वाढदिवस तसा २६ तारखेलाच होऊन गेला पण विचारांचं गाठोड अजून मनातच होत. आज थोडी उसंत मिळाली तर त्यातली थोडी पुरचुंडी शब्दांत उतरवू म्हटलं...
"Bye bye बाबा!" असं म्हणत मला पाठमोराच त्याने शाळेत जायला दाराबाहेर पावलं टाकली. मी न्याहारी आटोपत बसलो होतो. त्याच्या तेवढ्या बोलण्यानेच मला चटकन जाणवलं की म्हणता म्हणता अयांश मोठा होतोय. आज शाळेत जायला दाराबाहेर पाऊल टाकतोय म्हणता म्हणता हे ही दिवस सरतील... भुर्रर्रऽऽकन उडून जातील!
३ वर्षापूर्वीचा आजचा तो क्षण आजही ताजा आहे. जसं काही ३ दिवसच झाले असावेत. आदल्या रात्री इस्पितळात दाखल झालो होतो. त्या रात्री मला तरी झोप लागणं शक्य नव्हतं पण आकांक्षाला मात्र तू "शांत" झोप म्हणून सांगत होतो. पहाटे पासून तयारी सुरू झाली. अगदी सिनेमात दाखवाव तसं ऑपरेशन थिएटर चे दिवे लागले. माझं येरझाऱ्या घालणं चालू होतं. दोन्ही आजी आजोबा बाहेर बाळाची आणि बाळाच्या आईची प्रसूती कक्षातून बाहेर यायची वाट पहात होते. साधारण ८:३० च्या सुमारास डॉक्टरांनी मला बोलावून घेतलं. "मुलगा झाला! अभिनंदन! आई आणि बाळ सुखरूप आहेत." ही बातमी तशी धीरगंभीर चेहऱ्यानेच दिली. पुढचा तासभर त्याला सकाळच्या कोवळ्या ऊनात ठेवणार होते आणि मगच भेटता येईल असं डॉक्टर म्हणाले. आकांक्षा अजून शुद्धीवर यायची होती. तासाभराने त्याचा तो टॅऽऽ ऐकायला आतुर झालेलो मी त्याच्या जवळ जाऊन पोहचलो. लाल लाल त्वचा, कुरळे केस आणि हिरव्या कापडात गुंडाळून ठेवलेला तो छोटूसा इवलुसा अयांश! मी समोर येताच त्याच टॅऽऽ सुरू झालं. तोच काय तो क्षण होता जेंव्हा आमचं जगच पालटून गेलं.
मुलगा म्हंटल की बऱ्याचदा "Mumma's Boy" म्हणण्याच शास्त्र आहे किंवा मुलांना तसा आईचा जास्त लळा असतो म्हणा. पण अयांशला बाबाचा लळा पण तेवढाच आहे. त्याला झोप आली की - "बाबा Sleepy!!!" म्हणत माझा हात पकडून मला त्याच्यासोबत घेऊन जातो. आणि त्याला झोपवता झोपावता दमलेला बाबा त्याच्यासोबतच झोपी जातो. परत सकाळी उठला की तासभर त्याच्यासाठीच काढून ठेवावा लागतो. कारण अर्धवट झोपेत बाबाच्या कडेवर बसून, कुशीत शिरून आळोखे पिळोखे दिल्याशिवाय दिवस काही सुरू होत नाही. मग "बाबा let's take a bath" म्हणाला की त्याला न्हाऊ घालून तयार करताना त्याचे सगळे नखरे बघणं ही पण एक वेगळीच गंमत असते. अशीच गेल्या दीड- दोन वर्षांत त्याचं सारखं बाबा करत मागे पळताना आणि काम सांभाळताना दमछाक होतं होती. पण मग हे कायम जाणवत राहतं की आज ज्यामुळे दमछाक होते आहे त्याच गोष्टींची उद्या सगळ्यात जास्त आठवण येणार आहे. अगदी २ वर्षातलच सांगायचं झालं तर आधी मांडीत मावायचा आणि मांडीत झोपी जायचा. आता मांडीत मावत नाही त्यामुळे मांडीत डोकं ठेवून झोपतो तर कधी कुशीत शिरून. हळू हळू याही सवयी बदलतील. आत्ताच घरी ज्या शाळेतल्या मित्रांची नावं घेतो ते मित्र म्हणता म्हणता जास्त जवळचे होऊन जातील. तो त्याच्या विश्वात व्यस्त होईल आणि आम्ही त्याच्यात. पोरं म्हणजे आई वडिलांचं विश्र्वच नाही का? आज शाळेत जायला दाराबाहेर पाऊल टाकतोय म्हणता म्हणता हे ही दिवस सरतील... भुर्रर्रऽऽकन उडून जातील!
पण पुढचं पुढे. कारण आताचा प्रत्येक क्षण हा मौल्यवान आहे. अयांशला यावेळी वाढदिवसाची भेट म्हणून भटकंतीच्या नवीन अनुभवांची शिदोरी मिळावी या उद्देशाने यावेळी जंगल आणि जंगलातले प्राणी पक्षी दाखवावे आणि शहरातील कलकलाटातून उसंत मिळावी म्हणून घरापासून साधारण ३०० किमी अंतरावर असलेल्या काबिनीच्या जंगलात घेऊन गेलो होतो. तेथे टिपलेली ही काही छायाचित्रे!
Comments