अलीकडे बऱ्याच जणांनी विचारलं की "आजकाल काही लिहीत नाहीस. काहीच पोस्ट करत नाहीस. सगळं कुशल मंगल ना?". "हो" म्हणून आणि "सध्या कामात व्यस्त आहे." सांगून तो विषय तिथेच पूर्ण होऊन जाई. पण स्वामी काय घडवून घेत आहे हे तेच सांगू शकतात. त्यांची ईच्छा नसेल तर एक शब्दही उमटत नाही. उमटले तरी पूर्ण होत नाही आणि पूर्ण होऊन पण प्रकाशित होत नाही. हा लेख सुद्धा कितीतरी टप्प्यांत पूर्ण झाला आहे. लिहिता लिहिता मध्येच ईच्छाच निघून जाई आणि ते आहे तसेच सोडून देणे भाग असे. सदर लेख आहे गेल्या दीड दोन महिन्यांतील घडामोडींचा आढावा घेणारा.
स्वामींची पुण्यतिथी जवळ येते आहे पाहून एके दिवशी अचानक सकाळी मंदार शिधोरे दादाचा मेसेज आला - "श्री स्वामी समर्थ सप्तशतीच १० दिवस पारायण करायचं आहे. तुम्ही दोघे पण करणार का?" नाही बोलण्याचा काही प्रश्नच नव्हता. १९ तारखेपासून पुढचे १० दिवस, रोज एक अध्याय करायचं ठरलं.
१३ एप्रिल, २०२२, रात्री १०:३०-११:०० च्या सुमारास आम्ही झोपी गेलो. पण मला झोप लागेना. अस्वस्थ वाटू लागल्याने माझी चुळबुळ चालू झाली. पोटात डाव्या बाजूला दुखण्यास सुरुवात झाली. हळूहळू दुखणं वाढत गेलं. आता मला उठून आकांक्षाला सुद्धा उठवण भाग होतं. तोपर्यंत माझी अवस्था अजून वाईट झाली. वेदना असह्य होत होत्या. "का होतंय? कशाने होतंय?" काही म्हणजे काही सुचत नव्हतं. मनात स्वामींच्या नावाचा, कृष्णाच्या नावाचा धावा सुरू होता. "किडनीच काही असेल का?" म्हणून विचार करून अजून मानसिक ताण वाढला. १० वर्षांपूर्वी आकांक्षाला किडनीच्या त्रासातून जाताना पाहिलं आहे. त्या त्रासाची कल्पना सुद्धा करवत नाही. २३ तारखेला जन्मदिवसाच्या निमित्ताने अक्कलकोट, कडगंची आणि गाणगापूर असा बेत ठरला होता "तो आता कसा होणार?" "या वर्षात अशा तीर्थक्षेत्री आणि सिद्धपिठांना जायचं ठरलं की शक्य होणारच नाही आहे का?". "आत्ताच्या आत्ता इस्पितळात दाखल व्हावं का?" "रात्रीचे १ वाजले आहेत, बिचाऱ्या अयांशची भर रात्री फरफट होईल! पण सकाळ पर्यंत थांबू तरी कसा?" विचार करून डोकं सुन्न झालं. वेदना क्षणा क्षणाला वाढत चालल्या होत्या. अंग कपू लागलं, दात कडकडा वाजत होते. पुढचे काही तास कसेतरी काढायचे होते. आकांक्षाने दुखणं कमी व्हावं म्हणून गोळी दिली. हळूहळू त्रास कमी झाला. त्यात २-२:३० तास निघून गेले. पुन्हा पहाटे ५ च्या सुमारास दुखणं वाढत गेलं. पुन्हा त्या असह्य वेदना सुरू झाल्या. "आई! आई!!" करताना आईने किती प्रसूती वेदना सहन केल्या असतील असही वाटून डोक सुन्न झालं. विचार कुठल्याही टोकाला जाऊन भरकटत होते. पुन्हा एकदा दुखणं कमी व्हायची गोळी घेतली. इस्पितळात जायचं म्हणून आकांक्षा तयारी करायला घेणार, इतक्यात तिला म्हणालो "५ वाजलेच आहेत. तू आवरून स्वामींची पूजा करून घे! पुढचं पुढे बघू!".
असं करता करता कधी उजाडलं कळलच नाही. उठलो, पोटाचा संपूर्ण डावा भाग काहीतरी वेगळाच जाणवत होता. तसाच बसून राहिलो. इतक्यात अयांश उठला. त्याला कसलीही कल्पना नव्हती. "मी आज घरीच आराम करतो", असं म्हणून आकांक्षा आणि अयांशला तुम्ही जाऊ शकता म्हणून मी सुद्धा थोड्या वेळात घरूनच काम करण्यास बसलो.
१४ एप्रिल, गुरुवार, पूर्ण दिवस घरी स्वामींच्या समोर बसूनच मी त्या दिवशी घरूनच काम करून दिवस घालवला. पुन्हा रात्री त्रास सुरू. हे सत्र आठवडाभर थोड्या फार फरकाने असच चालू होतं. पण रोज टाळाटाळ करून मला काही इस्पितळात जावसं वाटलं नाही.
दोन गोष्टी मात्र चालू होत्या. तारक मंत्र आणि १९ तारखेनंतर श्री स्वामी समर्थ सप्तशती पारायण. दिवसामागून दिवस पुढे ढकलत होतो. दुखणं कायमचं म्हणून बंद व्हायचं काही नावं घेत नव्हतं. डोक्यात एक गोष्ट होती की "स्वामी मला अक्कलकोटला यायचं आहे. बाकी मला काही माहिती नाही. तुम्ही घ्या सांभाळून." "अक्कलकोटी ध्यान लागले माझ्या मनाचे स्वामी साऱ्या जगाचे , स्वामी साऱ्या जगाचे" अशी काहीशी मनाची अवस्था.
२२ एप्रिल २०२२. निघायचा दिवस उजाडला. पहाटे ४ वाजता उठल्यापासून मी दुखणं घेऊन बसलो होतो. तशातच सगळं आटपून पूजा करायला बसलो. आता सगळं सामान तयार होतं. नेहमीप्रमाणे आकांक्षाने स्वतः स्वामींसाठी बेसनाचे लाडू केले होते. पोटातलं दुखणं अजूनही थांबत नव्हत. परत गोळी घेतली. "गणपती बाप्पा मोरया!" गजर करून आम्ही पुढे ६०० किलोमीटर प्रवासाला सज्ज झालो. नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळी मी स्टिअरिंगचा ताबा घेतला.
वाटेत केदार गुरुजींना फोन केला तेंव्हा ते अक्कलकोट मध्ये नसल्याचे कळले. त्या दिवशी त्यांचा सुद्धा जन्मदिवस म्हणून ते परगावी गेले होते. आम्ही अक्कलकोटला जातो त्या दिवसा पासून प्रत्येक भेटीत ते सुद्धा भेटत आले आहेत. त्यांच्या कडून पूजा करून घेताना पूजा स्वामींपर्यंत पोहचल्याचे समाधान वाटायचे. पण या वेळी ते नाहीत म्हणून आम्ही थोडे हिरमुसलो. पण तेवढ्यात पुढे जे काही शब्द कानावर पडले त्यातून स्वामींनी जणू - "तू कशाला काळजी करतोस! मी आहे ना!" हे पटवून दिले. "निःशंक हो रे मना!" म्हणून आम्ही पुढे निघालो.
११ तासांचा प्रवास करत संध्याकाळी ७ च्या सुमारास अक्कलकोटात दाखल झालो. आम्ही पोहचण्यातच होतो तेंव्हा सहज आभाळाकडे पाहून आकांक्षाला म्हणालो - "पाऊस येणार आहे असं वाटतंय बघ!". "भर एप्रिल मध्ये आता कुठे पाऊस? संध्याकाळ झाली आहे म्हणून असं वाटत असावं" तिच्या म्हणण्यात पण तथ्य होतं कारण तसं तर काळे ढग वगैरे दाटून आले असावेत असं काही दिसत तर नव्हतं. पण आम्ही जेंव्हा आमच्या हॉटेलवर पोहोचलो तेंव्हा मात्र खरंच धो धो पाऊस सुरू झाला. आम्हाला ताबडतोब स्वामींच्या समाधी मठात निघायचं होतं. पण एवढ्या पावसात अयांशला घेऊन जाणं शक्य नव्हतं. माझ्या पण पोटात परत दुखायला सुरुवात झाली. त्यात एक तास तसाच निघून गेला. पाऊस बंद झाला.
साधारण ८ वाजताच्या सुमारास आम्ही मठात पोहचलो. कीर्तनकार कीर्तन करत होते. कीर्तन अगदी रंगात आलं होतं. आम्ही स्वामींच्या पादुकांना डोकं टेकवून नमस्कार केला आणि बसून राहिलो. इतक्यात एकाने सांगितलं आता आरती होईल. पुरुष एका बाजूला आणि स्त्रिया एका बाजूला असे आम्ही बसलो. सगळं लक्ष स्वामींकडे. टाळ मृदंग चिपळ्या खणखणून वाजत होते. सगळ्यांनी आरती म्हणायला सुरुवात केली असावी आणि मी तारक मंत्र. नाही तो मी नव्हतोच! स्वामी जणू म्हणाले - "इथे तुझा फक्त माझ्याशी संबंध आहे. बाकी कोण काय म्हणत आहे ते ऐकू नकोस." मी तारक मंत्र म्हणत राहिलो आणि म्हणत राहिलो. आरती संपली, प्रसाद मिळाला. जवळपास सर्व प्रसाद अयांशनेच संपवला. तो एक नंबर गोड्या आहे!
दुसऱ्या दिवशी पहाटे ठरल्या वेळी पावलं परत स्वामींच्या समाधीकडे वळली. वाटेत लक्षात आलं आमच्या पुढे काही अंतरावर ३ स्त्रिया चालत होत्या. त्यांना पाहून स्वामींच्या मठात चालल्या असाव्यात ही जाणीव झाली. आम्ही पण मागोमाग मठात पोहचलो. सोवळे नेसून पूजेला बसण्यास तयार झालो. पूजा यथासांग पार पडली. स्वामींच्या समाधीवर हार वाहून त्यावर डोक टेकवताना स्वामींच्या पायाला कडकडून मिठी मारावी असं वाटलं.
नंतर तिथेच सप्तशती वाचायला बसलो. वाचून झाली तेंव्हा पुन्हा एकदा त्या तिन्ही स्त्रियांकडे लक्ष गेलं. मठात मागच्या बाजूला तिघीही ध्यान लावून बसल्या होत्या तिघींच्या तीन वेगळ्या मुद्रा होत्या. माझं लक्ष गेलं पाहून त्यातला एकीने माझ्याकडे तीव्र कटाक्ष टाकला. त्यांच्या त्या प्रसन्न ध्यानस्थ मुद्रेकडे मी पाहतच राहिलो.
बाहेर पडून स्वामींची मूर्ती घ्यायला एका दुकानात गेलो. मूर्ती कशी घ्यायची हे स्वामींनी आकांक्षाला ध्यानात अगदी स्पष्टच सांगितले होते. कारण सासू सासऱ्यांच्या देहरादून येथील नवीन घरात आधी कोणी प्रवेश करण्याआधी "मी प्रवेश करणार" अशी जणू स्वामींचीच ईच्छाच असावी आणि त्यांनी ती वेळ आल्यावर पूर्ण सुद्धा केली. मूर्ती घेताना तिथे त्यावेळी तशी एकच मूर्ती असल्याचे आम्हाला लक्षात आले. त्यामुळे अगदी थोडेही उजवीकडे डावीकडे वळून पहावे लागले नाही. मूर्ती घेतली तशा सोबत पादुका सुद्धा आल्या. जणू काही त्यावेळी 'पादुका घे!' हे मुखातून स्वामींनीच वदवून घेतले असावे. कारण मला पादुका का घ्याव्या असे वाटले हे मी निश्चितपणे सांगू शकत नाही. तसेच झाले जप माळेचे. माझ्याकडून नामस्मरण अगदी सातत्याने होत नव्हते. जप माळ घ्यावी असं मला स्वतःला यापूर्वी कधीही वाटले नाही. कारण त्याला माझा मुळात एका गोष्टीमुळे आक्षेप होता, आजूनही आहे आणि ती गोष्ट म्हणजे - "मोजायचे का?" आणि मोजल्यास "मी आज एवढा जप केला!" हा अहंकार कसा घालवायचा? त्यापेक्षा नकोच ते! पण स्वामींच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालायचे. घेतली जप माळ! "का?" मला नाही माहिती!
पुढे ती जपमाळ कशी ओढावी ते स्वामींनीच शिकवले. कारण सुरुवातीला मला ती हाताळता पण येत नव्हती आणि अचानक एके दिवशी ती बोटांत फिरली, मणी हातात आला, विना सायास पुढे सरकू लागला. जप चालू झाला.
मूर्ती घेऊन आम्ही मठात आलो. गुरुजींना म्हणालो मूर्ती समाधीला लावून हवी आहे. त्यांनी मूर्ती समाधीवर ठेवली. गुरुजींनी स्वामींना गंध लावले आणि मग तेथील एकाने आम्हाला कळवले "स्वामींनी ही मूर्ती अभिषेक करून घेऊन जाण्याचे ठरवले आहे असे दिसते. असे नेहमी होत नाही पण. स्वामींची ईच्छा!". हे ऐकून आम्ही पण हरवून गेलो. बरं! हे वाचून मनात विचार आला असेल की हे पैसे लुबाडण्यासाठी त्यांनी तसं सांगितलं असावं तर याचे त्यांनी पैसे घेतले नाही. किंबहुना अभिषेक केला त्याचे सुद्धा पूजेचं साहित्य वगळता तेथील गुरुजी दक्षिणा म्हणून आम्ही पाकिटात घालून जी दक्षिणा देऊ ती स्वीकारत आले आहेत. शेवटी -"मिथ्या स्वामी अनेक रे, सत्य स्वामी एक रे!"
तिथून निघालो ते सरळ हॉटेल गाठलं. सामान बांधून तयार होतोच. मजल दरमजल करत कडगंची गाठलं. श्री क्षेत्र कडगंची! हे लिहिताना पण अंगावर शहारा आला! त्या जागेतील ऊर्जेची कल्पनाच केलेली बरं. हेच ते स्थान जिथे पाचवा वेद म्हणुन ओळखलं जाणारं "गुरूचरित्र" लिहिलं गेलं. येथील श्री दत्त गुरूंची मूर्ती एवढी मनमोहक आहे की त्याच वर्णन मला शब्दांत मांडता येणारच नाही! त्या काळ्या पाषाणात घडवेलेल्या मूर्तीवर वाहिलेल्या सुंदर फुलांच्या अस्तित्वाचं सार्थक झालं.
आम्ही बराच वेळ तिथेच बसून होतो. आम्ही सोडून तिथे फारसं कोणीच नव्हतं. मंदिराला लागूनच असणाऱ्या घरातील एक ज्येष्ठ व्यक्ती तिथे देखरेख करण्यास बसली होती. ते कोणासही तेथील मूर्तीचे फोटो काढून देत नव्हते. तेंव्हा मी थोडी मनाची तयारी करून त्यांना प्रश्न विचारला की "मूर्तीचा फोटो काढण्यास मनाई का केली आहे?" तेंव्हा त्यांनी मला शांतपणे सविस्तर उत्तर दिले की "लोक मनात श्रद्धा नसतानाही मुर्तीसोबत सेल्फी घेत बसतात, फोटो काढत बसतात. जेंव्हा गर्दी असते तेंव्हा सुद्धा त्यांना या गोष्टीचे भान नसते की त्यांच्या या वागण्यामुळे ते तिथेच घुटमळत बसतात आणि त्याचा साधकांना त्रास होतो. ज्याची खरंच दर्शन घ्यायची ईच्छा असते त्याला यांच्या फोटो काढत बसण्यामुळे ताटकळत बसावे लागते. तुमच्या सोबत असे झाले तर तुम्हाला आवडेल का?" त्यांचे हे उत्तर माझ्या मनाला एवढे पटले की मी पण ठरवले की खरंच आपण सुद्धा ही गोष्ट कटाक्षाने पाळायलाच हवी! नंतर त्यांनी एकंदर त्या बऱ्याच गप्पा मारल्या. ज्या ठिकाणी गुरूचरित्र लिहिले गेले ती गुहा दाखवली. आम्ही प्रत्यक्ष गुहेत उतरून तेथील उर्जेसमोर नतमस्तक झालो. तिथे आलेल्या एका साधकाने आम्हाला मागच्या बाजूस असलेल्या कल्पवृषा बद्दल कल्पना दिली. निसर्गतः एकत्र उगवलेले वड, पिंपळ आणि औदुंबर!
तेवढे दर्शन घेऊन तिथून निघालो ते गाणगापूरकडे. पण बहुतेक आम्ही तिथे जावं अशी दत्त महाराजांची ईच्छा नसावी. कारण पुढच्या काही घटना तशाच काही घडत गेल्या. आमचे GPS गंडले. आम्ही उलट्या दिशेची वाट धरली. मॅपवर दिसणारा रस्ता आणि आम्ही ज्या रस्त्याने चाललो होतो ते कुठेही जुळत नव्हते. पण तरी आम्ही बरोबर चाललो आहोत असेच मॅपचे म्हणणे होते. माझ्या मनात शंका बळावू लागली. त्या रस्त्याच्या आजूबाजूला विचारायची काही सोय नव्हती. नुसतं माळरान! आम्ही गाडी मागे फिरवली. मुख्य रस्त्यावर चौकात आलो. आता दुसराच रस्ता गाणगापूरला जात असल्याचे कळले. आतापर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. उष्णता प्रचंड वाढली होती. जेवणाची वेळ पण झाली होती. आम्ही जेवण आटोपून गाणगापूर गाठलं. उष्णेतेने आम्ही अगदी हवालदिल झालो होतो. थोडा वेळ आराम करू म्हणून पडलो. अयांश पण आमच्या सोबत लौकर उठला होता त्यामुळे त्याला सुद्धा थोडावेळ झोपेची गरज होती.
संध्याकाळी उठल्यावर आता अंघोळ वगैरे न करता असच कसं दर्शन घ्यायला जायचं म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घेऊन निघू असा बेत केला आणि बाहेर पडलो. पावलं मंदिराकडे वळली. मंदिरात पोहचलो. कितीवेळ तरी बाहेरच रेंगाळत बसलो. शेवटी गुरुजींना अभिषेक करण्या बद्दल विचारलं. तेंव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ७ नंतर अभिषेक करता येईल असं कळले. पण त्यावेळी त्यांनी गाभाऱ्यात दर्शन घडवले आणि बाहेर बसण्यास सांगितले कारण पालखीची वेळ झाली होती. आम्ही रांगेत जाऊन बसलो.
लाल झब्बा आणि शुभ्र पायजमा घातलेला आणि छातीवर शंकर महाराजांचा फोटो लावून फिरणारा एक माणूस आमच्या जवळ आला. "जय शंकर!" म्हणून आमच्या बाजूला बसला आणि आमच्याशी संवाद साधू लागला. त्याने फक्त आमचा चेहरा बघून आमच्या बद्दल काही गोष्टी अचून सांगितल्या आणि काही गोष्टींची आम्हाला चेतावणी देऊन निघुन गेला. एव्हाना अयांश थकल्यामुळे निजेलाआला होता. पालखी येईपर्यंत आम्हाला थांबता येईल असे वाटत नव्हते. आम्ही निघण्यास उभे राहिलो आणि इतक्यात गुरुजी आले आणि आम्हाला परत आत घेऊन गेले जिथून पालखी निघण्याच्या तयारीतच होती. आम्ही पालखीला डोकं टेकवून दर्शन घेतलं आणि निघालो. बाहेर अजून गर्दी नव्हती. अनुसुया माता ब्रम्हा विष्णू महेश यांना जेवायला वाढते आहे असे चित्र रेखाटलेले एक छान छोटेसे हॉटेल समोर दिसले आणि तिथल्या मालकाने आम्हाला आग्रह करून मराठी पद्धतीचे भोजन मिळेल म्हणून येण्यास आग्रह केला. पोटभर जेवून समाधानाचा ढेकर देऊन आम्ही परत हॉटेलवर येऊन झोपी गेलो. खूप दिवसांनी शांत झोप लागली असावी! एकदम पहाटे झोप उघडली.
पुन्हा आज अभिषेक म्हणून सोवळ नेसून आम्ही मंदिरात तयार होतो. गुरुजींना फोन लावत होतो पण फोन काही लागेना. तेवढ्या वेळात सप्तशती पाठ पूर्ण केला. ते वाचताना त्यांनी "मी अक्कलकोट मध्ये असताना तू इथे का आला आहेस?" हा मालोजी राजांना विचारलेल्या प्रश्नाने मला भंडावून सोडले. कारण नंतर गुरुजी आणि आमचा संपर्क काही होऊ शकला नाही. नाईलाजाने वेळेचे भान ठेवून आम्हाला निघावेच लागले. पुन्हा १२ तासांचा पल्ला गाठायचा होता.
आम्ही निघाल्यावर मी मेसेज करून तसे गुरुजींना कळवले. थोड्याच वेळात त्यांचा फोन आला. आम्ही वेळेवर आलो नाही म्हणून ते वैतागले होते. आम्ही तिथेच होतो आणि आम्ही त्यांना खूप वेळा फोन केल्याचे कळवले तेंव्हा ते हैराण होऊन म्हणाले - "हे कसं शक्य आहे! सकाळी ५ वाजल्यापासून त्यांचा फोन चालू आहे. आणि आम्ही सोडून बाकी बरेच फोन त्यांना येऊन गेले." पण मला मात्र त्यांना फोन केला असता त्यांचा फोन बंदच असल्याचे ऐकू येत असल्यामुळे मी सुद्धा निरुत्तर झालो.
तिथून जे नघालो ते तडक बँगलोर गाठण्यासाठी. वाटेत पप्पांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा फोन आला. त्यांना आमच्या प्रवासाबद्दल आम्ही सगळे कुशल मंगल कळवले. एव्हाना आमचे देहरादून जायचे तिकीट काढून झाले होते. तिथे जाण्याचे मुख्य कारण म्हणजे सासू सासऱ्यांनी घेतलेल्या नवीन घराची वास्तुशांती आणि आमच्यापूर्वी तिथे होणारे स्वामींचे आगमन. पण काही कारणास्तव ठरलेली तारीख निश्चित होऊ शकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि ती निश्चितपणे सुधारेल असे सांगणे शक्य नव्हते. पण पुन्हा एकदा स्वामींनी दाखवून दिलेच की सगळं काही त्यांच्या इच्छेने घडते. अगदी चमत्कारिक रित्या सगळी परिस्थिती सुतासारखी सरळ झाली. आम्ही देहरादून मध्ये दाखल झालो. वास्तुशांती अगदी सुंदर पार पडली. आम्ही एक आठवडा तिथेच काढला आणि पुन्हा बँगलोरला सुखरूप आलो.
गंमत म्हणजे २२ तारखेला ज्या क्षणाला मी स्वामींच्या मठात पाय ठेवला त्या क्षणापासून माझी पोटदुखी गेली ती मी देहरादूनहून परत आलो तरी परतली नव्हती. सगळं काही व्यवस्थित झाल्यावर ती दुप्पट तिप्पट दुखणं घेऊन परतली. हॉस्पिटल गाठले. मूतखडा झाल्याचे निदान झाले. डॉक्टर म्हणाले की प्रसूती वेदना या सगळ्यात तीव्र वेदना समजल्या जातात आणि त्या वेदनांनंतर कसल्या वेदना तीव्र असतील तर त्या म्हणजे मूतखडा झाल्यामुळे होणाऱ्या वेदना. त्यांनी तर मला शक्य तितक्या लवकर तो काढून घ्यायचा सल्ला दिला. पण अजूनही स्वामी कृपेने मी आयुर्वेदिक औषध घेऊन पुढे ढकलतो आहे. कारण ज्या दिवशी हे निदान झाले तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली की एवढ्या दिवसांत काहीही घडू शकले असते. प्रवासात सुद्धा हे घडू शकले असते पण नाही घडले. निदान झाल्याच्या पुढचे काही दिवस स्वामींच्या भक्तांचे पोटदुखी आणि मूतखडा त्रासाचे अनुभव आपसूकच समोर आले. जणू काही ते सगळेच मला धीर देत होते. "प्रचंड बळ पाठीशी रे!" वारंवार सांगत होते.
स्वामी त्यांचं कृष्ण रुपातल वचन आठवण करून देतात. -
अनन्याश्र्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् || २२ ||
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात,
त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या भक्तांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
U r blessed Nayanesh... for the umpteen number of times u hv experienced Swamis presence... his blessings r always with U.