मी पुढे जे लिहितोय त्याचा मी कोणताही पुरावा सादर करू शकत नाही कारण हा संदर्भ कोणत्याही पुराणातील नाही. त्यामुळे यावर विश्वास ठेवणं न ठेवणं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. विश्वास ठेवा असा आग्रह सुद्धा नाही. मला वेडा समजून नाही ठेवलात तरी माही काहीच हरकत नाही कारण हे माझे "Scribbled Thoughts". त्याच्या प्रेरणेने लिहिलेले आहेत. मी यांचं श्रेय सुद्धा घेत नाही. प्रत्येक लेखाप्रमाणे हा लेख पण श्रीकृष्णार्पणमस्तु !
हरे कृष्ण मंत्राचा उदय कसा झाला ? याची वेगवेगळी उत्तर मिळणं शक्य आहे आणि मला त्या उत्तरांमध्ये जायचं नाही. कारण याच उत्तर स्वतः त्यानेच दिल आहे. मनातल्या शंका कुशंका बाजूला ठेऊन हे जो वाचेल त्यालाच यातली ऊर्जा जाणवेल. संपूर्ण शरणागती !
त्याच झालं असं की भागवत पुराण वाचताना एका श्लोकाचे विवेचन वाचताना उल्लेख आला की "हरे कृष्ण..." मंत्रातला राम हा बलराम आहे. मला ते काही झेपलं नाही. आता त्या श्रीकृष्णाच्या इच्छेनेच वाचतो म्हंटल्यावर कुठे अडलं त्या शंकांचं निरसन पण तोच करतो. कारण माझ्या गुरुस्थानी पूज्य तोच तर आहे. गुरूने शंकेचं निरसन नाही केलं तर अजून कोण करणार ?
त्याने म्हंटल,"बर मग, हे "बघ" असा झाला या मंत्राचा जन्म!"
स्थळ : वृंदावन. हो! कृष्णाचं ! चल काही हजार वर्ष मागे. नक्की किती त्याला का महत्व ? तुम आम खाओ....
आज काय खेळ खेळायचा? बालगोपाळांची चर्चा रंगते.
मध्ये तो निळा सावला पोह्यांची पुरचुंडी घेऊन बसलेला असतो. गोरापान राम त्याच्या खांद्यावरवरून गळ्यात हात हात घालून हसत असतो. तो महाविष्णू तर तर दुसरा अनंत शेष.
एकीकडे प्रत्येक जण त्याला पुरूचुंडीतून एक एक घास भरवतो त्या बाळ गोपाळांना तो परत एक घास भरवतो. चार घासांची पुरचुंडी पण प्रेमाची शिदोरी संपतच नाही. गोपाळांची पोट भरतात पण तो अजूनही प्रेमाचा भुकेलाच. प्रेमाचा झरा ओसंडून वाहतोय, प्रत्येक घासागणिक तो त्यांना दिव्यानंदानी भरभरून प्रेम देतोय. त्यांचे कृष्णावर केलेलं युगायुगांचे प्रेम आज सफल झालंय.
५ वर्षांचा तो एका पायावर उभा राहतो, राम त्याच्या खांद्यांवर हात ठेवतो.
हरी नामाचा गलका होतो. हातात हात जुळतात. फेर धरला जातो.
तो बासरी वाजवतो. डोळे बंद होतात. गोपाळांच्या मुखातून शब्द निघतात....
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥
- हृषिकेश कृत
Comments