राखी पौर्णिमा, सकाळी ६:०० वाजता ची वेळ. आदल्या दिवशी कविताजींनी पाठवलेल्या "देहाची तिजोरी" कानावर पडले मग त्यामागोमाग त्याचे गायक सुधीर फडके यांच "गीत रामायण" ऐकलं आणि त्यावर थोडी चर्चा झाली आणि का कोण जाणे मध्येच कुठून "कानडा राजा पंढरीचा.." समोर आले, शब्द स्फुरले आणि लिहीत सुटलो ते लिहितच सुटलो. फेसबुक उघडून कधी नव्हे तर तिथेच लिहीत सुटलो, एका क्षणी लिहून थांबलो आणि ते फेसबुकवर पोस्ट करून मोकळा झालो. शक्यतो मी अशा पोस्ट आजकाल फेसबुक वर करत नाही. कारण फेसबूक राहील की नाही आणि ते राहिलं तरी मी त्यावरून परत कधी गायब होईन याची मलाही खात्री नाही. असो ! त्यावेळी जे सुचलं ते आणि आषाढी एकादशीच्या वेळी लिहिलेल्या २ ओळी त्यात वाढवून तोच लेख इथे प्रस्तूत करत आहे.
आम्हाला वेदांचे ज्ञान आहे सांगून उहापोह करणारे वेदांताचे ज्ञान असणारे अनेक पंडित होऊन गेले. पण वेदांचे प्रयोजन ते काय? भगवंतांना जाणून घेणे आणि जमलं का ते वेदांना? "नेती नेती" म्हणून त्यांनीही मौन पाळले. कारण भगवंत कसे आहेत ? याच उत्तर भगवंतां सारखे असच असू शकतं. त्यांना कशाचीही उपमा कशी देता येईल? म्हणून ते भगवंत असे आहेत आणि भगवंत तसे आहेत असं म्हणण्या ऐवजी "नेती नेती" - "न-इति न-इति" म्हणजे भगवंत "असे नाही असेही नाही" असं सांगावं लागतं.
ज्याला सगुण निर्गुण म्हणजे काय द्वैत अद्वैत म्हणजे कळलं तो म्हणतो, निराकार निर्गुण असलेला परब्रम्ह आपल्या सामान्यांच्या चक्षुला ज्ञान व्हावं म्हणून पंढरीच वैकुंठ करतो. तो सगुण रूपात अबीर गुलाल उधळून नाचतो, नाम्याची खीर खातो, चोखोबाची गुरे राखतो, जनी सोबत दळण दळतो.
वेदांनाहि नाही कळला - कारण तो या वेदांच्या पलीकडे आहे. सामवेदाने सांगितलेला "तत्त्वमसी" आणि यजुर्वेदाने सांगितलेला "अहं ब्रह्मास्मि" म्हणजे तो परब्रम्ह आहे तर मी ब्रम्ह आहे. मी त्याचाच अंश आहे. हे द्वैत आहे. मी मानस पूजेत जाऊन त्याला आळवणी घालतो तेंव्हा तो डोक्यावर हात ठेवतो आणि द्वैत आणि अद्वैत मधली रेषाच पुसून टाकतो. कसलं द्वैत आणि कसलं अद्वैत. सगळे फक्त शब्दांचे खेळ. शब्दांनाही मांडणी करता आली असती तर वेद का कमी पडले असते? त्याच नादब्रह्म रूप त्यातल्या त्यात जवळच रूप म्हणजे ॐ. तो बेंबीपासून निघतो. हृदयात पोहचतो. हृदयातल्या परमात्म्याची गळा भेट घेतो. त्या मीलनाने अनाहत चक्र जागृत होते. तीच आहे त्याच्या वक्षस्थळी विराजमान श्री लक्ष्मी. श्रीवत्स चिन्ह. तिथून त्याला आज्ञा झाली की आज्ञाचक्राकडे म्हणजे भृकुटीकडे पोहचतो. जीवाच आणि शिवाच मिलन होतं. डोळे उघडता उघडत नाहीत. उघडायचा प्रयत्न केला की पाझर फुटतो. त्याच्या पायांना मिठीत घेऊन बसतो. तो हसतो.
विठ्ठल म्हणजेच साक्षात श्रीकृष्ण !
त्याला म्हटलं मी रस्ता चुकलो तेंव्हा तूच हातात भगवद्गीता दिली आणि त्या दिवशीपासून एक नवीन दिशा मिळाली.
आता कळलं तू विठ्ठल रूप का घेतलं. कृष्ण अवतारातच तू विठ्ठल झालास. रखुमाई सोबत पंढरी मध्ये उभा ठाकलास पण तुझ मोरपीस म्हणजे मायेचं प्रतिक तू मागे द्वारकेत ठेऊन आलास. सोबत जी माया घेऊन आलास त्या मायेने तू माऊली झालास. त्या मायेची उब सगळ्यांना हवीहवीशी वाटावी म्हणून तू अजूनही लीला करतोस. वारीला बोलावून घेतोस. ज्या क्षीरसागरावर वैकुंठात क्षीरोदकशायी विष्णू म्हणून पहुडला आहेस, त्या क्षीरसागरातले जल म्हणजेच गंगा, तिलाच चंद्रभागेच स्वरूप दिलंस. कारण वामन अवतारात तुझ्या अंगठ्याच्या स्पर्शाने चिदाकाशाला भोक पाडून गंगामाई म्हणून अवतरली, धरणीला छेदून ती रसातळाला जाऊ नये म्हणून भगवान शिवांनी ती डोक्यावर झेलली. आणि तू काय केलंस ? द्वारकेत मायेचं मुकुट सोडल म्हणून त्या शिवलिंगाला पुन्हा एकदा डोक्यावर घेऊन पांडुरंग झालास. पांडुरंग म्हणजे म्हणायला गोरा गोमटा कर्पुर शिवांचा रंग पण काळा ठीक्कर पाषाण मूर्ती. सगळाच विरोधाभास. हरि आणि हर वेगळे नाही सांगून परत एकदा शैव आणि वैष्णव म्हणवणाऱ्या सगळ्यांना तुम्ही सगळे माझी सगळी लेकरं म्हणून परत एकदा तुम्हा सगळ्यांना जन्म देणारी आणि तुमचं पालन पोषण करणारी माऊली मीच आहे म्हणून ते गोंडस हसतमुख घेऊन कंबरेवर हात ठेऊन उभा ठाकलास - जणू पुतळा चैतन्याचा!
सगळे म्हणतात हे कलीच युग आहे, ते विसरतात की तुझ्या विठ्ठल नामाचा गजर जिथे आहे तिथे कलिची काय बिशाद. उगाच का उभा आहेस आमच्यासाठी कंबरेवर हात ठेऊन. ग्वाही जी दिली आहेस तू की "तू फक्त माझ नाव घे ! बाकी तुझा योगक्षेम वाहून न्यायला मी समर्थ आहे"
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.......
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 🙏 खुप छान लिहिलय👍