भगवद्गीता वाचून झाल्यानंतरही माझं वाचन एकीकडे चालूच होतं पण जेंव्हा लिखाण सुरू झालं तेंव्हा माझे भगवद्गीता वाचून प्रेरित झालेले विचार मी लेखनातून मांडण्यास सुरुवात केली. त्यावर काही जणांची प्रतिक्रिया ऐकण्यास मिळाली ती म्हणजे "तू अचानक इतका धार्मिक कसा झालास?" या प्रश्नाचं पटकन उत्तर देणं नेहमीच कठीण होतं कारण मुळात प्रश्नच चुकीचा होता. धार्मिक मी आधीपण होतो, धार्मिक तुम्हीपण आहात. मला जी गोष्ट उमगली तिला धार्मिकता नाही तर अध्यात्मिकता म्हणतात. मग साहजिकच पुढचा प्रश्न उपस्थित होतो की "काय फरक आहे?" तुम्ही स्वतःला अध्यात्मिक म्हणवणारे पण तर देव देवच तर करता. मनातून थोड हसू येत हा विचार करून की या प्रश्नाला कुत्सित म्हणावं की निरागस. असो, एकंदर धार्मिक आणि अध्यात्मिक या दोन गोष्टींची व्याख्या थोडक्यात मांडणं कठीण आहे पण तरी सुद्धा माझा हा लेख म्हणजे दोन्ही शब्दांच मला उमगलेले संक्षिप्त स्पष्टीकरण.
अथातो ब्रम्हजिज्ञासा
लोक जेंव्हा "किती देव देव करतोस!" असं म्हणतात तेंव्हा मला एका गोष्टीचं नवल वाटतं ते म्हणजे शेकडो आणि हजारो पानांच्या आपल्या धार्मिक संस्कृतीच्या ग्रंथांमध्ये फक्त देव देव असे दोनच शब्द लिहिलेले असतील का? नाही तर मग हे ग्रंथ म्हणजे फक्त देवाने केलेले 'चमत्कार' आहेत असं सगळ्यांना वाटत का? चमत्कार दाखवायला तो काय फक्त जादुगार आहे! मग वर वर म्हणताना लोक म्हणतात की देव म्हणतो माझी भक्ती करा. म्हणजे नक्की काय करा? का करायची भक्ती? काय होतं त्याने? असा प्रश्न पडतो का? बरं असा प्रश्न जरी पडला तरी त्याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करतो की जाऊ दे म्हणून सोडून देतो? माझ्या मते ही जिज्ञासा निर्माण झाली की आपल्याला हळू हळू त्याची ओढ लावते. त्या परब्रम्हाला जाणून घ्यायची इच्छा म्हणजेच अथातो ब्रम्हजिज्ञासा!
आपण हिंदू आहोत असा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान भगवद्गीता, गुरूचरित्र, दासबोध आणि तत्सम संत साहित्याचा अभ्यास किंवा साधारण वाचन करून खरा धर्म काय आहे हे जाणून घ्यायची तसदी घेणं अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियावर आजकाल कोणीही येतो आणि आपल्या धर्माचं वस्त्रहरण करून जातो. कित्येक जण धर्मावरून वाद नको म्हणून अशा टिप्पणीवर स्वतःचे मत देणे टाळतात. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे जे मी निरीक्षण केलं आहे, ते म्हणजे, त्याविरुद्ध शांतपणे आणि तर्कसंगतीने वादविवाद करण्यास आवश्यक असलेले ज्ञान पण कोणाकडेच नसते. त्यामुळे हे वस्त्रहरण होताना आम्ही धड कृष्णाचा धावा पण करू शकत नाही की "हे वासुदेवा! आता तूच नाश कर रे या अधर्माचा". कारण आम्हाला कृष्णाने काय सांगितले माहितीच नाही किंवा कृष्ण हा देव आहे या पलीकडे फारशी माहितीच नाही. अध्यात्म ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. पण आजकाल आपल्याच लोकांनीं तिचे वस्त्रहरण चालू ठेवले आहे.
एकंदर या लेखाचा गाभा धार्मिकता आणि अध्यात्मिकता यातील द्वंद्वावर आधारित आहे. पण सतत विचारला जाणारा हा प्रश्र्न आणि सोशल मीडियावर अध्यात्म या विषयावर न पटलेल्या युक्तीवादामुळे त्याच होणार वस्त्रहरण पाहून काल पहाटे हे विचार लेखनात उतरले. त्यामुळे अध्यात्म या शब्दाचं झालेलं वस्त्रहरण या अर्थाने हा लेख प्रस्तृत केला आहे.
धर्म काय आहे?
खर एका शब्दात सांगायचे झाले तर "सर्व धर्माचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये" हे भगवद्गीतेमधील श्रीकृष्णाचे विधान हा खरा धर्म आहे. पण माझ्यामते धर्माची व्याख्या ही मुळात आपल्या जीवनपद्धतीशी निगडित आहे. कारण सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये मनुष्य हा एकमेव सामाजिक प्राणी ठरला कारण त्याला बुद्धीचे वरदान मिळाले. समाज आला म्हणजे सामाजिक बांधिलकी आली. एकमेकांशी संपर्क आला. विचारांचे आदान प्रदान करणे आले. भौतिक गरजा आणि त्यांची पूर्तता आली.
समाज म्हणजे मुळात नक्की काय संकल्पना आहे ?
मला लागणाऱ्या सगळ्या भौतिक गरजांची पूर्तता मी एकटा करू शकत नाही. पण समाजात राहून ४ टाळकी एकमेकांच्या मदतीने त्या पूर्ण करू शकतात. ही वृत्ती थोडी संकुचित केली आणि त्यात 'मी' पणा आणला की कुटुंब आल. हे माझं कुटुंब म्हणजे 'माझी बायको' किंवा 'माझा नवरा' आणि 'माझी मुल' ज्यांवर 'माझा'अधिकार आहे. या कुटुंबातील एक जण काबाडकष्ट करतो, त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून एक जण सगळ्यांना खाऊ पिऊ घालायची सोय करतो, यातून थकलेल्या शरीराची सेवा करायची आणि पुढे मोठ होऊन हेच काबाडकष्ट करून कुटुंब, संसार चालवायची जबाबदारी घेण्यासाठी मुल तयार होत असतात. यातून संस्कार पद्धती जन्माला आली.
संस्कार म्हणजे काय?
जन्म व्हायच्या आधीपासून आई वडील त्या मुलास या जगतात आणण्याची तयारी सुरू करतात त्या क्षणापासून संस्कार पद्धती सुरू होते. म्हणून वैदिक पद्धतीनुसार बघता, फक्त कामार्कषणाने एकत्र येऊन मुलास जन्म न देता 'विवाह संस्कार', 'गर्भाधान संस्कार' इत्यादी संस्कार पद्धती उदयास आली. 'गर्भाधान संस्कार' म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर हे बाळ ज्यास आम्ही जन्माला घालू इच्छित आहोत त्यावर हे भगवंता तुझी कृपा असू दे आणि ते बाळ तुमच्यासारखे तेजस्वी होऊन त्याचे आचरण तुमच्यासारखे धर्माला अनुसरून असू दे या प्रेरणेने केलेला प्रयत्न. पुढे जसे ते बाळ मोठे होऊ लागते त्यावर भगवंतांची कृपा रहावी म्हणून अनेक संस्कार केले जातात. 'नामकरण' हा पण त्यातलाच एक संस्कार झाला. हे संस्कार त्या बाळास पुढे त्या कुटुंबात आणि समाजात सभ्यतेने वावरता यावं याची तयारी करून घेतात. कारण त्या बाळास पुढे जाऊन कुटुंब संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यायची असते.
हा सगळा पसारा वाढत जातो आणि त्याला सांभाळण्याची नैतिक जबाबदरी धर्म पार पाडत असतो. कारण वर म्हणालो तसं एका कुटुंबाचा दुसऱ्या कुटुंबाशी येणारा संपर्क आणि होणारी भौतिक आणि वैचारिक देवाण घेवाण ही सुरळीत नाही झाली तर समाज कोलमडतो. मग या निती मूल्यांची जपणूक करण्यासाठी त्यावर अंकुश ठेवण्यासाठी राजेशाही आली आणि प्रत्येकाच्या कामाच्या स्वरूपानुसार चातुर्वर्ण्य व्यवस्था आली आणि समाजाचा भाग बनली.
चातुर्वर्ण्य व्यवस्था
माझ्या 'संकीर्तन यज्ञ' लेखात या विषयास मी हात घातला होता. त्यामुळे मी तोच मुद्दा मांडू इच्छित नाही. अजून पर्यंत तुमच्या वाचनात हा लेख आला नसल्यास वरील संकीर्तन यज्ञ या शब्दावर क्लिक करुन तुम्ही तो लेख वाचू शकता.
वेद
एकंदर वरील लेख बघता एक गोष्ट लक्षात येईल की या सगळ्या पसाऱ्यात देव कुठे आला? बरोबर! या सगळ्या पसाऱ्याची उहापोह ज्या शास्त्रामध्ये केली आहे त्यातील प्रमुख शास्त्रे म्हणजे वेद. वेद हे कर्माच्या सिद्धांतावर आधारित आहेत. ते असे की, वेगवेगळ्या पद्धतीने वेद हे यज्ञकर्माविषयी सांगतात. किंवा थोडक्यात सांगायचं झाल तर कर्म करण्याविषयी सांगतात. हे कर्म मंत्रोच्चाराद्वारे पार पाडलं जातं त्यामुळे ते कर्मकांड म्हणून ओळखलं जातं. पण योग्य पद्धतीने उच्चारलेल्या मंत्रांची ताकद पण तेवढीच आहे. आजही सोम याग (यज्ञ) सारखे यज्ञ करून पाऊस पाडण्याची क्षमता असलेले वेद पारंगत पंडित अस्तित्वात आहेत. पण सांगण्याचा मुद्दा असा की या वेदांचा मूळ उद्देश हा आहे की, या मंत्रोच्चार पद्धतीने एखादे विशिष्ठ कार्य करण्यासाठी नेमून दिलेल्या देवास आळवणी करणे आणि आपले कार्य सिध्दीस जावे म्हणून प्रार्थना करणे. किंवा अजून सोप्प्या शब्दात सांगायचे तर आपल्याला ही सृष्टी ज्या भगवंतांनी दिली आणि त्या सृष्टीच्या पालनाची कामे ज्या विशिष्ठ देवतांकडे सोपवण्यात आली त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. म्हणजेच वेदांचा मूळ संदेश हा त्या भगवंताला जाणून घेणे हा आहे. म्हणून या प्रक्रियेत राजा हा भगवंतांचा प्रतिनिधी असे कारण असे यज्ञ करणे म्हणजे त्यातून स्वतःचा नव्हे तर आपल्या राज्याचा, समाजाचा विकास अपेक्षित असे. त्यासाठी लागणारे द्रव्य, वेद पारंगत ब्राम्हण यांना एकत्रित करून यथासांग यज्ञ पार पाडण्याचे ऐश्वर्य एक राजा किंवा अन्य काही अधिकारी वगळता कोणाला सहज शक्य नसे. या नात्याने राजा हा धर्माचा पालनकर्ता झाला. म्हणजे नक्की कशाचा पालनकर्ता झाला? ही गोष्ट आता लक्षात आलीच असेल!
धर्म / अधर्म
धर्म आणि धर्माचा पसारा हा भौतिक जीवनाशी निगडीत आहे. कारण धर्म आपल्याला समाजात वावरायला शिकवतो. त्यातून आपण आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करतो. जसे की सामाजिक नियमांचे पालन करूनच आपण नोकरी चाकरी करून पैसे कमावतो ज्यातून या गरजा पूर्ण करतो. म्हणून हा मनुष्य देह टिकवण्यासाठी धर्म एक मूलभूत गरज आहे हे साधारण लक्षात आलंच असेल. साने गुरुजी म्हणतात तसं, "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे". आपली विहित कर्मे आपण प्रेमाने जेंव्हा पार पाडतो तेंव्हा समाजात शांतता रहाते. उदाहरण सांगायचे झाले तर एखादा वाणी त्याच्या गिऱ्हाईकांना जर तुसडेपणाने वागवत असेल तर लवकरच ते गिऱ्हाईक दुसऱ्या वाण्याकडे जातील आणि त्या उन्मत्त झालेल्या वाण्याचे दुकान बंद होईल. म्हणजेच या गरजा पार पाडताना कोणाचा केलेला विनयभंग, कोणाची केलेली फसवणूक म्हणजे नियमभंग म्हणजेच अधर्म. कोणाला दिलेला विनाकारण त्रास म्हणजेच अधर्म मग तो माणसांना असो किंवा मुक्या जनावरांना. उत्पात माजवणाऱ्या प्राण्यांची शिकार करणे, ते शिकण्यास मृगया करण्यास जाणे आणि या उलट स्वतःच्या जिव्हेच्या तृप्तीसाठी निरपराध प्राण्यांचे रक्त वाहणे यात फरक आहे जो मी माझ्या 'जीवो जीवस्य जीवनम्' लेखात विस्तृतपणे मांडला आहे. म्हणून क्षात्र धर्माचे पालन करणारा राजा हा शिकार करू शकतो कारण त्याला त्या हिंस्र श्र्वापदापासून त्याच्या प्रजेचे रक्षण करणे आवश्यक आहे. पण तेच जिव्हातृप्ती साठी प्राण्यांचा गळा कापणारा खाटीक आणि त्याचे खरेदी करणारे हे अधर्मी आहेत.
धर्म म्हणजे नियम
नियम हे कोणत्याही मोठ्या जनसमुहास शिस्तबद्धतिने कार्य करता यावे आणि त्यातून सगळ्यांची उन्नती व्हावी या करिता असतात. ते कधीही कोणाची प्रगती खुंटावी यासाठी केले जात नाहीत. असा कोणताही नियम किंवा प्रयत्न जो अशा प्रगतीच्या आड येतो तो नियम अधर्म असतो. शाळा, कार्यालये येथील प्रशासकीय व्यवस्था नियम करतेच ना? त्यांचे उल्लंघन केले की काय होते?
अध्यात्म
अहम् ब्रम्हास्मी म्हणजे मी म्हणजे हे शरीर नाही. आपले शरीर हे पंच महाभूतांनी बनले आहे असे म्हंटले जाते. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश. थोडक्यात आपल्या शरीराची रचना भौतिक गुणधर्म असलेल्या पदार्थांपासून होते आणि त्यात प्राण असेपर्यंत आपण हे शरीर जिवंत आहे म्हणतो. हा प्राण निघून गेला की तोच देह परत त्याच पंचतत्वात विलीन होतो. पण त्या प्राणाच काय ? आपण शरीर जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घेण्यासाठी नाना तऱ्हेने प्रयत्न करतो. पण भौतिक शरीराचं जस वय वाढत जात तसं आपल्याला आपल्या शरीराच्या मर्यादेची जाणीव होते. पण बुद्धीचं काय ? तिला ही गोष्ट उमजायला लागते की शरीर थकत आहे पण माझं मन अजून तरुण ताजतवान आहे. शरीराने साथ दिली तर हे मन अजूनही त्याला त्याच्यासोबत भरकटून न्यायला कधीही तत्पर असतं. ते सहजासहजी तृप्त होत नाही. मग ते कसं तृप्त होत? खाऊन पिऊन, व्यायाम करून, मधुर संगीत ऐकून किंवा नयनरम्य दृश्य पाहून आपण आपल्या मनाला तृप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण या प्रक्रियेत नक्की काय तृप्त होत? तर शरीर. अग्नीमध्ये तूप घातल्याने तो धगधगतच राहतो. शांत कधीच होत नाही. आणि जसा तो शमतो आहे अस वाटलं की सरपण आणि तूप हे घालतच रहावं लागतं. अग्नी त्याला जाळून भस्मसात करत राहतो आणि तो सरपण आणि तूप मागत रहातो. तसच आपल्या शरीराचं आहे. आपण शरीरास तृप्त करण्याचा जेवढा प्रयत्न करतो ते तेवढ्याच आवेशाने गरजा वाढवत राहतं. मन तृप्त होत नाही. पण मन तृप्त झाल आणि त्या अवस्थेतून बाहेर आलाच नाही तर ? हा सच्चिदानंद मिळाला तर?
आपल्या शरीरातील प्राण म्हणजे आपला आत्मा. तो या भौतिक गोष्टींच्या पलीकडे असतो. त्याला शरीराच्या गरजांशी काही घेण देण नसतं. शरीर जीर्ण होऊन गलितगात्र झालं की तो त्याला सोडून नवीन शरीर धारण करतो. या प्रक्रियेत नवीन शरीर धारण करणे हे काही त्याच्या हातात नसतं. ते ज्याच्या हातात असतं तो म्हणजे परम् (श्रेष्ठ) आत्मा - परमात्मा ज्याचे आपण अंश असतो. तो म्हणजे अखंड धगधगणारा अग्नी आहे तर आपण त्यावर उडणारे स्फुल्लिंग किंवा ठिणग्या आहोत. ठिणग्या अग्निपासून विभक्त होतात तेंव्हा त्या अग्नी इतक्याच प्रखर तेजस्वी असतात. त्यांच्यात तसाच अग्नी निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं पण त्यातल्या सर्व सामान्य ठिणग्या उडत बाजूला पडतात आणि थोड्याच वेळात विझून निष्प्रभ होऊन जातात. आपलं अस्तित्व पण तसच क्षणभंगुर आहे. तो मात्र धगधगतच राहतो. आपला आणि त्याचा हा असा वैयक्तिक पातळीवरचा संबंध आपल्या लक्षात येणं म्हणजे अध्यात्म. ही सामाजिक गोष्ट नसून हे वैयक्तिक ऋणानुबंध आहेत. आपलं शरीर आपल्या आई वडीलांपासून प्राप्त झालं आणि त्यांनी आपलं संवर्धन केलं म्हणून जसे आपले आणि त्यांचे ऋणानुबंध असतात तसेच आपला आत्मा हा त्या परमात्म्यापासून अस्तित्वात आला म्हणून त्याचे आणि आपले ऋणानुबंध असतात. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव नसलेले जसे करंटे असतात तसेच तो परमात्मा आपल्यासाठी काय करत असतो याची जाणीव नसलेले आपण बहुतांश करंटे आहोत. पण ही जाणीव झाली की सगळं काही बदलायला सुरुवात होते. जणू काही तो आपल्याला एक दिव्य दृष्टी देतो. आजूबाजूच्या परिस्थितीकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यास सुरुवात करतो. कर्ता आणि करविता तोच आहे आणि आपण मात्र निमित्तमात्र आहोत याची जाणीव होते.
भगवद्गीता
भगवद्गीता हा अध्यात्माच्या क्षेत्राची परिपूर्ण जाणीव करून देणारा ग्रंथ आहे. माझासाठी अध्यात्माच्या प्रवासाची ती पहिली पायरी आहे. हे असे गुह्य ज्ञान आहे की श्रीकृष्णाची इच्छा असल्यास आपण ते जाणून तर घेऊ शकतो पण ते आत्मसात होण्यास कित्येक जन्म घ्यावे लागतात. खरं तर अर्जुन हा सगळ्याच दृष्टीने निमित्तमात्र योद्धा होता. त्याची बुद्धिमत्ता बघता हे सर्व ज्ञान त्याला खूप संक्षिप्त रुपात सांगितलं असतं तरी त्याला ते कळलं असतं किंवा जसं ध्रुव बाळ, भक्त प्रल्हाद यांच्या भ्रुकुटीला स्पर्श करून सर्व वेदांच आणि स्वतः विषयीचे गुह्य ज्ञान जस भगवंतांनी त्यांना एका क्षणात प्रदान केलं तसं ते अर्जुनालाही सहज प्रदान करता आलं असतं. मग रणछोड नाव धारण करण्याची लीला करणाऱ्या त्या श्रीकृष्णास भर रणांगणात संपूर्ण भगवद्गीता सांगण्याची आवश्यकता ती काय ? तर फक्त आणि फक्त आपल्यासाठी! द्वापार युगाचा अंत होऊन कलियुग सुरू होताना आपल्या अध्यात्मिक उद्धारासाठी त्या परमेश्वराने केलेले ते नियोजन होते.
भगवद्गीतेचे अध्याय क्रमाक्रमाने बघत गेल्यास अध्यात्म म्हणजे काय याची पटकन प्रचिती येते. कारण यातला प्रत्येक अध्याय हा किमान एका किंवा अनेक जन्माच्या बरोबरीचा आहे. गोंधळलेल्या मनस्थितीपासून ते मोक्षाच्या वाटचालीपर्यंत आपल्याला होणाऱ्या प्रत्येक अनुभूतीची साक्ष म्हणजे भगवद्गीता! ज्याने गीतासार जाणले त्याने अध्यात्म म्हणजे काय ते जाणले!
अध्याय पहिला : अर्जुनविषादयोग
कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण ज्या वेळी दोन्ही पक्ष युद्धाच्या पवित्र्यात उभे राहतात त्या वेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षांतले नातेवाईक, गुरू व मित्र युद्धाला आणि जीव द्यायला तयार असल्याचे दिसते. शोकाकुल व मोहग्रस्त झाल्याने अर्जुनाची शक्ती खचून जाते, मन गोंधळून जाते आणि तो युद्ध करण्याचा निश्चय सोडून देतो.
अध्याय दुसरा: सांख्ययोग-गीतेचे सार
अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करतो. नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून श्रीकृष्ण आपल्या उपदेशाला सुरुवात करतात. देहांतराची (पुनर्जन्म) प्रक्रिया, परमेश्वराची अहैतुकी सेवा आणि साक्षात्कारी पुरुषाची लक्षणे, यांच्याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात.
अध्याय तिसरा: कर्मयोग
या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म करायलाच हवे. परंतु आपण केलेले कर्म आपल्याला या संसारात बांधून ठेवू शकते अथवा मुक्त करू शकते. निष्काम भावनेने परमेश्वराच्या आनंदाप्रीत्यर्थ कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या फेऱ्यातून (क्रिया आणि प्रतिक्रिया) मुक्त होऊ शकतो व आत्मा आणि परमात्मा यांबद्दल दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो.
अध्याय चौथा : ज्ञानकर्मसंन्यासयोग
दिव्य ज्ञान - म्हणजे आत्मा, परमेश्वर आणि त्यांच्या परस्पर संबंधांविषयीचे ज्ञान हे शुद्ध करणारे व मुक्ती देणारे असते. हे ज्ञान निष्काम भक्ती किंवा कर्मयोगाचे फळ असते. भगवान श्रीकृष्ण गीतेचा प्राचीन इतिहास, भौतिक जगातील त्यांच्या वारंवार होणाऱ्या अवतरणाचे महत्त्व आणि गुरूला (आत्मसाक्षात्कारी शिक्षक) शरण जाण्याची आवश्यकता यांविषयी उपदेश करतात.
अध्याय पाचवा: कर्मसंन्यासयोग - कृष्णभावनाभावित कर्म
बुद्धिमान मनुष्य दिव्य ज्ञानरूपी अग्नीत शुद्ध होऊन वरकरणी सर्व प्रकारची कर्मे करीत असतो, परंतु आतून मात्र कर्माच्या फळांचा त्याग करून शांती, विरक्ती, सहिष्णुता, आध्यात्मिक दृष्टी आणि आनंद प्राप्त करतो.
अध्याय सहावा : ध्यानयोग
अष्टांगयोग प्रक्रिया (एक यंत्रवत चालणारी ध्यान क्रिया), मन आणि इंद्रिये नियंत्रित करून परमात्म्यावर (परमेश्वराचे आपल्या हृदयात स्थित असलेले रूप) ध्यान केंद्रित करते. या प्रक्रियेचा कळस म्हणजे समाधी किंवा परमेश्वराचा पूर्ण साक्षात्कार.
अध्याय सातवा : ज्ञानविज्ञानयोग- भगवद्ज्ञान
भगवान श्रीकृष्ण परम सत्य आहेत. जे काही भौतिक व आध्यात्मिक आहे त्या सर्व गोष्टींचे आदिकारण व पोषणकर्ते आहेत. महात्मागण भक्तिपूर्वक त्यांना शरण जातात, परंतु पापी लोक इतर गोष्टींच्या पूजेमध्ये मनाला गुंतवीत राहातात.
अध्याय आठवा: अक्षरब्रह्मयोग- भगवद्प्राप्ती
भगवान श्रीकृष्णांचे आयुष्यभर भक्तिपूर्वक स्मरण केल्याने व विशेषकरून मृत्युसमयी स्मरण केल्याने, मनुष्याला त्यांचे परमधाम प्राप्त करता येते, जे भौतिक जगाच्या पलीकडे आहे.
अध्याय नववा : राजविद्या राजगुह्य योग- परम गोपनीय ज्ञान
भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आहेत व परम आराध्य आहेत. भक्तीच्या माध्यमाद्वारे जीवात्म्याचा त्यांच्याबरोबर शाश्वत संबंध असतो. शुद्ध भक्ती पुन्हा जागृत केल्याने मनुष्य श्रीकृष्णांचे वैकुंठलोकातील परम धाम परत प्राप्त करू शकतो.
अध्याय दहावा : विभूतियोग- श्रीभगवंतांचे ऐश्वर्य
भौतिक किंवा आध्यात्मिक जगतांमध्ये बळ, सौंदर्य, वैभव किंवा उदात्तपणाचे प्रदर्शन करणाऱ्या सर्व घटना म्हणजे श्रीकृष्णांच्या दैवी शक्ती व ऐश्वर्यांचे एक आंशिक प्रकटीकरण होय. सर्व कारणांचे आदिकारण व सर्व वस्तूंचे सार असलेले भगवान श्रीकृष्ण हेच सर्वांचे परम आराध्य दैवत आहेत.
अध्याय अकरावा : विश्वरूप दर्शनयोग–विश्वरूप
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करतात व विराट रूप दाखवितात. आपले अद्भुत, असीमित रूप प्रकट करतात. अशा प्रकारे ते स्वतः परमेश्वर असल्याचे सिद्ध करून दाखवितात. श्रीकृष्ण सांगतात की, त्यांचे सर्वांग सुंदर मानवसदृश शरीर हेच परमेश्वराचे मूळ रूप आहे. केवळ शुद्ध भक्तीद्वारेच मनुष्य हे रूप पाहू शकतो.
अध्याय बारावा : भक्तियोग- श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा
भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध प्रेम प्राप्त करण्याकरिता भक्तियोग हे सर्वांत सुलभ व श्रेष्ठ साधन आहे. या परम पंथाचे अनुसरण करणाऱ्यांमध्ये दिव्य गुण उत्पन्न होतात.
अध्याय तेरावा : क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग-प्रकृती, पुरुष आणि चेतना
ज्या मनुष्याला शरीर, आत्मा आणि या दोघांच्याही पलीकडे स्थित असलेला परमात्मा यांच्यातील फरक समजतो तो या भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो..
अध्याय चौदावा: गुणत्रयविभागयोग- त्रिगुणमयी माया
सर्व देहधारी जीव सत्व, रज आणि तम या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या नियंत्रणाखाली असतात. हे गुण म्हणजे काय, ते आपल्यावर कसा काय अंमल करतात, त्यांच्या पलीकडे जाऊन आपण मुक्त कसे होऊ शकतो आणि ज्याने अशी मुक्तावस्था प्राप्त केली आहे त्याची लक्षणे कोणती? यांविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात.
अध्याय पंधरावा : पुरुषोत्तमयोग
परम पुरुषाचा योग स्वतःला भौतिक जगताच्या पाशातून मुक्त करणे व श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे समजणे हे वैदिक ज्ञानाचे परम उद्दिष्ट आहे. ज्याला श्रीकृष्णांचे परम स्वरूप समजते तो त्यांना शरण जातो व त्यांची भक्ती करू लागतो..
अध्याय सोळावा : दैवासुरसंपदविभागयोग-दैवी आणि आसुरी स्वभाव
शास्त्रांचे नियम झुगारून लहरीप्रमाणे जीवन जगणारे व आसुरी गुण असणाऱ्या व्यक्ती नीच योनीत जन्म घेतात व संसारामध्ये अधिकाधिक बांधल्या जातात. परंतु जे दिव्य गुणसंपन्न असतात, जीवनात विधिनियमांचे नीट पालन करतात व शास्त्रांच्या आदेशानुसार वागतात, ते क्रमश: आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करतात.
अध्याय सतरावा : श्रद्धात्रयविभागयोग- श्रद्धेचे तीन प्रकार
भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनुसार व त्यांच्यातून उत्पन्न होणाऱ्या तीन प्रकारच्या श्रद्धा असतात. रजोगुणी व तमोगुणी श्रद्धा बाळगणाऱ्या व्यक्ती जे काही कार्य करतात, त्यांच्यामुळे त्यांना क्षणभंगुर भौतिक फळाची प्राप्ती होते. तर याउलट, सत्त्वगुणी व शास्त्रांच्या आदेशाप्रमाणे केलेली कर्मे हृदयाचे शुद्धीकरण करतात व श्रीकृष्णांच्या ठायी शुद्ध श्रद्धा व भक्ती जागृत करतात.
अध्याय अठरावा : मोक्षसंन्यासयोग- गीतेचा निष्कर्षः त्यागाची पूर्णता
वैराग्य आणि मानवी चेतना व कर्म यावर प्रकृतीच्या तीन गुणांचा परिणाम यांविषयी भगवान श्रीकृष्ण विवेचन करतात. ब्रह्म-साक्षात्कार, भगवद्गीतेचा महिमा, गीतेचा अंतिम निष्कर्ष यांविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात. सर्वोच्च धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे बिनशर्त भक्तिभावनेने शरण जाणे, शरणागतीचा हा सर्वोच्च मार्ग सर्व पापांतून मुक्त करून पूर्ण ज्ञान प्रदान करतो व श्रीकृष्णांच्या नित्य, दिव्य धामात प्रवेश मिळवून देतो.
Comentários