top of page
Writer's pictureNayanesh Gupte

वासुदेव आला! हो! वासुदेव आला!!

हा लेख म्हणजे माझे फक्त Scribbled Thoughts नसून माझा आतापर्यंतचा सगळ्यात सुंदर अनुभव आहे आणि पुन्हा एकदा कर्मदरिद्रीपणा केल्याची नोंद सुद्धा !


नक्की काय घडलं हे सविस्तर मांडायच्या आधी थोडीशी प्रस्तावना त्या वासुदेवांबद्दल जे "वासुदेव आला! हो! वासुदेव आला!!" असा आवाज देऊन दारोदारी हिंडून माधुकरी मागून उपजीविका करणाऱ्या संप्रदायाबद्दल.


➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

वासुदेव

महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण जात. वृत्तीने हे धार्मिक भिक्षेकरी आहेत. एका ब्राह्मण ज्योतिषास कुणबी स्त्रीपासून सहदेव नावाचा पुत्र झाला आणि ह्या सहदेवापासून आपली जात उत्पन्न झाली, असे ह्या जातीचे लोक सांगतात. मराठा कुणब्यांप्रमाणे त्यांचे रीतिरिवाज आहेत. भिक्षा मागून ते उदरनिर्वाह करतात आणि घरातल्या मुलाला योग्य वेळी भिक्षा मागण्याची दीक्षाही समारंभपूर्वक दिली जाते. काही वासुदेव शेतीचा व्यवसायही करतात.


वासुदेव जरी भिक्षेकरी असले, तरी ते भिकारी गणले जात नाहीत कारण त्यांना भिक्षा वाढणे हा धर्माचरणाचा भाग मानला जातो. पहाटेच्या वेळी रामकृष्णांचा नामघोष करीत ते येतात. त्यांचा पोषाख वैशिष्ट्यपूर्ण असतो. घोळदार अंगरखा, सुरवार, गळ्यात तांबडा शेला आणि डोक्यावर शंकूच्या आकाराची मोरपिसांची टोपी, कंबरेला बांधलेल्या शेल्यात बासरी खोचलेली असते. पायात घुंगुर असतात. वासुदेवाच्या उजव्या हातात चिपळ्या आणि डाव्या हातात टाळ असतो. त्यांच्या तालावर तो सुंदर धार्मिक गाणी म्हणतो आणि नाचतो. गृहिणी त्याला धान्य, पैसे देतात. हे दानही वासुदेव विशिष्ट पद्धतीने स्वीकारतो. दान देणाऱ्याला तो त्याच्या वाडवडिलांचे नाव विचारतो आणि त्यांची नावे घेऊन महाराष्ट्रातील विविध देवतांना व संतांना ते दान ‘दान पावलंऽ दान पावलंऽ’ असे एक गाणे म्हणून पोचते करतो. पंढरपूरचा ‘इट्टोबाराया’, कोंढणपुरची ‘तुक्काबाई’, जेजुरीचा ‘खंडोबा’, सासवडचा ‘सोपानदेव’, आळंदीचा ‘ग्यानुबादेव’, देहूचा ‘तुकारामबाबा’, शिंगणापुरचा ‘महादेव’, मुंगीपैठणातला ‘नाथमहाराज’ अशा सर्वांना वासुदेव दान पावल्याचे सांगतो. म्हणजे हे दानवासुदेवाच्या हातात पडत असले, तरी वासुदेवाची भावना ते दान देवदेवतांना व संतांना पोचविण्याची असते. दाताही दान आपल्या वाडवडिलांच्या नावे देत असल्यामुळे दान देऊन स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईत भर पडावी, अशीच त्याची भावना असते. दान पावल्यानंतर वासुदेव बासरी वाजवतो आणि स्वतःभोवती गिरक्या घेतो.


वासुदेव हा कृष्णभक्त असल्यामुळे त्याने श्रीकृष्णाचा वेष घेतला, असे वासुदेवाच्या पोषाखाचे स्पष्टीकरण प्रा. श्री. म. माटे ह्यांनी दिले असून, ‘वासुदेव ही संस्था म्हणजे लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातील भागवत संप्रदायच आहे’ असे मत डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांनी मांडले आहे.


वासुदेवाच्या गाण्यांत कृष्णचरित्र, भक्तीची थोरवी, प्रपंचनीती असे विषय येतात. अनेकदा साध्यासोप्या भाषेत ही गाणी वेदान्ताचाही बोध करतात. वासुदेव आणि त्यांचा व्यवसाय ह्यांना हजार-बाराशे वर्षांची तर परंपरा आहे. महानुभाव साहित्यात ‘भ्रीडी’ ह्या नावाने वासुदेवाचा निर्देश आलेला दिसतो. ज्ञानदेवांनी तसेच नामदेवांनी वासुदेवावर रूपके केली आहेत.


गावोगावी भरणाऱ्या जत्रांत वासुदेव दिसतात. काही लोक नदीच्या पात्रात उभे राहून वासुदेवाला दान देतात. वेगवेगळ्या वासुदेवांची हक्काची वेगवेगळी गावे असतात आणि त्या गावांत प्रत्येक वर्षी फेरी मारून ते दान घेतात. ज्या गावत त्यांचा हक्क नसतो, त्या गावात दान घेताना ते आपली मोरपिसांची टोपी घालीत नाहीत.


संदर्भ : डॉ. रा. चिं. ढेरे, मराठी लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶


२४ फेब्रुवारी,२०२१, सायंकाळची वेळ. खिडकीतून बाहेर अंधार दिसत होता. घरातले दिवे लागलेले होते. रस्त्यावर लागलेल्या दिव्यात रिम झिम पडणाऱ्या पावसाची सर दिसत होती. मी आमच्या अंबरनाथच्या घरी खुर्चीत नुसताच बसलो होतो. घरात जेवणाची तयारी झाली होती. इतक्यात बाहेरून आवाज आला. "वासुदेव आला! हो! वासुदेव आला!!". मी खिडकीकडे धावलो.


तो समोर उभा होता. कृष्णवर्णीय, दुधात केशर पडावं तसा डोळ्याचा रंग. मोठं लखलखणार कपाळ. मी आमच्या पहिल्या मजल्यावरून त्याच्याकडे पाहिलं तेंव्हा तो हळूच डोकं वर करून माझ्याकडे पाहत होता. अंधार झाला तरी हा अजून भिक्षा मागतो आहे. कदाचित आज ह्याला भिक्षा मिळाली नसावी कारण त्याच्या चेहऱ्यावरचे भुकेले भाव मी टिपले होते किंवा माझ्याच मनाचा भ्रम होता पण त्यानंतर मी स्वयंपाकघराकडे पळालो. डोक्यात होत की त्याला भिक्षा म्हणून त्याला धान्य द्यायचं असतं. पण पाऊस पडत होता. पाऊस वाढला तर! कुठे कधी जेवणार तो? मी आईला म्हंटल पान वाढ. बहुतेक तिला वाटलं की मला भूक लागली असावी. कारण घाईघाईत मी काही सांगायला विसरलो होतो. तिने पान वाढलं. मला कुठून हातात आल्या माहित नाही पण कागदी पत्रावळ्या हातात आल्या. एका पत्रावळीवर वरण, भात, चपाती मीच वाढून घेतलं. त्याला दुसऱ्या पत्रावळीने झाकले आणि जिने उतरून खाली धावत गेलो. दुसऱ्या क्षणाला मी खाली त्याच्यासमोर उभा होतो. तो एका आडोशाला उभा होता. मी त्याच्या हातात ते जेवणाच पान दिलं. त्याला नमस्कार करायला खाली वाकलो. त्याने देखील डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. काहीच बोलला नाही. मी उभा राहिलो. तो तिथे नव्हताच ! मी आजूबाजूला पाहिलं. पण कुठेच नव्हता.


मी ताडकन उठून बसलो. घड्याळ पाहिलं. २४ फेब्रुवारीचे पहाटेचे ०४:१५ वाजले होते. मी आमच्या बँगलोरच्या घरी होतो. थोडावेळ बसलो. पण अजूनही त्या धक्यातून सावरलो नव्हतो. शयनगृहातून बाहेर आलो. आमच्या दिवाणखान्यात लावलेल्या श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या चित्रातील श्रीकृष्णाच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहिले. डोळ्यातील गंगा यमुना बोलक्या झाल्या. अश्रूंचा बांध फुटला. अक्षरशः लहान मुलासारखा ढसाढसा रडत होतो. खूप गहिवरलो. का रडत होतो मी पण नाही सांगू शकत! मी तिथेच गुडघे टेकले आणि डोकं टेकवल. त्याला म्हणालो - "मला माहित नाही की तुम्ही वेंकटेश रुपात होता की विठ्ठलाच्या" पण मला माहित आहे तुम्ही माझे वासुदेव श्रीकृष्ण होता!".

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

थोडा वेळ गेला. तसाच हुंदके देत देत परत आकांक्षाला उठवल. तिने माझ्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहिले. ती गोंधळून गेली. तिचा हात धरुन तिला परत बाहेर घेऊन आलो. एकंदर माझ्या स्थितीकडे पाहून मी काहीतरी स्वप्न पाहिले असल्याचा अंदाज तिला आला होता कारण अजूनही हुंदके फुटत असले तरी मन शांत होतं. दुःखाचा लवलेश दिसत नव्हता. आम्ही बसलो. मी नक्की काय पाहिलं सांगण्याचा प्रयत्न केला पण शब्द फुटत नव्हते. तसाच स्वस्थ बसलो आणि थोड्या वेळाने तिला सर्व हकीकत सांगितली. माझी उठायची वेळ झालीच होती. आवरून बसलो आणि श्रीमद् भागवत पुरणाचा पाचवा स्कंध वाचत होती तो पुढे वाचन चालू ठेवलं.


वरील अनुभव वाचताना 'मनी वसे ते स्वप्नी दिस' असं म्हटल्यास काही गैर दिसणार नाही पण आपण स्वप्नात अनुभवणारे सुख दुःख पण त्या भगवंताची कृपाच असते. श्रीपाद श्रीवल्लभ चरीतामृतामध्ये श्रीपाद प्रभूंनी या गोष्टीवर त्यांनी विशेष प्रकाश टाकला आहे. आपल्या कर्माची फळं ही जागेपणीच नाही तर आपण स्वप्नात असताना सुद्धा भोगावी लागतात. उदाहरणादाखल सांगायचे तर शरण आलेल्या भक्तांना त्यांच्या पूर्वायुष्यातील कर्माची फळं देताना एका भक्तास त्याचा राक्षसाद्वारे वध होत आहे अशा प्रसंगातून जावे लागले. गुरुलीलामृतमधील एका कथेमध्ये स्वतःला विद्वान पंडित म्हणवणाऱ्या ब्राम्हणास स्वप्नात विंचू चावल्याचा भास होतो तेंव्हा "स्वप्न पाहून भयभीत होतोस! आणि वेदांतावर भाष्य करतोस!" म्हणून स्वामी समर्थ त्या ब्राम्हणाची निंदा करतात. मुळात ही सगळी त्या परब्रम्हाची माया असते. तसेच कित्येक भक्तांना स्वप्नात दृष्टांत देऊन ते आपले कृपाशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी असल्याचे ते सांगतात.


एक महिना उलटला. अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेऊन अमेयला जर्मनीला निघताना निरोप द्यायला म्हणून आम्ही मुंबईला आलो. त्यानंतर काही दिवस अंबरनाथच्या घरी मुक्कामास होतो. कामातून सुट्टी घेतली नसल्याने घरून काम चालूच होते. असाच एके दिवशी 'त्याच' खिडकीजवळ माझा लॅपटॉप उघडून कामाला बसलो. अचानक कानावर आवाज आला. " वासुदेव आला! हो! वासुदेव आला!!" अंगावर शहारे आले. मागे वळून पाहिलं. 'तो' तिथेच उभा होता. हसून बघत होता. मला काही कळतच नव्हतं काय करू. मी स्तब्ध झालो. 'तो' 'तोच' आहे मान्य करायला मन तयार होतं नव्हतं. आता वेगळा चेहरा धारण करून तो तिथेच माझी वाट बघत उभा होता. पण मी तिथून हललोच नाही. का ते सांगणं कठीण आहे.


आज लिहायला बसलो. पाहिला प्रसंग लिहिताना एकीकडे अजित कडकडेंच्या आवाजात "घेऊन निघालो दत्ताची पालखी" मोबाईलवर वाजत होतं. परत परत डोळे पाणावत होते. स्पंदन जाणवत होती. हाच का तो अष्ट्सात्विक भाव ? म्हणून त्याला विचारत होतो आणि दुसरा प्रसंग लिहिताना स्वतःच्याच कर्मदरिद्रीपणाची कीव येत होती!

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶

➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶➴➵➶


हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे |

हरे राम हरे राम राम राम हरे हरे॥

168 views1 comment

1 Comment


rashmi mahajan
rashmi mahajan
Jun 09, 2021

ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏

Like
bottom of page