आज आमच्या घरासाठी खरोखर आनंदाचा दिवस आहे!
श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा महाभारतातील कुरुकक्षेत्रावरील तो मनमोहक क्षण ज्या भव्य दिव्य अशा तैलचित्रामध्ये सहा महिन्यांच्या कालावधीनंतर बद्ध करण्यात आले होते, ते तैलचित्र आमच्या घरात आज लागले गेले. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी जसा अर्जुनाचे लक्ष्य फक्त मास्याच्या डोळ्याकडे होते तसेच या तैलचित्रात माझी नजर श्रीकृष्णांवरच खिळून रहाते.
मी माझ्या वडिलांकडून नेहमी ऐकून आलो आहे की महाभारतातील या चित्रास घरात कधी लावू नये कारण त्यामुळे घराची शांती भंग पावते आणि घरात महाभारत घडते. त्यांना असे सांगण्याचे कारण म्हणजे त्यांनी ही गोष्ट निरनिराळ्या स्त्रोतांकडून अनेकदा ऐकली आहे.
पण माझे मन ही गोष्ट मान्यच करू शकत नाही. माझ्या मते अर्जुन आणि श्रीकृष्णाची जोडी म्हणजे नर नारायणाची जोडी घरात सुख, शांती, समृद्धी घेऊन येते.
माझ्या मते माझे वडील आणि माझे, दोघांचेही या मागचे तर्कशास्त्र बरोबर आहे. भगवद्गीता आणि श्रीमद् भागवत पुराण वाचून मी लावलेला अर्थ आणि स्वानुभव मी इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
हृषिकेश, मायापती आणि एकमेव पूर्ण पुरुषोत्तम असे भगवान श्रीकृष्ण जे त्रिगुणातीत आहेत आणि ज्यांचा कोणी शत्रू अथवा मित्र नाही कारण त्यांच्या ठायी सर्वांसाठी समभाव आहे ते त्यांच्या भक्तांची नेहमीच काळजी घेतात. ते एकवेळ त्यांचा स्वतःचा अपमान सहन करू शकतात परंतु त्यांच्या निस्सीम भक्ताला झालेला त्रास ते कधीच सहन करत नाहीत.
अर्जुन हा श्रीकृष्णांचा फक्त भक्तच होता असे नव्हे तर त्यांचे जन्मो जन्मीचे नाते होते. ते अर्जुनाचे मामेभाऊ, मित्र आणि अध्यात्मिक गुरु सुद्धा होते. जेंव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथ्य स्वीकारले तेंव्हा अर्जुन हा जगाच्या इतिहासातील सर्वात संहारक युद्धाचा अजिंक्य योद्धा झाला !
अर्जुन हा एवढा भाग्यशाली होता की श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे हनुमानाने अर्जुनाला त्याच्या रथाच्या ध्वजावर आरूढ होऊन त्याला संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. हनुमानांचे स्वामी प्रभु श्रीरामांचे अवतार श्रीकृष्ण ज्या रथावर सारथी म्हणून आरूढ झाले आहे, तिथे हनुमान कसे अनुपस्थित राहू शकत होते. (त्यामागची कथा पण खूप रोमांचकारी आहे !) हेच कारण आहे की ज्यामुळे अर्जुनाच्या रथास "कपिध्वज" नाव पडले. हनुमानांच्या उपस्थितीमुळे रथास मिळालेले स्थैर्य इतके बलभक्कम होते की ब्रम्हास्त्रासारखी सर्वशक्तिमान शस्त्रे पण रथास काही धक्का पोहचवू शकली नाहीत.
हा रथ अर्जुनास अग्निदेवाकडून भेट मिळाला होता. या रथाचे चार घोडे म्हणजे काम, क्रोध, लोभ आणि मोक्षाचे प्रतीक आहेत ज्यांची दोर मायेचे अधिपती, त्रिगुणातित श्रीकृष्णांच्या हाती आहे. या ब्रम्हांडात कोणीही त्यांना शरण गेल्याशिवाय या मायाजालातून निसटू शकत नाही. अर्जुन हा मनुष्य असल्यामुळे खचितच त्या देह रुपात अमर नव्हता पण साक्षात श्रीकृष्णांकडून भगवद्गीता ऐकून तो महाभारताचा अजरामर योद्धा झाला!
म्हणून भगव्गीतेच्या १८व्या अध्यायातील ७८ व्या श्लोकात संजय म्हणतो ( भगवद्गीतेमधला शेवटचा श्लोक)
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धार: ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।७८।।
भाषांतर :
जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्र्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे.
‘श्री’ या संस्कृत आदरवचनाला हिऱ्यासारखे अनेकानेक पैलू आहेत. ‘श्री’चे अनेकार्थ आहेत. श्री म्हणजे ‘सौंदर्य’, ‘अरोध सामर्थ्य’, ‘अलौकिक बुद्धिमत्ता’, ‘अगणित संपत्ती’, ‘अनंत गुणवत्ता’ असे ते अर्थ आहेत. आपण जेंव्हा महाभारत किंवा रामायण यातील विविध पात्र आणि त्यांना देण्यात आलेल्या उपाधींकडे लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येईल की रामाचे श्रीराम झाले, कृष्णाचा श्रीकृष्ण झाला तसा श्रीलक्ष्मण किंवा श्रीबलराम म्हणण्याचा प्रघात पडला नाही त्याला कारण तसेच आहे. तसेच श्री म्हणजे सौभाग्याची देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्ण म्हणजे भगवान नारायण. घरातील सुख शांती म्हणजे त्या घरात लक्ष्मीचा निवास असण्याची लक्षणे आहेत. ते कटुंब भले पैस्या अडक्याने गडेगज्ज श्रीमंत नसो पण मानसिक समाधान मिळण्यावढे धन धान्य त्या घरात नक्कीच असते.
तसेच ज्या घरात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे हे चित्र त्यांचा भगवद्गीतेमधल्या उपदेशाचा मान न राखता फक्त एक कलाकृती म्हणून भिंतीवर टांगण्यात येते, म्हणजेच जिथे लक्ष्मी मातेला आपल्या नारायणांचा मान राखल्याचे दृष्टीस पडत नाही, तिथे लक्ष्मी का बरे वास्तव्य करेल ? त्या घरात कलह निर्माण होणे सहाजिकच आहे!
माझे एवढेच मत आहे की, लोकांनी आपल्या शास्त्रांचा योग्य अर्थ न समजता आंधळेपणाने कशावरही विश्वास ठेऊ नये आणि श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या या पवित्र चित्रास नाव ठेऊ नये.
या चित्राबाबत एक गोष्ट कायम माझ्या निदर्शनास आली आहे ती म्हणजे या चित्रास भगवद्गीतेमधल्या २ श्लोकांसोबतच नेहमी जोडण्यात येते. ते श्लोक म्हणजे -
भगवद्गीतेमधील ४ थ्या अध्यायतील ७ वा आणि ८ वा श्लोक
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७ ॥
परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थानार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ८ ॥
भाषांतर :
जेंव्हा जेंव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ह्रास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्या वेळी हे भारता! मी स्वतः अवतीर्ण होतो.
भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो.
लोक हे विसरून जातात की ७०० श्लोकांची भगवद्गीता या फक्त दोन श्लोकांच्या पण पलीकडे आहे.
आमच्या घरात लावलेल्या या चित्राच्या, ते त्याच्या चित्रकाराच्या घरापासून ते आमच्या घराच्या भिंतीवर लावेपर्यंतच्या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे -
एका तथाकथित हिंदू चित्रकाराकडून त्याची निर्मिती १० वर्षांपूर्वी झाली.
त्याला सुंदरशी चौकट एका तथाकथित मुस्लिम कारागिराने बसवली.
आणि शेवटी त्याला भिंतीवर लावण्याचे काम एका तथाकथित ख्रिश्चन कारागिराने पूर्णत्वास नेले.
Superb post! I am inspired to put this up in my own home. The message is really good and is very motivating.
But do tell if there's a mahabharat in your house since then? 😜
We will know who wins the argument then.