अमेयचा जर्मनीचा व्हिसा हातात पडला आणि पुढच्या तयारीची चक्र वेगात फिरण्यास सुरू झाली. त्याला उच्च शिक्षणासाठी पुढील १० दिवसांत हॅम्बर्ग, जर्मनी मध्ये दाखल होणे आवश्यक होते. त्यामुळे व्हिसा हातात पडण्याची जेवढी आम्ही सगळेच आतुरतेने वाट पहात होतो, तेवढीच उत्साहाने आम्ही अजून एका गोष्टीची वाट पहात होतो ती म्हणजे या १० दिवसांत अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या दर्शनाची!
बरोब्बर ३ महिन्यांपूर्वी आम्ही प्रथमच स्वामींच्या मठास भेट दिली होती तेव्हा विठोबाच्या भेटी आधीच पोटोबा आटोपला असल्यामुळे, आम्हाला स्वामींचा अभिषेक आणि त्यांच्या समाधीचे गाभाऱ्यात प्रवेश करून दर्शन घेणे शक्य झाले नव्हते. या वेळी सहकुटुंब सहपरिवार भेट देताना आम्ही पहाटेची काकड आरती आणि अभिषेक असा दोन्हींचा लाभ घेता यावा अशी पूर्वतयारी करूनच निघायचे ठरवले होते.
ठरल्याप्रमाणे दिनांक २४ मार्च, २०२१ रोजी आकांक्षा, अयांश आणि मी आमच्या बँगलोरच्या निवासस्थानाहून पहाटे ०४:३० वाजता "गणपती बाप्पा मोरया" अशा उद्घोषात घर सोडले. पहाटेची ही वेळ साखरझोपेची असल्यामुळे गाडीच्या चालक पदी माझी निर्विवाद निवड होते. नंतर एकदा सकाळची कोवळी किरणे अंगावर पडू लागली की मग "मला कधी चालविण्यास देणार?" म्हणून माझ्या मागे तगादा लागतो! कारण गाडी चालवण्याबाबत आम्ही दोघेही उत्साही आहोत.
पहाटे ०५:०० वाजताच्या काकड आरतीसाठी उशीर होऊ नये म्हणून आम्ही अक्कलकोटातच मठापासून साधारण एक ४५० मी. अंतरावर असलेल्या विकास हॉटेल मध्ये आमच्या राहण्याची सोय करून ठेवली होती.
बँगलोरहून अक्कलकोटला जाण्याचे एकाहून अधिक मार्ग आहेत. आम्ही अक्कलकोटातच रहायची सोय केली असल्यामुळे आम्हाला सोलापूर मार्गे न जाता दुसऱ्या एका जवळच्या मार्गाने जाणे Google Maps ने सुचवले. आमचा आतापर्यंतचा Google Maps चा अनुभव बघता आम्ही शक्यतो महामार्ग सोडून बाकी कोणताही "सुलभ" मार्ग न घेता सरळ जाण्याचेच ठरवले. पण Google Maps ऐकेल तर शप्पथ! त्याने सुचविलेला उजव्या हाताचा रस्ता न घेता सरळच गाडी पुढे हाकल्याचे त्याला काही सहन झाले नाही आणि आम्ही गाडी वळवून त्याने सुचवलेल्या मार्गानेच आम्ही जावे असा त्याचा अट्टाहास चालूच ठेवला. आम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करून सरळच जायचे ठरवले. पण नाही ! गाडी वळवा म्हणजे वळवा ! शेवटी आम्ही गाडी मागे वळवली आणि त्याने सुचवलेल्या मार्गाने पुढे प्रस्थान केले. त्या मार्गाची सुरुवात एक सुंदर कमान असणाऱ्या प्रवेशद्वाराने झाली. तिथे बाजूलाच भगवान शंकरांचे देवस्थान होते. आम्ही मनोमन प्रार्थना करून तसेच पुढे निघालो.
त्या नागमोडी वळणांच्या रस्त्याचा, आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत, गगनचुंबी पवनचक्क्या पहात पहात आम्ही मिनिटांगणिक एक दोन किलोमीटर मागे टाकत होतो. एकीकडे अमेय आणि अयांश चे आजीआजोबा मुंबईहून अक्कलकोटला यायला निघाले. गाडी चालवता चालवता एकाएकी आकांक्षाच्या मनात विचार आला म्हणून आम्ही महाराष्ट्र सीमेपासून अजून किती दूर आहोत हे पहायचे ठरवले. मी Google Maps वर अक्कलकोट शोधतच होतो इतक्यात माझी नजर गाणगापूरवर पडली. श्री नृसिंह सरस्वतींचे देवस्थान असलेलं,भीमा-अमरजा संगमकाठी वसलेले गाणगापूर अवघ्या ४०-५० कि.मी.च्या अंतराने दूर असल्याचे पाहून आम्ही विचार करण्यात फार विचार न दवडता गाडी गाणगापूरच्या दिशेने वळवली. एकीकडे मुंबईहून येणाऱ्या माझ्या सासू साऱ्यांच्या कानावर आमचा बदललेला प्लॅन कळवून झाल्यावर मी त्यांना एवढंच सांगितले की "आम्ही भटकलो नाही आहोत, तर आम्हाला भटकवले गेले आहे!"
कृष्णा, भीमा नद्यांवरील लांबलचक सेतू पार करून आम्ही गाणगापूरास पोहचलो. वर्दळ तशी तुरळकच दिसत होती. मधलाच वार, कोरोनाची परिस्थिती आणि भर दुपारची वेळ बघता भाविकांचा फारसा उत्साह दिसत नसावा असा अंदाज बांधून आम्ही मंदिरात प्रवेश केला. आम्हाला पहाताच वेगवेगळी विक्रेते मंडळी आम्हाला गराडा घालून उभे राहिले. एकाने चंदनाचे गंध लावले, एकीने प्रसादाचे पुडे आमच्या हातात टेकवले आणि एकाने "तुम्हाला गाभाऱ्यात दर्शन करून देतो" सांगून सद्गुरु दत्तात्रेयांच्या समोरच उभे केले. बाकी कोणत्याही गोष्टींकडे फारसे लक्ष न देता आम्ही दर्शन घेतच होतो, जेंव्हा मंदिरांतील आचार्यांनी आम्हाला वेगवेगळ्या पूजा आणि अभिषेकांबद्दल माहिती दिली. हातात वेळ असल्यामुळे आम्ही पूजा करून घेण्याचे ठरविले. पुजेकरिता राखीव असलेल्या जागेत बसून आम्ही आचार्यांची वाट पाहू लागलो. यावेळी दुसरे कोणी एक आचार्य आले आणि त्यांनी परत एकदा आम्हाला वेगवेगळ्या पूजा आणि विधींची माहिती सांगण्यास सुरुवात केली. आकांक्षा आणि मी नक्की काय चालले आहे हा विचार करत एकमेकांकडे पाहू लागलो.
मंदिरात केल्या जाणाऱ्या या पूजेचे फळ पाप कमी करणे किंवा पुण्य मिळवणे नाही हे मी खचितच जाणून होतो. मनामध्ये एकच प्रश्न सतत घुटमळत होता तो एकचं. "दत्त महाराज, तुम्ही आम्हाला इथे नक्की का आणलेत ? म्हणजे तुमच्या निवासाने आणि पादुकांनी पवित्र झालेल्या या तीर्थस्थानी तुमच्या दर्शनाव्यतिरिक्त या पूजेच्या कर्मकांडात अडकवण्याचा नक्की काय उद्देश आहे?"
हा सगळा मायेचा न सांभाळता येणारा पसारा कसाबसा सांभाळण्याचा प्रयत्न करतच होतो, जेंव्हा ते आचार्य म्हणाले. "सध्या महाराष्ट्रातून सीमा पार करून येण्यास कोरोनाची चाचणी केल्याशिवाय प्रवेश निषिद्ध असल्यामुळे बऱ्याचशा सेवा खंडित झाल्या आहेत. तुम्ही ही पूजा करून सेवेसाठी पैसे दिल्यास सेवेमध्ये खंड पडणार नाही."
त्यांनी हे वाक्य पूर्ण केले आणि सगळे चित्र डोळ्यांसमोर सगळं काही स्पष्ट झाले. आमच्या व्यतिरिक्त बाकी कोणीही भाविक नसल्याचे आमच्या आधीच निदर्शनास आले होते.
कोरोना पसरलेला असला आणि अशा ठिकाणी त्याचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते वगैरे असं सगळं जरी माहिती असलं तरी एक गोष्ट जी भगवद्गीता आणि श्रीमद् भागवत पुराण वाचून मी माझ्या मनात पक्की बसली आहे ती म्हणजे - ज्याला भगवंतांनी तारायचे ठरवले त्याला कोणी मारू शकत नाही आणि ज्याला भगवंतांनी मारायचे ठरवले त्याला कोणी तारू शकत नाही. वाट्याला आलेले सुख जसे त्यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करतो, तसेच वाट्याला आलेले दुःख सुद्धा प्रसाद म्हणूनच ग्रहण करण्याची बुद्धी जोपासणे आवश्यक आहे. म्हणून अशा प्रसंगी भगवंतांवर अविश्वास दाखवून, तीर्थस्थळी जायची इच्छा असूनही स्वतःला घरात कोंडून घेणे मला फारसे पटत नाही. बाकी आवश्यक ती काळजी घेऊन आपण आपली श्रद्धा कायम ठेवावी असे माझे स्पष्ट मत आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर काही वर्षांपूर्वी एका चाचणीच्या निमित्ताने फक्त दोनच व्यक्तिंकरिता बनलेले असे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे शहरी भागात कोसळले आणि त्यात एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नशिबात जर विमान अपघातात मृत्यू लिहिला असेल तर तो विमानात न बसताहि होऊ शकतो आणि नियतिसमोर हात टेकण्याशिवाय काही पर्याय रहात नाही हेच सत्य आहे!
मी आधी एका लिहिलेल्या लेखात म्हटलेच आहे की, मंदिरांची आवश्यकता ही मनुष्याच्या अध्यात्मिक प्रगतिकरिता महत्वाची आहे. मंदिराद्वारे अर्चाविग्रहाच्या रुपात भगवंत आपल्या भक्तांना त्यांची सेवा करण्याचा हा मार्ग उपलब्ध करून देतात. तसेच तीर्थस्थानामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी खरोखरच भगवंतांच्या कृपेवर अवलंबून राहावे लागते. एका पद्धतीने हे सुद्धा त्यांच्या पूर्वकर्माचे त्यांना प्राप्त झालेले फळचं असते. प्रश्न हा असतो की, ते भाग्यशाली लोक त्याकडे भगवंतांची कृपा म्हणून बघतात की, फक्त परिश्रम करून मिळणारे उत्पन्नाचे साधन म्हणून? परिस्थिती बघता सगळ्याच गोष्टींचा बाजार झाल्याचे जरी दिसत असले तरीही आपण कोणत्या भावनेने त्याकडे बघतो आणि त्यावर आपली काय प्रतिक्रिया देतो, ही आपली खरी कसोटी असते.
भगवंतांच्या सेवेमध्ये खंड पडू नये या एकाच कारणास्तव मला तिथे पूजा करणे अपेक्षित आहे असे वाटले. बाकी पाप आणि पुण्याचा हिशोब करणारे आपण कोण ?
पूजा आटोपून बाहेर आलो, मंदिरास ३ प्रदक्षिणा घातल्या आणि बाहेरील घरगुती खानावळीत निव्वळ ९०/- रुपयांत उत्तम थाळी पोटभर जेवून आम्ही अक्कलकोटच्या दिशेने प्रवास सुरू केला.
उर्वरित दिवस आम्ही आराम, गप्पा वगैरे कौटुंबिक आनंदात घालवला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:०० ला उठण्यास सज्ज होऊन शांत झोपी गेलो.
आम्ही काकड आरती आणि अभिषेक करण्यासाठी शुचिर्भूत होऊन पहाटे ०४:३० वाजता समाधी मठ उघडायची वाट पहात आणि मठाचे त्या प्रातःसमयीचे सौंदर्य न्याहाळत बाहेर उभे होतो.
०५:१५ वाजता मठाची द्वारे उघडताच आम्ही मठात प्रवेश केला. थोड्याच वेळात सर्व वातावरण दुदंभून टाकणारी मंगलमय काकड आरती आटोपली.
काही स्त्रिया तेथे केरसुणी घेऊन केर काढत होत्या. केदार गुरूजींनी आम्हाला अशा सेवांचा लाभ घेण्याबाबत सूचित केले होते. मग आम्हीपण तिथल्या केरसुणी उचलून स्वामींचे सेवाकार्य करण्यास सज्ज झालो. त्या समाधी मठात असाच यथेच्छ वेळ काढता काढता आमच्या सोबतीला एक कुत्रा सुद्धा आला. थोडाफार वेळ त्याच्याशी खेळण्यातही घालवला. अयांशचा असा कुत्र्याला हात लाऊन त्याच्याशी खेळण्याची पहिलीच वेळ होती.
०७:०० वाजता केदार गुरुजी आले. अमेय आणि पप्पा सोवळे नेसून पूजेसाठी सज्ज झाले. अयांश माझ्या अंगावर झोपल्यामुळे मला सोवळे नेसणे शक्य झाले नाही. पण सोवळ्या ओवळ्याचे फार न पहाता गुरुजींनी मला आणि आकांक्षालाही पूजेस बसण्यास सांगितले. पूजा अगदी यथासांग पार पडली आणि आम्ही सगळेच ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होतो ती म्हणजे स्वामींच्या समाधीवर नतमस्तक होण्याची ! महाराजांच्या समाधी शिळेवर डोके टेकवले असता, प्रत्यक्ष त्या माऊलीच्या मऊ मऊ पायांवरच डोके ठेवल्याचा अनुभव आकांक्षा ने प्रत्यक्ष घेतला आहे. आमच्या सगळ्यांसाठीच तो एक अविस्मरणीय क्षण आणि अभूतपूर्व अनुभव होता.
त्या मागोमाग आम्ही भक्तश्रेष्ठ चोळप्पा महाराजांचे ५ पिढ्यांपूर्वीचे घर, स्वामींचा स्नानाचा हंडा, स्वामींचा राजदंड, स्वयंभू गणपती असे सर्व काही पाहून आणि आनंदाने तृप्त होऊन आमच्या हॉटेलवर परतलो.
आता यापुढेही काही अनुभव वाचण्यास बाकी आहे का? असा प्रश्न पडला असेल तर त्या मागची गंमत अशी आहे की स्वामी हे सगळीकडेच आहेत. मग तुम्ही मठात असाल किंवा अजून कोणीकडे.
प्रवासात अयांशची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही दुधाच्या पकिटांचा डब्बा जवळ बाळगतो. हॉटेल मधून सामान गाडीत ठेवता ठेवता हा डब्बा तेवढा आमचा हॉटेलमध्येच सुटला. जोपर्यंत हे विसरल्याचे निदर्शनास आले तोपर्यंत आम्ही अक्कलकोट मागे सोडून बरेच पुढे निघून आलो होतो. अयांशसाठी प्रवासापुरती काही मोजकीच पाकिटे आमच्याकडे होती. एरवी हीच गोष्ट झाली असती तर आम्हाला खूप हूरहूर लागली असती, पण आता तसे झाले नाही. आम्ही हॉटेलला संपर्क करून तो डब्बा मठास पोहचवण्यास सांगितले. आम्ही हे ओळखून होतो की त्या दुधाची खरी गरज कोण्या अन्य गरजू लोकांना असावी आणि अन्नदानाच्या माध्यमातून त्या दुधाचा योग्य वेळी आणि योग्य जागी उपयोग व्हावा अशी स्वामींचीच इच्छा असावी.
पुढे जाऊन आम्ही पुण्याच्या अलीकडे जेवणासाठी थांबलो. जेवण आटोपून परत गाडीत बसताना आकांक्षा आणि मम्मा एका गाडीत आणि आम्ही बाकी पुरुष मंडळी एका गाडीत असे विभागले गेलो. पुणं सोडून दृगगती मार्गास लागताना मला आकांक्षाने व्यक्त केलेली इच्छा आठवली. आमची कुलदेवी वाघजाई देवीचे मंदीर वाटेतच लागते. द्रुगगती महामार्ग सोडून लोणावळा/ खंडाळ्याला जाण्याचा रस्ता पकडायचा आणि दर्शन आटोपुन परत त्याच महामार्गास लागायचे असे ठरले. आम्ही Google Maps वर अंतिम स्थळ बदलून "राजमाची" असे निश्चित केले. पुढे जाऊन जसा लोणावळा/ खंडाळा जाणारा फाटा दिसला तसा आम्ही Google Maps कडे दुर्लक्ष करून त्या रस्त्यावर गाडी वळवली. पण ! Google Maps ला ते काही पटले नाही आणि आम्ही घेतलेला रस्ता चुकीचा आहे असे दाखवून त्याने आम्हाला परत महामार्गावर येण्यास भाग पाडले. अजून एखादा फाटा पुढे असावा अशा विचाराने आम्ही Google Maps चे तंतोतंत पालन करायचे ठरवले. पण शेवटी पदरी पडली ती निराशा! ज्या डोंगराच्या माथ्यावर राजमाची आणि वाघजाई देवीचे मंदीर आहे त्या डोंगराच्या मधून जाणाऱ्या बोगद्यात पोहचल्यावर आम्ही इच्छित स्थळी पोहचलो असल्याचे Google Maps ने जाहीर केले आणि मी परत एकदा कपाळास हात लावला.
या दरम्यान आकांक्षा आणि मम्मा वाघजाई देवीच्या मंदिरात पोहचले आणि त्यांचे यथेच्छ दर्शन झाले. मंदिरातून बाहेर पडता पडता मंदिराबाहेर बसलेल्या वयस्कर आजींनी आकांक्षाला तिने काहीतरी दान द्यावे अशा अपेक्षेने आवाज दिला. आकांक्षा त्यांच्या पदरी पैसे दान करून परतण्यास मागे वळली आणि तिच्या निदर्शनास आले की त्या आजी स्वामींचे पुस्तक घेऊन बसल्या होत्या. पदरात दान देताना त्यांनी आकांक्षाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनेचे विश्लेषण न करता त्याचा स्पष्ट दिसणारा अर्थ कोणी कसा लावावा हे मी या लेखाच्या वाचकांवर सोडतो.
एकंदर बघता पुनः एकदा अक्कलकोटवारी सुंदर अनुभवांची शिदोरी देऊन गेली !
ता. क. : आज रात्री अमेय हॅम्बर्गला जाण्यास निघतो आहे. प्रवासी बॅगा अगदी काठोकाठ भरल्या आहेत पण सामानाची बांधाबांध करून झाल्यावरही कुठे न कुठे काट-छाट करत त्याने भगवद्गीता सोबत घेतली आहे.
Commentaires