top of page
Writer's pictureNayanesh Gupte

शाळा !

Updated: Mar 19, 2021

हा माझा मराठी मधला पहिलाच ब्लॉग. विषयच असा आला की मराठीत लीहिण्या व्यतिरिक्त दुसऱ्या अन्य कोणत्या भाषेचा विचार करावासाच वाटला नाही. कारण विषयच तसा आहे. शाळा !


मी मराठी शाळेमधून शिकलो आणि आता त्याच शाळेबद्दल विचार मांडायचे म्हणजे अन्य कोणत्या भाषेत लिहून कसे चालेल म्हणा ! २००४ मध्ये १०वी झाली आणि त्यानंतर आज प्रथमच १७ वर्षांनी मी मराठीत चार ओळींच्या पलीकडे काही लिहीत आहे.


तर ! काल सकाळी शाळेच्या WhatsApp group वर काही संभाषण सुरू झाले आणि लॅपटॉप वर काम करता करता मी सहज कटाक्ष टाकला. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे संभाषण आहे म्हणून मी पुढे जाऊन वाचायचे ठरवले. त्यातून असे लक्षात आले की शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक WhatsApp group केलेला आहे. २०० च्या वर माजी विध्यार्थी WhatsApp च्या माध्यमातून आधीच जमा झाल्याचे पाहिले आणि संकल्प काहीतरी मोठा असल्याचा अंदाज आला.


त्या ग्रुप मधल्या शाळेच्या इमारतीच्या छायाचित्राकडे पहाता पहाता मी शाळा सोडून किती वर्ष झाली मोजायला सुरुवात केली. ७ वी नंतर शाळा बदलल्याने शाळा नक्की कोणत्या वर्षी सोडली हे थोड बोटावरच मोजावे लागले. ती बोटावर मोजण्याची शाळेतली सवय अजूनही न गेल्याचे पण तेंव्हाच लक्षात आले. मोजल्यावर लक्षात आले की शाळा सोडून आता २० वर्षे झाली! तो आकडा ऐकून पूर्वीच्या हिंदी सिनेमा मधले संवाद आठवले - "२० साल पहिले..." वगैरे आणि आपले पण वय झाले आहे अशी उगाचच जाणीव झाली.


शिशुवर्ग ते ७वी दरम्यानच्या माझ्या शाळेचे नाव बाळवाडी भगिनी मंडळाची प्राथमिक शाळा क्रमांक १. हे पूर्ण नाव लहानपणी कोणाकडे गेल्यावर त्यांनी "कोणत्या शाळेत जातोस रे?" विचारले की ऐटीत सांगितल्याचे मला आठवते. त्यावर खोचक प्रश्न असायचाच की असे काय रे तुझ्या शाळेचे नाव आणि ते पण एवढे मोठे ! शाळेच्या नावाचा फारसा इतिहास पाठ नव्हता केला कधी, पण एक गोष्ट जी आवर्जून सांगायचो ती म्हणजे आमच्या शाळेत कोणी मास्तर नाहीत सगळ्या बाई आहेत, म्हणून कदाचित भगिनी मंडळ असे नाव दिले असावे. तेंव्हा woman empowerment चे फार काही खुळ नव्हते म्हणा, पण गोष्ट वाखडण्यासारखी नक्कीच होती.

 
दिनांक ६ नोव्हेंबर, २०१८ रोजी घेतलेले छायाचित्र
 

असे आठवता आठवता शिशुवर्गापासून ते ७ वी पर्यंतच्या बऱ्याचशा आठवणी सिनेमामध्ये flashback दाखवतात तस म्हणता म्हणता डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. शिशुवर्ग या शब्दाची फोड शिशु वर्ग अशी आहे आणि शी शु वर्ग अशी नाही हे बहुतेक पाहिलीत आल्यावर लक्षात आले होते. त्यामुळे शिशुवर्गतल्या फारश्या आठवणी न सांगणेच बरे !

पहिली ते चौथी हा बऱ्यापैकी खेळण्या बागडण्यातच गेला. पण काही गोष्टी आठवतात. जसे की पहिलीच्या वर्गशिक्षिका ब्राम्हणगावकर बाई, दुसरीच्या स्वामी बाई आणि तिसरीच्या सावंत बाई, चौथीच्या पवार बाई आणि पाचवी ते सातवी अशी ३ वर्ष आम्हाला सहन केलेल्या पाबळे बाई. पहिलीमध्ये आम्ही पाटावर बसत असू, दुसरीमध्ये बाकडे आले, तिसरी मध्ये पेन्सिल पासून पेन वापरण्यावर प्रगती झाली. इयत्तेबरोबर तळ मजला ते दुसरा मजला अशीपण काही प्रगती झाली होती माझ्या दृष्टीने.

शाळा सुरू व्हायची घंटा वाजली की पळत पळत जागेवर येऊन प्रार्थनेसाठी हात जोडून उभे रहाणे हा नित्याचा नियम. आजही ऑफिसला आणि ऑफिसच्या मीटिंग ना वेळेत हजर राहण्याच्या शिस्तीचा प्रारंभ त्या "प्रारंभ विनंती करू गणपती..." च्या प्रार्थनेला वेळेत हजर राहण्यापासूनच झाला. त्या मागे अजूनही बाकी प्रार्थना, राष्ट्रगीत आणि मधली सुट्टी झाली की "वदनी कवळ घेता..." अशी सगळी पाठांतर करण्याची सवय तिथून लागली. ही फक्त पाठांतरची प्रक्रिया नसून आपल्या संस्कृतीची जडण घडण होत होती. आणि त्याबरोबच आम्ही घडले जात होतो. तुकोबांचे अभंग, ज्ञानोबांचे पसायदान, समर्थ रामदासांचे मनाचे श्र्लोक अशी कित्येक पाठांतरे घोकून घोकून केली. त्यातली काही अजूनही लक्षात आहेत. कधी YouTube वर suggestions मधून हे अभंग, श्लोक जेंव्हा वाजू लागतात, ओठ त्यांची साथ कधी पकडतात कळतच नाही आणि अजूनही लक्षात आहे! हे विचार करून माझे मलाच आश्चर्य वाटते.


माझ्या मते शाळेत लावल्या जाणाऱ्या या शिस्तीला आणि मूल्य शिक्षणाला फार महत्त्व असते. घरी पालकांनी आपल्या पाल्याला शिस्तीचे कितीही धडे दिले तरी शाळेत लावली गेलेली शिस्त आणि संगत ह्याला फार वेगळे महत्व आहे. चार मुलांत मिसळायला लागल्यावर खरी शिस्त काय ते चटकन दिसून येते. बाहेर कुठे बेशिस्त वर्तन करताना आढळल्यास - "घरी आणि शाळेत तुला हेच शिकवतात काय रे!!!!" असा पटकन शेरा मारला जात असे. अजून काही महिन्यांत मला माझा मुलगा, अयांशला, शाळेत घालायची वेळ येईल आणि त्या गोष्टीचा विचार करून मला पहिले माझी शाळा आठवते ती याच कारणांमुळे. शिस्त आणि मूल्य. बाकी पुस्तकी ज्ञान हे काय कोणत्याही शाळेत मिळेलच. आजकाल शाळेची फी सुद्धा तशीच घेतात म्हणा. पण शाळेमध्ये पुस्तकी ज्ञान घेण्यासाठी म्हणून गेल्याचे मला कधीच आठवत नाही. तशी सगळ्याच पालकांची अपेक्षा असली तरी काही आदर्श विद्यार्थी वगळता असा विचार करून कोणी शाळेच्या पायऱ्या चढल्याच माझ्यातरी स्मरणात नाही आणि मी सुद्धा त्याला कधीच अपवाद नव्हतो. आता पुढे जाऊन मी हीच गोष्ट माझ्या मुलाला न सांगितलेलंच बरे राहील, तो मुद्दा वेगळा.


शाळेत कशासाठी जायचे मग ?

माझ्यातल्या खोडकर मुलाचे खर खर उत्तर सांगायचे झाले तर, शाळा सुरू झाली की मधल्या सुट्टीची वाट पहायची, की जेणकरुन आम्ही खादाड बोके सगळ्यांच्या डब्यावर तुटून पडू, शाळेच्या अंगणात मनसोक्त खेळू शकू आणि मधली सुट्टी संपली की शाळा सुटण्याची वाट पहायची म्हणजे घरी जाऊन परत खेळायला मोकळे!


कधी एखादा मोकळा तास मिळणं ही पण एक आठवड्याच्या मध्ये आलेल्या सुट्टीसारखी आनंदाची बाब होती. या मोकळ्या तासाला वर्गाचा मॉनिटर म्हणून रुबाब दाखवण्याची संधी म्हणजे शिवरायांनी त्यांच्या मावळ्यांवर टाकलेल्या जबाबदारी सारखे वाटे. मग संधी साधून "ए आवाज नका करू रे! नाहीतर नाव लिहीन!" अशा काहीतरी फुशारक्या मारायच्या आणि पुढच्या तासाला कामगिरी चोख बजावली आहे असे दाखवून नाव लिहिलेली वही बाईंच्या समोर करायची!

शाळेत बसायच्या जागा ठरवून दिल्या जात त्यामुळे कायम "back bencher" ही पदवी फार काळ रहाणे शक्य नव्हते पण जेंव्हा कधी संधी मिळत असे तेंव्हा आमच्यातला संधी साधू फुल्ली गोळा, नाव-गाव-फळ-फूल, पेन-पेन इत्यादी खेळ खेळणे किंवा अंगातला चित्रकार जागृत झाला असल्यास वहीच्या शेवटच्या पानावर पेन-पेन्सिल घेऊन चित्रे रेखाटने अशी काही "विशेष" पुरस्कारास पात्र संधी सोडत नसे.


अशा बऱ्याचशा "पुरस्कारांसाठी" कधी कधी मुख्याध्यापिका (कै.) गुप्ते बाईंच्या कक्षातून बोलावणे येत असे. त्यांच्या "कोमल" आवाजातील उपदेशाने आणि कधी हातावर दिलेल्या "प्रसादाने" किंवा पाठीवर मिळालेल्या "शाब्बासकीने" मन अगदी भरून येत असे!


पण काळाच्या पडद्याआड जाऊन थोडा अजून विचार करून सांगायचे, तर जस जस पुढील इयत्तांमध्ये "प्रगती" होऊ लागली, तसे शाळेत जाण्यासाठी अधिक कारणे मिळू लागली. उदाहरण सांगायचे झाले तर पाचवी मध्ये असताना संगणकाशी तोंडओळख झाली. त्यावेळी संगणक हाताळायला मिळणारे शाळा हे एकमेव माध्यम होते. Personal Computer हा घरी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षी घरात आला. सध्या मी एका सॉफ्टेअर कंपनी मध्ये अभियांत्रिकी व्यवस्थापक ( Software Engineering Manager at AJIO - Relience Retail ) म्हणून नोकरी करतो पण प्रोग्रामिंगचा "Basic" नावाचा पहिला धडा या शाळेतच गिरवला. बाकी संगणकाच्या प्रात्यक्षिकांच्यावेळी प्रात्यक्षिक आटोपून वेळ मिळाला की "जरा Game खेळण्यास देता का?" ही पण एक वेगळीच मागणी असायची आणि त्या बाईंनी खेळू द्यायला तयार होणं ही वेगळीच पर्वणी!


शाळेने अजूनही खूप उपक्रम चालवले आणि त्या सगळ्या उपक्रमांतून खरी आमची जडण घडण झाली. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे अशा उपक्रमांची जत्रा असे. वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, चित्रकला, नाटके, काव्यवाचन, वेशभुषा, नृत्य आणि कबड्डी, खो खो, Running सारखे काही खेळ, कधी रानडे काकांचे कथाकथनाचे मार्गदर्शन, कधी कुलकर्णी काकूंनी सांगितलेल्या स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी असे अनेक उपक्रमांतून शाळेने केलेल्या जडणघडणीमुळे आमच्या पैकी खूप जणांची व्यक्तिमत्वे पुढे विकसित झाली. शाळेने आयोजित केलेल्या वृक्षदिंडी, शोभायात्रा, पथनाट्ये यांमध्ये आपली प्रमुख भूमिका असो वा नसो त्यांमध्ये सहभाग घेऊन उनाडक्या करायला जाण्याचा आनंद वेगळाच असायचा. कधी कधी घरून "लष्कराच्या भाकऱ्या भाजायला कशाला जातोस!" असे टोमणे मिळायचे पण ते चालायचंच!


खास करून माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर, मी पाचवीत असताना शाळेने मराठी विज्ञान परिषदेचे वर्ग शाळेत भरवण्यास सुरुवात केली. श्री. भ. द. चक्रदेव हे उल्हासनगरच्या चांदिभाई महाविद्यालयाचे M.Sc. चे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक हा वर्ग चालवत. त्यांच्या भौतिक शास्त्राच्या प्रयोगातून खरी विज्ञानाची गोडी निर्माण झाली. पुढे जाऊन याच माध्यमाद्वारे मला पहिल्यांदा आंतरशालेय वक्तृत स्पर्धा, कथाकथन, विज्ञान प्रदर्शन अशा विविध उपक्रमात पारितोषिके मिळाली. आज ऑफिस मध्ये आणि इतरत्र जेंव्हा असे सादरीकरण करायची वेळ येते तेंव्हा यत्किंचतही कोणासमोर उभे रहायची भीती वाटत नाही आणि तेंव्हा त्याचे श्रेय या शाळेद्वारे चालवल्या गेलेल्या उपक्रमांना द्यावेसे वाटते.

या व्यतिरक्त स्कॉलरशिप, होमी भाभा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, इत्यादी अनेक स्पर्धा परीक्षांकरिता मार्गदर्शन शाळेतून कायमच मिळतं राहिले. यांपैकी कोणत्याही परीक्षेत काही विशेष गुण उधळले नाहीत पण परीक्षांचा बाऊ आणि भीती भविष्यात कधी राहिली नाही.


शाळा तेंव्हा ७वी पर्यंतच असल्यामुळे, ७ वी नंतर बदलणे भाग होते. ७ वीचा निकाल लागला आणि निकालात नाही निघालो हे ऐकून बरे वाटले. पण एका बाजूला ही शाळा सोडून जायचं विचार करून नेहमी वाटायचे की हीच शाळा पुढे १०वी पर्यंत असती तर किती बरे झाले असते! पुढे काही वर्षांनी शाळा १०वी पर्यंत झाल्याचे कानावर पडले आणि परत त्याच विचारांनी मनात घर केलं की हे भाग्य आम्हला का नाही लाभले?


अशा कित्येक आठवणींची शिदोरी आजही जवळ आहे आणि उघडली की संपता संपत नाही.

 
ज्यांच्या हातून आम्ही घडलो, याच त्या आमच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका !
 

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुप मध्ये सहभागी झालो आणि शाळेला आर्थिक मदतीची गरज आहे कळलं. आपल्या शास्त्रांमध्ये म्हंटल्याप्रमाणे आई-वडील, शाळा आणि गुरूंचे ऋण हे कधीही न फेडता येण्यावढे मोठे असते. शाळेला आर्थिकदृषट्या का होईना ही मदत करायला मिळालेली संधी म्हणजे शाळेचे ऋण फेडण्यासाठी मिळालेलीच एक संधी आहे.

नुकतीच शाळेला ५० वर्षे आणि मंडळाला ७० वर्षे पूर्ण झाली. शाळेची इमारत ही शाळा सुरू झाल्यापाून टप्प्या टप्प्याने, गरजेनुसार बांधण्यात आली असल्याने आता तिचे पुनर्निर्माण करणे आवश्यक आहे. या पुनर्निर्माणासाठी २ - २.५ कोटींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


हा लेख कोणी माजी विद्यार्थ्यांच्या वाचनास आल्यास त्यांनी शाळेच्या सध्याच्या शाळा क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका सौ. निपूर्ते बाई (+919867876541) किंवा शाळा क्रमांक २ च्या मुख्याध्यापिका सौ. गोडसे बाई (+918793841580) यांच्या संपर्कात रहावे. शाळेचे उद्दिष्ट खूप मोठे असले तरी माजी विद्यार्थ्यांनी उचललेला खारीचा वाटा हा शाळेला आणि इतर मोठया स्वरूपात मदत करणाऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन करणाणारा ठरेल.


शाळेच्या बँक खात्याचे तपशील खालीलप्रमाणे

Bank name : State Bank Of India .

Branch : Ambarnath

A/C No : 30086381378

IFSC : SBIN0001040


ता. क.

वरील लिहिलेल्या लेखावर लिहून झाल्यावर नजर फिरवली आणि "माझी शाळा" या विषयावर निबंध लिहिल्यासारखे वाटले. गोडसे बाई किती गुण देतात ते बघावे लागेल.


709 views4 comments

Recent Posts

See All

4 Comments


chakradeobd
Mar 19, 2021

Very nice article


Thanks for sharing.

Like
Nayanesh Gupte
Nayanesh Gupte
Mar 19, 2021
Replying to

Thank You Sir ! 🙂

Like

Aditya Deshpande
Aditya Deshpande
Mar 18, 2021

नयनेश, सुंदर लिहिलं आहेस. 👌👌

Like
Nayanesh Gupte
Nayanesh Gupte
Mar 18, 2021
Replying to

धन्यवाद ! आदित्य 🙏

Like
bottom of page