top of page
Writer's pictureNayanesh Gupte

अक्षरब्रह्म - मृत्यूपूर्वीचा मोक्ष

आजकाल खूप जण अध्यामाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्या नादात खूप भरकटत जातात. प्रत्येकाची अध्यात्म म्हणजे काय? याची व्याख्या बदलत जाते. प्रत्येक जण त्याला एका साच्यातून काढून आकारात बद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. कारण निराकार निर्गुणाची ओढ असणारे पण स्वतःच्या आकाराच्या अस्तित्वाने बांधलेले आहेत. खर सांगायचं तर मी पण जेंव्हा उत्तर शोधायला सुरुवात केली तेंव्हा असच काहीसा भरकटत जाण्याची दाट शक्यता होती. पण कृष्णाने भरकटू दिलंच नाही. मी प्रश्न विचारत गेलो आणि वेळ येईल तशी तो उत्तरं देत गेला. तीच भगवद्गीता परत परत उघडत होतो, आधी वाचलेल्या त्याच श्लोकाचा तो नवीन अर्थ सांगत राहिला. परत वाचलं की मी अवाक्! "आईला! हे आधी नव्हतं आलं ध्यानात!" मग तो परत गालातल्या गालात हसतो! म्हणतो "आता कळलं ना! बस मग! हेच हवं आहे! अरे! ज्या गोष्टी मी स्वतः अर्जुनाला सांगून सुद्धा एका फटक्यात नाही समजल्या त्या बाकी कोणाला कितीही वेळा वाचल्या तरी त्या अशा कशा सहज लक्षात येतील. कळूनही न कळलेला मी कृष्ण आहे! विभूती योग सांगताना मी सांगीतल ना तुला की समासात द्वंद्व मी आहे! हे द्वंद्व फक्त व्याकरणात नाही तर आयुष्यातलं द्वंद्व मी आहे! हे बघ, तुला लोक येऊन सांगतील. "मी" भगवद्गीता वाचली आणि मला ती समजली. तू फक्त त्यावेळी माझी आठवण काढ. का माहिती आहे? अरे! कारण त्यावेळी मनातल्या मनात हसणारा तो तू नाही तर मी आहे!"


तो बोलत होता. मी ऐकत होतो. पुढे म्हणाला "अरे! हेच होत! अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात आणि मी काय म्हणालो ते पार विसरून जातात! गीता सांगताना मी माझ्यापर्यंत पोहोचण्याचे बरेच मार्ग सांगितले आहेत. पण तरी "माझाच मार्ग श्रेष्ठ "हे खूळ डोक्यात चढत आणि माझ्या मायेच्या जाळ्यात गुरफटत जातात. ज्या गोष्टी मी सांगितल्याच नाहीत त्या माझ्या नावाच्या खाली खपवून मोकळे होतात!"


मी खूप ध्यान लावून ऐकत होतो. तो एकतर बोलत नाही आणि बोलायला लागला की थांबत नाही. खूप छान गप्पा मारतो तो. फक्त आपण ऐकलं म्हणजे मिळवलं.


"आता हेच बघ, अध्यात्म म्हणजे काय आहे हे मी सांगितलं आहे की नाही नाही भगवदगीते मध्ये. उघड बघू तो आठवा अध्याय आणि वाच तो तिसरा श्लोक! हं! काय म्हंटल आहे? तुला संस्कृत नाही, थोड समजेल अशा मराठीत सांगतो बघ. नीट लक्ष देऊन ऐक -

चैतन्य अक्षर ब्रम्ह तेचि जाणती।

भावाविष्कार तयाचा नामे ओळखती।।


म्हणजे असे की ब्रम्ह म्हणजे आत्मा. हा आत्मा अक्षर आहे, म्हणजे त्याचा कधीही मृत्यू होत नाही. चैतन्य आहे ते. या चराचरात व्यापलेलं. म्हणजे कोण? हो! मी! आणि तू सुद्धा. तू आणि मी वेगळे नाही. मी आहे म्हणून तर तू आहेस. पण तरी तू वेगळा का आहेस ? कारण तू सकाम कर्म करण्यात गुंतलास आणि माझ्यापासून वेगळा झालास. तुझा जन्मच या सकाम कर्मामुळे झाला. कळतंय का? यात सुद्धा द्वंद्व होत. सांगितलं ना तुला मी मगाशी. तेच!


आता त्याचा तू आधी वाचलेला दुसरा अर्थ पण परत वाच. अविनाशी "दिव्य" जीवाला ब्रम्ह असे म्हंटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात.


म्हणजे हेच, की तुझ्यातला तो अविनाशी आत्मा त्याला दिव्य म्हंटल आहे कारण तो माझा अंश आहे. एका स्वयंप्रकाशित धगधगत्या अग्नी मधून निघालेल्या ठिणगी सारखा. पण ठिणगी विझते. अग्नी नाही! म्हणून तू मला जाणून घ्यायचा प्रयत्न तर कर! कारण आत्म्याचा नित्य स्वभाव म्हणजे मी आहे! कळूनही न कळलेला!"


"आता सगळ्यात महत्त्वाचं काय सांगतो ते ऐक! बरेच जण असे आहेत की अध्यात्माच्या शोधात निघाले आहेत पण मला शरण यायचं सोडून बाकी जे काही करत आहेत, ते सरसकट सर्व भरकटले आहेत. कारण माझ्या पर्यंत यायचा मार्ग फक्त मीच दाखवू शकतो अन्य कोणीही नाही. हे लक्षात घे की इथे कुठेही जवळचा मार्ग नाही बरं! कारण तू सकाम कर्म करून जन्माला आला आहेस तर तुला कर्म करण्यापासून सुटका नाही. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. कोणतेही अन्य मार्ग हे सगळे भोग न भोगण्याच्या तात्पुरत्या पळवाटा आहेत. अशा पळवाटांनी विधिलिखित गोष्टी बदलत नसतात. तुम्हाला ज्या या पळवाटा वाटतात, तो पण या नियतीने खेळलेला खेळ असतो. तीच आहे माझी "माया". माया या शब्दाचा अर्थच "जे नाही असे ते".


तुला मी वाचायची संधी यासाठीच दिली की जेणकरुन तू मला जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकतोस. आठव महाभारत. पांडव माझ्या जास्त जवळ असूनही मायेच्या गर्तेत सापडले. त्यांना दुर्बुद्धी झाली तेंव्हा त्यांनी मला द्युत खेळताना दूर ठेवले. सर्व काही पणाला लावून हरले. वनवास भोगला. हाल अपेक्षा भोगाव्या लागल्या. कारण ते त्यांच्या "कर्मांचे" भोग होते. पण तेच पांडव तेंव्हाच विजयी झाले जेंव्हा मला शरण आले.


कारण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माझ्यापर्यंत पोहचण्याचा सोप्पा मार्ग आहे आणि तो म्हणजे मी स्वतः! जो नामाच्या रूपात तुझ्या कायम सोबत आहे. माझं नामस्मरण जे घडवून आणेल ते बाकी काहीचं घडवून आणू शकत नाही.


बघ! तुला काय जमतंय ते!"


....आणि परत गोड हसला! त्या मनकवड्याला माहिती आहे मी त्यालाच निवडलं आहे! कारण जो त्याच्या प्रेमात पडतो त्याला मृत्यू पूर्वीच मोक्ष प्राप्त होतो.

श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽

140 views1 comment

Recent Posts

See All

1 Kommentar


Shekhar Kulkarni
Shekhar Kulkarni
28. Dez. 2021

Once again a very nice post.


The crux of all things are.

1. Namsmaran.

2. Tyala sharan jane. For you its Krushna and for me it is Datta Maharaj. Tatva ekach aaahe.

3. Satkarma karat rahane.

4. Being into Sansar i e bound by family, its very tough comeout of Mohmaya pan tathastha rahnyachya prayatna karane.


Gefällt mir
bottom of page