सगळ्या गोष्टी कशा जुळून येतात! शनिवारी श्रीशंकरलीला वाचायला घेतली. शंकर महाराज 'अष्टावक्र' होते आणि त्या अनुषंगाने अष्टावक्र गीता कशी सांगण्यात आली याच वर्णन श्रीशंकरलीला मध्ये सापडतं. अष्टावक्र ऋषी आणि अष्टावक्र गीता फारशी सगळ्यांच्या जाणण्यात किंवा ऐकण्यात नसते. पण ती ज्या प्रसंगी सांगण्यात आली तो प्रसंग खरच खूप बोधप्रद आहे. त्यामुळे मला त्यातून ज्या गोष्टींची सांगड घालायची आहे ती विशद करण्याअगोदर तो प्रसंग संक्षिप्त स्वरूपात का होईना वर्णून सांगणं मला आवश्यक वाटत.
अष्टावक्र ऋषींचे वडील प्रकांड पंडित होते पण त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा तेवढाच गर्व होता. अष्टावक्र गर्भात असताना आपल्या वडिलांना उद्देशून आणि त्यांची अवहेलना करून म्हणाले की त्यांचं हे ग्रंथ वाचून मिळवलेलं शाब्दिक ज्ञान सर्व व्यर्थ आहे कारण हे शाब्दिक ज्ञान जर तुम्हाला तुमच्या अंतरंगाच दर्शन घडवून तुम्हाला तुम्ही कोण आहात याची जाणीव करून देऊ शकत नाही तर असलं ज्ञान काय कामाचं ?
अर्थात अष्टावक्रांच्या वडिलांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी अष्टावक्रांना शाप दिला की - "तू आठ अंगांनी वाकडा होऊन जन्माला येशील" आणि तसंच झालं आणि म्हणून नाव सुद्धा अष्टावक्र पडलं.
याच अष्टावक्रांचे प्रकांड पंडित वडील एकदा जनक राजाच्या दरबारात विद्वांनांशी वेदान्तावर चर्चा करत असताना अष्टावक्र दरबारी येऊन पोहचले. त्यांना पाहून दरबारात हशा पिकला. त्यावर अष्टावक्र पण हसले. जनक राजाला आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांच्या हसण्याच्या कारणाबाबत अष्टावक्रांकडे पृच्छा केली असता ते म्हणाले या चांभारांच्या सभेत होणाऱ्या वेदान्ताच्या चर्चेस पाहून त्यांना हसू वाटले. तिथे उपस्थित विद्वानांना चांभार संबोधल्यामुळे सर्व अवाक झाले. त्यावर अष्टावक्र म्हणाले की- "या सर्वांना माझं अष्टावक्र शरीर दिसतं आहे त्याच्या आतील "सरळ मी" दिसत नाही!"
या एका वाक्याने राजाला उद्विग्न करून सोडले. त्याला त्या रात्री आपण पण हसलो या विचाराने झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी राजाने अष्टावक्रांना विनंती करून बोलावून घेतले आणि स्वतःच्या सिहासनावर बसवले. त्यानंतर जनक राजाला जो बोधप्रद उपदेश केला गेला तीच "अष्टावक्र गीता" !
ज्या एका वाक्याने जनक राजाची झोप उडाली ते वाक्य खरचं खूप विचार करायला लावणारे खळबळजनक वाक्य आहे! काल सोशल मीडिया ड्रग केस मध्ये सापडल्या गेलेल्या एका चित्रपट सृष्टीतील 'दिग्गज' कलाकाराच्या मुलाच्या अटकेच्या बातमीने भरून गेला होता. त्या बातमीला मिळालेली प्रसिद्धी ही खरचं एका अर्थाने खूपच आश्चर्यकारक आहे. कला क्षेत्राचा 'एक भाग' म्हणजे चित्रपट सृष्टी. या चित्रपट सृष्टीला आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांना गेल्या काही दशकांत लोकांनी प्रमाणाबाहेर डोक्यावर घेतलं आहे. त्यांच्यातील एखाद पात्र रंगवण्याची कला राहिली बाजूला आणि त्यांच्या बाह्य सौंदर्यावर, त्यांनी घातलेल्या कपड्यांवर म्हणा किंवा काढलेल्या कपड्यांवर म्हणा लोकांचं एवढं लक्ष केंद्रित झालं आहे की त्यांची परस्थिती जनक राजाच्या दरबारातील 'चांभारांसारखी' झाली आहे. लोकांना दिसत आहे ते बाहेर लोळणार चांबड ! त्या चांबड्याच्या आतील खरा "तो" सरळ आहे वाकडा याच्याशी कोणाला काहीच घेणंदेणं नाही. मी म्हणजे हे शरीर नाही, ही गोष्ट अजून लोकांच्या तितकीशी पचनी पडत नाही.
जवळपास एक वर्ष झालं! हिंदी इंग्रजी सिनेमे बघणंच सोडून दिल आहे. गेल्या वर्षभरात कोणते सिनेमे आले, गेले, त्यांची कोणती गाणी आली गेली काहीच कल्पना नाही आणि घेणंदेणं पण नाही. आता त्यातल्या बहुतांश सिनेमांमधून केलं गेलेलं नको त्या गोष्टींचं उदात्तीकरण पाहवत नाही. परत कधी कोणताच सिनेमा बघणार नाही असा संकल्प केलेला नाही, पण तसे दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाल्यास का नाही पाहणार ? कलाकारास डोक्यावर खुशाल उचलून घ्यावं पण त्याने केलेल्या मनोरंजनासाठी, विचार करायला भाग पाडेल किंवा खरंच काळजाला हात घालेल अशा करून दाखवलेल्या कौशल्याबाबद्दल. त्यांच्या बाह्य रंग रूपावर मोहून जाऊ नये. ते पडद्यावर दिसतात तसे प्रत्यक्ष आयुष्यात नाहीत. तुम्हाला त्यांचं काम किती आवडलं यापेक्षा जास्त रस त्या चित्रपटातून त्यांनी किती कमाई केली याकडे जास्त असेल तर आपण दर्जेदार अभिनयास मुकणार आहोत किंबहुना मुकत आहोत!
काल "आर्ट ऑफ लिविंग" सारख्या अध्यात्मिक मार्गाला लावणाऱ्या संस्थेच्या एका निस्सीम भक्ताची या ड्रगच्या केस वरून टीका आणि थट्टा उडवणारी एक पोस्ट फेसबूक वर पाहिली. दुर्लक्ष करून पुढे गेलो तर त्याच व्यतीच्या अजून एक-दोन पोस्ट त्याच विषयावर आणि तशाच स्वरूपाच्या! परत दुर्लक्ष केलं. परत अजून काही तशाच पोस्ट. आता मात्र मला कुतुहूल वाटलं. त्या बातमीच नाही तर त्या बद्दल 'नकारात्मकता' दर्शवणाऱ्या त्या व्यक्तीच. थोडं अजून पुढे पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की या व्यक्तीने "नाव ठेवण्यासाठी" म्हणून गेल्या २ तासांत या बातमीवर बाष्कळ अशा एक दोन नाही तर तब्बल वीस पोस्ट लिहिल्या होत्या. यावर काय म्हणावं मला काही सुचलंच नाही.
खरं तर त्या व्यक्तीवरच काय, तर कोणत्याही व्यक्तीवर आपण टीका करावी एवढी आपली पात्रता खरच आहे का ? हा मला आजकाल प्रश्न पडतो. एखाद्यावर टीका करायची म्हणजे तो जे काही करतो आहे, बोलतो आहे, वागतो आहे त्याला आपण चुकीचं ग्राह्य धरण. एखादी गोष्ट बरोबर की चूक हे ठरवताना आपण एखादा संदर्भ पकडून किंवा स्वतःला, स्वतःच्या मताला बरोबर पकडून समोरचा टीकेस पात्र आहे असा ग्राह्य धरणं. म्हणजे यात मी मोठा असल्याचा अहंकार आला आणि त्या अहंकाराची बाधा आली. अशा प्रसंगी माझ्या मते एखाद्या विचार प्रणालीचा विरोध विचार प्रणालीने करावा, त्याच्या आणि स्वतःच्या अंतरंगात वाकून आणि अर्थात त्याच उदात्तीकरण तेवढंच करावं जेवढी त्याची आवश्यकता आहे. नाहीतर आपण सगळेच ठरतो फक्त चांभार ! बाहेरच्या कातडीवरून पारख करणारे !
खालील फोटो हा शंकर महाराज बालगंधर्वांचं नाटक पाहतानाचा आहे.
Comments