ओढ !
२६ फेब्रुवारी, २०२१ रोजी आम्ही स्वामींच्या दाभोळे, रत्नागिरी येथील स्वयंभू पादुका मठास भेट दिली आणि त्या क्षणापासून मठाला परत भेट देण्याची ओढ लागली. आमचा प्रवास आटोपून आम्ही बँगलोरला घरी परतल्यावर मी मठाचे सर्वेसर्वा सिनकर (भाऊ) काकांना फोन लावला आणि १४ एप्रिल, २०२१ रोजी स्वामींच्या प्रकटदिनीच्या सोहळ्यात सहभागी होण्याची आमची ईच्छा व्यक्त केली. भाऊंनी ताबडतोब "स्वामींचा प्रकटदिनाचा अभिषेक तुमच्या हातून करू" असे म्हणून आमच्या वास्तव्याला येण्याची पोचपावती दिली.
जसजशी जायची तारीख जवळ येऊ लागली तशी आमची उत्सुकता शिगेला पोहोचली. लग्न झाल्यापासून आणि अयांशच्या जन्मनंतरही आम्ही खूप भटकंती केली आहे पण या सगळ्या भटकंतीमध्ये एक गोष्ट कायम होती, ते म्हणजे आमचा सुखसोयींनी पूर्ण अशा हॉटेल मधले वास्तव्य. ज्यामध्ये वातानुकूलित यंत्रणा, इंटरनेट, उत्तम जेवणाची सोय, झोपण्यास मोठा दिवाण, इत्यादी अनेक सोयीसुिधांचा समावेश असे. याऊलट मठापासून किमान ५०० मी.च्या परिसरात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच घर वगळता इतर घरेही पाहिल्याचे माझ्या तरी स्मरणात नव्हते. मठाची वास्तु चिरेबंदी आहे. चिऱ्याच्या भिंतींना माती थापलेली, मठाच्या आतील आणि बाहेरील जागा शेणाने सारवलेली. मठाच्या मागच्या बाजूस छोटेसे स्वयंपाकघर आणि ते सुद्धा मातीचेच बांधकाम. अजून मागे शेंतांच्या आडोश्याला बांधलेले छोटेसे शौचालय. मठाचे सभागृह तसे बऱ्यापैकी मोठे आहे. "पुढच्या वेळी राहायला या. कधीपण या पण फोन करून या. तुम्हाला दिसते आहे ही अशी परिस्थिती आहे आणि यातच राहावं लागेल." असे म्हणून सिनकर काकांनी राहायच्या सोयीची अगदी स्पष्ट जाणीव आम्हाला करून दिलेली होती. आमचीपण कोणत्याही सुखसोयींविषयी तक्रार किंवा कुरबुर न करता तेथे राहण्यास जाण्याची पूर्ण मानसिक तयारी झाली होती.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
जायची तारीख जशी जवळ येऊन ठेपली तसा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला. त्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जायला मिळेल की नाही अशी साशंक परिस्थिती निर्माण झाली. त्याचबरोबर या वर्षी उकाडा प्रचंड वाढून मार्च महिन्यातच तापमानाने ४०° पलिकडे तापमान गेल्याची नोंद केली होती. खासकरून रत्नागिरीमध्ये अतिशय कठीण परिस्थिती असल्याचे बातम्यांतून कानावर पडले. घरूनही "जाऊ नका" अशा आशयाच्या सूचना मिळायला लागल्या होत्या. पण या सगळ्याच्या पलीकडे जी होती ती म्हणजे स्वामीभक्ती, जायची ओढ आणि कानांत गुंजणारा एकच आवाज -
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !"
आम्ही मनातल्या मनात स्वामींना विनवणी केली, "आम्ही येतो आहोत. बाकी तुम्ही बघून घ्या!".
संचारबंदी
जायची तारीख अगदी जवळ येऊन ठेपली तशी संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा संचारबंदी लागू होण्याची दाट शक्यता दिसू लागली. पण आमचा विचार अजूनही डगमगला नव्हता. आम्हाला २ दिवस रहायचे असले तरी आम्ही १५ दिवसांची तयारी करून सामान बांधाबांध करायला सुरुवात केली. धान्य, तेलाचा डबा, पत्रावळ्या, विद्युत शेगडी, कूकर, फळं, सतरंज्या, चादरी, गादी, बॅटरी वर चालणारे दिवे, जुने वर्तमानपत्र, साबण, साबणाची डबी, दोरी, चटयांपासून अगदी १५ दिवसांचा दुधाचा साठा आणि रांगोळीपर्यंत सर्व काही सोबत घेऊन निघालो. हॉटेल मधील साध्या पाण्यानेपण ज्याचे पोट बिघडले आहे असा मी पाण्याच्या बाटल्यांचा साठा घ्यायला विसरलो नव्हतो.
लूटमार
बँगलोर ते दाभोळे हा १२ तासांचा प्रवास आहे. आकांक्षा आणि मी दोघेही गाडी चालवतो त्यामुळे कर्नाटकातील निपाणी पर्यंत मी आणि पुढे उर्वरित रस्ता आकांक्षा असं आमचं ठरलेलं होतं. निपाणीला १२:३० च्या सुमारास जेवण आटोपून आम्ही महाराष्ट्र सीमेत प्रवेश केला आणि कोल्हापूर जवळ एका ट्रॅफिक पोलिसाने आम्हाला अडवले. पाहिले लायसेन्स दाखवा, मग PUC कागद दाखवा, गाडीमध्ये दारू तर नाही ना, ते दाखवा असं करून कुठूनच काहीच हाती न लागल्याने शेवटी "तुमची गाडी आहे की मालवाहतूक टेम्पो? तुमच्या गाडीला एवढे सामान घेऊन जायचे परमिट नाही" असे म्हणून शेवटी त्याने पैसे लुबाडण्याचा मार्ग शोधून काढला. आम्ही पण हतबल होऊन फाडा पावती म्हणून हात जोडले. पण कॅश मध्ये पैसे देणार नाही असे स्पष्ट सांगितले असता त्याने "नेटवर्क चालत नाही, मशीन चालत नाही" अशी कारण देण्यास सुरुवात केली. "माझ्याकडे एकही पैसा कॅश मध्ये नाही" असे सांगून मी पण अडून बसायचे ठरवले. शेवटी ५००० ची पावती फाडण्यास तयार झालेला तो ट्रॅफिक पोलिस ५०० रुपयांच्या नोटेमध्ये समाधानी झाला. तिथून निघालो त्यानंतर आम्ही थेट दाभोळे गाठले. तेंव्हा संध्याकाळचे ०५:०० वाजले होते. बरोब्बर १२ तासांचा प्रवास पूर्ण झाला होता.
पादुका दर्शन
आधी मोजकेच सामान हाती घेऊन मठात प्रवेश केला आणि स्वामींच्या पादुकांचे आशीर्वाद घेतले.
मठाच्या अगदी जवळ पर्यंत गाडी आणणे शक्य आहे हे तोपर्यंत माहीत नसल्याने हे सर्व सामान उचलून ते चार-पाचशे मीटर अंतर वाहून नेण्याखेरिज काही गत्यंतर नव्हते. गावातल्या दोघांनी आमची ते सामान उचलून नेण्यास खूप मदत केली, पण हे सर्व स्वामींचे कार्य म्हणून कुठेही पैशाची अपेक्षा केली नाही. गेल्या वेळी प्रमाणे यावेळीसुद्धा स्वामींचे श्वानपथक आमच्या सोबतीला होते. गेल्या वेळी एकच होती. यावेळी त्यात अजून दोघांची भरती झाल्याचे दिसत होते.
परीक्षा
या खेपांची रंगीत तालीम स्वामींनी आम्ही बँगलोरला असल्यापासूनच करून घ्यायला सुरुवात केलेली. जवळच्या दुकानातून सर्व सामान खरेदी करून झाल्यावर ते घरी आणताना अर्धे सामान दुकानात विसरल्याने परत चालत जाऊन ते सामान दुकानातून आणावे लागले होते.
आम्ही थोडे स्थिरस्थावर झाल्यावर सिनकर काकांनी पाहुण्यांसाठी आतमध्ये एक स्वतंत्र खोलीची व्यवस्था केल्याचे सांगून आम्हाला तिथे राहण्याचे सूचित केले. तोपर्यंत आकांक्षा स्वामींसमोर ध्यान लावून बसली होती. मी सामान उचलून घामाघूम झालेलो पण त्याकडे दुर्लक्ष करत आकांक्षाच्या बाजूला बसून ध्यान लावण्याचा प्रयत्न केला. आल्यापासून कानापाशी गुणगुणणारे चिलटे आणि डास आता हळूहळू कुठेतरी अदृश्य झाल्याचे जाणवतं होते. घाम येणे बंद होऊन गरमी पण कमी झाली होती. बाकी देवस्थानांप्रमाणे आम्ही हात पाय न धुताच स्वामींच्या चरणी जाऊन बसलो होतो. पण ते अगदी मनातून निसटून गेले होते म्हणून. "थकून असाल ना रे बाळांनो !" असे म्हणून त्या माऊलीने जवळ बसवून सगळा थकवा दूर करून घेतला होता.
त्यानंतर काळोख पडताच अचानक काहीतरी झाले आणि वीज पुरवठा खंडित झाला. सिनकर काका म्हणाले, "अलिकडे जात नाही. पण आज कशी काय गेली काही कळत नाही." आम्ही हसलो आणि एवढच म्हणालो की परीक्षा घेत आहेत आमची ते. किती कुरबुर करतो बघायचं असेल त्यांना. असं म्हणून मी आमच्या सामानातून बॅटरीवर चालणारे दिवे आणि टॉर्च बाहेर काढले. मठाचे सभागृह व्यापून टाकणारा त्याचा प्रकाश पाहून आम्ही सर्वांनीच तूर्तास चिंता मिटल्याचा निःश्वास सोडला. पण "हे दिवे किती वेळ चालतील!" असा विचार करून सिनकर काकांनी फोनाफोनी करून काय झालं आहे याची चौकशी करण्यास सुरुवात केली. आम्ही वरंड्यात बसून वाऱ्याची झुळूक येते का अशी वाट पाहत लख्ख ताऱ्यांनी भरलेल्या आभाळाकडे पाहत होतो. अमावस्या आणि वीजही नसल्याने ते निरभ्र आकाश नक्षत्रांनी उजळून निघाले होते. एवढे सुंदर निरभ्र आकाश यापूर्वी कधी पाहिले होते हे सांगणे खूप कठीण आहे.
थोड्याच वेळात वीज आली आणि आम्ही मागच्या स्वयंपाकघरात बसून चुलीवर बनवलेल्या स्वयंपाकाचा यथेच्छ आनंद घेतला. झोपायला जाण्यापूर्वी औदुंबराच्या खाली असलेल्या स्वयंभू पादुकांचे एकदा दर्शन घेऊन मग झोपी जावे म्हणून मी त्या दिशेने निघालो. मगाशी वाट दाखवणारे आणि पायात घुटमळणारे श्वानपथक तिथेच बसले होते. माझी चाहूल लागताच त्यांनी गुरगुरायला सुरुवात केली. मी दुर्लक्ष करून पुढे निघालो असता त्यांनी माझा रस्ता अडवून धरला. त्यावेळी मी दर्शन घेऊ नये अशी त्यांची इच्छा असावी म्हणून मी पण माझा रस्ता बदलला आणि आत सभागृहात येऊन बसलो.
दृष्टांत
आम्ही झोपी जाण्याच्या तयारीतच होतो जेंव्हा सिनकर काकांना कोणाचा तरी फोन आला. काहीतरी गंभीर परिस्थिती असल्याचे ध्यानात आले. मी काय झाले आहे विचारपूस केली असता, गावात कोणालातरी मुतखड्याचा त्रास होतो आहे असे समजले.
आकांक्षाने नुकताच "प्राणिक हिलिंग" चे अध्ययन पूर्ण केले होते. त्यानुसार यासारख्या आजारावर दुरूनच नियंत्रण आणणे शक्य असल्याने तिने काकांना त्या आजारी मुलास टाळूला जीभ लावून पडून राहण्यास सांगितले आणि तिने हिलिंग देण्यास सुरुवात केली. हिलिंग देऊन झाल्यावर फोन करून चौकशी केली असता तो मुलगा झोपल्याचे कळले. आम्ही निघेपर्यंत त्याला परत त्रास झाल्याचे ऐकण्यात आले नाही.
"येताना तुझी प्राणिक हिलिंगची पुस्तकं घेऊन ये" असे स्वामींनी आधीच का सांगितले होते, याची जाणीव झाली. खरं तर आम्ही आधी १२ एप्रिलला न निघता ११ एप्रिलला निघणार होतो पण आकांक्षाचा प्राणिक हिलिंगचा कोर्स ३ वर्षांनी प्रथमच बंगलोरला होत आहे कळल्याने आम्ही निघण्याचे एक दिवसाने पुढे ढकलले होते. त्या माऊलीला सगळ्यांची काळजी असते हेच खरं!
गुढीपाडवा - २०२१
दुसरा दिवस उजाडला. १३ एप्रिल, २०२१. चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. शुचिर्भूत होऊन आम्ही नवीन वर्षाच्या स्वागतास सज्ज झालो. त्या सकाळच्या प्रहरी मी अयांशला घेऊन फेरफटका मारायला जायचे ठरवले. पक्षांचा किलबिलाट, कोंबड्याची बांग, काजू, आंबा, चिकू, फणसाची झाडं, कोकणातली लाल माती, शुध्द हवा, कुठे वेळूच्या काठीची गुढी उभारण्यात मग्न असलेले तर कुठे गुढीची पूजा आटोपत असलेले गावकरी मंडळी काही चिमुरड्यांचा ढोल ताशांचा गजर असं सगळं मनमोहक दृश्य मी माझ्या मोबाईलच्या माध्यमातून चित्रफितीत बद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
मठाच्या बाहेर गुढी उभारताच आकांक्षाने रांगोळीचा सडा घातला. पूजा आटोपल्यावर आम्ही पोटभर कांदेपोह्याची न्याहारी केली. तेवढ्यात सिनकर काकांनी मठाच्या जवळपर्यंत गाडी येऊ शकते याची कल्पना देताना एक गोष्ट आवर्जून सांगितली. रस्ता खडकाळ आहे. गाडीची उंची पुरेशी असल्याशिवाय गाडी आणण कठीण आहे. स्वामींनी हे बघूनच गाडी घ्यायला लावलं आहे याची प्रचिती आम्ही गेल्या खेपेतच घेतली होती. सिनकर काका, कार्तिक ( वरील व्हिडिओ मधिल ढोल ताशा पथकाचा प्रमुख मुलगा) आणि मी गाडी मठाजवळ आणण्यास निघालो. काका म्हणाले तसं रस्ता नक्कीच खडकाळ आणि भुसभुशीत मातीचा होता. मी ते चढ उतार कसेबसे पार करून गाडी मठापर्यंत आणून लावली. आधी माहिती असतं तर काल जो घामटा निघाला तो वाचला असता पण स्वामींची परीक्षाच ती! या परीक्षेची पूर्ण पूर्वकल्पना असूनही स्वामींच्या सेवेसाठी घेतलेल्या सामानात आम्ही कुठेही काटकसर केली नव्हती.
स्वामी अनुभूती
सिनकर काकांनी आम्हाला स्वामींच्या पादुकांना दोन्ही हात लावून काही अनुभूती येते का बघण्यास सांगितले. आकांक्षाला पुनः एकदा स्वामींच्या मऊ मऊ पायांना स्पर्श केल्याचा अनुभव आला आणि तिने हात लावताच विजेचा दिवा बंद झाला. त्यांच्या चरणाशी लावलेली निरांजन तेवढी तेवत होती. तिने हात बाजूला करताच विजेचा दिवा पुनः चालू झाला. मी जेंव्हा स्पर्श केला तेंव्हा मला मात्र दगडी पादुकांना स्पर्श केल्याचेच जाणवले. मी मनात म्हंटले, "माझा मार्ग अजूनही खडतर दिसतोय"!
नैवेद्य ग्रहण
स्वामींना पुरणपोळ्या आवडतात म्हणून सासूबाईंनी देहरादूनवरून खास कुरिअर करून आमच्यासोबत पाठवल्या होत्या. गुढीपाडव्याच्या निमित्ताने नैवैद्य म्हणून सिनकर काकांनी त्या स्वामींना दाखवण्यास सांगितले. आकांक्षा भावपूर्ण होऊन स्वामींशी बोलत होती - "माझ्या आईने खास तुमच्यासाठी पाठवल्या आहेत. याचा स्वीकार करा." तिचे बोलणे पूर्ण होते न होते तोच ती शुभ्र रंगाची श्वान मागे येऊन पुरणपोळ्या पाहत उभी राहिली. आकांक्षाने तिला पुरणपोळ्या खाऊ घातल्या आणि त्या स्वामिंपर्यंत पोहचल्या याची खात्री पटली!
माऊली
दुपारच्या प्रहरी अयांश मठात खेळत असताना त्याला अचानक बाहेर जाऊन खेळायची इच्छा झाली. महाराजांची स्वामीभक्त ती श्वान तिथेच पहुडली होती. बाहेर तुळशी वृंदावनाच्या पुढे काहीच भिंत नसल्यामुळे कोणीही लहान मूल खेळता खेळता पडण्याची सहज शक्यता होती. अयांश मठाची पायरी उतरून तडक त्या तुळशी वृंदवनाकडे निघाला. माझं लक्ष होतंच पण मी काही करायच्या - बोलायच्या आतच ती श्वान तिथून उठून अयांशच्या पुढे जाऊन उभी राहिली आणि त्याला पुढे जाण्यापासून परावृत्त करू लागली. मी ते बघून एवढा अचंबित झालो की काय बोलावं हेच सुचेना!
गुरुलीलामृत्
निघायच्या आदल्या रात्री अयांशने गुरुलीलामृत् माझ्या हातात टेकवले होते. स्वामींनी मी ते मठात जाऊन वाचावी अशी त्यांची इच्छा असावी म्हणून मी बरोबर घेऊन निघालो होतो. दुपारचा वेळ मोकळा असल्याने मी वाचायला बसलो. ज्या विष्णुपंतांनी दाभोळेचा हा मठ स्थापन केला त्यांनी स्वामिसुतांनी (हरिभाऊ) मुंबईला गिरगावात स्थापन केलेल्या कांदेवाडीचा मठात सेवा केली होती.
पृष्ठ क्रमांक ११ वर पोहचलो आणि श्री आनंदभारती महाराज ज्यांच्या प्रेरणेने गुरुलीलामृत् लिहिले गेले त्यांचे त्या कांदेवाडीच्या मठात वास्तव्य असल्याचे समजले. मी ही गोष्ट सिनकर काकांच्या कानी घातली. तेंव्हा त्यांनी ठाण्याच्या कोळीवाड्याजवलील दत्त मंदिरात जाऊन आल्याचे सांगितले पण त्याचा श्री आनंदभारती महाराजांशी असलेला हा संबंध त्यांनाही नवीन होता.
पूर्वतयारी
असाच दुपारचा प्रहर टळत आला आणि आकांक्षा उकाड्याने बेजार झाली. मनामध्ये "किती हा उकाडा !" म्हणून तिची कुरबुर चालू होती. थोड्या वेळात उन खाली उतरू लागताच गावातील गृहिणी शेणाच्या टोपल्या घेऊन प्रकटदिनाच्या तयारीनिमित्तने शेण सारवण्यासाठी घेऊन आल्या. आधी संपूर्ण परिसर त्यांनी झाडून स्वच्छ केला. अगदी लहान पोरांपासून सगळ्यांचाच त्याला हातभार लागलेला फक्त आकांक्षा आणि मी सोडून तिथे उपस्थित सगळ्यांचेच त्यात योगदान होते.
तथास्तु
सूर्य अस्ताला गेला आणि आभाळ कृष्णमेघांनी दाटून आले. वीजा कडकडायला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वारा सुटला. इतक्यात सांगलीहून विश्वनाथ कानिटकर आणि गजानन कुलकर्णी यांचे आगमन झाले आणि परत एकदा वीज जाऊन मुसळधार पावसास सुरुवात झाली. दुपारी उकाड्याने त्रस्त झालेली आकांक्षा आता त्या गार वाऱ्याने थंडी वाजते म्हणून कुडकुडत होती. मठाच्या आजूनाबुजला सर्वत्र पाणी साठायला लागलं होतं. वाऱ्याने मध्ये मध्ये पावसाची सर मठाच्या आतपर्यंत येऊन भिजवून जात होती. तोपर्यंत आमचा कानिटकर आणि कुलकर्णी यांच्याशी परिचय झाला. अयांश आणि क्षितिज iPad वर कार्टून बघण्यात गुंग होते. अयांशने त्या बिचाऱ्या क्षितिजला हैराण करून सोडले.
पत्रकार
आकांक्षा आणि मला दोघांनाही मोबाईलला नेटवर्क नसल्याने आमचा बाकी जगाशी संपर्क १२ तारखेला संध्याकाळपासूनच तुटला होता. त्यामुळे बाहेरच्या जगात काय चालू आहे याची आम्हाला न काही कल्पना होती न काही काळजी. बाहेर पाऊस कोसळत असताना आणि वीज गेली असताना मी आतमध्ये त्या बॅटरीवर चालणाऱ्या दिव्याच्या उजेडात गुरुलीलामृत् वाचणे चालूच ठेवले. कुलकर्णींची एकीकडे फोनाफोनी चालू होती. त्यावरून १४ तारखेला रात्री ०८:०० वाजल्याासून महाराष्ट्रात १५ दिवसांकरिता संचारबंदी लागू होणार असल्याचे कळले. आम्ही १५ तारखेला सकाळी निघणार होतो पण आता १४ तारखेलाच पूजा आटोपून निघावे लागणार असे लक्षात आले. आम्ही ईच्छित कार्य पार पाडून ताबडतोब निघावे असा स्वामींचा आदेश असावा. हाच अनुभव आम्हाला आमच्या अक्कलकोटच्या पहिल्या भेटीतपण आला होता.
जीवन
रात्रीच्या जेवणाची वेळ जवळ आली होती. आता काळोखातच जेवण आटोपाव लागणार अशा विचारात असता वीज पुरवठा सुरळीत झाला आणि कुलकर्णींनी आणलेल्या डब्यावर आम्ही यथेच्छ ताव मारला. जेवता जेवता कानिटकर म्हणाले की त्यांनी गेल्या खेपेस इथले पाणी टेस्टिंग साठी नेले होते. टेस्ट केले असता पाण्याचा TDS (Total Dissolved Solids) अवघा ८२ आहे असे कळले. त्यांनी "एवढे स्वच्छ पाणी पिऊन आम्हाला काहीतरी व्हायचे" असा विनोद करताच, मी उगाच एवढ्या पाण्याच्या बाटल्यांची हमाली केली असे वाटले. कारण ते पाणी पिऊन खरंच आम्हाला काही झाले नाही. किंबहुना ते पाणी पिताना आम्ही ते कोणत्याही फिल्टर ने शुध्द केले आहे की नाही याचा विचारही आला नाही. जेवण आटोपून थोड्या गप्पा मारून आम्ही झोपी गेलो.
सेवा
मी दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:३० वाजता शुचिर्भूत होऊन पादुकांचे दर्शन घेतले आणि सकाळी फेरफटका मारून यायचे ठरवले. पण यावेळी डोक्यात थोडी चिंता होती. कारण आदल्या दिवशी मी ज्या भुसभुशीत मातीतून गाडी चढवून वर आणली होती ती माती पावसाने वाहून जाते असे सिनकर काकांनी सांगितले होते पण त्यावेळी स्वामींच्या कृपावर्षावाने असा मुसळधार पाऊस भर एप्रिल महिन्यात पडेल हे कोणाला माहित! पण गंमत अशी की, ती माती वाहून न जाता आता छान बसली होती. त्यामुळे उलट आता गाडी नेणे खूप सोपे होणार होते. हा फेरफटका मारताना परत एकदा त्या श्वानपथकाची अग्रणी श्वान माझ्या सोबतीला होतीच.
फेरफटका मारून परतलो तेंव्हा मठाच्या परिसराकडे एक कटाक्ष टाकला. आदल्या दिवशी केलेल्या मेहनतीवर पावसाने अक्षरशः पाणी ओतले होते. झाडाचा पालापाचोळा सर्वत्र विखुरला होता. सिनकर काकांनी परत कंबर कसून कुंचा हातात उचलला होता. ओला झाल्यामुळे कचरा साफ करणे अजून कठीण होऊन बसले होते. मी आलो तेंव्हा मठाच्या दारासमोर अर्धवट काढलेला कचरा आणि कूंचा समोर पडलेले दिसले. काका काहीतरी कामानिमित्त आत गेले होते. "काल हातात कुंचा घेतला नाहीस. हा घे आणि मला मठ झाडून दे" असा स्वामींचा आदेश असावा असा संकेत समजून मी तो कुंचा उचलून कामाला लागलो. एका बाजूला कानिटकर आणि आकांक्षा पण त्या साफसफाईच्या कामाला लागले. "नळ स्पेशालिस्ट" अशी ज्यांची ओळख करून दिलेली असे ते गजानन कुलकर्णी सर्व नळांची दुरुस्ती करण्यात व्यस्त झाले. पुनः एकदा सर्व साफसफाई करून आम्ही मठास पूर्ववत स्थितीत आणले. आकांक्षाने रांगोळीचा सडा घातला.
कर्मकांड
थोड्याच वेळात दाभोळे गावातून भटजी आले. कानिटकर आणि मी पूजा करण्यास उभे राहिलो. पूजा यथासांग झाली. पूजेचे विधी सुरू असताना माझ्या मनात विचारांनी थैमान घालण्यास सुरुवात केली. माझ्या लेखी स्वामींच्या चरणी केलेल्या त्या सेवेचं महत्त्व हे त्या पुजेपेक्षा जास्त आहे. मनातून सारखं वाटलं की दुसऱ्या कोणाची इच्छा असल्यास आपण पूजा करण्यास त्यांनाच सांगायला हवं होतं. कारण त्या मंत्रोच्चाराव्दारे भौतिक सुखाची अपेक्षा किंवा मागणी करणे मला पटत नाही. आपण भक्ती करावी आणि त्या बळावर स्वामींना योग्य वाटेल तेवढे त्यांनी आपल्या पदरात दान देतातच असे माझे प्रामाणिक मत आहे.
बेसन लाडू
पूजा आटोपताच आम्ही प्रसाद घेतला आणि सोबत करून आणलेले बेसनाचे लाडू पण सर्वांना प्रसाद म्हणून वाटले. "लाडू सर्वांना पुरतील का?" असा प्रश्न होता पण कोणालाही लाडू कमी पडला नाही. कमी पडू नये म्हणून लाडू तोडून अर्धा अर्धा द्यावा असं काही जणांचं मत होतं. पण आपले काम बाजूला सोडून स्वामींच्या कार्यासाठी जे आले त्यांनाच तो प्रसाद मिळावा असे माझे स्पष्ट मत होते आणि तसेच झाले. सर्वांना प्रसाद वाटूनही काही लाडू उरले. मधल्या मध्ये त्या लाडक्या भक्त श्र्वानाला मी लाडू भरण्यास विसरलो नव्हतो. गंमत म्हणजे आम्ही करून आणलेले लाडू आम्हीच खाल्ले नाहीत. ही गोष्ट आमच्या खूप नंतर लक्षात आली.
सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना
जेवणाच्या आधी सिनकर काकांनी माझं तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे असं सांगितलेलं. विसरू नये म्हणून मी काकांना त्याची आठवण करून दिली. ते लगबगीने मला घेऊन स्वामींच्या चरणी गेले. माझ्या हातात अक्षता दिल्या आणि काही स्वतःच्या हातात घेतल्या. हात जोडून त्यांनी स्वामींच्या चरणी आमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आणि मग आम्ही त्या अक्षता स्वामींच्या चरणी अर्पण केल्या.
निरोप
पु. लं. च्या लिखाणात कोकणी माणसाबद्दल लिहिताना ते म्हणतात की "कोकणी माणूस हा फणसासारखा. बाहेरून कडक असला तरी आतून मृदू आणि बोलायला गोड." सिनकर काका आणि बाकी सर्वच गावकऱ्यांशी बोलून आम्ही त्यांच्या गोडव्याची चव घेतली होती. "वसुधैव कुटुम्बकम " चा प्रत्यय आम्हाला त्या वेळी आला जेंव्हा आम्ही निघायला गाडीत बसलो आणि सर्वांनी गाडीपाशी जमून आम्हाला निरोप दिला !
आम्ही तिथून निघालो खर, पण मन अजूनही तिथेच अडकले आहे आणि मन पुनः एकदा कधी जायची संधी मिळते याच विचारात गुंतून जाते!
🌼श्री स्वामी समर्थ 🌼
श्री स्वामी समर्थ _/\_
Divine. Be blessed. Always.