top of page
Writer's pictureNayanesh Gupte

संकीर्तन यज्ञ

संकीर्तन यज्ञ - कीर्तनासह केलेला यज्ञ म्हणजेच नामस्मरण. या कलियुगात या नामस्मरणाच महत्व तेवढंच आहे जेवढं हजारो वर्षांपूर्वी अग्नि प्रज्वलित करून केल्या जाणाऱ्या यज्ञांच होतं.


यज्ञ म्हणजे काय ?

यमुनेच्या डोहाप्रमाणे खोल असणारा हा विषय मी शक्य तितक्या प्रमाणात साधा, सरळ आणि सोप्पा करून सांगण्याचा प्रयत्न करीन.


सहज सोप्या भाषेत सांगायचं तर कोणीही ढोबळपणे हेच म्हणेल की धार्मिक कार्यासाठी केलेले होम हवन म्हणजे यज्ञ. कोणीतरी प्रकांड पंडित एका यज्ञकुंडासमोर बसून त्यात काष्ठ, तूप, धान्य वगैरे वगैरे घालून त्याला धगधगत्या अग्नि मध्ये रूपांतरित करून त्यासमोर काही मंत्र पुटपुटत असतात. मध्ये मध्ये स्वाहा एवढाच कानांना परिचयाचा शब्द कानावर पडतो आणि त्याचबरोबर यज्ञाला अर्पण केलेली आहुती, असं काहीसं चित्र डोळ्यांसमोर येतं.


बरोबर ! पण का करतात होम हवन किंवा यज्ञ ? काय साध्य होत त्याने ?

लहानपणापासून निरीक्षण केलेल्या, स्वानुभवाने जाणलेल्या आणि अलीकडे आपले भगवद्गीता आणि श्रीमद् भागवत पुराण सारखे पवित्र ग्रंथ वाचून मी जे काही ज्ञान आत्मसात केले आहे त्या ज्ञानाच्या अनुभवाने आणि तत्वांवर आधारित हे विचार मी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करत आहे.


"यज्ञ" हे श्रीहरी विष्णुंचे एक नाव असून धार्मिक कार्यासाठी करण्यात आलेल्या कोणत्याही यज्ञाचे ते परम भोक्ते आहेत. सर्व साधारण लोकांच्या माहितीप्रमाणे "वेद" हे महर्षी व्यासांनी आणि तशाच अन्य काही तथाकथित महर्षींनी लिहिले. हे विधान जेवढे बरोबर आहे तेवढेच अपूर्ण पण आहे. वेद हे मुळात स्वयंभू आहेत आणि ते या सर्व महर्षींच्या अस्तित्वाच्या पूर्वीपासून अस्तित्वात होते. त्यांना स्वयंभू म्हणण्याचे कारण असे ते स्वतः श्रीहरी विष्णुंच्या मुखातून प्रकट झाले आणि सर्वप्रथम ब्रम्हदेवांना कथित करण्यात आले आणि त्यांनी श्रवण प्रक्रियेद्वारे (श्रुति) त्यांना ग्रहण केले. ज्या कलियुगात आपण वावरतो, त्या कलियुगापुर्वी सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग होऊन गेले. त्या प्राचीन काळात विविध कारणास्तव मनुष्याची बुद्धी अत्यंत तल्लख होती आणि अशा असाधारण स्मरणशक्तीच्या बळावर गुरू शिष्य परंपरेतून सर्व ज्ञान गुरूंकडून शिष्याकडे फक्त मौखिक रुपानेच प्रदान करण्यात येत असे. म्हणून "श्रुति-स्मृति" मध्ये वेद हे श्रुति आहेत कारण ते श्रवण प्रक्रियेद्वारे ग्रहण करण्यात आले. त्यानंतर श्रीकृष्णांचे वाङमयीन अवतार महर्षी वेद व्यासांनी त्यास प्रथम लेखी वाङमयात रूपांतरित केले. म्हणून सर्व ग्रंथ साहित्य स्मृति मध्ये गणले जाते कारण मनुष्याच्या स्मृति द्वारे ते रचले गेले.


वेद हे काय आहेत ? आणि त्याचा यज्ञाच्या विषयाशी नक्की काय संबंध आहे ?

परत एकदा, ढोबळपणे सांगायचे झाले तर त्या परब्रम्हाने मनुष्य जीवनाच्या आचार विचारांसाठी सांगितलेली सूत्रे म्हणजे वेद आहेत. जसे की कोणत्याही एका संस्थेमध्ये किंवा कार्यालयांत सर्वसाधारण वर्तवणुकिविषयी जसे नियम असतात, तसेच सर्वसाधारण लोकांचे आचार विचार कसे असावे जेणेकरुन त्यांची अध्यात्मिक प्रगती होईल याचे विविध विषयांमध्ये केलेलं विश्लेषण म्हणजेच वेद आहेत.


पण खऱ्या अर्थाने सांगायचं झालं, तर वेदांचे मूळ उद्देश हे त्या श्रीकृष्णाला जाणून घेणे हेच आहे!

 

श्रीकृष्ण भगवद्गीतेत १५ व्या अध्यायातील १५ व्या श्लोकात म्हणतात


सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।

वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५ ॥


भाषांतर :

मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात.

सर्व वेदांव्दारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.

 

एखाद्या शाळेत जसे आदर्श विद्यार्थी असतात तसेच काही द्वाड विध्यार्थी पण असतात. पण शाळेने लावलेल्या शिस्तीमुळे त्या शाळेच्या चौकटीत का होईना पण सगळेच त्या शिस्तीचे पालन करण्यास बद्ध असतात. त्याचप्रमाणे वेदांमध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार आदर्श समाज कसा असावा याचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


हे वाचताच काही वाचकांना चातुर्वर्ण्य व्यवस्थेस पाठिंबा देणे हे नक्कीच खटकले असणारं आणि काही अंशी ते बरोबर आहे आणि चूक पण.


खटकणे बरोबर एवढ्यासाठी कारण अलीकडच्या (काही शेकडो वर्षांच्या) काळात या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे चार आधारस्तंभ असलेले ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र ही संकल्पना वेदांमध्ये नमूद केल्याप्रमाणे राहिली नाही आणि त्याचे आधुनिक जातिव्यवस्थेत रूपांतर झाले.


चूक एवढ्यासाठी कारण भगवान श्रीकृष्णांनी हे स्पष्ट म्हटले आहे की जन्माने सर्वच क्षुद्र आहेत. पण भक्तीचा मार्ग ज्याने अवलंबला आहे असा चांडाळ (कुत्र्याचे मांस खाणारी जात) कुळात जन्मलेला पण ब्राम्हण होण्यास पात्र आहे.


थोडक्यात सांगायचे झाले तर तत्कालीन ब्राम्हण हे वेदांत फक्त पारंगत नसतं तर त्यांच्याद्वारे केले जाणारे यज्ञ आणि मंत्रोच्चार खूप प्रभावशाली असतं. म्हणून अर्थार्जन न करता फक्त भिक्षुकी करून स्वतःचा उदरनिर्वाह करणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग क्षत्रिय राजांना आणि त्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या राज्याचं कल्याण करणे यासाठी असे. ब्राम्हणांनी अर्थार्जन केल्यास त्यांचेही त्यांच्या पदावरून पतन होणे शक्य असे.

श्रीहरी विष्णू हे यज्ञाचे अंतिम भोक्ते असून बाकी सर्व देव हे त्यांच्या आज्ञेनुसार जीवनावश्यक सामग्रींचा पुरवठा सर्व पृथ्वीला करणे ही त्यांची जवाबदारी पार पाडत असतात. त्यामुळे यज्ञाचा हविर्भाव या सर्वच देवांना मिळणे आवश्यक असते. जेणेकरून हे देव संतुष्ट राहतील आणि कायम आपला कृपावर्षाव या पृथ्वीवर करत राहतील. असे यज्ञ अशा विद्वान ब्राम्हणांशिवाय पार पडणे शक्य नसे कारण यज्ञातल्या त्या मंत्रोच्चारात चुका होणे मान्य नसे. अशा चुकांमुळे त्याचा चुकीचा अर्थ लागून विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यज्ञातून आणि मंत्रोच्चारातून राक्षस प्रकट झाल्याच्या कथा आपल्या पुराणांमध्ये आढळतात.


या ब्राम्हणांचे यज्ञ विना अडथळे पार पडावे आणि समाजास सुरक्षा प्राप्त व्हावी यासाठी क्षत्रिय राजांना शस्त्र उचलणे आवश्यक असे. तसेच समाजाचा आर्थिक विकास व्हावा यासाठी वैश्य समाजाने व्यापार करणे आवश्यक असे. याव्यतिरिक्त ज्यांचा बौद्धिक विकास फारसा झाला नाही अशा क्षुद्रांनीही अर्थार्जन न करता इतर तीन कुळांवर अवलंबून रहावे आणि त्यांची सेवा करून आपला उदरनिर्वाह चालवणे अपेक्षित असे.


आता कोणी म्हणू शकेल की क्षुद्रांना परावलंबी बनवणे हा क्षुद्रांवर अन्याय नाही का ?

इथे हा भाग समजून घेणे गरजेचे आहे ते म्हणजे क्षुद्र ही उपाधी त्यांच्या बौद्धिक क्षमतेमुळे दिली गेली असून बाकी उच्च समजल्या जाणाऱ्या समाजाने त्यांचे कल्याण करणे अपेक्षित असे, ना की त्यांना उपेक्षित म्हणून वागणूक देणे. तसेच त्यांना अर्थार्जन न करू देण्याचे कारण म्हणजे ज्यांची बौद्धिक क्षमता कमी आहेत, असे ते क्षुद्र अर्थार्जन केल्यास त्या संपत्तीचा दुरुपयोग करू शकण्याची शक्यता असे. याउलट ते क्षुद्र आपल्या वैश्य किंवा क्षत्रिय धन्यावर अवलंबून राहिल्यास ते धनी आपल्याकडच्या विपुल संपत्तीचा उपयोग त्या क्षुद्रांच्या पालनपोषणाकरिता योग्यप्रकारे करु शकत.


आजकाल कोणाला फारसे वेदांचे आणि त्यातल्या शिकवणुकीचे ज्ञान नाही. कलियुगात धर्मस्वरुपी बैलाचे चारही पाय अधू झाले असून आता बहुतांश क्षुद्रच राहिले आहेत. म्हणून हातात आलेली संपत्ती वामामार्गवर उधळून स्वतःच्या कर्माने दरिद्री झालेले कर्मदरिद्री पुष्कळ संख्येने पाहायला मिळतात. सध्या खऱ्या अर्थाने ब्राम्हण उपाधी दिली जावी असे ज्ञानी विद्वान ब्राम्हण राहिले नाहीत किंवा एकतंत्री शासन चालवू शकतील असे क्षत्रिय राजे राहिले नाहीत. व्यापार करून वैश्य पुढे गेले आणि लक्ष्मी मातेची पूजा ही तिला प्रसन्न करून अर्थार्जन करणे या एकाच अपेक्षेपुरती मर्यादित राहिली. चंचला नावानेही प्रसिद्ध असणाऱ्या लक्ष्मी मातेला प्रसन्न तर प्रत्येकाला करायचे आहे पण ती स्वतः तिथेच निवास करते जिथे तिचे नारायण पुजले जातात, हे फारसे कोणाच्या ध्यानात येत नाही आणि त्या भगवान नारायणांना भक्तीच्या मार्गाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. वरील वाक्यात भगवंतांना प्रसन्न करणे आणि पुण्य कर्माची फळं उपभोगणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवावे.


आता कलियुगात एकंदर अशी परिस्थिती असताना कोणाच्या सांगण्यावरून यज्ञ, पूजा करताना या गोष्टींची जाणीव असणं आवश्यक आहे. कारण असे यज्ञ करण्यासाठी लागणाऱ्या व्यक्ती, वस्तू आणि विपुल प्रमाणात धन संपत्ती जमवून येणं अशक्यप्राय आहे.


मग यज्ञ करायचेच नाही का ?

याचे उत्तर हो पण आहे आणि नाही पण. नाही एवढ्यासाठी की पारंपरिक पद्धतीने केले जाणारे यज्ञ कलियुगात शक्य नाही पण संकीर्तन यज्ञ नक्कीच शक्य आहे. याच कारणास्तव आपण आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातील इतरत्र ठिकाणच्या संतांची शिकवण आठवली, तर त्यातल्या सगळ्याच संतांनी कर्मकांडास विरोध केला. त्यांनी अभंग रचले, ओव्या रचल्या आणि नामस्मरणाचं म्हणजेच संकीर्तन यज्ञाचे आणि त्यातून भक्तीचे महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न केला.

 
नामस्मरणात तल्लीन झालेले तुकाराम महाराज
 

कधी पंढरपूर मध्ये एकादशीच्या दिवशी पाय ठेऊन बघावं आणि विठूमाऊलीचे दर्शन घ्यायला आतुर झालेल्या त्या वारकऱ्यांचे भक्तिभाव स्वतःच्या डोळ्यांनी पहावे. यज्ञात विद्वान ब्राम्हणांकडून मंत्रोच्चाराव्दारे आहुती स्वीकारणारा श्रीकृष्ण पण तोच आणि युगा-युगांपासून कंबरेवर हात आणि विटेवर उभा राहून भक्तांच कल्याण करणारा श्रीकृष्ण पण तोच !


कारण त्याला कर्मकांडापेक्षा प्रिय आहे ती म्हणजे निस्सिम भक्ती. भगवद्गीतेमध्ये पण कर्मयोग आधी सांगितला आहे आणि भक्तीयोग नंतर. प्रत्येक मनुष्याची कर्मयोगी ते भक्त अशी प्रगती क्रमाक्रमाने होत असते आणि कधी कधी या प्रक्रियेत कित्येक जन्म घ्यावे लागतात. कर्मकांडापासून भक्ती मार्गापर्यंतचा प्रवास म्हणजे अध्यात्मिक प्रगती. भक्त त्याच्या नामस्मरणात रमतो तसा तो श्रीकृष्ण पण त्याच्या भक्ताच्या भक्तीत रममाण होऊन अशक्य ही शक्य करून दाखवणाऱ्या लीला करतो. एखाद्याने वेदांमध्ये उल्लेखलेले मंत्र तंत्र अगदी स्पष्ट उच्चारले तरी जोपर्यंत मनापासून भक्तिभावाने डोळ्यातून अश्रु आले नाहीत तोपर्यंत भक्ती आणि पूजा अपूर्णच राहिली आणि पार पडले ते फक्त कर्मकांड. त्याची फळं म्हणून एकवेळ मुक्ती मिळेल पण भक्ती नाही. अशा मार्गातून मिळालेली मुक्तीसुद्धा कायम राहत नाही, तर त्याला श्रीकृष्णाची मोहमाया परत जीवन मरणाच्या चक्रात परत घेऊन येते आणि तोपर्यंत गुंतवून ठेवते जोपर्यंत भक्तीचा मार्ग आत्मसात होत नाही.

 

श्रीकृष्ण भगवद्गीतेत १८ व्या अध्यायातील ५५ व्या श्लोकात म्हणतात


भक्त्य‍ा मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वत: ।

ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥ ५५ ॥


भाषांतर :

मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो.

अशा भक्तीद्वारे मनुष्य जेंव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेंव्हा तो भगवद् धामात प्रवेश करू शकतो.

 

मग एक प्रश्न असाही पडतो, की, जर यज्ञाचा हाविर्भाव हा अन्य देवतांना पण अर्पण केला जात असे, तर मग नामस्मरण हे फक्त श्रीकृष्ण, श्रीराम अथवा त्यांच्या कोणत्याही रुपाचं/अवताराचं करून संकीर्तन यज्ञ कसा पूर्णत्वास जातो ?

त्याचं उत्तर असं आहे की श्रीकृष्णांना भौतिक लाभासाठी केलेली अन्य देवतांची पूजा मुळीच मान्य नाही. याचा अर्थ असा नाही की अन्य देवतांचा आदर करू नये. पण अन्य देवता या श्रीकृष्णांनी नेमून दिलेली वेगवेगळी पदे भूषवत असतात. जसे इंद्र देवास पर्जन्यवृष्टी नियंत्रित करण्याचे कार्य दिले गेले आहे. पण जेंव्हा श्रीकृष्णांची इच्छा झाली की इंद्राच्या गर्वाचे हरण करावे तेंव्हा त्यांनी गोकुळवसियांना इंद्राची पूजा न करण्याचा सल्ला दिला. जेंव्हा इंद्राने कोपिष्ट होऊन गोकुळास अतिवृष्टी करून शरण आणण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी श्रीकृष्णांनी करंगळी वर गोवर्धन पर्वत उचलून धरण्याची लीला रचली आणि त्याखाली गोकुळवसियांच संरक्षण करून इंद्राच्या गर्वाच हरण केले.

सांगायचे तात्पर्य असे की, सर्व देवता या श्रीकृष्णाच्या विराट रूपाचे विविध अवयव आहेत. श्रीकृष्ण जर एका विशाल वटवृक्षाप्रमाणे आहेत अशी कल्पना केल्यास बाकी देवता ह्या त्या वृक्षाची पाने, फुले, शाखा आहेत. आपण एखाद्या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी त्याच्या मुळास पाणी, खत घालतो. त्याच्या पानांवर आणि शाखांवर पाणी ओतून काय साध्य होणार आहे ?

 
दत्तात्रेयांचे अवतार स्वामी समर्थ त्यांच्या विराट रुपात
 

आपल्याला अशी भीती वाटते किंवा घालून दिली जाते की "तुम्ही तर एक साधारण कर्मी आहात. असे यज्ञ केल्याशिवाय तुम्हाला भगवंत प्रसन्न होणार नाहीत." पण हे साफ चुकीचे आहे. तुम्ही विश्वास ठेऊन एक पाऊल पुढे टाकून बघा तर खर मग तुम्हाला कळेल की त्यांनी तुमच्यासाठी दहा पाऊले पुढे टाकली आहेत. आपण जेंव्हा त्याला आपलं सर्वस्व अर्पण करून शरण जातो तेंव्हाच आपल्याला त्याची अनुभूती येते. आपल्याला परमेश्वराची आलेली अनुभूती म्हणजे आपल्याला त्यांच्या विषयी मिळालेले ज्ञान असते आणि ज्ञान हे दुसऱ्यांबरोबर वाटल्याने वाढते. कमी कधीच होत नाही.

 

श्रीकृष्ण भगवद्गीतेत १० व्या अध्यायातील १० व्या श्लोकात म्हणतात


तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।

ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १० ॥


भाषांतर :

जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो,

ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील.

 
 

मी अलिकडेच या चिमुरड्यांनी १०८ वेळा केलेल्या महामंत्राच नामस्मरण ऐकलं. त्यांच्या जीभेवर जणूकाही सरस्वतीचं बसली आहे, असा काहीसा अनुभव माझ्या वाट्यास आला आणि अश्रू हे सुखं-दुःखं वगळता भक्तिच्या मार्गातही डोळ्यांची वाट धरतात याची प्रचिती पुन्हा एकदा आली !

 

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे॥


Comments


bottom of page