हीना अत्तर म्हणजे स्वामींना अगदी प्रिय!
"हम गया नहीं जिंदा हैं।" ची अनुभूती ज्यांना आली आहे त्यातील काही जणांकडून अचानक या हीना अत्तराचा सुगंध दरवळल्याचा अनुभव आल्याचे ऐकण्यात/वाचण्यात आले आहे.
स्वामींनी घरी स्थापन करून घेतलेल्या पादुका लाकडी असल्यामुळे त्यांची सेवा करताना त्यांची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. या पादुकांवर हीना अत्तराने अत्तरलेपन केल्यास त्या लाकडी पादुकांवर अत्तराचा छान थर जमतो. त्याचा सुगंध तर दरवळत राहतोच पण पादुका छान सुरक्षित राहतात. आणि मग त्यावर फुलांनी पाणी शिंपडून का होईना अभिषेक करणं सुद्धा शक्य होत. कारण आता त्या पाण्याने खराब व्हायची भीती रहात नाही.
पण आजकाल मिळणारी बहुतांश अत्तर ही अल्कोहोल मिश्रित असतात त्यामुळे ती पूर्ण शुद्ध नसतात. आता नियमित अत्तरलेपन करता यावं, म्हणून अशा शुद्ध अत्तराची मोठ्या प्रमाणात घेण्याची आवश्यकता होती. ही सगळी माहिती आणि अशा शुद्ध अत्तराविषयी माहिती रितेश वेदपाठक दादांकडून कळली.
S. H. Kelkar यांचा हा Kiva कंपनीच्या कोब्रा ब्रँडचे - हीना ३६० या अत्तराबद्दल रितेश दादांनी सांगितलं. ऑनलाईन कुठे काही मिळतं का पाहिलं पण काही कुठे मिळालं नाही. एक दोन ठिकाणी छोट्या छोट्या कुप्या दिसल्या पण मला अर्धा किलोची बरणी हवी होती. शेवटी त्यांचं बँगलोर मध्ये कुठे दुकान आहे का शोधण्यास सुरुवात केली. दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर सापडला पण फोन करून चौकशी करावी आणि मागवता येईल का बघावं म्हंटले तर फोन लागेना. आता आमच्या घरापासून दूर बँगलोरच्या अगदी दुसऱ्या टोकाला २०-२२ किलोमीटर लांब असलेल्या या दुकानात ट्रॅफिक मधून मार्ग काढत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
पण स्वामी सेवेत आल्यावर एक गोष्ट आपण एक गोष्ट शिकतो आणि जी कटाक्षाने कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे स्वामी विनाकारण कोणतीच गोष्ट करून घेत नाहीत. मी ड्राईव्ह करून जात असताना वैशाली ताईचा फोन आला. स्वामी आणि श्रीपाद प्रभूंबदल बोलता बोलता अनघालक्ष्मीचा सुद्धा विषय निघाला. अनघालक्ष्मी म्हणजे दत्तगुरूंची सहचारिणी. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी यांचं एकत्रित रूप. प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमी ही अनघाष्टमी पकडली जाते. काल योगायोगाने अनघाष्टमीचा दिवस. बोलता बोलता माझा आवाज क्षीण होत चालल्याच वैशाली ताईने सांगितलं. काहीतरी नेटवर्क संदर्भात तांत्रिक अडचणी असाव्यात म्हणून आम्ही नंतर बोलू म्हणून निरोप घेतला. तेवढ्यात अत्यंत धीम्या गतीने चाललेल्या गाड्यांच्या ताफ्यात माझी गाडी एका जागी थांबली. हातात पेनचं बंडल घेऊन केविलवाण्या चेहऱ्याने एक पोरं माझ्या गाडी जवळ आली. "हा गाडीत बसलेला आपले पेन काही घ्यायचा नाही!" असेच काहीसे भाव तिच्या चेहऱ्यावर होते पण भुकेने व्याकुळ तिचे बोलके डोळे तिला एकदा प्रयत्न करायला भाग पाडत होते. मी हसऱ्या चेहऱ्याने काच खाली केली. तिने २ पेन पुढे केले. मी तिच्या हातात काही पैसे टेकवले. त्याबरोबर तिने अजून ३ पेन पुढे केले. मी अजून काही पैसे देऊ केले. ती कानडी भाषेत आभार मानून पुढे गेली. माईने तिच्या प्रतिबिंबाला जणू माझ्या पुढे उभ केलं होतं. त्या भुकेल्या लेकराला पोटभर अन्न मिळावं याची तिने काळजी घेतली होती. मी मनातल्या मनात श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणून पुढे निघालो. पुढे फारसं ट्रॅफिक लागलं नाही.
नुकत्याच वाचनात आलेल्या २ गोष्टी आठवल्या.
एक म्हणजे तुम्ही कितीही साधना करा पण तुमच्या मनात करूणा जागृत होऊ शकत नसेल तर ही सर्व साधना व्यर्थ आहे!
अशा परिस्थतीमध्ये मदतीचा हात पुढे करणारे खर तर तुम्ही कोणीच नसता. परेमश्वराला ज्याची जेंव्हा जशी मदत करायची आहे ती तो करणारच. तुम्ही फक्त निमत्तमात्र असता. तुम्ही हात आखडता घ्याल तर तो दुसऱ्या कोणाला साधन करेल पण त्याच साध्य तो पूर्ण करणारच. त्याचं साधन होण्याचं भाग्य आपल्याला घ्यायचं आहे की नाही हे आपण ठरवायचं आहे!
बाकी स्वामींना आज पादुकांवरील अत्तरलेपन आवडलं असावं. त्यांच्याकडे कधीही पहिलं की कुठे दुसरीकडे पाहत आहेत असा भास व्हायचा. पण आज ते आनंदाने आमच्याकडे पाहत आहेत असच सारखं वाटतं!
श्री स्वामी समर्थ! 🙏🏽
हरे कृष्ण 🙏🏽
Comments