आपल्याकडे बहुतांश कुटुंबांमध्ये अध्यात्मिक जीवनाची वाटचाल आपण लहान असताना देवासमोर हात जोडण्यास शिकतो तिथपासून होते. "बाप्पा जय जय" असं तोडकं मोडकं का होईना हळू हळू शब्द फुटायला लागतात. गेल्या डिसेंबरपूर्वी अयांश पण जसा हळू हळू शब्द उच्चारायला लागला, तेंव्हा आम्ही त्याला देवासमोर हात जोडायला शिकवायचा प्रयत्न केला, पण त्याने आम्हाला फारसा काही प्रतिसाद दिला नाही आणि आम्ही पण त्याला जास्त आग्रह केला नाही.
आकांक्षाचा अध्यात्मिक प्रवास माझ्या आधीच सुरू झाला होता. तिने अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची नियमित साधना करणे सुरू केले होते. जणू काही तिला स्वतः स्वामींनीच दृष्टांत दिला होता. तत्पूर्वी तिलाही स्वामींची तशी कधी अनुभूती नव्हती आली पण सरत्या काळानुसार तिची अध्यात्मिक प्रगती झाली आणि तिला स्वामींच्या भक्तीचे स्वानुभव आले.
स्वामी म्हणजे साक्षात दत्तगुरूंचे (श्रीकृष्णांचे) अवतार.
भगवद्गीतेच्या ४ थ्या अध्यायातिल ८ व्या श्लोकात श्रीकृष्णांनी म्हंटले आहे -
परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थानार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ८ ॥
भाषांतर :
भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो.
अशाच एका संध्याकाळी ऑफिसची काम आटोपुन आम्ही टीव्ही वर भजन, गाणी ऐकत, अयांशशी खेळत, एकीकडे जेवणाची तयारी करत असताना आमच्या गप्पा चालू होत्या. गप्पा मारता मारता मध्येच आकांक्षाने विषय काढला, "आपण आपल्या लग्नाच्या वाढदवसानिमित्त अक्कलकोटला जायचे का?". तिच्या या प्रस्तावावर फारसा विचार करण्यात वेळ न दवडता मी लगेच माझी संमती दर्शवली. आमचा लग्नाचा वाढदिवस २५ डिसेंबरला असतो. योगायोगाने त्याच दिवशी वैकुंठ एकादशी आणि गीता जयंती सुद्धा होती. पण आम्ही प्रवासाचे नियोजन करण्यास घेतले त्या क्षणी याबद्दल आम्हाला काही कल्पना नव्हती. आकांक्षाचा भाऊ, अमेय ने सुद्धा आमच्या सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली आणि अशाप्रकारे आम्ही चौघांनी आमच्या गाडीने एकत्र अक्कलकोटला जायचे ठरले.
२४ डिसेंबर, २०२० रोजी बँगलोरच्या (कु) प्रसिद्ध रहदारीला चुकवत पहाटे ०५:३० लाच आम्ही घर सोडले. पुढचा बँगलोर ते सोलापूर हा ९-९:३० तासांचा प्रवास आम्ही कुठलाही मोठा मुक्काम न करता सलग पार पाडला. मधल्या रस्त्यात पेटपुजा करण्यासाठी काही विशेष पर्याय न मिळाल्याने आम्हाला तसं सलग प्रवास करणं अनिवार्य होत. प्रवासाने थकल्यामुळे पुढचा उरला सुरला दिवस आम्ही सोलापूरला आमच्या हॉटेल वर आराम करण्यातच घालवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारी आटोपुन आम्ही गाडीत बसलो आणि Google Maps ला स्वामींच्या मठाचा पत्ता विचारला. अक्कलकोटला स्वामींचे २ मठ आहेत. एक वटवृक्ष मठ, जिथे स्वामी ध्यान लाऊन बसत आणि दुसरा समाधी मठ जिथे स्वामींचे निस्सीम भक्त चोळप्पा महाराज यांच्या वाड्याच्या आवारात महाराजांनी समाधी घेतली. Google Maps ने आम्हाला समाधी मठास घेऊन जायचे ठरवले. खरं सांगायचं तर स्वामींचीच इच्छा !
स्वामींना बेसन लाडू आवडत म्हणून आम्ही घरून स्वतः लाडू बनवून जायचे ठरवले होते. आकांक्षा, अमेय आणि मी असा आमच्या तिघांचाही हातभार लागून तयार झालेले ते लाडू आम्ही शक्य तितकी काळजी घेऊन डब्यात घट्ट बंद करून स्वामींना अर्पण करण्यास आणले होते.
आम्ही मठात शिरलो तेंव्हा केदार गुरूजींनी आम्हाला पुढे बोलावून घेतले. केदार गुरुजी म्हणजे स्वामीभक्त चोळप्पा महाराजांची पाचवी पिढी. आम्ही लाडू पुढे करताच त्यांनी आम्हाला एक प्रश्न आवर्जून विचारला तो म्हणजे "लाडू कोणी केले ? म्हणजे तुम्ही केले की विकत घेतले?". त्यांच्या या प्रश्नामागे एक विशेष प्रयोजन होते जे त्यांनी आम्हाला लगेच स्पष्ट करून सांगितले -
"आपण लाडू वळतो तेंव्हा आपल्या हातावरच्या भाग्यरेषा त्या लाडवांवर उमटतात आणि तेच लाडू आपण जेंव्हा स्वामींना अर्पण करतो तेंव्हा एकाप्रकारे आपलं भाग्य त्यांना अर्पण करून प्रार्थना करतो की आमचे सर्व कर्म या लाडवांसोबत अर्पण करत आहोत. त्या कर्मांची फळ देणं आता त्यांच्या हातात!"
म्हणून स्वामींना अर्पण करायचे लाडू स्वतः करण्याला महत्व आहे.
भगवद्गीतेच्या ९व्या अध्यायातिल २७व्या श्लोकात श्रीकृष्णांनी म्हंटले आहे -
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥
भाषांतर :
हे कौंतेया! तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस तू जे तप करतोस, ते तू सर्व मला अर्पण कर.
या दरम्यान आम्ही तिघेही अयांशच्या मागे आळीपाळीने पळत होतो. अचानक आमच्या कोणाच्या ध्यानी मनी नसतानाही अयांश ने "जय जय" असे म्हणून पहिल्यांदाच हात जोडले. त्याला असं करण्याची बुद्धी अचानक कशी काय झाली हा विचार करून आम्ही हैराण झालो आणि आम्ही सुद्धा परत एकदा "स्वामी जय जय 🙏🏼" करून हात जोडले.
असेच केदार गुरुजींकडून अजून नवीन ४ गोष्टी समजून घेता घेता अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे पहाटे काकड आरती नंतर रुद्राभिषेक करण्याबाबत. हातात वेळ असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता काकड आरतीला परत यायचे ठरवून आम्ही गुरुजींचा निरोप घेतला आणि सोलापूरला परतलो. पहाटे ४ वाजता काकड आरतीला हजर रहायचे म्हणजे सोलापूरहून किमान ३ वाजता तरी निघणे आले आणि त्यासाठी शुचिर्भूत होऊन जायचे म्हणजे २ वाजता उठणे आले. अशी सगळी आकडेमोड करून आम्ही लौकर निजायचे ठरवले. तरी मनात थोडी शंका होतीच की, "अयांश उठेल का एवढ्या पहाटे?". खर तर मध्यरात्रीच म्हणायला हवे. पण मग शेवटी या शंकेचे समाधान आम्ही स्वामींवर सोपवून ठरल्याप्रमाणे झोपी गेलो. स्वामींना कधी आणि कोणी भेटावे हे ते ठरवतात, ते आपल्या हातात थोडीच असते!
२ वाजता गजर वाजला आणि मी अर्धवट झोपेत केदार गुरुजींचा मेसेज आल्याचे पहिले. त्यांनी महाराष्ट्र शासनाने पाठविलेल्या सूचनेची प्रत पाठवली होती. त्यात असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते की -
"अक्कलकोट समाधी मठ, वटवृक्ष मठ आणि अन्नछत्र दिनांक २४/१२/२०२० रात्री १२:०० वाजल्यापासून ते दिनांक ०२/०१/२०२१ रात्री १२:०० पर्यंत वाढत्या कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे बंद ठेवण्यात येईल.".
ही सूचना आम्ही दिनांक २६/१२/२०२० रोजी पहाटे २:०० वाजता वाचत होतो आणि दिनांक २५/१२/२०२० रोजी आमचे अगदी व्यवस्थित दर्शन घेऊन झाले होते. आम्हाला परत एकदा आश्चर्याचा धक्काच बसला! स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून एवढ्या लांबून येऊन जर दर्शन झाले नसते, तर पदरी पडू शकलेल्या निराशेची कल्पनाच करवत नव्हती.
त्या क्षणी मनात एकच विचार आला -
" अशक्य ही शक्य करतील स्वामी!" 🙏🏼
रुद्राभिषेक करणं जरी आता शक्य होणार नसले तरी हा विचार करून आम्ही धन्य झालो की, या परिस्थितीतही स्वामींनी दर्शन दिले. आम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा ठेऊन आलो होतो ती आम्हाला मिळाली होती. वेळेच्या आधी आणि नशिबात असते त्यापेक्षा जास्त कोणालाही काही मिळतं नाही. प्रश्न आशीर्वादाचा असला तरी अजून लोभीपणा करू नये, असा विचार करून आम्ही आमची गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईच्या दिशेने पळवली!
Comments