top of page
Prof. Namrata Bhat

स्वयंभू पादुका मठ - दाभोळे

विशेष टिप्पणी : सदर लेख हा प्रा. नम्रता भट यांच्या "स्वामी समर्थ गौरव गाथा- खंड १ २००८" या ग्रंथातून जसाच्या तसा घेण्यात आला आहे. यात माझे तीळमात्रही श्रेय नाही. हा लेख मी माझ्या ब्लॉग वर लिहिण्याचे कारण एवढेच की माझा "स्वयंभू गणपती आणि स्वयंभू स्वामी पादुका" या लेखात या मठाचा उल्लेख आहे आणि मठाबद्दलची संपूर्ण माहिती अन्य कुठेही उपलब्ध नाही. स्वामी समर्थ गौरव गाथा या ग्रंथाचे ४ खंड असून त्याविषयी अधिक माहिती वर दिलेल्या लिंक मध्ये उपलब्ध आहे.


- नयनेश गुप्ते.


रत्नभूमी कोकण

बहुरत्ना वसुंधरा या म्हणीची साक्ष देणारी कोकणची भूमी. गोपाळबुवा केळकर, स्वामी सुत, गणपतराव जोशी, आत्माराम बुवा, सच्चिदानंद स्वामी, दत्त गिरी महाराज, आनंदनाथ वालावलकर हे सर्व स्वामीभक्त कोकणच्या मातीतच जन्माला आले.


याच कोकणच्या भूमीत पानवळ या विष्णुपंत पानवळकर नावाचे सत्पुरुष जन्माला आले. पानवळ या ग्राम नामावरून त्यांचे उपनाम पानवळकर पडले. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील देवळे - दाभोळे ही जोड गावे. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे शिष्य, नारेश्वरचे श्रीरंगावधूत महाराज हे मूळचे याच गावचे. १८९८ ते १९६८ असा रंगावधूतांचा कालखंड आहे.


विष्णूपंतांचे कुटुंब

विष्णूपंत विवाहित होते. त्यांचे चिरंजीव वासुदेव हेही स्वामी भक्तच. विष्णुपंतांना वासुदेव, दत्तात्रय आणि बाबूराव असे तीन पुत्र व एक कन्या होती. ह्या पनवेल येथे घरात यांचे स्वामी समर्थ मठाजवळ रहात असत. त्यांचे नाव इंदू. विष्णुपंतांचे चिरंजीव वासुदेव आणि त्यांचे चिरंजीव श्रीराम वासुदेव. म्हणजेच श्रीराम हे विष्णुप्ताचे नातू, विष्णूपंतांच्या चरित्राचा शोध सुरू असता, कर्मधर्म-संयोगाने गिरगावात पराग व गजाभाऊ पानवळकर यांची गाठ पडली. श्री गुजाभाऊंनी श्रीराम यांचा अंधेरीचा पत्ता दिला आणि चक्र फिरू लागले.


दाभोळे मठाला भेट

पानवळकरांच्या वंशजांना विशेष माहिती नाही. दाभोळे येथील मठात तर ते कित्येक वर्षात गेलेले नाहीत. हा मठ पाहिल्याशिवाय निष्णुपंतांचे चरित्र पुरे होऊ शकणार नाही. असा विचार करून प्रथम कोकणचा रस्ता धरला. २० एप्रिल २००८ रोजी रत्नागिरीतून नी कोल्हापूर बस पकडून, टाक्याचा माळ स्टॉपला उतरले. रत्नागिरी ते टाक्याचा माळ अंतर २९ किमी आहे. श्री. भाऊ सिनकर स्टॉपवर घ्यायला आले होते. त्यांचे सोबत मठात गेले. चारी बाजूंनी गर्द झाडी. उतरणीची कच्ची पाऊलवाट आता पक्की पाखाडी म्हणून बांधून काढली आहे. त्यामुळे मठाकडे व्यवस्थित जाता येते. पाऱ्ह्यावर पक्का साकव बांधला आहे. तो ओलांडून पंधरा-वीस पायऱ्या चढून वर गेले की, मठाची वास्तू लागते.


आजुबाजूचा निसर्गरम्य परिसर, फुलझाडे, मोठा जुना औदुंबर वृक्ष, त्याच्या खालच्या दत्तपादुका पाहून मन प्रसन्न होते. ह्या स्वयंभू दत्तपादुका असून मठाच्या वास्तूची पायाभरणी केली. त्यावेळी खोदकामात या पादुका सापडल्या. औदुंबराचे खाली पूज्य भाऊंनी त्यांची स्थापना करून वर छोटीशी घुमटी बांधली भाऊंच्या रहात्या वास्तूचे, आता नामोनिशान उरलेले नाही. फक्त उघडा चौथरा पहायला सापडतो. दाभोळे गावचा हा मठ म्हणजे बाहेरून एखादे घरच वाटते. बांधकाम चिरेबंदी आहे. तिथे स्वामी समर्थाच्या पादुका पहायला मिळतात. स्वामींची अत्यंत सुंदर अशी प्रतिमा पूर्वी तिथे होती. ती जीर्ण झाली म्हणून तिचे विसर्जन करून नवीन प्रतिमा बनवून घेतली आहे. गोल काळ्या पाषाणावर मध्यभागी पादुका कोरलेल्या असून त्याच्या बाजूच्या कठड्यावर पुष्प, पद्म, स्वस्तिक आणि शिवपिंडी कोरलेली आहे. या पादुकांना स्पर्श केल्यावर वेगळीच स्पंदने जाणवतात. पादुकांवर आपले दोन्ही तळवे टेकवल्यावर 'एखाद्या सजीव व्यक्तिच्या पायाला स्पर्श करीत आहोत' असे जाणवते. इतके ते मऊ आणि गुबगुबीत जाणवतात.


मठातील विहिरीची कथा

मठाच्या परिसरात दोन विहीरी होत्या. सध्या एकच एकूण अस्तित्वात असून ती आजुबाजूच्या असंख्य कुटुंबांची जीवनदात्री ठरली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात या भागात पाण्याची फार हालाखी असते. अशावेळी ही वापी अनेकांना जीवनदान देते. दुसरी विहीर आता नाही. ती बुजवून टाकली. हे ऐकून मला आश्चर्य वाटले पाण्याचे इतके दुर्भिक्ष असताना एवढी प्रशस्त बांधलेली विहीर बुजवून का टाकली? याचा विचार करीत असता सिनकर म्हणाले, 'त्याला कारणही तसेच घडले. त्या काळात प्रवासाची साधने फारशी उपलब्ध नव्हती. भाऊंनी कोकण प्रवासासाठी खास घोडागाडी बनवून घेतली होती. एकदा अनवधानाने त्यांच्या गाडीचा एक घोडा या विहीरीत पडला. कुणाचे लक्ष गेले नाही आणि दुर्दैवाने तो विहीरीत बुडून मेला. विष्णुपंताना ही गोष्ट जिव्हारी लागली. त्यामुळे ती विहीर कायमची बुजवून टाकली.


बामणाचं घर

भाऊंचे देवळे गावात पूर्वी घर होते. त्याचे बालपण या देवळ्यातच व्यतीत झाले. गणपतीचे मंदिर होते. पुढे त्यांनी दाभोळ्याला जमिन बरेदी केली प्रथम तिथे घर बांधले, त्यानंतर घरासमोरच मठाची वास्तू उभारली, हा मठ म्हणजे बामणाचं पर म्हणून आजही प्रसिध्द आहे. या गावात आजही एकही ब्राह्मणाचे घर नाही. धार्मिक कार्याकरिता साखरप्याहून भटजी बोलावले जातात. विष्णुपंतांना पाहिलेल्या एक-दोन व्यक्ती गावात हयात आहेत. पण एकाची भेट होऊ शकली नाही आणि दुसरे थोडेसे अशिक्षित अडाणी. त्यांना काही सांगता आले नाही.


बाळप्पा महाराजांची भेट/अपमृत्यू टळला

१८९९ साली कोल्हापूर येथे वामन महाराज आणि दत्तोपंत घाणेकर या दोन स्वामीभक्त गुरुवंधूंसमवेत, त्यांचा स्वामी सेवेचा श्रीगणेशा झाला. बाळप्पांच्या कृपेने त्यांचा अपमृत्यू टळला. विष्णुपंतांवर त्यावेळी गंडांतर होते. बाळप्पा महाराजांनी ते अंतर्ज्ञानाने जाणून, कोल्हापूर येथील बाळप्पांच्या दीड-दोन महिन्याच्या वास्तव्यात विष्णुपंताना रोज लाल जास्वंदीच्या फुलांची सेवा दिली होती. या कालावधीत रोज पूजेसाठी टोपलीभर फुले विष्णुपंत तयार ठेवीत असत. ही त्यांची एक प्रकारे परीक्षाच होती. शिवाय त्यांचा नियमितपणा, सातत्य यांचीही कसोटीच होती. बाळप्पा महाराजांबरोबर काही वर्षे त्यानी भ्रमंती केली. १९०० साली जालना येथील मठ स्थापने चे वेळी ते उपस्थित होते. १९१० साली पुण्यातील दाढीवाला दत्त- मंदिराच्या स्थापनेस बाळप्पांबरोबर विष्णुपंतही उपस्थित होते. सर चिमणलाल सेटलवाड हे त्यांचे परम शिष्य होते. त्यांचे सुपुत्र, मोतीलाल सेटलवाड, त्यावेळचे सरकारचे अटर्नी जनरल हेही विष्णुपंताचे कृपांकित होते. सेटलवाड कुटुंबाचे सध्याचे वंशजही स्वामी भक्तीत लीन आहेत. विष्णूपंतांनी सेटलवाड कुटुंबियांच्या सहकार्याने देवळे - दाभोळे येथे त्याकाळी १० एकर जमिन खरेदी करून तिये मोठा वाडा, स्वामी समर्थ मठ उभारला. तो आज अखेर कार्यरत आहे. त्याची माहिती आज प्रथमच जगासमोर मांडत आहे.


विष्णुपंत तथा भाऊ पानवळकर स्वामी समर्थ गौरव गाथेच्या शोधयात्रेत स्वामीकृपेने, एक अनमोल रत्न आमचे हाती लागले ते म्हणजे विष्णुपंत पानवळकर, एक दोन चरित्रातील नामोल्लेख सोडल्यास, संपूर्ण आयुष्य स्वामी सेवेत घालवणाच्या या नि:स्सीम स्वामी उपासकाचे चरित्र अद्याप जगासमोर आलेले नाही. विष्णुपंत पानवळकर यांचा जन्म १८६१ चा. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंब्याजवळचे पानवळ हे गाव. पानवळ गावचे हे पानवळकर. बालपणा- पासून अत्यंत निस्पृह. संपन्न व्यक्तिमत्त्व. विष्णुपंतांचे पूर्ण नाव विष्णू भालचंद्र पानवळकर. पण 'भाऊसाहेब' या नावानेच ते कुटुंबात परिचित होते. बालपणापासून अत्यंत बाणेदार असलेले विष्णुपंत, स्वामी समर्थ परिवारातही त्याकाळी आदरणीय ठरले होते. सहा फूट उंची, सावळी पण भरदार शरीरयष्टी मुखकमलावर साधनेचे विलक्षण तेज यामुळे प्रथम दर्शनीच त्यांचा दरारा जाणवायचा. ते अत्यंत कडक शिस्तीचे होते. कोणतीही गोष्ट वेळच्या वेळी आणि व्यवस्थित व्हायला हवी यावर त्यांचा कटाक्ष असे. आजुबाजूचे लोक त्यामुळे त्यांना घाबरूनच असायचे.


भाऊंची शिस्त आणि सर्व साक्षीत्व

भाऊ उंचनिंच गोरेपान, भक्कम शरिरयष्टी लाभलेले तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्यांची शिस्त आणि काटेकोरपणा यामुळे सर्वत्र त्यांचा दरारा असे. साधासुधा माणूस त्यांच्यापुढे टिकत नसे. मठातील पूजा-अर्चा-आरती नैवेद्य व्यवस्थित झाला पाहिजे. स्वामींच्या उपासनेत सेवेत खंड पडलेला त्यांना चालत नसे. भाऊंचा एक मुलगा त्यावेळी डॉक्टरीचे शिक्षण घेत होता. या सर्व प्रकारामुळे त्याला कॉलेजला जायला उशीर होत असे. पण भाऊंचा संतापी स्वभाव त्यामुळे काही बोलताही येत नसे. असंच एखदा भाऊ आजुबाजूला नाहीत असे पाहून दत्तात्रय पुजाऱ्यावर ओरडू लागला. लवकर आटपा, मला विलंब होतोय असा त्यांचा बोलण्याचा हेतू होता. पण तेवढ्यात भाऊ तिथे आले. त्यांनी ते शब्द ऐकले आणि ते कडाडले, ज्या स्वामींचे खातोस, त्यांच्यावरच राग काढतो.... आणि संतापाच्या भरात त्यांनी उपाशी पोटीच मुलाला घराबाहेर हाकलून दिले. डॉ. दत्तात्रय ही गोष्ट आयुष्यभर विसरले नाहीत.


सर चिमणलाल भाऊंच्या प्रत्येक कार्यात अग्रभागी असत. ते त्यांचे परम भक्त होते. एकदा दाभोळ्याला, 'ताई" नावाच्या एका बाई. ज्या मठात सेवा करत होत्या, त्या भाऊंना म्हणाल्या, 'काय हो, हल्ली चिमणलाल शेठजींची तुमच्यावर खपा मर्जी झाली की काय ? ते तुम्हाला काही देत नाहीत वाटतं...? ताईच्या या खोचक प्रश्नावर भाऊ मनातून संतापले आणि काही बोलणार, एवढ्यात दारात पोस्टमन उभा राहिला. तो मुंबईहून आलेल्या मनी ऑर्डरचे पैसे घेऊन आला होता. चिमणलाल शेठजींनी पाठवलेले कोरे करकरीत रुपये तीन हजार पाहून, ताई खजिल झाल्या. त्यानंतर त्यांनी भाऊंना असले प्रश्न कधीही विचारले नाहीत.


कांदेवडीच्या मठात एक इंजिनियर झालेले गृहस्थ येत असत. अर्थात् ते स्वत :ला इंजिनिअर झाला म्हणता, काही येत नाही?... यावर ते गृहस्थ संतापले. अर्थात् त्यांचा हा संताप खोटा होता आणि पदवीही खोटी होती. दोन चार वेळा असे खटके उडाले आणि अखेरीस त्या गृहस्थाने कबूल केले की, तुम्ही म्हणता ते खरे आहे, मला या विषयातले फारसे ज्ञान नाही.


निष्काम भक्ती - निरपेक्ष सेवा

जामदग्नि गोत्रोत्पन्न कहाडे ब्राह्मण कुळात जन्मलेले विष्णुपंत म्हणजे खरे तर जमद्ग्निंचेच अवतार परंतू त्यांचा स्वभाव जेवढा कडक तेवढेच ते प्रेमळही होते. त्यांना बालपणी वडिलांकडून धार्मिक शिक्षण मिळाले. सुसंस्कृत कुळात जन्म झाल्यामुळे, उपजतच संस्कारक्षम बातावरणातच त्यांचा पिंड पोसला गेला होता. पुढे, बाळप्पा महाराजांसारखे ऋषितुल्य सद्गुरु लाभले आणि विष्णुपंतांच्या आयुष्याचे सोने झाले. निष्काम भक्ती, निरपेक्ष सेवा, सद्गुरुप्रति अनन्य निष्ठा आणि भूतमात्रांबद्दल विलक्षण प्रेम हे बाळप्पा महाराजांचे सद्गुण यांनी पुरेपूर आत्मसात केले. आपले अवघे जीवन स्वामी -भक्तीसाठी वाहून घेतले. अनेकांना कळत नकळत मार्गदर्शन केले. पण आपल्या कार्याचा गवगवा कधीही केला नाही. वास्तविक सर चिमणलाल सेटलवाड यांचेसारखे त्या काळातले लक्षाधीश उद्योगपती त्यांच्यावर प्रसन्न होते. त्यांचेकडून जे मागितले ते मिळाले असते पण विष्णुपंत लोकेषणा आणि वित्तेषणा यांपासून सदैव दूर राहिले.


विष्णुपंतांच्या बहिणीचे नातू, श्री. प्रभाकर पळसुले हे सध्या पुणे येथे विद्यमान आहेत. त्यांना विष्णुपंतांचा सहवास बालपणी अनेक वर्ष घडला, त्यांचा जन्म १९२० सालचा सध्याचे वय ८८ वर्षे, त्यांची मुलाखत घेऊन विष्णुपंतांच्या चरित्रावर अधिक प्रकाश टाकला आहे. प्रभाकर पळसुले हे नेव्हीमधून पेटी ऑफिसर या मानाच्या पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत.


तरुण वयात अक्कलकोट गाठले

विष्णू भालचंद्र पानवलकर तथा 'भाऊ' हे बालपणापासूनच विरक्त वृत्तीचे होते. अध्यात्माच्या ओढीने त्यांनी तरुण वयातच अक्कलकोटला गाठले. त्यांचा जन्म १८६१ चा. अगदी तरुण वयात मणजे किमान १५व्या वर्षी अक्कलकोटला गेले असावेत असे गृहित धरले तर त्यांची व स्वामींची भेट घडली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण स्वामीनी १८७८ ला देह ठेवला, त्यावेळी विष्णुपंतांचे वय १७ वर्षांचे होते. पण कवठेकर लिखित स्वामी समर्थ चरित्रात विष्णुपंतांची आणि बाळप्पा महाराजांची प्रथम भेट करवीर येथे घडली असे नमूद केले आहे. त्यानंतर वाळाप्पांनी त्यांना अक्कलकोटला नेले व पुढे सर्व कार्य घडले.


अक्कलकोट येथे वास्तव्य

विष्णुपंतांना बाळप्पा महाजारांचा सहवास अनेक वर्षे लाभला. या काळात, बाळप्पा महाराजांनी त्यांची कसून परीक्षा घेतली. अक्कलकोट येथील बाळप्पा मठ तथा गुरुमंदिरात झाडलोटीपासून भांडी घासण्यापर्यंत सर्व प्रकारची बारीक सारीक कामे बाळप्पा महाराज त्यांचेकडून करवून घेत असत. त्यांनी विष्णुपंत तथा भाऊंची निष्ठा आजमावून मगच त्यांना अनुग्रहित केले. त्यानंतर मात्र प्रत्यक्ष पूजेअर्चेतही त्यांचा समावेश होऊ लागला. काही दिवस वटवृक्ष देवस्थानाची पूजाअर्चा करण्याचे भाग्यही विष्णुपंताना लाभले होते. भागू बाई सारखा रडतोस काय?


एकदा अक्कलकोटहून १५-२० मैलांवर असलेल्या दुसऱ्या एक स्वामीस्थानात काही धार्मिक उत्सव करण्याचे ठरले. त्यानुसार सर्व तयारी झाल्यावर, बाळप्पा महाराजांनी, आपल्या शिष्य व सेवेकऱ्या समवेत त्या स्थानी प्रयाण केले. पण त्यांनी विष्णुपंतांना बरोबर नेले नाही. सद्गुरूंनी आपल्याला का नेले नाही? इथे अक्कलकोटातच का ठेवले? याचा ते विचार करू लागले. ही गोष्ट त्यांच्या मनाला चांगलीच लागली. निराश मनाने ते गुरुमंदिरात स्वामींच्या तसबीरीकडे एकटक पहात बसले. त्यांनी स्वामींनाच गाहाणे घातले. स्वामींचा धावा सुरु केला असा काही काळ गेल्यावर त्यांच्या कानावर शब्द पडले, 'अरे, असा भागुबाईसारखा रडतोस काय ? जा तिकडे आणि लाग कामाला...


जातोस का देऊ एक ठेऊन?

भाऊंनी हे उद्गार ऐकून दचकून इकडे तिकडे पाहिले. कारण मठात त्यांचे व्यतिरिक्त, त्यावेळी अन्य कुणीच नव्हते. पुन्हा डोळे मिटून भाऊ स्वस्थ बसले तर पुन्हा तेच शब्द कानावर पडले. असे दोन तीन वेळा घडले. भाऊंना नेमके काय करावे ते समजेना. कारण सद्गुरूंनी इथे मठात आपल्याला ठेवले आहे. त्यांनी आपल्याला बरोबर नेले नाही. तेव्हा त्यांची आज्ञा नसताना त्यास्थळी जाणे योग्य नाही. असा विचार एकीकडे तर दुसरीकडे साक्षात् समर्थच ही आज्ञा देत आहेत. तेव्हा अवज्ञा कोणाची व कशी करावी? असाही विचार मनात येत होता. भाऊंनी करुणामय दृष्टीने पुन्हा एकदा स्वामींच्या तसबीरीकडे पाहिले तर स्वामी अत्यंत शुद्ध चेहऱ्याने त्यांचेकडे पहात होते. पुन्हा आवाज आला, आता तरी जातोस, का देऊ एक ठेऊन?...'


काय, केलीत आमची तक्रार ?

स्वामींचे ते उग्र रूप पाहून भाऊ चटकन उठले. दुसऱ्या एका सेवेकऱ्याला मठाकडे लक्ष ठेवायला सांगून, मठाबाहेर ते पडले. पंधरा सोळा मैलांचे अंतर पार करून, मुक्काम गाठायला रात्र झाली होती. तिकडे बाळप्पा महाराजांनी अंतर्ज्ञानाने हा सर्व प्रकार जाणला होता. सर्वांची भोजने उरकली होती. पण सेवेकऱ्यांमार्फत दोन ताटे वाढून आधीच बाजूला ठेवायला सांगितली होती. भाऊ तेथे पोहोचताच बाळप्पा महाराजांची व त्यांची दृष्टीदृष्ट झाली आणि बाळप्पा महाराज म्हणाले, 'काय? केली आमची तक्रार ? आता चला. दमला आहात. जेऊन घ्या व झोपा. प्रात :काळी उठून खूप कामे करायची आहेत.'


आता तू मुंबई गाठ

भाऊंनी शुचिर्भूत होऊन प्रसाद भोजन घेतले आणि दुसऱ्या दिवशी सर्व लवाजम्यासहित, सारे अक्कलकोट येथे परत आले. अशी निरंतर सेवा सुरु होती. कालांतराने बाळप्पा महाराजांनी त्यांना सांगितले की, 'तुझे येथील कार्य संपले. आता तू मुंबई गाठ.'


हाच तो... हाच तो...

बाळप्पा महाराजांचे हे उद्गार ऐकून विष्णुपंत चक्रावून गेले. कारण तत्पूर्वी मुंबईशी त्यांचा सुतराम संबंध नव्हता. मुंबईची काही माहिती नव्हती वा कुणी नातेवाईकही नव्हते. त्यामुळे विष्णुपंत म्हणाले की, 'महाराज मी मुंबईला कधी गेलो नाही. मी तिथे कोणाला ओळखत नाही.' यावर बाळप्पा महाराज काहीच बोलले नाहीत.


तेव्हा गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून, भाऊंनी मुंबईस प्रयाण केले. त्यावेळी कुलाबा हे मेन स्टेशन होते. ते सकाळच्या वेळी कुलाबा स्टेशनवर उतरले. भांबावलेल्या स्थितीत आता पुढे काय करावे, कोठे जावे असा विचार करीत बाकड्यावर बसले असता, 'हाच तो... हाच तो. असे म्हणत, काही मंडळी त्यांचेजवळ आली.त्यांनी विष्णुपंताना नशशिखांत न्याहळले. त्यांची सतेज उंचनीच शरीरयष्टी, प्रसन्न चेहरा आणि दिव्य तेजस्वी रूप पाहून ते त्यांना म्हणाले, आपण अक्कलकोटहून आलात का? आपणास सर चिमणलाल सेटलवाड यांनी बोलावले आहे... आम्ही तुम्हास न्यायला आलो आहोत...'


बॅरिस्टर चिमणलाल सेटलवाड

यावर, 'कोण हे चिमणलाल आणि त्यांनी मला का बोलावले आहे?' असा प्रश्न भाऊंना पडला परंतू स्वामींवर भरवसा ठेऊन ते त्या मंडळींबरोबर चालू लागले. थोड्याच वेळात सेटलवाड यांच्या बंगल्यावर पोहोचले. सर चिमणलाल सेटलवाड हे मुंबईतील त्यावेळचे नामवंत बॅरिस्टर, प्रख्यात व्यक्तिमत्त्व गर्भश्रीमंत खानदानी गृहस्य. पण त्यावेळी ते खूप आजारी होते. अनेक उपाय केले परंतू गुण येत नव्हता. परिस्थितीला शरण जाण्यापलिकडे दुसरा उपाय नव्हता. चिमणलाल सेटलवाड यांनी विष्णुपंतांना पाहिले आणि ते एकदम ओरडले. 'हाच तो माणूस, हीच ती व्यक्ती पण यांचेबरोबर एक संन्यासीसुद्धा होते ते कुठे गेले ?


हाच तो संन्यासी

तोपर्यंत सर चिमणलाल सेटलवाड स्वामी समर्थांविषयी ऐकून होते परंतू दर्शन घडले नव्हते. भाऊंजवळ स्वामी महाराजांची एक सुंदर तसबीर होती. ती दाखवल्यावर चिमणलाल म्हणाले की, 'हाच तो संन्यासी. यानेच मला सांगितले की, तुम्ही मला बरे करणार. चिमणलाल साहेबांनी भाऊंची सर्व व्यवस्था केली. कारण साक्षात स्वामी समर्थांनीच त्यांना दर्शन दृष्टांत देऊन, भाऊंची ओळख करवून दिली होती. हे सर्व ऐकताच भाऊंचा कंठ दाटून आला. स्थिर स्थावर झाल्यावर त्यांनी चिमणलाल यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि म्हणाले की, 'मी काही डॉक्टर नाही पण साक्षात् स्वामींनीच तुम्हाला दृष्टांत देऊन हे सांगितले,. त्यामुळे तुम्ही नक्की बरे होणार...


कांदेवाडी मठात सेवेस प्रारंभ

अशा तऱ्हेने भाऊंचे मुंबईतील आगमनावर साक्षात स्वामींनीच शिक्कामोर्तब केले होते. सर चिमणलाल यांनी कांदेवाडीतील स्वामी समर्थांच्या मठाची व्यवस्था पहाण्याचे काम भाऊंवर सोपवले. कांदेवाडीतील मठात अशा तर्हेने सन ११०५ च्या दरम्यान ते व्यवस्थापक म्हणून काम करू लागले. बॅरिस्टर साहेबांच्या कृपेमुळे विष्णुपंतांना स्वामी सुतांसारख्या ज्येष्ठ स्वामी शिष्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या स्वामी समर्थ मठात सेवा करण्याचे भाग्य लाभले. त्यावेळी त्यांचे वय ४५ वर्षांचे होते. मठात दैनंदिन पूजाअर्चा आरती सर्व कार्यक्रम सुरु झाले. रोजच्या पूजेचे तीर्थ, औषध म्हणून बॅरिस्टर साहेबांकडे पाठवले जात असे. स्वामींच्या या तीर्थाने आसन्न मरण पडलेले बॅरिस्टर साहेब पुढे खडखडीच बरे झाले. नामवंत डॉक्टरांनी काही दिवसांचे सोबती असा निर्वाळा दिला होता पण 'स्वामी तारी त्याला कोण मारी?' म्हणतात ना! तीर्थाने कमाल केली. ज्यांना उठून बसता येत नव्हते, चार पावले चालण्याचे त्राण ज्यांच्या गात्रांत नव्हते ते बॅरिस्टरसाहेब एका महिन्यात पूर्णपणे बरे झाले आणि स्वामींबरोबरच विष्णुपंतांवरही त्यांची अनन्य निष्ठा दृढ झाली. भाऊंशी त्यांची जवळीक निर्माण झाली. कांदेवाडीतील मठाच्या खूप भरभराटीसाठी भाऊंनी अनेक उपक्रम राबवले. गोरगरीबांना वस्त्रदान, अन्नदान यांवर त्यांचा भर होता. बॅरिस्टर साहेबांनी त्याकाळात हजारो रुपये देऊन या कार्याला सहकार्य केले. कांदेवाडीतील मठाचे व्यवस्थापन सुरु असताना विष्णुपंतांचे अक्कलकोट आणि अन्यत्र नेहमी जाणे येणे असायचे. मुंबईस पाठवताना स्वतः बाळप्पांनी विष्णुपंतांना श्रीस्वामी महाराजांच्या संगमरवरी पादुका दिल्या होत्या. पुढे याच पादुका, कांदेवाडी मठात स्थापन करण्यात आल्या. आजही त्या गोजिन्या पादुकांचे दर्शन आपणास मुंबईच्या मठात घडते. स्वामी नामाची गंगा दाभोळे येथे प्रवाहीत...


स्वामी नामाची गंगा दाभोळे येथे प्रवाहीत

कोकणात त्यांचे बालपण व्यतित झाले. कोकणच्या मातीत ते जन्मले. वाढले. त्यामुळे स्वामी नामाचा प्रचार कोकणच्या भूमीतही कायला हवा. स्वामी कार्याची गंगा कोकणात प्रवाहित करण्याच्या उद्देशाने विष्णुपंतांनी १११० साली. कोकणातील दाभोळे या गावी अगदी धनदाट जंगल असलेल्या शांत निवांत जागी ९० एकर जमीन खरेदी केली होती. त्यांचे अन्य तीन बंधू रामभाऊ, बापू आणि शंकर हेही स्वामी भक्तच होते. या चारही बंधूंचा सलोखा होता. टाक्याचा माळ मुक्काम देवळे - दाभोळे ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे ही शेतजमीन चौघां-बंधूंच्या नावे खरेदी केली होती. विष्णुपंतांचे देवळे या गावी घर होते. त्यात सुधारणा केली आणि त्यानंतर एक गणपती मंदिर बांधून कार्याचा श्रीगणेशा केला.


देवळे येथील गणपती मंदिर अगदी हल्ली अलिकडच्या काळपर्यंत अस्तित्वात होते. काही वर्षापुर्वी विष्णुपंतांच्या नातलगांनी ही गणपतीची मूर्ती मुंबईला स्वगृही नेली. दाभोळे येथे प्रथम घर बांधले. त्यानंतर घरासमोरच प्रशस्त असे मोठे घर बांधून तिथे स्वामी पादुकांची स्थापना केली. १९२५ च्या दरम्यान दाभोळे गावी स्वामी समर्थ मठाची वास्तू उभी राहिली. स्वामींची भव्य तस्वीर आणि शाळीग्राम पाषाणातील कृष्णवर्णी स्वामी पादुकांची तिथे स्थापना केली. त्यानंतर दोन विहिरी खणल्या. बागायत केली. आंबा-काजू-फणस अशी लागवड केली. तिथे सेवेकरी नेमून स्वामी कार्याची सुरुवात केली.


कांदेवाडीमठ आणि दाभोळे मठ दोन्ही ठिकाणी त्यांनी मोठा सेवकवर्ग निर्माण केला. दोन्ही मठातून त्यांचे आलटून -पालटून वास्तव्य असायचे. स्वभाव कडक, निग्रही. प्रत्येक गोष्टीत त्यांचे लक्ष असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या नातवंडांना ते कोकणात घेऊन जात. तिथे मुलांना खेळ शिकवीत. व्यायामाचे महत्त्व पटवून सांगत. आंबे फणस भरपूर खायला देत पण सकाळ संध्याकाळी पर्वचा-विष्णू सहस्त्र नाम, भगवत्गीतेचे अध्याय पाठ करून घेत. हंगामाचे पहिले फळ, किंवा कोणतीही वस्तू स्वामींना दाखवल्याशिवाय ग्रहण करायची नाही असा त्यांचा शिरस्ता होता. आपल्या बागेतील भाजी-फळ हे प्रथम देवाला अर्पण करायचे आणि मगच घरच्यांनी खायचे असा अलखित नियमच होता. एकदा त्यांच्या पुतण्याने नैवेद्य न दाखवता आधीच आंबा खाल्याचे समजताच भाऊंनी त्याला चांगला चोप दिला होता.


विष्णुपंतांचा स्वभाव कडक होता. शिस्त प्रिय होता पण मनाने अत्यंत प्रसन्न आणि आनंदी होते. त्यांचे खिशात खूप पैसे असत. बाडीत सकाळी फेरी मारायला जात, तेव्हा त्यांच्या भोवती मुलांचा गराडा पडे. या मुलांना, ते खिशात हात घालून हाती लागतील तेवढे पैसे देत असत.


अशा त-हेने जवळपास पंचवीस वर्षे भाऊंनी या दोन्ही मठांची व्यवस्था उत्तम त-हेने सांभाळली. शेवटचा श्वास घेण्यापूर्वी आपल्या जवळ असलेल्या दोन्ही मुलांना त्यांनी 'आम्ही जातो' अशी निरोप देण्यासाठी हाताने खूण केली. आणि त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला आणि त्याचवेळी समोरच्या स्वामींच्या तसवीरीवरील बल्ब खळकन फुटला.


विष्णूपंतांच्या पश्चात कांदेवाडी मठात त्यांचे चिरंजीव पानवळकर हे सेवेकरी होते. वासुदेवरावांनी आपल्या पश्चात अप्पा देव यांची नियुक्ती केली होती. या अप्पा देवांनीही अगदी निरलसपणे आणि एक निष्ठेने सेवा केली. १९८० सालपर्यंत विष्णुपंतांचे नातू श्रीराम यांचा कांदेवाडी मठाशी संपर्क होता. गंगाराम खत्री वाडीत गिरगावात त्यांचे पूर्वीपासून वास्तव्य होते. त्यानंतर ते अंधेरी येथे रहायला आले.


विष्णूपंत संस्थापित दाभोळे मठ

विष्णूपंतांनी आपल्या असीम स्वामी भक्तीच्या जोरावर कांदेवाडी मठात खूप सेवा केली. मोठा लौकिक मिळवला. अनेकांचे कोटकल्याण केले. त्यांची या निमित्ताने अनेक धनिकांची ओळख झाली मठात येणारे स्वामीभक्त सढळ हस्ते खर्च करीत असत. विष्णूपंतांनी ह्या मिळकतीतूनच दाभोळे येथे स्वामी समर्थ मठाची स्थापना केली हा इतिहास आपण आता पाहिलाच. आता पुढचा इतिहास पाहू


विष्णुपंतांच्या मृत्यूनंतर ह्या मठाचे वैभव संपले. त्याला कुणी वाली उरला नाही. विष्णूपंतांच्या पश्चात त्यांचे द्वितीय चिरंजीव वासुदेव हे काही काळ दाभोळे मठात वास्तव्यास होते. परंतू तेथील जमीन, मठ यातून ठोस उत्पन्नाचे काही साधन नसल्यामुळे ते तिकडून मुंबईस आले आणि पानवळकरांची नाळ या मठापासून तुटली ती कायमचीच वासुदेव दत्तात्रय हे अत्यंत कर्तबगार होते. निस्सीम स्वामीभक्त होते. त्यांनी मुंबईत गिरगाव येथे सुईग थ्रेड म्यॅन्युफॅक्चरर या नावे कारखाना सुरु केला. खूप मेहनत घेतली आणि स्वामीकृपेने त्यांची व्यवसायात खूप भरभराट झाली. मोठे वैभव प्राप्त झाले. पण कोकणातील मठाकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यांचे तीन पुत्र बाळकृष्ण श्रीराम आणि महादेव हेही मुंबईतच वाढले. लहानाचे मोठे झाले. त्यामुळे त्यांनाही गावची ओढ राहिली नाही. इस्टेटीकडे आणि मठाकडे लक्ष द्यायला सवड झाली नाही. १९१० साली खरेदी केलेली १० एकर जमीन हळुहळू कुळकायद्यानुसार कुळाच्या नावे होत गेली. शेवटी १२ एकर जमीन, विहीर आणि मठाची वास्तू एवढीच उरली. तेही सरकारजमा होण्याची वेळ आली.


सुवर्ण संधी आली होती

विष्णूपंतांचे चिरंजीव दत्तात्रय हे डॉक्टर होते. त्यांचा पुत्र अविनाश आणि अजित. यापैकी अजित यांचा नोकरी व्यवसाय यात जम बसत नव्हता. त्यामुळे ही सर्व मालमत्ता बक्षीसपत्राने श्री. अजित दत्तात्रय पानवळकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. अजित यांचे मित्र नारायण सिनकर हे राजापूर जवळील भालावली गावचे. हे दोघे कट्टर मित्र. अजित यांनी दाभोळे येथे जाऊन अनेक वर्ष दुर्लक्षित असलेले आपले परंपरागत स्थान विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यांची बहिण विनिता याही विवाहीत असून, मुंबईत वास्तव्यास असल्यातरी त्या अधूनमधून तिकडे आवडीने जातात.


दुर्दैव आडवे आले

पण दुर्दैवाने अजित यांचे अकाली निधन झाले आणि पुन्हा मठ बेवारस झाला. पण नारायण सिनकर यांनी कंबर कसली. अजित यांचे अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करण्याचा त्यांनी चंग बांधला, सध्या दाभोळे मठाचे तेच सर्वेसर्वा असून, गेली बावीस वर्षे निरलस सेवा करीत आहेत. ते अविवाहीत आहेत. परंतु राजकारणात असल्यामुळे, थोरा मोठ्यांच्या परिचयामुळे आज गावात त्याचा दबदबा आहे.


मठात अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून मधली पन्नास वर्षे दुर्लक्षीत असलेला हा स्वामी समर्थ मठ त्यांनी पुन्हा उर्जितावस्थेला आणला आहे. ह्या मठाची वास्तू व एकूण सर्व इस्टेट १९७२ च्या कुळकायद्याच्या वेळी श्रीकृष्ण भिकाजी पानवळकर यांचे नावे झाली. हे पानवळकर विष्णुपंत नातलग नव्हेत. श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता त्यांच्या पत्नी वत्सलाबाई श्रीकृष्ण पानवळकर यांचे नावे झाली. आज अखेर ती त्यांचेच नावे असून, त्या मुलगा दिलीप यांचे सोबत सावंतवाडी येथे रहातात.


वत्सलाबाईंनी अनेक वर्षे या मठाची देखभाल केली. त्यांचे दुसरे सुपुत्र दिनेश हे कणकवली येथे रहातात. त्यांनी तरळे या गावाजवळ छोटासा स्वामी मठ उभारला आहे. हे दोघे बंधू श्री. दिलीप आणि दिनेश पानवळकर हेच दाभोळे येथील मठाचे व जमिनीचे सध्याचे वहिवाटदार आहेत. या मठाचा ते ट्रस्ट करणार आहेत असे समजते. आपणास या मठाकडे जाण्यासाठी विविध रत्नागिरी रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टँडवरून कोल्हापूरला जाणाऱ्या बसने दाभोळे येथे जाता येते. संगमेश्वर तालुक्यातील देवळ्यापासून ४ किमीवर टाक्याचा माळ, जोशीवाडी येथे हे स्थान आहे. रत्नागिरीपासून २९ किमीवर तर साखरप्यापासून केवळ ९ किमीवर हे स्थान आहे. साखरप्याहून रिक्षाने जाता येते. बेळगाव विजापूर बस पकडल्यास दाभोळे बाजारपेठेत थांबते. तिथून मठाकडे जाता येते. पूर्वी हा मठ ब्राह्मणाचे घर. बामणाचा मठ म्हणून ओळखला जायचा. तेथील सोवळे ओवळे आणि एकंदरीत संकुचित दृष्टीकोन यामुळे सर्वसामान्यांपासून अपरिचित होता. गाभारा आणि सभागृह याचेमध्ये लाकडी पार्टीशन होते. या मठात तशी ये-जा कमीच. आणि त्यातूनच जे भाविक येत त्यांना लांबून दर्शन घ्यावे लागे. भक्त आणि भगवंत यांचेमधील हा अडसर सिनकरांच्या पुढाकाराने दूर झाला आणि भाविक अगदी सहजतेने मठात जाऊन स्वामी समर्थ पादुकांवर माथा टेकवू लागला. ह्या भागाला 'टाक्याचा माळ' हे नाव पडण्याचे कारण म्हणजे, हा भाग तसा डोंगराळ. इथे पाण्याचे चार महिने दुर्भिक्ष. या परिसरात फार पूर्वीपासूनचे मोठे पाण्याचे टाके म्हणजे प्रशस्त तळे असून, सर्वांचे जीवन त्याच्यावरच अवलंबून आहे. पाण्याचे टाके, असलेला हा परिसर त्यामुळेच टाक्याचा माळ या नावे प्रसिध्द झाला. असो. पण गेली वीस बावीस वर्षे त्याचे महात्म्य वाढले आहे. टाक्याच्या माळावर टेलिफोन बुथ आहे. तिथून पुढे जोशीवाडी - स्वामी मठ.

 
 


श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

278 views0 comments

Comments


bottom of page