तिन्ही सांजेची वेळ. अंधुक अंधुक होत जाणाऱ्या प्रकाशासोबत डोंगर आता काळ्याकुट्ट अंधारात दडी मारून बसू लागल्याचे भासू लागले. गंगा नदीला वाट करून देणाऱ्या आणि गर्द झाडीचे पांघरूण ओढून घेतलेल्या त्या शिवालिक टेकड्या पण मला समाधिस्त भासतात. जणू कित्येक हजारो वर्षांपासून तपोवनात तपामध्ये मग्न! त्यांच्या दऱ्या खोऱ्यात वस्ती केलेल्या घरातून प्रकाशाचे दीप मिणमिणायला सुरुवात झालेली.
एका बाजूला ऋषीकेशच्या शहरी भागात, गंगेच्या काठी, आपल्यालाच स्थान मिळावं म्हणून बांधलेली मंदिरं, आश्रम आणि आधुनिक व्यावसायिक वस्तीची दाटीवाटी तशाच आधुनिक विद्युत रोषणाईने उजळलेली.आमचं हॉटेल पण त्यातलच एक. आम्ही गंगा आरती सुरू व्हायची वाट पाहत तिथेच जवळपास घुटमळत होतो. इतक्यात स्पीकरहून गंगा आरती सुरू होण्याची घोषणा झाली. इतक्या वेळ इकडे तिकडे विखुरलेले सगळे लोक त्या घोषणेच्या दिशेने वळले. आमच्या हॉटेलला गंगेचा किनारा लाभला असल्याने दर दिवशीची ही एक विशेष पर्वणी होती. डोंगराच्या आडून खळखळत वाहत येणाऱ्या गंगेच्या प्रवाहाकडे डोळे लावून बसलो होतो. आता त्या दृष्टीक्षेपात कर्पूरगौऱ्या भोळ्या शंकरासमोर करपुराच्या वड्या धगधगु लागल्या. तुम्हा आम्हाला माहीत असणाऱ्या ओळखीच्या अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात आरती सुरु झाली. या काही आरती अशा आहेत की आठवतात तेंव्हा या ठराविक गायकांच्या स्वरातच कानात वाजतात. आम्ही पण आरतीसाठी पुढे जाऊन उभे राहिलो. गंगा माईला वाटलं असावं पोरांना आरतीचा दिवा हाती द्यावा. हातात आलेला दिवा ओवाळताना त्या दिव्याच्या उजेडात अनिमिष नेत्रांनी समाधी लावून बसलेले शिव शंभू स्मित हास्य करत असल्याचा भास होतो.
आरती आटोपली, गर्दी पांगली, आरतीचा दिवा भगवान शिवांच्या समोर तेवत होता, बाजूला स्पीकरवर आता मधुर संगीताचे स्वर गंगामाईच्या खळखळाटात मिसळून त्या क्षणाचे माधुर्य वाढवत होते. त्या नीळकंठ महादेवाचा निळा रंग आसमंतात, गंगामाईच्या प्रवाहात सगळीकडेच उतरला. जीवाने शिवाचा गुण घेतला आणि तो ही अनिमिष नेत्रांनी त्या शिवाच्या समाधिस्त मुद्रेकडे पाहून गुंग होऊन गेला...
Chhan !!!