गजानन महाराज आणि स्वामी समर्थ, परब्रम्हाची दोन रुपं. स्वामी अशा काही मूर्ती रूपात घरी आले की संपूर्ण मूर्तीच दर्शन झाल्याशिवाय स्वामी आहे की गजानन महाराज कळता कळत नाही.
आज गजानन महाराजांचा प्रकट दिन. सकाळी नैवैद्य दाखवून झाल्यावर नमस्कार करताना अयांश म्हणाला - गणपती बाप्पा मोरया!! आणि हिरण्यगर्भ वाचताना आलेला स्वामी आणि गजानन महाराज भेटीचा प्रसंग डोळ्यासमोर आला तो असा -
"आज श्री स्वामी काही वेगळ्याच भावावस्थेत होते. सकाळपासून ते स्वत:शीच, ‘आज माझा गणपती येणार, आज माझा गणपती येणार’, असं पुटपुटत होते. जवळ असणार्या सेवेकर्यांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता. दुपारी साधारण बारा वाजायच्या सुमारला एक सोळा वर्षांचा तरुण मुलगा अक्कलकोटात आला. तो कोण होता आणि कोठून आला होता? हे कोणासही माहीत नव्हतं आणि कळायलाही काही मार्ग नव्हता. खरेतर अयोनीज शरीर धारण केलेला, जगाच्या उद्धारासाठी परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्याच आज्ञेनं प्रगट झालेला, तो एक दिव्य आत्मा होता. जणू तो श्री स्वामी समर्थांचंच प्रतिबिंब वाटत होता. तेजस्वी चेहरा, पीळदार देहयष्टी, आजानुबाहु हात, अत्यंत प्रेमळ आणि बोलके डोळे यामुळं त्याचं व्यक्तिमत्त्व अतिशय प्रसन्न वाटत होतं. हा मुलगा दुरून येत असलेला पाहून श्री स्वामी समर्थ अचानक उठून बसले आणि आरोळी ठोकून त्याच्या दिशेनं धावू लागले. त्यांना धावत येताना पाहून तो मुलगाही श्री स्वामींच्या दिशेनं धावू लागला. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघांच्याही नेत्रात प्रेमाचे अश्रू दाटून आले होते. हा असा प्रकार अक्कलकोटात प्रथमच घडत होता. श्री स्वामी समर्थांना असं काही करताना याआधी कुणीच पाहिलं नव्हतं. श्री स्वामींनी प्रेमानं त्या मुलाचे मुके घेतले आणि हात धरून त्याला वटवृक्षाकडे घेऊन आले. त्याला आपल्या मांडीवर बसवून त्याच्या डोक्यावर प्रेमानं हात फिरवू लागले."
गण गण गणात बोते - जीवा शिवाची प्रत्यक्ष भेट याची देही याची डोळा कित्येकांनी अनुभवली आणि हा प्रसंग वाचताना मी मनः चक्षुंनी! अलीकडेच स्वामींची मालिका पाहताना पुन्हा एकदा त्याच चित्रीकरण पाहण्याचा योग आला. वाचलेलं आठवून, चित्रीकरण पाहून आणि ज्यांना स्वतःला महराजांच्या सहवासाचा योग आला, ते सगळं विचार करून सारखं वाटत, परब्रम्ह किती कृपाळू आहे! त्यांनी अवतार नसता घेतला तर? आणि त्या लीलांमागचं सगुण रूप कधी जाणून घ्यायचा प्रयत्नच करता आला नसता तर ? आज आयुष्य खूप वेगळीकडेच भरकटल असतं....
श्री स्वामी समर्थ 🙏🏽
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
🙏🌹Swami Om🙏🌹