वस्त्रावर उभे राहायची विनंती करून त्यांचे अंग टॉवेलने छान कोरडे कारण घेतो. स्वामींची ७ फूट उंच उंची बघता त्यांना नखशिखांत कोरडे करायचे म्हणजे सोबत एखाद्या स्टूल किंवा टेबलाचा आधार घेऊन चढावे लागते. ते दत्त दिगंबर मात्र मस्त पांडुरंगाच्या कंबरेवर हात ठेऊन असलेल्या स्थितीत उभे राहतात आणि सेवा करू देतात. नंतर त्यांना छान पितांबर नेसवून जेंव्हा गळयात नाजूक फुलांच्या माळा घालतो तेंव्हा कधी त्या लंबोदरामुळे गणपती भासतात तर कधी निळाक्षार वर्ण धारण करून श्रीकृष्ण भासतात. चेहऱ्यावर तेच लीला करतानाच खट्याळ हास्य. त्यानांतर धूप अगरबत्ती समई घेऊन तत्यांना ओवाळते आणि आरतीसाठी समोर उभा राहतो तेंव्हा लक्षात येत की मला तर फक्त नामस्मरण येत. आरती पाठ नाही. दत्तगुरूंची आरती लहानपणी पाठ होती ती पण विसरलेलो आहे. त्या विचाराबरोबरच मनकवडे स्वामी "चालता हो !" म्हणून स्वतःच अंतर्धान पावतात. डोळे उघडतात.
या सर्व प्रक्रियेत वैखरी वाणी बेंबीपासून ओंकार काढायचा प्रयत्न करून त्यापुढे श्री स्वामी समर्थ जोडून "ॐ श्री स्वामी समर्थ" असे मुखातून वदवून घेतच असते!
🌺॥ॐ श्री स्वामी समर्थ॥ 🌺
This one has a very significant Deep meaning. Well explained philosophy...