या वर्षी एप्रिल मध्ये वयाची ३२ वर्षे पूर्ण झाली. खूप वर्षांनी पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त सासू-सासऱ्यांकडून भेट म्हणून पुस्तक मिळाली आणि शरीरा सोबत थोड ज्ञान पण वृध्दींगत व्हावं या विचाराने ती लवकरच वाचण्याचा संकल्प केला. एक महिना होत आला तरी त्यातलं अजून एकही पुस्तक मी वाचायला घेतलं नव्हतं. पुस्तकं अध्यात्माशी निगडित आहेत याचा आढावा मी आधीच घेतला होता कारण नुकतीच लागलेली अध्यात्माची गोडी बघूनच मला तशी भेट देण्यात आली होती.
गेल्या काही महिन्यांपासून वाचन सुरू झाल्यापासून एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे मला जे हवे ते किंवा जेंव्हा हवे तेंव्हा वाचून होईलच असे नाही. एखाद पुस्तक हाताला लागलं की वेळ कुठूनही जुळून येतो आणि वाचून होतं आणि कधी वेळ आणि पुस्तक हातात असूनही वाचून होत नाही. मन भरकटत राहतं. त्यामुळे कधी, काय आणि किती वाचव याच मार्गदर्शन पण "तिथूनच" येत हे मी आतापर्यंत चांगलं अनुभवलं आहे. ज्यांच्या मते हे माझ्या मनाचे खेळ आहेत त्यांनी वाचा आणि सोडून द्या.
माझा वाचनाचा आणि आकांक्षाचा ध्यानाचा व्यासंग दिवसेंदिवस वाढतच चालला असताना, माझ्या वाचनाचा तिला आणि तिच्या ध्यानाचा मला होणारा लाभ बघून परमेश्वराने आम्हाला का एकत्र आणलं असावं हे विचार करून एक वेगळंच समाधान मिळते. आकांक्षाला ध्यान करताना आणि वाचन करताना मला कुंडलिनी शक्तीचे खूप संदर्भ येऊ लागले आणि या वेळी हातात पुस्तकं आल ते म्हणजे 'अवधूतानंद' 'जगन्नाथ कुंटे' लिखित 'नर्मदे हर हर !' एक महिन्याने का होईना आपल्याला भेट मिळालेलं पुस्तक हाती घेतलं म्हणून पण एक समाधान होतच.
खर पहाता एकंदर अध्यात्मिक जगात नवीनच वास्तव्याला आलो असल्याने 'नर्मदा परिक्रमा' हे शब्द माझ्या कानावर पडून फार काळ लोटला नव्हता. दाभोळ्याला पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा मठाचे सर्वेसर्वा सिनकर काकांनी तिथे यज्ञ करायला येणारे रमेश महाराज नर्मदा परिक्रमेला गेल्याचे सांगितले होते, ती 'नर्मदा परिक्रमा' शब्द कानावर पडण्याची पहिलीच वेळ. त्यामुळे 'नर्मदे हर हर' वाचून परिक्रमेविषयी माहिती मिळवण्याची तितकी काही इच्छा मनात अजून तरी जागृत झाली नव्हती. पण गेल्या रविवारी शाळेतला मित्र नरेंद्रशी बोलता बोलता परत एकदा नर्मदा परिक्रमेचा संदर्भ आला आणि पुस्तक वाचायला घेतलं.
जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥
या तुकोबांच्या ओळींची प्रचिती यावी असे साधुत्व, अंगात कुंडलिनी शक्ती खेळती असणारे योगी आणि खऱ्या अर्थाने अवधूत आनंद अनुभवणाऱ्या जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदा परिक्रमेत आलेल्या अनुभवापेक्षा त्यांचे पावलोपावली उलगडणारे व्यक्तिमत्त्व आणि विचार वाचून मी भारावून गेलो.
ज्यांना शंकर महाराजांनी स्वतः हाताने पाणी पाजले, अश्वत्थामा सारख्या चिरंजीवी वीर पुरुषाने दर्शन दिले, नर्मदा मातेने एकदा दोनदा नाही तर अनेकदा खाऊ पिऊ घालून काळजी घेतली तर कधी मारुतीरायाने स्वतः गलितगात्र झालेले त्यांचे शरीर वाहून नेले आणि कुंडलिनी शक्तिपाताची दीक्षा देऊन गुरूंचा डोक्यावर कायम वरदहस्त लाभला असे अध्यात्माची उंची गाठेलेल जगन्नाथ कुठे आपले पाय जमिनीवरच राहिले पाहिजेत हे जेवढ्या ठामपणे सांगतात, ते वाचून आपण त्यातून काय बोध घ्यावा? हे त्या नर्मदा परिक्रमेचे वर्णन वाचताना पावलोपावली जाणवतं. कोणाचे नमस्कार नकोत आणि चमत्काराच म्हणाल तर ते आपल्या बरोबर झाले तरी ते करणारे आपण नाही, म्हणून आपण जमिनीवरच रहावं याच याहून सुंदर स्पष्टीकरण मी यापूर्वी कधी वाचले किंवा ऐकले नाही. या कलियुगात अध्यात्माच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे तथाकथित साधू आणि योगी पुष्कळ संख्येने पाहायला मिळतात. पण 'हे विश्वची माझे घर' म्हणून अंगावर फक्त लंगोटी ठेऊन कशाचीही पर्वा न करता आपले सर्वस्व आपल्या गुरूंना अर्पण करून गुर्वज्ञाचे पालन करायला निघालेले अवधूतानंद विरळच.
कर्म आणि भक्ती यावर खूप काही वाचलं, अनुभवलं पण प्रारब्धाचे भोग म्हणजे सगळे या भौतिक शरीराचे भोग आणि मी म्हणजे हे भौतिक शरीर नाही हे ते इतक्या सहजपणे सांगून जातात की ते वाचून आपल्या अंगावर रोमांच उभे राहते. पण 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणून ते त्यांच्यावर टिच्चून उभे राहतात. त्या भोगांच त्यांना काहीच विशेष वाटलेल नाही हे वाचून आपण मात्र आ वासून पुढे पुढे वाचत राहतो. ते सगळं वाचून आणि एकंदर सद्य परिस्थिती बघता आपण पुण्य कर्माच्या मोबदल्यात मिळालेल्या भौतिक सुखात किती गुरफटून गेलो आहोत याची जाणीव होते. कारण हा पुण्यकर्माचा पाढा संपला की परत वाट्याला येतील ती या भौतिक शरीराची दुःख आणि त्या दुखांच्या वर तरंगण्याचा अवधुतानंद घेणे म्हणजे काय असते ते जगन्नाथ कुंटे खूप समर्पकपणे सांगतात.
परिक्रमेत भेटलेला आणि ज्याच्याशी जगन्नाथ कुंटेंचे ऋणानुबंध जुळले असा कुंतल चॅटर्जी हा मी जिथे लहानाचा मोठा झालो त्या अंबरनाथचा आहे वाचून अंगावर वेगळेच शहारे आले. ऐश आरामात आयुष्य जगत असताना 'ब्रह्म सत्य जगत मिथ्या' या विधानाची ज्याला एकाएकी अनुभूती आली आणि हे सगळं भौतिक सुख क्षणभंगुर आहे याची जाणीव होऊन जो अध्यात्माकडे वळला अशा कुंतल चॅटर्जीबद्दल मी डोळे विस्फारून विस्मयचकित होऊन वाचत होतो. कारण माझा अध्यात्मिक प्रवास पण अशाच काहिश्या जाणिवेने झालेला. किती ते योगायोग विचार करून मन भरून आलं.
नुकतंच वाचलेलं सखाराम आठवले लिखित हिरण्यगर्भ अजूनही डोक्यात घोळत होत तोच जगन्नाथ कुंटेंचा अध्यात्मिक प्रवास वाचण्यात आला. जगन्नाथ कुंटेंची हिमालयात जाण्याची उत्कट इच्छा, तिथल्या गुहा आणि गुहांमध्ये बसून तप करणारे सिद्ध पुरुष हे सगळं वर्णन आणि त्या मागोमाग मिळालेले शंकर महाराजांचे आशीर्वाद हे हिरण्यगर्भ मध्ये पण वाचलेले संदर्भ वाचून हा काही निव्वळ योगायोग नाही तर जगन्नाथ कुंटे हे स्वामींचा कृपाशिर्वाद लाभलेले अवधूतानंद आहेत याची खात्री पटली.
नर्मदेच अवधूतानंदांवरच प्रेम, घरच्या, पत्नीच्या, मुलाबाळांच्या, पैशाच्या, मैत्रीच्या आसक्तीला दूर ठेऊन त्यांनी केलेल्या परिक्रमा, आलेले अद्भुत अनुभव, परमात्म्याची प्रचिती आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ध्यान करताना कुंडलिनी तुम्हाला ब्रम्हांडात कितीही वर तरंगत घेऊन गेली तरी भौतिक शरीराचे पाय हे जमिनीवरच राहिले पाहिजेत अशी वारंवार दिलेली शिकवण अनुभवायची असेल तर 'नर्मदे हर हर!' वाचनाचा अद्भुत अनुभव अध्यात्माची आवड असणाऱ्या प्रत्येकाने घ्यावा!
नर्मदे हर हर !
२०१९ ला नर्मदा मैयाने , चैत्र महिन्यातील उत्तरवाहिनी परिक्रमा करून घेतली . ते दोन दिवस माझ्या आयुष्यातील मंतरलेले होते . वाट पाहतोय पुढील परिक्रमेची .
अनुभव :
मला उन्हाचा त्रास होतो म्हणून मला उन्हाळा आवडत नाही . उत्तरवाहिनी परिक्रमा हि एप्रिल मध्ये होती . या पूर्वी काम निम्मित बरोड्याला जाण व्हायचं त्यामुळे बरोड्याची गर्मी बद्दल अंदाज होता , पण कामानिम्मत कार ने सर्वत्र प्रवास असल्यामुळे काही वाटत नसायचं . नर्मदा परिक्रमा आपण उन्हात करू शकू का अशी शंका होती , म्हणून सोबत ग्लुकॉन-डी वैगरे घेतलं होत .
आम्ही सकाळी ६ ला बरोड्याला पोहचलो , माझा मित्र विशाल ह्याचा मामाचा मुलगा आम्हाला त्यांच्या घरी न्यायला आला होता , त्या दिवशी थोडं ढगाळ वातावरण होत , गाडीत मामाच…