३१ ऑगस्टला गणपती बसणार म्हणून ३० ऑगस्टला दाभोळे येथील मठात पोहचेन आणि त्यासाठी ३० ऑगस्टलाच पहाटे निघेन असं काहीसं नियोजन मनात होतं. पण नंतर एकंदर मुसळधार पाऊस बघून एका दिवसात पोहचू शकू की नाही शंका होती. त्याला एक कारण असं आहे की दाभोळे येथील मठात औदुंबराच्या खाली दत्तगुरूंच्या स्वयंभू पादुका असूनही हे ठिकाण नावारूपास आलेले नाही. हे ठिकाण घाटातील शेतात आणि गावकुसाबाहेरच्या वस्तीत दडलेले आहे. सूर्यास्तानंतर इथे पोहचणे थोडे अवघड होऊन बसते कारण घाटात मधूनच निघणारा अरुंद रस्ता सहज लक्षात येत नाही.
असा विचार करता करता २९ ऑगस्टची सुट्टी वाचवण्यासाठी २७ किंवा २८ तारखेलाच निघाव आणि मध्ये कुठेतरी थांबावं असं ठरलं. २७ की २८ की ३० असं करता करता करता शेवटी २८ तारखेला पहाटे घर सोडलं आणि कोल्हापूर येथे महालक्ष्मीच्या मंदिराजवळ शिवाजी पेठेतील एका हॉटेल मध्ये थांबलो. भर पेठेत गणपतीच्या दिवसात, रविवारी आणि ते सुद्धा महालक्ष्मी सारख्या शक्तीपीठा जवळ गाडी घेऊन जाणं म्हणजे दिव्य होतं.
२८ तारखेलाच महालक्ष्मी, दत्तगुरुंच आणि कृष्णाचं अपेक्षा सुद्धा नव्हती एवढं सुंदर दर्शन घडून आल्यामुळे मी मनातून खूप समाधानी होतो. २९ तारखेला आपण कोल्हापूरहून हॉटेल मध्ये बसून ऑफिसच काम करू असं डोक्यात होतं. २८ तारखेला पोहोचल्यावर मिसळ पावावर ताव मारता मारता नृसिंह वाडी इथून किती दूर आहे बघू असं डोक्यात आलं. पाहतो तर काय! तिथून अवघ्या सव्वा तासावर वाडी होती. मी यापूर्वी वाडीला कधीच गेलो नव्हतो पण ईच्छा मात्र होती. रविवारची गर्दी टाळण्यासाठी आपण उद्या पहाटे जाऊन ऑफिस सुरू होण्याआधी परत येऊ असा मनात विचार केला आणि त्याप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी पहाटे ५:१५ वाजता हॉटेल मधून सोबत काही न घेता मनोहर पादुकांच्या दर्शनाच्या ओढीने निघालो. ६:३० वाजता पोहचलो ते थेट महाराजांच्या पादुकांच्या जवळ. गर्दी सोडा पण पुजारी वगळता अगदी ५-६ लोकं असावीत. कितीतरी वेळ तिथेच पादुकांकडे पहात समोर बसलो. तेवढ्यात एक कुत्रा आणि कुत्री माझ्या समोर येऊन उभे राहिले. माझ्याकडच्या प्रसादातले काही पेढे त्यांना दिले. तेवढे समाधानाने खाऊन ते तिथून निघून गेले. नंतर मी तिथून उठलो आणि पादुकांना प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. गर्दी नव्हतीच त्यामुळे हळू हळू गर्दी होईपर्यंत प्रदक्षिणा चालूच होत्या आणि मुखाने नामस्मरण.
आता बराच वेळ झाला होता. ऑफिसच काम करण्यासाठी बसायचं आहे हा विचार अजून तरी बदलला नव्हता. वाडीच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडलो आणि समोरच एक ढाबा दिसला म्हणून न्याहारीसाठी थांबलो. पुन्हा मिसळ पाव येण्याची वाट पाहतच होतो की गौरी ताईचा फोन आला. तिला कालच्या आणि आजच्या दर्शनाचा वृत्तांत सांगताच तिने मला पहिला प्रश्न विचारला की - "अरे! शिरोळला जाऊन आलास का?"
श्री नृसिंह सरस्वती महाराज भिक्षा ग्रहण करण्यासाठी शिरोळ येथील एका ब्राम्हणाच्या घरी गेले असताना तेथील भिक्षापात्रावर उमटलेले ठसे आजही तिथे आहेत आणि त्या ठिकाणी त्या ब्राम्हणाच्या घराचं आता एका मंदिरात रूपांतर झालं आहे. त्या ब्राम्हणाची आताची पिढी त्या मंदिरास लागून मागच्या बाजूला राहतात. महाराजांची ही लीला गुरुचरित्रात वाचण्यास मिळते.
मी वाडी सोडून कोल्हापूर पोहोचण्यापूर्वी त्यावेळी गौरी ताईचा फोन येणं आणि त्यामुळे गाडी परत मागे वळवून शिरोळ येथे जाऊन भिक्षा पात्राच दर्शन घेणं हा निव्वळ योगायोग समजावा का?
शिरोळला सुद्धा गर्दी नव्हतीच. फक्त मी आणि गावातील २-३ जण. दर्शन घेऊन पुन्हा एकदा समाधानाने कोल्हापूरचा रस्ता धरला. अर्ध्या रस्त्यात होतो तेंव्हा असेच एक गुरुबंधू हर्षद ठोंबरे दादांचा फोन आला. त्यांनी चौकशी केली - "अरे नयनेश! कुठे आहेस? कुरवपूर जाऊन आलास का?"
माझं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण झालं तेंव्हा माझी कुरवपूर जायची अतिशय तीव्र ईच्छा होती. पण त्यावेळी कृष्णा नदीला पाणी खूप जास्त असल्यामुळे तेथील गुरुजींनी थोडे दिवस थांबण्याचे सूचित केले. त्यानंतर २-३ वेळा हाच प्रकार घडला. शेवटी श्रीपाद प्रभूंची ईच्छा नाही म्हणून मी मन खट्टू करून बसलो होतो. कुरवपूर येथील गुरुजींचा नंबर मला हर्षद ठोंबरे दादांनीच दिला होता. त्यांना हा वृत्तांत मी सविस्तर सांगितला. पण गंमत म्हणजे योगायोगाने हर्षद दादांचा फोन तेंव्हाच का आला हे मी सांगू शकत नाही. कारण जेंव्हा मी वाडीहून परत कोल्हापूर चाललो आहे सांगितलं तेंव्हा त्यांनी मला औदुंबर आणि खिद्रापुर शिवमंदिर याबद्दल विचारलं. औदुंबर तेथून जवळच आहे तेंव्हा तू जाऊनच ये असा त्यांनी आग्रह धरला.
तोपर्यंत मी कोल्हापूरचा रस्ता धरला होता. मनात एक गोष्ट लक्षात आली की आज काय ऑफिस आणि कामाचं खरं नाही. कोल्हापूर पोहचेपर्यंत उशीर झाला होता. त्याला कारण असं मी ज्या गूगल मॅपच्या भरवश्यावर पुढे पुढे चाललो होतो त्या भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात तशी गत झाली. कोल्हापुरात त्याने मला one way मध्ये गाडी घालायला लावली. तिथून कसाबसा बाहेर पडलो तर त्याला कोणत्या रस्त्याला ट्रॅफिक आहे याचा पत्ताच लागत नव्हता. गर्दीने खच्चून भरलेल्या भर बाजारात मी गाडी घेऊन शिरलो होतो. कोणालाही धक्का लागू नये या काळजीने मला तर घाम फुटला होता. कशी बशी वाट काढत मी हॉटेल पर्यंत पोहचलो.
१२:०० वाजून गेले असावेत. आता ऑफिस विषयी विचार करण्यात पण अर्थ नव्हता. आजच दाभोळे गाठू असं ठरलं. सामान बांधाबांध केली, हॉटेल सोडल आणि गाडीत बसलो. एकदा दाभोळे मठात स्वामींच्या सेवेत रुजू असणाऱ्या सिनकर काकांना एकदा फोन करावा असं वाटलं.
(कै.) श्री नारायण श्रीधर सिनकर घर, दार सोडून सिनकर काका उर्फ भाऊ या महात्म्याने गेली ३५ वर्षांहून अधिक काळ दाभोळे मठात राहून महाराजांची सेवा केली. स्वामींच्या या मठाची आणि त्यांची ओळख झाली आणि साधारण त्याच वेळी त्यांची मुंबईतली नोकरी गेली. स्वामींचे पट्ट शिष्य बाळप्पा महाराजांचे शिष्य श्री विष्णुपंत पानवलकर यांना स्वामींनी स्वतः दिलेल्या पादुका त्यांनी दाभोळे येथे स्थापन केल्या होत्या. पानवलकरांच्या पुढच्या पिढीतले एक गृहस्थ हे नारायण सिनकर यांचे जवळचे मित्र. त्या मित्राचे सुद्धा दुर्दैवाने याच वेळी निधन झाले आणि सिनकर काका मूळचे राजापूरचे असून दाभोळेचे झाले. आजही तिथे मठात जायचं म्हणजे गावात कसल्याही सोयी सुविधा बाजूला ठेऊन गावात तिथल्या लोकांत आणि मातीत मिसळून राहावं लागतं.
अचानक अशा तडका फडकी झालेल्या घटनांमुळे सिनकर काका स्वामींच्या सेवेत रुजू झाले. कसलं अवांतर वाचन नाही की मंत्र तंत्र नाही. पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वामींची सेवा, भक्ती आणि तेथील गावातल्या लोकांचे प्रश्न सोडवणे वगैरे असा साधारण दिनक्रम. या काळात खेडे गावांचे प्रश्न सोडवताना कितीतरी मोठ्या राजकीय व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला पण राजकारणात त्यांनी इतरांना पुढे केलं आणि स्वतः मात्र शक्य तितके अलिप्त राहिले. आपलं सर्वस्व त्यांनी स्वामींच्या चरणी अर्पण केलं होतं. त्यांच्या पहिल्या भेटीतच त्यांनी आम्हाला आपलंसं करून टाकलं होतं. त्यांच्या त्या निष्काम कर्मयोगाच मला कायम खूप कुतुहुल वाटलं. कर्मयोग समजायला जेवढा सोप्पा तेवढाच आचरणात आणण्यासाठी महाकठीण. सर्व काही स्वामींवर सोडून ते जगत राहिले. क्षयाने त्यांच्या शरीराला झिजवून संपवेपर्यंत.
सिनकर काकांचे आणि आमचे अधून मधून एकमेकांना फोन होत असतं. आमच्या सर्वांची ते खूप आपुलकीने चौकशी करत. एक प्रश्न त्यांचा कायम असे आणि तो म्हणजे - "कधी येताय आता?" गेल्या वर्षभरात त्यांची अवस्था खोकल्यामुळे फार बिकट झाली होती. गेल्या वेळी फोन झाला तेंव्हा - "एकदा भेटून जा." असं म्हणून त्यांनी फोन ठेऊन दिला. त्यांचा तो आवाज ऐकून आमचे धाबे दणाणले. मी त्यांच्यासाठी सोबत औषधं घेऊन निघालो होतो. म्हणून गणपतीत त्यांना तरी किमान भेटता यावं अशी ओढ लागली होती.
कोल्हापूरहून हॉटेल सोडलं आणि सिनकर काकांना फोन लावला. तो स्वाती ताईने उचलला. स्वाती ताई सिनकर काकांच्या सर्वात जवळची व्यक्ती. तिने सिनकर काकांना ॲंब्युलन्स मधून रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास घेऊन जात असल्याचे कळवले. ते ऐकून मला धक्का बसला. आता नक्की काय करावे कळत नव्हते.
औदुंबर आणि खिद्रापुर येथे जाऊन काकांसाठी दत्त महाराजांकडे प्रार्थना करावी म्हणून मी तेथून औदुंबरचा रस्ता धरला. औदुंबर येथे पोहचलो तेंव्हा दुपारचे १:३० वाजले होते. दर्शन घेतलं. इथेही गर्दी नव्हतीच. मोजकीच ५-१० माणसं. दर्शन झालं. तिथल्या गुरुजींशी संवाद साधला. त्यांनी तिथला अंगारा आणि पादुकांचे गंध सोबत दिले आणि म्हणाले खूप जपून वापरा. आता मनात वाटू लागलं की हे सगळं सिनकर काकांसाठीच असावं. थोडा वेळ तिथेच पादुकांसमोर बसलो. २-३ कुत्रे आले आणि सोबतचा थोडा प्रसाद खाऊन गेले.
तिथून निघणार इतक्यात समोर एकाने महाप्रसाद जेऊन जा म्हणून बोलावलं. कृष्णा नदीच्या घाटावर झाडाखाली मांडी घालून बसलो आणि पोटभर प्रसाद ग्रहण करून निघालो. तेवढ्या वेळात तिथलं कृष्णामाईचं संथ नितळ रूप न्याहाळत होतो. मध्येच कुठूनतरी मयुरांचा केकारव कानावर पडत होता. तिथेच दत्तगुरूंच्या सानिध्यात तासंतास बसून राहावं असं ते मनोहर दृश्य आणि तिथलं पावित्र्य.
पण तेवढा वेळ काढणं शक्य नव्हत. कोल्हापूर सोडलं होतं आणि सिनकर काकांना पाहिल्याशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं त्यामूळे पुढचे २ दिवस राहण्याची सोय गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरा समोर एमटीडीसी मध्ये झाली. गणपतीपुळे दाभोळेच्या पुढे अजून दीड तासांवर आहे आणि रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर. पण औदुंबर नंतर खिद्रापुर करून मग गणपतीपुळे पोहोचणं म्हणजे रात्र होणार होती. कोल्हापूर पुढे २००-३०० किमी घाटाचा रस्ता रात्रीच्या काळोखात कापायचा होता.
मी खिद्रापुरच्या दिशेने निघालो. पुन्हा एकदा एका कोण्या शहरात शिरलो. गूगल मॅपने मला पुन्हा एका चिंचोळ्या गल्लीत आणून सोडलं. एका वेळी एकच गाडी जाईल अशा त्या गल्लीच्या टोकाशी मी पोहोचणार इतक्यात एक बस समोरून आत शिरली. आता एकतर बस किंवा मी एकाला मागे जाणं भाग होतं. बस ड्रायव्हरने बस मागे घेण्यास सुरुवात केली खरी पण ती भर चौकात अडकली. काही केल्या तिथला ट्रॅफिक जॅम सुटेना. वेळ पुढे धावत होता. अर्धा तास असाच गेला. शेवटी दत्त महाराजांना म्हणालो आता नाही जाऊ शकत खिद्रापुर. पण काकांचं काय? मला गणपतीपुळे जाऊ द्या. ट्रॅफिक जॅम अगदी त्या क्षणाला सुटला.
गणपतीपुळे तिथून पुढे जवळपास ५ तासांचा रस्ता होता. पोहोचायला रात्री ९ वाजणार होते. मी गाडी पळवायला सुरुवात केली. पुन्हा पुन्हा गूगल मॅप मला शहरात गोल गोल फिरवत होता. महाराजांचं नाव घेऊन मिळेल तो रस्ता पकडून मी शेवटी कोल्हापूर सोडलं.
रस्त्यात लागलं ते दत्तावतारी चिले महराजांची समाधी - कासव मंदिर, पैजारवाडी. गाडी लावण्यास तिथे पुष्कळ जागा आहे. पटकन उतरून मी महाराजांसाठी राजगिऱ्याचे लाडू घेतले आणि त्यांच्या समाधीवर अर्पण केले आणि थोड्याच वेळात निघालो. निघता निघता तिथली शांतता पाहून आणि भक्त निवास पाहून वाटलं की एकदा इथे मुक्कामाला यावं.
आंबा घाट सोडला तोपर्यंत ७:३० वाजले होते. काळोख वाढत होता. रस्त्याच्या बाजूला घनदाट झाड. रस्त्याला मी सोडून अजून कोणी नव्हतं. गूगलने नेहमीचा रस्ता सोडून मला मध्येच गाडी 'साखरपा - देवरूख - संगमेश्वर' रस्त्याला लावली. रस्ता नुकताच नवीन बांधला होता. अगदी कोरा करकरीत दिसत होता. त्याच्या बाजूला नवीनच लावलेले रिफ्लेक्टर गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिव्यांनी उजळून निघावे तसे भासत होते. जणू काही दिवाळीची रोषणाई. रस्ता समजायला आजिबात त्रास होत नव्हता. गाडी सुसाट वेगाने पुढे चालली होती. एकीकडे "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" नामाचा गजर चालू होता. अधून मधून मी पुढचे गाणं लावलं तरी फिरून फिरून परत तेच वाजत होतं. असं वाटतं होतं श्रीपाद प्रभू त्यांचा विनोदी स्वभाव दाखवून हसत हसत त्यांच्या नेहमीच्या हाताची घडी घातलेल्या मुद्रेत बसून माझ्याकडे पाहत आहेत आणि जणू म्हणत आहेत - "काय झालं? तुला भीती वाटतं होती ना रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करायला?" त्या मागोमाग डोळ्यासमोर आजचा दिवस तरळला. काय विचार केला केला होता आणि काय घडतं होत हे सगळं कळण्याच्या पलीकडच होतं. ज्या क्रमाने घटना घडल्या आणि जेवढा वेळ जिथे कुठे गेला त्यामुळेच दुपारचं जेवण हे औदुंबर मध्ये शक्य झालं. "अन्नपूर्णा माई तूच जेऊ घातलसं ना?" असं मनात विचारलं आणि डोळ्यातून पाणी ओघळू लागले. म्हणता म्हणता कधी गणपतीपुळे पोहचलो लक्षात आलंच नाही. रात्रीचे ८:३० वाजले होते. पण अजून प्रवास संपला नव्हता. एक नवीन प्रवास सुरू होण्यात होता...
श्रीकृष्णार्पणमस्तु
Comments