अध्यात्माचा मार्ग हा बऱ्याच जणांना भ्रमिष्ट झालेल्या जीवांचा मार्ग आहे अशी समजूत आहे कारण त्यातलं गूढ ज्याने जाणल तोच या मार्गात साधक म्हणून प्रगती करतो आणि जे लोक बुवा बाजीच्या फंदात पडतात ते खरंच भरकटतात. आम्ही या बाबतीत खूप भाग्यवान आहोत की स्वतः सद्गुरूंनी हे गुरूपद स्वीकारल. सद्गुरू म्हणजे - श्रीकृष्ण, गुरू दत्तात्रेय, स्वामी 🙏🏼
तुम्ही इंग्रजी मधला "ट्रान्सफॉर्मर" हा चित्रपट पाहिला आहे का ? नसेल तर त्यातली एक गंमत आहे. त्या चित्रपटाचा आणि या विषयाचा काय संबंध? सांगतो ! त्या चित्रपटात एक अत्यंत आधुनिक असा "बंबल बी" नावाचा यंत्रमानव दाखवला आहे. हा अजस्त्र यंत्रमानव स्वतःला एका अत्यंत सुंदर आधुनिक चार चाकी गाडीत स्वतःला रूपांतर करू शकतो पण त्याचा आवाज यांत्रिक बिघाडामुळे गेला असल्याने त्याला संवाद साधायचा असल्यास तो त्याच्या रेडिओ वरचे स्टेशन बदलून बदलून त्यातले शब्द उचलून संवाद साधतो.
आमच्या सद्गुरुंचे तसच काहीसं आहे. त्यांच्याशी समोरासमोर संवाद साधण्याचं भाग्य मिळालं नसेलही पण याचा अर्थ आमचा संवाद होत नाही अशातली गोष्ट नाही. हृदयात निवास करणाऱ्या त्या श्रीकृष्णाला सगळंच माहिती आहे. भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायातील १५ व्या श्लोकात तो म्हणतो,
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥१५॥
भाषांतर :
मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृत होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदान्ताचा संकलक आ आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.
पण त्याला साद घालावी लागते. साद घातली की तो प्रतिसाद देतोच. नाही दिला अस कधी झालं नाही. जेंव्हा प्रतिसाद मिळत नाही असं वाटतं, तेंव्हा ती निरव शांतता पण बोलत असते पण ती ऐकायला कान लागतात ते श्रद्धेचे. अध्यात्माचा डोलारा उभा राहतो तो या श्रद्धेवर. काही वाट्टेल झालं तरी श्रद्धा ढळली नाही पाहिजे. भक्त प्रल्हाद आठवा? दरीत ढकलल, हत्तीच्या पायदळी देण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याच्यासारखा स्थितप्रज्ञ तोच. मुखातून त्या श्रीहरीच नाव कधी दूर गेलं नाही. काळजी घ्यायला तो समर्थ आहे म्हणून सगळं त्याच्यावर सोडून तो फक्त त्याच्या नामात दंग राहिला.
या सगळ्या पुराणात वाचलेल्या कथा. पण आजच्या काळात अस होतं का ? येतात असे अनुभव ? त्याचा प्रतिसाद म्हणुन त्याने जी काही पुस्तकं हातात दिली त्यापैकी हे एक पुस्तक - "नित्य निरंजन"!
श्रद्धेचे निरंजन कायम तेवत ठेवावे आणि सद्गुरूंच्या चरणी स्वतःला समर्पित करावे या आशयावर आधारित अशी ही सगळी अद्भुत कथा. पण खरीखुरी. त्यासाठी अरण्यात जाऊन सन्यास घेण्याची आवश्यकता नाही. प्रपंचात राहून परमार्थ करावा हाच कलियुगातील योग्य मार्ग आहे. तुकाराम महाराज, रामकृष्ण परमहंस यांसारखे कित्येक संत महापुरुष स्वतःच्या उदाहरणातून दाखवून गेले. कर्म, वासना, साधना, गुरू, गुरुपद, अहंकार, शरणागती, वैराग्य अशा कित्येक विषयांची अद्भुत सांगड या अगम्य पुस्तकातून वाचण्यास मिळते.
अवधूतानंद जगन्नाथ कुंटे यांच्या लहान वयापासूनच प्राप्त झालेल्या कृपा आशीर्वादाने मिळालेल्या प्रेरणेतून झालेल्या अध्यात्मिक प्रगती बद्दल भरभरून बोलतात. त्यांच्या लिखाणातून त्यांचं वाचन, ज्ञान, साधना किती दांडगी आहे याची प्रत्येक शब्दागणिक प्रचिती येते पण त्यातल्या कोणत्याही गोष्टीचं श्रेय घेत नाहीत. आपण किती मूढमती आहोत आणि कर्ता करविता म्हणजे सद्गुरू शंकर महाराज, गुरू दत्तात्रेय आहेत हे ते पदोपदी बोलून दाखवतात. इतकं की आपल्या तोंडातून बाहेर पडणार हे ज्ञान म्हणजे सद्गुरू शंकर महाराज बोलत आहेत आपण फक्त त्यांचा बोलका पोपट आहोत असा आविर्भाव आणतात. कोणी त्यांना स्वामी किंवा गुरू मानलं तर, एवढं मोठं पद भूषवायची आपली लायकी नसल्याचे ते वारंवार सांगतात. कोणी साधना शिकवा म्हणून आग्रह केलाच तरी त्यावर भरभरून बोलताना, शिकवताना तोंडातून बाहेर पडलेले शब्द, अंतरंगातून बाहेर पडणारा ओमकार सगळंच सद्गुरूंना अर्पण करतात. अगदी श्रीकृष्ण म्हणतात तसं - "तुझ सगळं कर्म मला अर्पण कर." सगळंच निष्काम कर्म. स्वतःच आणि स्वतःसाठी काहीच नाही. "मी" पणाचा स्वाहा! अध्यात्मात या "मी" ला काही जागा नसते. स्वामी पण म्हणतात "तुझ्यातला "मी" माझ्या काय कामाचा?"
कथानक सुरू होत हृषिकेश मधील विठ्ठल आश्रमापासून. वासनेने होरपळलेला अविनाश अध्यात्माच्या शस्त्राने वासनेचा अंत करण्याच्या उद्देशाने गुरूच्या शोधात आलेला असतो. त्याला पुसटशी कल्पनाही नसते की ही सगळी पूर्व जन्मीची वासना आहे जो तो अजूनही भोगतो आहे. पण आता आयुष्य बदलणार आहे. सद्गुरू डोक्यावर हात ठेवणार आहेत. आयुष्याच सोन होणार आहे. हा जन्म शेवटचा. सगळ्या वासानांची होळी करून त्यातून निर्माण झालेल्या वैराग्याची राख ललाटी भस्म म्हणून फासायची आहे.
अवधूतानंदांना निमित्तमात्र करून शंकर महाराज शक्तिपात दीक्षा घडवून आणतात तर कधी स्वतः अवधूतानंद रूपात स्वप्नात दर्शन देतात. ज्याला जे रूप गुरू म्हणून भावत त्याला त्या रूपात दर्शन! गुरुतत्त्व एकच ! श्री गुरुदेव दत्त! सळसळत चैतन्य! कोणासाठी सगुण तर कोणासाठी निर्गुण! सगळ्या व्याख्या करणारे आपणच. त्यांना त्याच काय. त्यांची एकच अपेक्षा निष्काम कर्म आणि शरणागती. घडवून आणणारे पण तेच. आपण फक्त बोट धरून चालत राहायचं.
दिवस जातात, वर्ष जातात इतिहासाची पुनरावृत्ती होते. मागच्या जन्मिच्या भेटीगाठी परत होतात. कोण म्हणतं की वैराग्याची अनुभूती द्यायला भगवंत सगळं काही काढून घेतो ? पैश्याच्या झाडाखाली बसून पण त्याची हाव न धरता जो साधना चालू ठेवतो तोच खरा वैरागी! कोण म्हणत की स्त्री ही अध्यात्माच्या मार्गातला अडथळा आहे? प्रत्येक स्त्री मध्ये आई पाहता आली पाहिजे. अगदी बायकोच्या ठिकाणी पण. बहुतांश लोकांच्या घरातील अन्नपूर्णा देवी तीच तर आहे! पुरुषाने आपण मानसिक दृष्ट्या कितीही कणखर असल्याचं म्हंटल तरी खचलेल्या पुरुषाला उराशी घेऊन धीर देऊन मायेची ऊब स्त्री ही कित्येक वेळा पत्नी असते. खरोखर अवधूतानंदांना निमित्तमात्र करून सद्गुरू अध्यात्म खूप सरळ सोप्प करून सांगतात.
देवाच्या नावावर खापर फोडून धर्माचं स्तोम माजवणाऱ्या समाजावर ते हल्लाबोल करतात. देवाचा धाक का वाटावा. तो कायम आपलाच असतो. त्याला त्याचा भक्त हवाच असतो. "भक्त नसेल तर त्याला कोण विचारेल ?" म्हणून जेंव्हा ते बोलतात तेव्हा हसू आवरत नाही. उदाहरणादाखल जेंव्हा ते तुकोबांच्या पत्नीचे उदाहरण देतात तेंव्हा तर हसावं की रडाव कळत नाही. हे सगळं बोलतात तेंव्हा एक विचार मनाला शिवून गेला तो म्हणजे गेल्या काही शेकडो वर्षांच्या काळात दांभिक उच्चवर्गीय समाजामुळे जो बहुजन समाज भरडून निघाला त्याने त्या भगवंताला दोष देण्यापेक्षा किंवा त्याच्या अस्तित्वाला झुगारून लावण्यापेक्षा ज्या शास्त्रानुसार तत्कालीन समाज त्यांना त्या भगवंतापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता त्याच शास्त्राला शस्त्र करून त्यातल्या खऱ्या ज्ञानाच्या बळावर काट्याने काटा का नाही काढला ? एका अर्थाने त्यांनी त्या उच्च वर्णीयांच्या मताला दुजोरा दिला. असो! ज्यांना त्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी तो स्वतः सगळे मार्ग उपलब्ध करून देतो. सांगायचा मुद्दा तोच की आर्त स्वरात साद घालून तर बघा!
नित्य निरंजन वाचत होतो त्याच दरम्यान साधना करताना त्याने गुरुमंत्राच महत्त्व दर्शवून दिलं. त्याच्या कृष्ण रूपाच वेड असल्याने "हरे कृष्ण" गुरुमंत्राची निर्मिती दाखवली. अंग स्पंदनांनी भरून गेलं. शब्द उमटले -
साद घातली की तो प्रतिसाद देतो ।
बासरी वाजत राहते ती जागृत होते ।
सळसळून त्याचाकडे धावते ।
कोणासाठी जी कुंडलिनी असते ।
त्या कृष्णाची ती योगमाया राधा असते ॥
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥
Comments