तुम्ही त्याची आठवण काढायचे थांबत नाही आणि तो मनकवडा तुमची ईच्छा पुर्ण केल्यावाचून राहत नाही. हरीसी करुणा येतेच!
२५ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी अंघोळ पांघोळ आटोपून आम्ही तिघे आणि आदल्या दिवशी आलेले माझे सासू सासरे असे आम्ही सगळे अयांशच्या तिसऱ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या गाडीने काबिनीच्या जंगलात वसलेल्या रिसॉर्टच्या दिशेने कूच केले. नेहमीपेक्षा निघायला तसा उशीर झाला होता त्यामुळे बँगलोरच्या ट्रॅफिक जाम मधून वाट काढत आम्ही आमची गाडी शेवटी बँगलोर बाहेरच्या दृगगती मार्गाला लावली. तोपर्यंत ९ वाजत आले होते. पोटात भुकेने कावळे, चिमण्या, वगैरे वगैरे सर्व काही थैमान घालू पहात होते.
या रस्त्याला नेहमीच्या खाण्याच्या ठिकाणी न जाता आज कुठे वेगळीकडे जावं असं उगाचच मनात आलं. नेहमीप्रमाणे सकाळी गाडीच्या स्टिअरिंगचा ताबा माझ्याकडे होता. आकांक्षा आणि सासूबाई मागे तर सासरेबुवा आणि अयांश शेजारी बसले होते. त्यांनी तोपर्यंत जवळ कोणती ठिकाणं आहेत बघायला सुरुवात केली. आमच्या पण बघण्यात बरीच चांगली खाण्याची सोय असलेली रेस्टॉरंट पाहण्यात आली होती पण ते सगळं सोडून कामथचं रेस्टॉरंट गाठायच ठरवलं.
जसं जसे एक एक टप्पा मागे टाकत चाललो होतो तसे रस्त्यात कित्येक चांगली सोय असलेली रेस्टॉरंट मागे सोडत होतो. या सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी असावी कारण त्यांचं पार्किंग अगदी खचाखच भरलेले दिसत होते. शेवटी आमच्या नियोजित स्थळी पोहोचलो. पण ते कामथ नव्हतं ते होतं माझ्या कृष्णाचं "वृंदावन". सगळं रिकामं. आम्ही सोडून अजून कोणीच गिऱ्हाईक नव्हतं.
गाडी लावली आणि आत प्रवेश केला. पहिली नजर कुठे गेली असेल तर ती त्या कृष्णाच्या आणि त्याच्या सोबत असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर. रेस्टॉरंट मध्ये एका बाजूला प्रशस्त जागा त्याच्या पूजेसाठी राखून ठेवलेली. अगदी नजर हटेनाच त्याच्यावरून. म्हणून त्याच्या जवळच्या टेबलावरच जाऊन बसलो. अशी पूजेची मांडणी केलेलं रेस्टॉरंट पहिल्यांदाच पाहण्यात येत होतं.
इतक्यात तिथल्या वाढपी काकांच्या कानावर आमचं बोलण पडलं असावं. "तुम्ही पण मराठी काय!" असं म्हणून ते आनंदाने आमच्याशी बोलू लागले. त्या हॉटेलच्या मालकाशी ओळख करून देत म्हणाले आम्ही मुंबईत ३० वर्ष काढली. पण मुळेचे मंगलोरचे. मग काय त्यापुढच्या पाहुणचारात कसलीही कमतरता राहिली नाही. खूप आपुलकी आणि प्रेमाने ते आग्रहाने वाढत राहिले. मी मात्र खाता खाता कृष्णाकडे बघत होतो. खाता खाता मध्येच एखादा आवंढा गिळत होतो. शेवटी फिल्टर कॉफी भुरके मारत घेतली आणि निघालो. बोलता बोलता सासूबाई म्हणाल्या "स्वामींना सांगू की यांचा धंदा छान चालू दे!"
गंमत म्हणजे परतीच्या वाटेवर दुपारचं जेवण परत तिथेच झालं. मी गरमगरम खिचडी खाऊन आणि थंडगार ताक पिऊन पुन्हा तृप्त झालो. हॉटेलचा मालक आमच्याकडे जातीने लक्ष देत होता. अयांशला कडेवर घेऊन फिरवून आला. २ दिवस आधी ज्या वाढपी काकांनी आमची ओळख करून दिली ते आज दमले म्हणून रजेवर आहेत म्हणाला. कारण गेल्या दोन दिवसांत गिऱ्हाईकांची खूपच रांग लागली होती म्हणे. ऐकून माझ्या चेहऱ्यावर समाधानाच हास्य उमटले. त्याने बहुतेक सासूबाईंची प्रार्थना ऐकली होती.
आम्हाला तिथे पाठविणारा पण तोच. प्रार्थना करून घेऊन घेणारा पण तोच. कोणाच्या प्रार्थनेत कोणाला ठेऊन कोणाचं भलं करून घेईल ते त्याच त्यालाच माहिती. कर्ता करविता - कृष्ण!
त्याने त्याच आयुष्य असा एक असा योग सांगण्यात वेचलं जे त्याने भगवद्गीतेमध्ये नाही मांडलं तर कृतीतून दाखवून दिलं. तो योग म्हणजे - प्रेमयोग!
- नयनेश गुप्ते श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
*"आम्हाला तिथे पाठविणारा पण तोच. प्रार्थना करून घेऊन घेणारा पण तोच. कोणाच्या प्रार्थनेत कोणाला ठेऊन कोणाचं भलं करून घेईल ते त्याच त्यालाच माहिती. कर्ता करविता - कृष्ण!"*
So very true...