शृगालपुत्र शुक्रदेव यास राज्याभिषेक करताना श्रीकृष्णाने ठेवलं होतं हे नाव - कोल्हापूर!
आज पहाटे सकाळी ४:४४ वाजता प्रवास सुरू झाला. साधारण ६२५ किमी अंतर कापून दुपारी १:३० च्या सुमारास कोल्हापुरात दाखल झालो. खरं तर कोल्हापूरला येणं हे शेवटच्या क्षणी ठरलेलं. त्यात एकट्याने गाडी चालवत एवढा लांबचा प्रवास करण्याची पहिलीच वेळ.
गेल्या वेळी आलो तेंव्हा कसबस दर्शन झालं होतं. आज रविवार, सुट्टीचा दिवस. मंदिराजवळ आलो तेंव्हा तिथला समुद्रासारखा जनसमुदाय पाहून मुंबईच्या स्टेशनची आठवण झाली. पावसाळ्यात गाड्या रद्द झाल्या की ब्रिज वरून अशीच गर्दी दिसायची. मुंबई सोडल्यापासून अशी गर्दी आत्ताच पाहत होतो. एरवी बँगलोर च्या रस्त्यावर तुंबलेल्या गाड्यांची गर्दी ऑफिसच्या खिडकीतून पाहतो.
बरं असो! सांगायचा मुद्दा असा की आता दर्शन कसं व्हायचं या चिंतेत गणपतीच्या आगमनाच्या तयारीत उत्साही असलेल्या गर्दीकडे कुतूहलाने पहात पुढे चालत राहिलो. मंदिराच्या पश्चिम दरवाजात पाऊल ठेवलं आणि मंदिराच्या लाऊड स्पीकरवर ओम जय जगदीश हरे बासरी साद घालू लागली. मी गदगदून गेलो. आता चिंता करायचं कारणच उरलं नव्हतं. अजून दोन पाऊल पुढे गेलो. माझ्या नजरेच्या सरळ रेषेत गाभाऱ्यातील महालक्ष्मी समोर दिसली. माई दिसली!
पुढच्या दोन मिनिटांत अजून जवळून दर्शन घडलं. तिथून बाहेर पडलो तर समोर श्री दत्तगुरु. गाभाऱ्यापाशी कोणी नव्हतं. मी लोटांगण घातलं. कालच श्री दत्त महात्म्य वाचून झालं. ते सोबत घेऊन फिरतो आहे. जणू महाराज सोबत आहेत!
तिथून वळलो, बासरी वाजतच होती. साद घालत होती. कारण आता समोर होता श्रीकृष्ण वासुदेव चतुर्भुज रूपात. त्याच दर्शन घेऊन परत अजून जवळून दर्शन घेण्यासाठी परत रांगेत उभा राहिलो. परत पाचव्या मिनिटाला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच दर्शन झालं. जणू श्रीदत्त आणि अनघालक्ष्मी च दर्शन झालं. प्रसाद परत देताना तिथल्या गुरुजींनी कमळाच फुल सोबत दिलं.
तो प्रसाद आणि ते फूल घेऊन आताही तिथेच बसलो आहे. मंदिराच्या आवरात लहान पोरं आईच्या अवतीभोवती गिरक्या घेत आहेत. बागडत आहेत. काही मुद्दाम पडणाऱ्या झडणाऱ्या पोरांकडे दुर्लक्ष करत आहेत. तर काही जणी त्यांच्याकडे लेकुरवाळ्या नजरेने पाहत आहेत.
गंमत म्हणजे समोर विराजमान बसलेली सर्वांची आई पण अशीच आपल्या सगळ्यांकडे पाहत आहे. स्मितहास्य करीत. मिश्कीलपणे
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तु
Comments