top of page
Writer's pictureNayanesh Gupte

गोकुळाष्टमी तना-मनातली

"अक्कल गहाण टाकली होती" , "अक्कल शेण खायला गेली होती" असे काही प्रेमळ वाकप्रचार आपण बऱ्याचदा ऐकले आहेत. मी तर हे स्वतःला सुद्धा ऐकवले आहेत. पुढे मांडलेल्या विचारांत त्याची थोडी कारणीमीमांसा करणार आहे. गंमत म्हणजे गोकुळ अष्टमीच औचित्य साधून माझे गुरू श्रीकृष्ण यांनी सांगितलेले हे काही विचार.


तसं म्हणायला गेलं तर आपल्या या देहाची आणि इंद्रियांची राणी म्हणजे बुद्धी तर राजा म्हणजे मन. या जोडीमध्ये खर तर राजापेक्षा सरस आहे ती राणी. कारण ती स्वभावाने प्रॅक्टीकल आहे तर मन कल्पनाविलासी आणि भावूक. तिला राजाचा स्वभाव पटत नाही पण राजा तिच्या अधीन असला तरी तो राजा आहे आणि तो त्याचे निर्णय राणीला पटत असो वा नसो! शेवटी घ्यायचे तेच घेतो.


या राज्याला सहा बाजूंनी शत्रूने वेढले आहे. लक्षात आलंच असेल कोण आहेत हे सहा शत्रू. षड्रिपू - काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. पण हे शत्रू खूप चलाख आहेत. ते कधीच आक्रमण करीत नाहीत. ते पाठवतात आपले फितूर! कारण त्यांना या राजाचा पराभव आक्रमण न करताच कसा करावा हे त्याच्या कल्पनाविलासी स्वभावामुळे कळले आहे. यातील ज्या शत्रूचा जोर जास्त तो शत्रू राजाला तेवढी जास्त भूरळ पाडतो आणि त्याला राणीपासून शक्य तितकं दूर ठेवतो. मोहिनीच म्हणायला हरकत नाही. जसं तिने दैत्यांना आपल्या रूपाच भूरळ पाडून खर अमृतं कधी पाजलच नाही तसं हे फितूर मोहिनी रूपात राजाला भूरळ पाडत रहातात.


आपल्या मनाला यातल्या कोणत्या शत्रूच्या मोहिनीने जास्त भूरळ पाडली आहे बघायचं असेल ५ मिनिट डोळे बंद करून कसलाही विचार न करता शांत बसून पाहावं की जमतंय का?

कोणाला या ५ मिनिटांत कोणाचा राग जाणवेल, तर कोणाला एखादा जण आपल्यापेक्षा पुढे कसा गेला याची जाणीव होईल. कोणाला आपल्याला अमुक अशी मोठ्या पगाराची नोकरी मिळाली किंवा अमक्या किमतीची ऑर्डर मिळाली तर कसा फायदा होईल आणि आपण त्यातून काय काय करू शकू याचे विचार पछाडून टाकतील. तर कोणाची भोगविलासी वृत्ती संभोग घेण्यापलीकडे जाऊच शकणार नाही. एखादा दुर्दैवी असाही असतो ज्याला यातले एकाहून अधिक किंवा सगळेच विचार डोक्यात थैमान घालतात. थोडक्यात मन या शत्रूंच्या कचाट्यात पूर्णतः सापडले आहे याची खात्री करून घ्यायची ही सोप्पी कृती. पण यात पण गंमत अशी असते की, कधी कधी हे शत्रू एवढी प्रबळ मोहिनी घालतात की "यात वाईट काय आहे?" हा विचार मनाच्या आसपास सुद्धा भटकत नाही. कारण या शत्रूंनी राणीची मुस्कटदाबी केलेली आहे याची राजाला कल्पनाच नसते. उदाहरण सांगायचे झाले तर, एखाद्याच्या मनात सूडाची भावना एवढा जोर घेते की, त्या भावनेच्या आहारी जाऊन आपण समोरच्याला संपवले तर आपणही सुळावर चढू याचीही त्याला तमा बाळगायची नसते. त्या मनाला हे भौतिक जगातील ऐश्वर्य म्हणजेच अमृत वाटतं म्हणून या भौतिक जगातील सुख घेण्यात तो गुरफटून जातो आणि एक शरीर जीर्ण झालं की ते सोडून परत दुसऱ्या शरीरात प्रवेश घेत राहण्याच्या अविरत चक्रात फसतो!


आपलं नशीब चांगलं आहे की आपल्या आजूबाजूचे सर्व जण मनकवडे नाही किंवा आपण आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार बोलून दाखवण्याची आपल्यावर सक्ती नाही. कारण फार कमी असे लोक आहेत ज्यांच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा समोर मांडण्याजोगा शुद्ध आणि निर्मळ असतो. या वैचारिक विकाराचे कारण असतात आपल्या पूर्व कित्येक जन्मांचे संस्कार. प्रत्येक जन्मात हे आपल्या मनाभोवती एक कोष तयार करतात आणि कित्येकदा आपल्याला नको असलेले विचार पण विचार करायला भाग पाडतात. शुद्ध आणि निर्मळ विचार म्हणजे त्या पांढऱ्या शुभ्र लोण्याच्या गोळ्यासारखे आहेत. ताकाला घुसळून लोणी काढतात, तसच मनातल्या विचारांना नामस्मरणाने घुसळून घुसळून त्यावर शुध्द निर्मळ विचारांचा थर जमा होतो, तेंव्हा कुठे जाऊन तो "चोरायला" कान्हा त्या मनाच्या मडक्याला हातात घेऊन त्यातल्या लोण्याचा आस्वाद घेतो. मनाभोवती षड्रिपूंनी विणलेली कोळीष्टकं तो दूर करतो. त्याच्या स्पर्शाने आता मन कृष्णमय होऊन जाते. हाच अर्थ आहे त्याच्या लोणी "चोरण्या" मागच्या लीलेचा. कारण ते मन एवढं शुद्ध होतं की त्या चोरीला चोरी म्हणूच शकत नाही. बाळ कृष्णाच्या लोणी खाण्याला चोरी सारखा शब्द कसा जोडणार. जे त्याचच आहे, ज्या मनावर आणि त्यातल्या विचारांवर ज्याचा पूर्ण अधिकार आहे त्याला त्याचा आस्वाद घेताना बघणं याहून अधिक रम्य ते काय!


त्याने अष्टमीला कारागृहात आठवा पुत्र म्हणून जन्म घेतला आणि गोकुळात नांदला याचा अर्थ पण त्या मनाशीच जोडलेला आहे. देवकीचे पहिले ६ पुत्र मारले गेले, सातवा बलराम आणि आठवा कृष्ण! कोण होते हे सहा पुत्र ? येतंय का काही लक्षात? हो हो. तेच वर उल्लेख केलेले सहा - षड्रिपू. त्यांचा संहार होतो, बलदेव किंवा बलराम रूपात बुद्धीला बळ प्राप्त होत आणि मग मन आणि बुद्धी कृष्णाच्या अधीन होते. कृष्णाचा जन्म होतो. शरीर रूपी कारागृहात त्या "राजा" "राणीचं" (मन /वसुदेव - देवकी /बुद्धीच ) तो संरक्षण करण्याची आणि त्यांना वेळ आली त्यातून मुक्ती देण्याची तो ग्वाही देतो. मनाला कसलीही सीमा नाही. शरीर रूपी कारागृहाची पण नाही. ते स्वच्छंद आहे. म्हणून वसुदेव (मन) कारागृहाच्या बेड्या शिथिल झालेल्या पाहून आणि इंद्रिय रूपातील सैनिक झोपलेले पाहून कृष्णाला गोकुळात स्थलांतरित करतात आणि सोबत घेऊन येतात ती त्यांची बहीण म्हणून जन्म घेतलेली शक्ती - योगमाया - दुर्गा! आता कृष्ण दूर आहे तोपर्यन्त त्या कृष्णाचच ध्यान करायचं आहे, त्याचंच नाव घ्यायचं आहे!

पुढील उर्वरित लेख म्हणजे परत एकदा या लेखाची सांगता कशी व्हावी म्हणून त्यानेच केलेलं प्रयोजन आहे कारण लेख लिहायला बसलो आणि हा मेसेज माझ्यापर्यंत पोहचला !


गोकूळ

'गो' म्हणजे इंद्रिय व 'कुळ' म्हणजे घर. इंद्रियांचे घर म्हणजे प्रत्येक शरीर. हे शरीर जो चालवितो, त्याचे पालन करतो गोपाळ (कृष्ण).


अष्टमी

अष्ट म्हणजे आठवा (स्मरा). शरीराच्या द्वारे जो "मी मी" म्हणतो तो खरा मी आहे कृष्ण.


"मी" हा शब्द उठे जिथे।

स्वरूप ते सत चित सुखात्म्या तुझे॥

देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे।

ते तु स्वंये ना दुजे॥


याचाच अर्थ 'मी' हे स्फुरण त्या कृष्णा तुनच येते व सर्व शरीरे, जे जे दिसते आहे त्या सर्व उपाधी व विश्व या सर्वांच्या रुपाने तोच आहे. चराचरात व्यापलेला तोच आहे.


गोपाळ

गो म्हणजे इंद्रिय व पाळ म्हणजे पालन करणारा.


आपल्याच शरीररुपी गोकूळात असणार्‍या "खर्‍या मी" चा म्हणजेच गोपाळाचा आठव (अष्ट) अर्थात स्मरण करता करता तोच प्रगट होणे (तत्त्वमसि - तत् त्वम असि - तो तूच आहेस ) म्हणजे गोकुळाष्टमी (कृष्ण जन्माष्टमी).

हा गोपाळ आपल्याच ठिकाणी जन्माला आला की मिळतो तो आनंदाचा गोपाळ काला. अशी खरी 'गोकुळाष्टमी' आपल्या सर्वांच्या जीवनात साजरी व्हावी, हीच आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा !!




186 views0 comments

Comentarios


bottom of page