मकरसंक्रांत या आजच्या दिवसाच महत्त्व माझ्यासाठी गेल्यावर्षी पासून अचानक बदललं ते बदललंच. गतवर्षी ते थोडक्यात इंग्रजी लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा नुकतीच हातात लेखणी चिकटली होती.जमेल त्या शब्दांत व्यक्त करण्याची धडपड चालू होती. आज पहाटे जाग आल्यापासूनच परत एकदा मराठी मध्ये त्या भावना नव्याने व्यक्त कराव्या म्हणून तीव्र ईच्छा प्रकट झाली आणि लिहायला बसलो. शेवटी श्रीकृष्णार्पणमस्तुच म्हणायचं आहे !
१४ जानेवारी, २०२१, मकरसंक्रांत / उत्तरायण. पहाटे साधारण ४:२० च्या सुमारास जाग आली. आन्हिक आटोपून ४:४० पर्यंत माझ्या नेहमीच्या जागेवर, माझे गुरू श्रीकृष्णांसमोर बसून श्रीमद् भागवत पुराणाच अध्ययन करायला बसलो. वाचन सुरू करण्यापूर्वी खालील श्लोकांद्वारे आत्मनिवेदन करून आणि संपूर्ण समर्पण करून मगच वाचायला घ्यावं असा दिनक्रम ठरलेला.
ॐ नमो भगवते वासुदेवाय।
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्।
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्॥
"नारायाणस्वरूप श्रीकृष्ण, नरस्वरूप नरश्रेष्ठ नारायण स्वामी,
देवी सरस्वती तसेच महर्षि व्यासांना नमस्कार करून पुराणचे पठण करावे."
नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवतसेवया।
भगवत्युत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी॥
"भागवताचे निरंतर श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते आणि ज्यांचे दिव्य स्त्रोतांनी स्तवन केले जाते, अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममय भक्ति दृढ रूपाने प्रस्थापित होते."
संपूर्ण श्रीमद् भागवत पुराण म्हणजे १२ खंडांच्या ग्रंथरूपात साक्षात श्रीकृष्ण आहे. पहिला खंड त्याचे कमळासारखे नाजूक पाय आहेत. तर दहावा खंड जो सर्वात मोठा आणि श्रीकृष्णाच्या लीलांनी भरलेली कृष्णगीता आहे. श्रीमद् भागवत पुराणाच्या पाहिल्या खंडातील नवव्या अध्यायाच वाचन मी अगदी मन लावून वाचण्याचा प्रयत्न करत होतो. जणू त्याच पादप्रक्षालन करून त्याला प्रणिपात करत होतो.
त्याचं त्याच्या भक्तांवरच अपार प्रेम विषद करताना महर्षी व्यासपुत्र शुकदेव गोस्वामी जेंव्हा गंगापुत्र पितामह भीष्म यांच्यातील आणि श्रीकृष्णातील भक्तीच नात उलगडून सांगताना म्हणतात, भीष्म प्रतिज्ञा आणि त्यांचं वचन पूर्ण करणं हे सर्वश्रुत असतानाही पितामह भीष्म यांनी अशी काही प्रतिज्ञा केली की कुरुक्षेत्रावर अभूतपूर्व क्षण घडला.
श्रीकृष्णाने महाभारताच युद्ध सुरु होण्यापूर्वी आपली १८ औक्षहणी नारायणी सेना किंवा मी असा प्रस्ताव कौरवांसमोर ठेवला तेंव्हा कौरवांनी श्रीकृष्णाला न मागता त्याची सेना मागितली होती आणि तरीसुद्धा श्रीकृष्णाने मी शस्त्र उचलणार नाही असा शब्द दिला होता आणि गंगापुत्रा भीष्म पितामह "मी" श्रीकृष्णाला शस्त्र उचलायला लावीन अशी प्रतिज्ञा करून बसले होते.
काय प्रसंग होता तो. एका बाजूला भगवंत स्वतः शब्द देऊन बसले होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा परम भक्त त्यांना त्यांचा शब्द मोडायला लावीन म्हणून अडून बसला होता. पण शेवटी त्या रणांगणावर काय झालं ते आपण जाणूनच आहोत. पितामह भीष्म आणि आणि श्रीकृष्ण - अर्जुन समोरासमोर उभे ठाकले होते. सामना खूप गंभीर स्वरुपाला येऊन पोहोचला होता. भीष्म पितामह यांचा पराक्रम आणि प्रतिष्ठा बघता अर्जुनाचा त्यांच्यासमोर निभाव लागणं शक्य नव्हत. पण प्राणप्रिय सखा अर्जुनाच्या रथाच आणि त्याच्या आयुष्याचं सारथ्यच तर त्या श्रीकृष्णाने स्वीकारलं होतं. भीष्मांच्या भात्यातून निघणाऱ्या बाणांनी त्या श्रीहरी श्रीकृष्णाची छाती, पीतांबर आतापर्यंत रक्तरंजित झालं होतं. आपल्या भक्तासमोर आपली हार मानण्यातला आनंद श्रीकृष्ण भीष्मांना पुरेपूर घेऊ देत होते. पण शेवटी वेळ येऊन ठेपली होती. तो क्षण आला होता. श्रीकृष्णाने आपल्या परम भक्ताच्या प्रेमाखातर स्वतःचा शब्द मोडला. चक्रधारी श्रीकृष्ण रथाचं चाक उचलून धावून गेला. अर्जुन त्याचा पायाशी कोसळला.
पुढे जे काही घडलं त्या नंतर भीष्म पितामह ईच्छा मरणाचं वरदान असूनही शरशय्येवर पुढील सहा महिने तसेच होते. महाभारताचा अभूतपूर्व संग्राम संपुष्टात आला होता. युधिष्ठिर भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट म्हणून सिंहासनावर विराजमान होणार होता. पण तत्पूर्वी श्रीकृष्णाचा परामर्श घेत पितामह भीष्म यांच्याकडून ज्ञान संपादन करावं म्हणून पुन्हा एकदा आज सगळे त्या शरशय्येवर पहुडलेल्या भीष्म पितामहांच्या समोर सर्व उभे होते. भीष्म पितामह आणि श्रीकृष्णाची नजरानजर झाली. त्यांनी नजरेनं श्रीकृष्णाला अभिवादन केलं. पुढे भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यात जो संवाद झाला त्यातून निर्माण झालं ते "श्रीविष्णूसहस्त्रनाम"!
आपलं राहिलेलं शेवटचं तेवढं कार्य आटोपत घेत गंगापुत्र पितामह भीष्म यांनी श्रीकृष्णाच दर्शन घेत आपला प्राणत्याग केला आणि मोक्षाची प्राप्ती करून घेतली. तो पवित्र क्षण होता "उत्तरायण" !
उत्तरायण सुरू झालं त्याच दिवशी माझ्याकडून हे श्रीमद् भागवत पुराणातून वाचून घेणं हा निव्वळ योगायोग कसा समजावा? सगळ्याच त्याच्या लीला. त्यानंतर काय झालं ते मला नक्की शब्दात नाही मांडता यायचं, पण टॅटू पार्लर गाठलं आणि श्रीकृष्णाच नाव माझ्या डाव्या हातावर कायमचं कोरल गेलं. त्यानंतर कोणतंही कर्म जाणते अजाणेतेपणी होताना तुझा विचार येऊदे ही भावना अजून प्रबळ झाली, मनात रुजत गेली. आयुष्यच श्रीकृष्णार्पणमस्तु झालं!
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
コメント