"तो" चराचरात व्यापलेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात "त्याच" वास्तव्य असल्यामुळे "तो" आणि फक्त "तोच" आपला "Soul Mate" किंवा खऱ्या अर्थाने "सुहृद" आहे. आपल्या मनातलं प्रत्येक गुपीत "तो" जाणतो. पण "खरंच असं होतं का?" असा विचार ब्रह्म देवांच्या मनात आला आणि त्यांच्या मनातला तो विचार ओळखून कान्हा खुदकन हसला. आता नवीन लीला करण्याची वेळ आली होती.
त्याच्या लडिवाळ खेळण्या बागडण्याने अवघ्या गोकुळाच नंदनवन झालं होतं. गोकुळात असं कोणतंही घर नव्हतं जिथे त्या कान्हाला पाहून तिथल्या गोपिकांच मातृ वात्सल्य जागृत होत नव्हतं. नंद महाराजांच्या घरात दुधासाठी जेंव्हा बाळ कृष्णाच्या रुदनाचा आवाज जेंव्हा ऐकू येई तेंव्हा तिथल्या मातांनाच काय तर गोठ्यात गाईंना सुद्धा पान्हा फुटे. ती गोमाता सुद्धा हंबरडा फोडून त्याला साद घालत असे - "रडू नको कृष्णा मी दूध देते!" प्रत्येकीला वाटे, कुष्णाला आपल्या छातीशी कवटाळून त्याला दुध पाजावं. या प्रत्येकीच्या हृदयातलं मातृ वात्सल्य भाव कृष्ण जाणून होता. संधी तो प्रत्येकाला देणार होता. फक्त ती लीला करायची योग्य वेळ यायची वाट पहात होता. ज्याने पुतना सारख्या राक्षसीणीला सुद्धा तिच्या मनातली क्रूर ईच्छा जाणूनही तिला स्तनपानाचा अधिकार नाकारला नाही तिथे या प्रेमळ आईच्या मनाला तो कसा नाकारू शकत होता?
कान्हा मोठा होऊ लागला होता. पण अजूनही त्या अल्लड गोपाळाला खेळून दवडून आलं की आईच्या दुधाची आसं होतीच. राम आणि कृष्ण आपल्या छोट्या छोट्या सवांगड्यांना घेऊन वनात छोट्या वासरांना चरायला घेऊन जात असे. वासरांना मोकळं करून मग यांचा खेळ रंगात येई. कधी सुरपारांब्या तर कधी आंधळी कोशिंबीर तर कधी नुसतीच पकडापकडी. कृष्णाच्या मागे पुढे पळण्यातला सर्वोच्च परमानंद ते बाळ गोपाळ अनुभवत होते. कधी ते त्याच्या आणि रामाच्या भोवती फेर धरून नाचत आणि "हरे रामा हरे कृष्णा" चा जयघोष त्या वनातल्या सर्व दिशा दुमदुमून टाकत असे. कधी खेळून दमून भागून झाडाखाली बसलेल्या त्या बाळ गोपळांसाठी तो मधुरापती मधुर बासरी वादन करत असे आणि सगळी पोरं तिथेच झोपून जात. तोपर्यंत त्या सर्वांच्या वासरांवर कृष्णाचं अगदी बरोबर लक्ष असे. बलराम आणि कृष्णाच्या संगतीत दिवस कसे एकदम मजेत चालले होते.
आता ती घटिका येऊन ठेपली होती. बाळ गोपळांसोबत कान्हा वनात वासरांना चरायला घेऊन आला. वासरांना मोकळं सोडून, पोरांचा अल्लडपणा सुरू झाला. थोड्याच वेळात दमून भागून बसलेल्या सर्वांनी आपापली शिदोरी काढली आणि वनभोजन करायला म्हणून बसलेच इतक्यात गलका झाला. "अरे कान्हा!! आपली वासरं! कुठे दिसत न्हाईत रे! कुठं गेली??". कान्हाच्या हातातला घास हातातच राहिला! सगळी पोरं चिंतेने व्याकुळ. आता काही खरं नाही. "कुठे भरकटली असतील तर कुठून शोधून आणायचं आता त्यांना." अवघ्या ५ वर्षांच्या त्या जीवांना भेडसावणारा तो प्रश्न पाहून कान्हा हातातला घास तसाच ठेऊन उठला. आपल्या सवांगड्यांच्या डोळ्यात पाणी असताना त्याच्या घशातून तो घास असा कसा खाली उतरणार होता? तरी त्यांची काळजी दूर व्हावी म्हणून तो घास हातात घेऊन कान्हा तसाच उभा राहिला. बाकीच्या बाळ गोपाळांना उद्देशून म्हणाला, "तुम्ही काळजी कशाला करता! मी आहे ना! तुम्ही घ्या भोजन उरकून. मी आलोच त्यांना घेऊन!" है
सर्व सवांगड्यांना मागे सोडून कान्हा एकटाच पुढे निघाला. गर्द झाडी आणि हिरवळीने नटलेल्या त्या वनात जणू काही त्याची आतुरतेने वाटच पाहिली जात होती. त्याला वासरं काही कुठे दिसेना. त्याने शोध शोध शोधलं. सगळीच त्याची लीला. ब्रह्मदेव हे सगळं पहात होते आणि "श्रीहरी फसले!" असं समजून मनोमन हसून गंमत पहात होते. पण कोण कोणाची गंमत पहात आहे हीच खरी गमतीची गोष्ट होती. चहू दिशांना पाहून पण वासरं कुठेही न हुडकली नाही म्हणून कान्हा हताश होऊन मागे वळला. आता आपल्या सवंगड्यांना काय तोंड दाखवू म्हणून त्याचं तोंड पण इवलुस झालं होतं. परत येऊन बघतो तर काय सगळे सवंगडी गायब. आधी वासरं आणि आता मित्र असे एकाएकी नाहीसे होणं हे कोणाचं तरी मायाजाल असावं आणि कोणाचं हे सुद्धा खरंतर तो चांगलंच जाणून होता. नाहीतर त्याने आधीच बासरी वादन सुरू केलं असतं तर सगळी वासरं कशी तुरुतुरु धावत आली असती. नाही का?
आता कान्हा काय करणार? ब्रह्मदेव खूप उत्सुकतेने पहात होते. पण कान्हा सरळ गोकुळाकडे वळला. वाटेत काय झालं कोणालाही काही कळलं नाही पण सगळी पोरं आणि वासरं घरी पोहोचली. जशी आपली पोरं घराच्या दिशेने येत आहेत हे त्यांच्या मातांनी पाहिलं त्या सगळ्यांचा वात्सल्य भाव जागृत झाला. गोठ्यातील गाईपासून ते घराघरातल्या आईला पान्हा फुटला. "दमला असाल ना रे बाळांनो!" म्हणून त्यांनी त्या चिमुकल्यांना दूध पाजून मग न्हाऊ घातले. मग त्यांना खाऊ पिऊ घालून निजवले. गोठ्यात गाई पण आपल्या वासरांना चाटून पुसून त्यांच्या त्यांच्या परीने न्हाऊच घालत होत्या. आज ती वासरं पण त्यांच्या आईच्या कुशीत शिरून शिरून निजली.
ब्रह्मदेवांना काहीच कळत नव्हत कारण सगळी वासरं आणि बाळ गोपाळ त्यांनी एका गुहेत चिरनिद्रेत बंदिस्त करून ठेवले होते. मग प्रश्न होता की "गोकुळात आहेत ते कोण ? आणि आपल्याकडे आहेत ते कोण? बरं जर गोकुळातील बाळ गोपाळ आणि वासरं खरी नाहीत म्हणावं तर त्यांच्या आयांनी त्यांना ओळखलं कसं नाही? प्रत्येक आई आपलं बाळ ओळखतेच. हे काय होतंय?". दिवसामागून दिवस जात होते. ब्रह्मदेव रोज निरीक्षण करत पण त्यांना काहीच कळायला मार्ग नव्हता की इथे नक्की खेळ कोण खेळत आहे?
म्हणता म्हणता एक वर्ष सरलं. आता काही ब्रह्म देवांना राहवेना. आपली काहीतरी चूक झाल्याचं त्यांना जाणवतं होतं. त्या अल्लड बाळ गोपाळाला आपण सामान्य बालक समजून चूक केली होती याची त्यांना आता खंत वाटू लागली. खरं तर त्या कृष्णाच्या प्रेमाच्या मायाजालात ते अगदी अलगद अडकले होते. आता त्या गोपाळा समोर शरण जायची वेळ आली होती. अनाकलनीय, अतर्क्य लीला जाणून घ्यायची वेळ आली होती.
योग्य वेळ साधून श्रीकृष्णाला शरण जाव म्हणून कान्हा वासरं घेऊन पुन्हा जेंव्हा त्याच वनात क्रीडा करत होता. तेंव्हा त्याला एकांतात गाठून ब्रहमदेव कृष्णा समोर प्रकट झाले आणि नतमस्तक झाले. पण कान्हा तो कान्हाच! त्याचा खोडकर स्वभाव तो असा कसा सोडेल. आपण काही जाणतच नाही अशा आविर्भावात तो ब्रह्मदेवांकडे पहात राहिला. ब्रह्मदेवांना आता न राहवून त्यांनी आपल्या कृत्याची कबुली दिली आणि आपण साक्षात कृष्णाची परीक्षा पाहण्याची चूक केली याबाबत दिलगिरी व्यक्त केली. पुढे शरण जावून कृष्णाने ही काय अजब माया आहे ती उलगडून सांगावी प्रार्थना केली.
आता मुकुंद मोहन हसला. त्याने वर्षभर सर्वांनाच घातलेली मोहिनी आवरती घेत त्यांनी सर्व मित्र आणि वासरं त्याच्या आजूबाजूला गोळा केली. म्हणता म्हणता त्या सर्वांच्या जागी अत्र तत्र सर्वत्र कृष्णच कृष्ण दिसू लागला.
प्रत्येकाच्या हृदयात स्थित तो प्रत्येकाला जेवढ्या जवळून जाणतो तेवढं इतर कोणीही जाणू शकत नाही. त्याला कोणाचंही रूप घेणं सहज शक्य होतं. कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या प्रत्येक जण त्याच्याशी एकरूप होऊन जातो. त्याची ईच्छा झाली म्हणून आपण निमित्तमात्र असतो. बाकी सगळं काही तोच असतो. त्याने ब्रह्मदेवांना निमित्तमात्र करून गोकुळातील प्रत्येक आईची ईच्छा पुर्ण केली होती. त्याने हे दाखवून दिलं होतं की - "काय झालं मी तुझ्या समोर उभा नाही राहिलो तर! तू मला शरण जातोस तेंव्हा तुझ्या अंतर्मनातील तुला मार्गदर्शन करणारा आवाज मीच आहे! तू माझ्या मायेच्या बंधनात अडकून इतर लोकांत स्वतःचा सुहृद शोधत भटकत फिरत राहतोस पण अरे वेड्या तुझा "परम मित्र, तुझा Soul Mate" "मी" नेहमीच तुझ्या सोबत आहे! हाक मारून तर बघ!"
म्हणून डोळे बंद केले आणि त्याला साद घातली. तो खुदकन हसला आणि मी पण!
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Comments