या वर्षातला हा १०० वा लेख ज्या श्रीकृष्णाच्या प्रेरणेने लिहायला एक वर्षापूर्वी सुरुवात केली, त्या श्रीकृष्णाला अर्पण !
गेले पाऊणे दोन - दोन वर्ष कोरोना रुपी सूक्ष्म राक्षसाशी दोन हात करण्यात संपूर्ण जग गुंतलं आहे. संपूर्ण जगाला घरात कोंडून ठेवणारा हा राक्षस इतका सूक्ष्म आहे की प्रत्येकाला लागण झालेला हा विषाणू एकत्र गोळा केला तरी तो डोळ्यांना दिसण्या एवढा मोठा व्हायचा नाही. स्वच्छंदी मनाला, चार चौघांत मिसळल्याशिवाय चैन न पडणाऱ्या माणसाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसावा लागतं होता. हा सुरुवातीला हळू हळू पसरायला लागला होता तेंव्हा "लॉकडाऊन" हा प्रकार नव्यानेच सुरू झाला. लोकांची धांदल उडाली. "जीवनावश्यक वस्तू तरी मिळणार का?" यासारखे प्रश्न लोकांच्या समोर उभे राहू लागले. या जीवनावश्यक वस्तूंचा संग्रह होण्यास सुरुवात झाली. त्यात फक्त शिधाच नाही तर अगदी ऑक्सिजनच्या सिलिंडर पासून सगळ्याच वस्तूंचा साठा लोकं करू लागली. दुसऱ्याला या गोष्टींची तातडीने आवश्यकता असूनही लोकांचा स्वार्थ त्यांच्या विवेकला दाबून त्याची गळचेपी होता. सगळी खटपट हा देह टिकवण्यासाठी, "माझ्या" कुटुंबाला काही होऊ नये म्हणून सगळी धडपड! काही जणांनी याची देही याची डोळा हतबल होऊन त्यांच्या जवळच्या व्यक्तीला प्राण सोडताना पाहिले आहे, त्यांच्या मनस्थितीची कल्पना पण करवत नाही.
यातील कित्येक जणांचा परमेश्वरावर विश्वास आहे आणि काहींचा नाही. पण काही नस्तिकांनी यावर प्रश्न केलाच की - "जर आहे तुमचा देव तर तो का काहीच करत नाही ?" बरोबर आहे. प्रश्न चुकीचा नाही पण त्यातला अरेरावीपणा चुकीचा आहे. तो निर्माता आहे, पालनकर्ता आहे आणि वेळ आली की संहार करणारा पण तोच आहे! श्रीकृष्ण स्वतः या भूतलावर असताना सुद्धा त्यांना न ओळखू शकलेले होतेच की! त्यांना सगळे ओळखू शकले असते तर महाभारत घडलं असतं का ? महाभारत हे आपण आता ज्या देशाला भारत म्हणून ओळखतो तेवढ्याच भूभागा पुरतं मर्यादित नव्हतं. तेंव्हा देशाच्या आणि युद्धात उतरलेल्या देशांच्या सीमा संपूर्ण जग व्यापून टाकणाऱ्या होत्या. त्यात प्रचंड मानवी, पशू संहार भगवंताच्या डोळ्यादेखत झाला. का झाला ?
या "का?" च उत्तर आहे ती भगवद्गीता! जी त्या वेळी रणांगणावर सांगण्यात आली. आणि ती सांगूनही स्वतः भगवंताला स्वतःची प्रतिज्ञा मोडून शस्त्र उचलायची वेळ आलीच! का? कारण आपली देहबुद्धी आपल्या विचारशक्तीला लुळी पांगळी करते. अर्जुनाची ही गत झाली तर आपलं काय बोलावं ? त्या एका कृतीत कित्येक अनेक लीला सामावलेल्या होत्या तो भाग वेगळा.
पण भगवंत आपल्यासारखा नाही. तो आपल्यासमोर नेहमी पर्याय ठेवतो. तो आपलं अंशिक स्वातंत्र्य हिरावून घेत नाही. जरी कर्ता करविता तोच असला तरी किमान तसं तो दर्शवतो. म्हणून भगवद्गीता ही "गीतोपदेश" म्हणून ओळखली जाते. तो आदेश नाही. त्यातला "उपदेश" हा शब्द महत्त्वाचा. आपण ऐकलं तर आपला उद्धार होईल नाही ऐकलं तर जे काही होईल त्याला भगवंताला कसे जबाबदार पकडायचे ?
त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण आपण धड कर्म करत नाही, केलेलं कर्म त्याला अर्पण करत नाही, न धड खरं ज्ञान आत्मसात करून घेत, न धड योग पद्धतीचा अवलंब करत, न त्याला संपूर्ण शरण जात. अरे! मग तुमच्या परिस्थितीला जबाबदार कोण ? माणसाला आपल्याला न जमेलेल्या गोष्टींचं खापर दुसऱ्यांवर फोडायची खूप जुनी घाणेरडी सवय आहे. आणि जिथे काहीच सापडत नाही, सगळे मार्ग संपतात तेंव्हा एकतर देव आठवतो तरी किंवा तो काहीच करत नाही म्हणजे तो नाहीच आहे म्हणून आपण बोंबा मारून मोकळे होतो. तो स्थितप्रज्ञ आहे. आपण काय निष्कर्ष काढतो याचं त्याला सुख दुःख काही नसलं तरी त्याच्या निस्सिम भक्तांचा योगक्षेम वाहून नेण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे!
हा कोरोना रुपी राक्षस प्रकटला तेंव्हा एक खर तर सुरुवातीला एक सरळ सोप्पा उपाय सांगितला होता. १५ दिवस कोणीही घराबाहेर पडू नका. मान्य आहे की रोजच्या कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशावर पोट भरणारी कितीतरी कुटुंब आहेत आणि त्यासाठीच अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून गौरविण्यात आलं आहे. अन्न हे पर्णब्रह्म आहे.भुकेल्याची भूक क्षमवून त्याच्या जठराग्नी मध्ये अन्नाची दिलेली आहुती ही कोणत्याही यज्ञात दिलेल्या आहुती पेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. म्हंटल तर नवीन चित्रपटासाठी आठवड्याभरात ३०० आणि ४०० कोटींचा आकडा पार करणारी जनता सरकार आणि विविध स्वयंसेवक संस्थांच्या माध्यमातून ही अन्नाची गरज भागवू शकली नसती का? यात कुठेही लबाडी न करता हे सर्व शक्य नसतं झालं का? झालं असतं. पण आम्हाला "गीतोपदेश" ऐकायचा नाही. आम्ही १५ दिवस कमीत कमी अन्नाचं सेवन करून हा देह टिकवण्यापूर्तीच योगसामार्थ्य गमावलं आहे. १५ दिवस संपूर्ण जगाशी संपर्क तोडून आत्मनिरीक्षण आणि स्वतःला भगवंताच्या आधीन करायची, आत्मसमर्पण करायची ईच्छा गमावली आहे. ज्यांना कोरोना झाला आणि एका खोलीत कोंडून घ्यायची वेळ आली, ते खऱ्या अर्थाने नशीबवान होते कारण त्यांना ही संधी चालून आली होती. पण केलं का सोनं त्या संधीच कोणी? तुम्हीं भले बंगला बांधून रहात असाल पण तुम्हाला आयुष्य जगण्यास एका १० X १० ची खोली सुद्धा पुरेशी आहे, हे क्वारंटाईन व्हायची वेळ आल्यावर दाखवून देणारा परमेश्वरच आहे. तिथेच बसायचं, झोपायच, खायचं, प्यायच आणि तिथेच बसून त्यांचं अखंड नामस्मरण करायचं. ज्याला जिवंतपणी हे ध्यानात नाही आलं त्याला मृत्यूने कवटाळल्यावर तेवढ्याही जागेची आवश्यकता लागली नाही. त्यातील कित्येक जणांच्या नशिबी अंतिम क्रिया कर्म सुद्धा आल्या नाहीत. कारण कर्माचा सिद्धांत एवढा बलवान आहे की विषाणू हा निमित्तमात्र, बाकी सर्व कर्माची फळ. पूर्वकर्मामुळे जे काही भोगावं लागतं त्याला जबाबदार आपणच असतो. नियतीच्या कामात भगवंत ढवळा ढवळ करत नाही आणि आपल्यासाठी त्याने तशी ढवळा ढवळ करणं अपेक्षित असेल तर आपण किमान त्याची आठवण आपल्या चांगल्या वाईट क्षणांच्या पलीकडे सुद्धा नको का काढायला?
कोरोना हे निम्मित आहे. भगवंताला बरच काही सांगायचं आहे. माझं माझं करून आयुष्य कधीपर्यंत काढणार ? इदं न मम - हे माझं नाही. माझं काहीच नाही. मी सुद्धा माझा नाही, मी तुझा अंश आहे. अहम् ब्रम्हास्मी हेच सत्य आहे!
परवाच यावर व्हॉट्सॲप वर फिरत आलेला खूप सुंदर मेसेज माझे एक पूर्व सहकारी प्रवीण कल्याणकर यांनी पाठवला. त्यात मी थोडा बदल करून खाली मांडू ईच्छितो.
बरं झाल देवा, मला कोरोना झाला.. आयुष्याचा आलेला सगळा माज निघुन गेला..
म्हणत होतो नेहमीच मी माझी गाडी, आंन माझा बंगला.. पन जवा बसलो अंबुलन्समधी आखा जीव उशाला टांगला.. गाडी राहिली बंगल्या बाहेर, आन रस्ता दिसेनासा झाला.. बरं झाल देवा, मला कोरोना झाला..!!!
प्रत्येक खोकल्याच्या उबळीनिशी, केली कर्म आठवत होती.. प्रत्येक अडकनाऱ्या श्वासासंगे, माणुसकीची जान साठवत होती.. पुण्यसंचय आला संपत, आणी ऑक्सीजन शॉर्ट झाला.. तेंव्हा कुठ देवा तुझ्यावर भरोसा आला.. बरं झाल देवा, मला कोरोना झाला..!!!
होती पैशांची मस्ती, आनं पदाचीबी गुरमी.. सगळं संपल देवा आता, आलीया पुरती नरमी.. जवा आता मिळालाय, गरिबा शेजारी खाट.. तवाच माझा जिरलाय, आता समदा थाट.. सगळ आठवुन आता, जीव घाबरा झाला.. बर झाल देवा मला कोरोना झाला..!!!
नाही दिली कोणा गरिबा कधी रुपया आणीक दमडी.. इथं सुयांच्या भोकानी, थकून गेलीया चमडी.. पै-पै कमावलेला, पैसा ना कामी आला.. बर झाल देवा मला कोरोना झाला..!!!
खर सांगतो मित्रांनो आता, पद, पैसा आणी खोटी प्रतिष्ठा हे सर्व काही व्यर्थ आहे.... देवा तुझ्या नामालाच फक्त या जीवनात अर्थ आहे... तुझ्या नामाचा धावा केला आणि तू धावून आला... बर झाल देवा मला कोरोना झाला..!!!
हरे कृष्ण श्रीकृष्णार्पणमस्तु!
Comments