कुठून सुरुवात करू नक्की कळत नाही. अजूनही काहीतरी अपूर्ण असल्याची जाणीव आहे. काय ते नक्की सांगता येणार नाही. कारण गेल्या एका वर्षाच्या काळात एका गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे उत्तर तर हवी आहेत पण प्रश्न नक्की काय विचारावा हे कळलं आहे का? प्रश्नच बरोबर विचारला नाही तर बरोबर उत्तरं तरी कशी मिळणार. थोड अजून उलगडून सांगायचं झालं तर आपण प्रत्येक जण लहानपणापाूनच आपल्या घरातल्या आणि आजूबाजूच्या लोकांनी मनात भरून दिलेले विचार घेऊन पुढे जातो तेच सत्य म्हणून पचवतो. पण तरी जेंव्हा प्रश्न सोडवण्याची वेळ येते तेंव्हा त्यातलं सगळं ज्ञान सार्थकी लावूनपण समाधानाचा ढेकर काही येत नाही. समीकरण अधिकाधिक कठीण होत जात. महितीतली सगळी प्रमेय लावूनसुद्धा अज्ञात 'क्ष' काही सापडत नाही.
अध्यात्म या शब्दाची थोडी थोडी समज यायला लागली तेंव्हा दोन गोष्टी घडल्या देव आणि परमेश्वर या संकल्पनेकडे बघण्याचा आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अजूनही कित्येक अज्ञात गोष्टी आणि प्रश्न डोक्या भोवती पिंगा घालतातच आहेत. पण कित्येक गोष्टींचं गूढ उकलले आहे हे पण तितकच खरं. शोध नक्की कसला घ्यायचा आहे एवढं तरी नक्की कळलं आहे. शंकर महाराज म्हणतात- “मुझे वो ही जानता है, जो खुद को समझता है।” तेवढ्या विधानाने पण डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ओळखतो का मी खरच स्वतःला ? "तुज आहे तुजपाशी परी तु जागा चुकलासी" - अशी काहीशी अवस्था. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यातील कित्येक प्रश्नाचं समाधान आपल्याकडे असतं. आपल्या अंतरंगात वाकून ते प्रश्न विचारावे लागतात आणि मग कळतं की एवढा वेळ जटिल वाटणारा प्रश्न हा केवळ भ्रम होता. अंतरंगात वाकून स्वतःला तो प्रश्न विचारला तेंव्हा भ्रमाचा भोपळा फुटला. सगळा मनाचा खेळ होता. मनाने स्वतःभोवती एक कोश करून एक चित्र उभ केल होतं जे वास्तव कधीच नव्हतं.
गेल्या काही महिन्यांपासून सद्गुरूंनी वाचनाचा वेग कमी करून घेतला आहे. वैचारिक मंथन चालू आहे. जे वाचलं त्यातलं मर्म पुन्हा एकदा जाणून घेण्याची आवश्यकता असल्याचं ते सांगत आहेत. ज्या गोष्टी जाणून घ्यायला कित्येक साधकांना हजारो वर्ष तप करावं लागलं त्या प्रश्नांची उकल इतक्या सहज होईल अशी अपेक्षा तरी का ठेवावी म्हणा. पण तरी आपण या कित्येक साधकांपेक्षा भाग्यवान आहोत कारण त्या परमेश्वराच्या इच्छेने या साधकांनी त्या नोंदी कुठे न कुठे करून ठेवल्या आहेत. फक्त योग्य वेळी आणि योग्य क्रमाने त्यांचं अध्ययन करता आलं म्हणजे मिळवलं. पण त्याचा भार पण सद्गुरूंवर टाकूनच मोकळे झालेलं बरं. त्यांची कृपा झाल्याशिवाय कितीही प्रयत्न केला तरी या शंकांचं निरसन होण शक्य नाही. त्यासाठी बऱ्याचदा गरज पडते ती काही पावलं मागे जाण्याची. आपल्याला जे "माहिती" आहे असं आपल्याला वाटतं त्याला विसरण्याची. आपल्याला माहिती असलेल्या कोणत्याही प्रमेयांनी जर 'क्ष' सुटलाच नव्हता म्हणजे आपला मार्ग कधी योग्य नव्हताच.
विचारांना पुन्हा एकदा कलाटणी मिळाली ते अलीकडे सद्गुरूंच्या कृपेने लिहून घेण्यात आलेल्या या तीन पुस्तकांद्वारे -
समुद्र भरला आहे - श्री नागेश करंबळेकर साद देती हिमशिखरे - कै. गो. खं. प्रधान श्रीशंकरलीला - श्रीमती मृणालिनी जोशी
या तीनही पुस्तकांविषयी आणि त्यातून मिळालेल्या बोधामृताविषयी लिहीन तितकं कमीच आहे. अगदी अलीकडच्या काळातील त्यांचं हे लेखन. गेल्या ५०-६० वर्षांतल. गो. खं. प्रधांनाना तर शंकर महराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेला. पण तिघांच्याही लिखाणात एक विलक्षण गोष्ट जाणवली ती म्हणजे ज्ञान मिळविण्यासाठीची, त्यातून मिळालेला बोध लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी लोक कल्याणाची आणि हे सगळं गुरूंची आज्ञा म्हणून त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्याची तळमळ. वाचन करताना हृदयांतरी ही तळमळ जाणवते आणि त्या तळमळीचा अंकुर ज्या बीजतून पेरला गेला ते बीज पेरणारे गुरूतत्त्व किती अनंत असा ज्ञानाचा, प्रेमाचा सागर आहे याची अनुभूती पदोपदी जाणवते.
अनुभूती शब्द वाचून "आम्हाला पण सांगा ना तुमच्या अनुभूती" असा सहज प्रश्न समोर येतो. साधनेतले काही अनुभव आपण आपल्या सोबतच ठेवावे अस म्हणतात. त्याला २ महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे ज्यांच्या मते ते खूप काळापासून साधना करत आहेत पण अनुभूती आली नाही कधी त्यांच्या मनात मत्सर किंवा हेवा वाटावा अशा भावना निर्माण होतात. त्यांना हे दिसत नाही तुम्हाला एखद्याची जी साधना दिसते ती या जन्मातली. शेकडो, हजारो वर्षांपासून साधक प्रगती करत करत एक एक टप्पे पार करत पुढे प्रवास करत असतो.
दुसरी गोष्ट म्हणजे अहंकार. त्यावर श्रीशंकरलीला मध्ये एक मनाला स्पर्श करून जाणारी डॉ नागेश धनेश्वर यांची कथा आहे. त्यांच्या देव्हाऱ्यातील बाळकृष्ण रोज प्रसादाच सेवन करत असे. आपला हा भ्रम तर नाही म्हणून ते बेचैन झाले. तशी अनुभूती द्यावी म्हणून त्यांनी श्रीकृष्णास प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद खाऊन जाताना बाळकृष्णाने त्याचे सोन्याचे कडे मागे सोडले. अनुभूती तर मिळाली होती. म्हटलं तर अत्यानंदाचा क्षण होता पण त्याच बरोबर अजून एक विचार मनाला शिवून गेला तो म्हणजे जशी विठ्ठलाने नामदेवांची खीर खाल्ली तशीच आपला प्रसाद पण. म्हणजे आपण पण नामदेवांच्या बरोबरीच भक्ताचे स्थान मिळवलं. पुन्हा दुसरा विचार आला- "छे छे! ही सगळी माया आहे. हा तुलना करण्याचा विचार अहंकार आहे!" त्यानंतर त्यांनी जे केलं ते खूपच अनपेक्षित होतं. त्यांनी तो बाळकृष्ण भिरकावून दिला. फेकून दिला. त्यावेळी शंकर महाराज दारात हसत टाळ्या वाजवत म्हणाले मेला मेला ! डॉ नागेश धनेश्वर म्हणाले, होय महाराज आज माझ्यातला अहंकार मेला! ते खऱ्या अर्थाने कसोटीला उतरले होते!
आपण पुराणातील वांगी (वानगी) पुराणात ठेवतो. त्यामुळे फार पुराणातल्या काळात जाणार नाही. वरील अलीकडच्या लिहिल्या गेलेल्या बोधामृतांनी कित्येक प्रश्न विचारायला भागही पाडल आणि उत्तरही दिली. श्रीपाद प्रभू, श्री नृसिंसरस्वती, श्री स्वामी समर्थ किंवा अगदी अलीकडे म्हणजे गेल्या १०० वर्षांतच समाधी घेतलेले अवधूत अवलिया श्री शंकर महाराज हे अवतार का होऊन गेले ? आणि आज सगुण साकार स्वरूपात नसूनही ते "हम गया नहीं जिंदा है।" ची प्रचिती ते का देतात? त्यांना जाऊन आपण फक्त हार, तुरे, प्रसाद अर्पण करावा अशी त्यांची अपेक्षा ते सगुण रूपात वावरत असतानाही नव्हती तर आता का असेल? याचा अर्थ आपण ते अर्पण करून आपण आपलं प्रेम व्यक्त करू नये असं म्हणणं नाही. आजच्या काळात सोशल मीडियामुळे घर बसल्या आपल्याला त्यांच्या समाधी स्थानाच किंवा पादुकांच दर्शन होण ही भाग्याची गोष्ट आहे. पण काय होत त्याने ? का दिल्या स्वामींनी पादुका त्यांच्या भक्तांना? स्वामींच्या कित्येक वाक्यांचे अर्थ कोणाला उमगले नाहीत. बाकी कोणाला सोडा, ज्या चोळप्पा महाराजांच्या घरी अक्कलकोटला महाराजांनी तब्बल २२ वर्ष वास्तव्य केलं त्यांनाही महाराजांनी त्यांच्या अखेरच्या क्षणाचे दिलेले संकेत समजू शकले नाहीत, तो हम किस खेत की मूली है? शंकर महाराज सुद्धा त्यांच्या समाधी घ्यायचे क्षण जवळ आले असताना हा विचार करून हळहळले की - "आम्ही काय व्यसनी आहोत काय? की जो उठतो तो सिगारेटची पाकीट आणि दारू घेऊन येतो?" त्या मागचा खरा अर्थ कधी उमगणार लोकांना? शंकराला बेलाच पान आवडतं म्हणून नुसतीच त्रिपत्री बेलपत्र कधीपर्यंत अर्पण करणार आपण? त्या तीन पात्रांच्या मागचे त्रिगुण आणि त्याला जोडणाऱ्या अहंकाराच्या देठाच समर्पण कधी व्हायचं?
क्ष अजूनही अनुत्तरीत आहे!
Comments